पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले


सेवा हे भारतीय संस्कृतीचे मध्यवर्ती मूल्य आहे: पंतप्रधान

‘सेवा परमो धर्मः’ या तत्वाने आपल्या संस्कृतीला तिचे अंतर्गत सामर्थ्य प्राप्त करून देत बदल आणि आव्हानांनी भरलेल्या शतकांच्या वाटचालीतून भारताला खंबीर ठेवले आहे: पंतप्रधान

श्री सत्य साई बाबा यांनी सेवेला मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवले: पंतप्रधान

श्री सत्य साई बाबा यांनी अध्यात्माला समाज सेवा आणि मानव कल्याणाच्या साधनात परिवर्तीत केले: पंतप्रधान

व्होकल फॉर लोकलच्या भावनेला आणखी बळकट करण्याचा निर्धार करूया; विकसित भारताची उभारणी करण्यासाठी आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला सक्षम केले पाहिजे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 19 NOV 2025 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर 2025

 

भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात “साई राम” उच्चारून केली आणि पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर सर्वांमध्ये उपस्थित राहणे हा अत्यंत भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. थोड्या वेळापूर्वी बाबांच्या समाधीवर पुष्पांजली वाहण्याची संधी मिळाली असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. बाबांच्या चरणांशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर अंतःकरण  भरून येते यावर त्यांनी भर दिला.  

श्री सत्य साई बाबा यांचे जन्मशताब्दी वर्ष हा या पिढीसाठी केवळ एक सोहोळा नव्हे तर तो एक दिव्य आशीर्वाद आहे हे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की बाबा आत्ता शारीर अवस्थेत आपल्यात उपस्थित नसले तरीही त्यांची शिकवण, त्यांचे प्रेम आणि त्यांची सेवा भावाची उर्जा जगभरात सर्वांना मार्गदर्शन करत राहणार आहे. जगातील 140 पेक्षा जास्त देशांमधील असंख्य लोक नवीन प्रकाश, दिशा आणि निर्धारासह आगेकूच करत आहेत हे त्यांनी ठळकपणे नमूद केले.

श्री सत्य साई बाबा यांचे जीवन म्हणजे वसुधैव कुटुंबकम संकल्पनेच्या आदर्शाचे सजीव मूर्त रूप होते हे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, “म्हणून हे जन्मशताब्दी वर्ष वैश्विक प्रेम, शांती आणि सेवेचा भव्य सोहोळा बनले आहे.” बाबांच्या सेवेच्या वारशाचे दर्शन घडवणारे 100 रुपये मूल्याचे स्मृती नाणे तसेच विशेष टपाल तिकीट जारी करणे हे सरकारचे भाग्य आहे अशा भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी पंतप्रधानांनी भाविक, स्वयंसेवक तसेच बाबांच्या जगभरातील अनुयायांना मनापासून शुभेच्छा देत सदिच्छा व्यक्त केल्या.  

"भारतीय संस्कृतीच्या केंद्रस्थानी असणारे मूल्य म्हणजे सेवा" असे उदगार काढत पंतप्रधानांनी भारताच्या वैविध्यपूर्ण अशा सर्व आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक परंपरा शेवटी त्याच आद्राषा आदर्शांपर्यंत  जाऊन पोहोचतात, असे अधोरेखित केले. व्यक्तीने भक्तिमार्ग अवलंबू दे की ज्ञानमार्ग की कर्ममार्ग- प्रत्येक मार्ग सेवेशीच जोडलेला आहे. सर्वांभूती असणाऱ्या दिव्यत्वाची सेवा करण्यावाचून भक्ती ती कोणती, इतरांप्रति करुणा जागवत नसेल तर ते कसले ज्ञान, आणि एखाद्याचे काम ही जर समाजाची सेवा नसेल, तर ते कसले कर्म? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "सेवा परमो धर्म: या तत्त्वाच्या बळावरच अनेक  शतकांपासून भारताने परिवर्तनाच्या आणि आव्हानांच्या  लाटा झेलल्या आणि तो तग धरून राहिला. त्यातून आपल्या संस्कृतीला तिची स्वतःची एक आंतरिक शक्ती मिळाली- यावर भर देत पंतप्रधानांनी असे नमूद केले की अनेक महान संत आणि सुधारकांनी त्यांच्या-त्यांच्या काळाला उचित ठरेल अशा पद्धतीने हा कालातीत संदेश अनेक शतकांपर्यंत वाहून आणला आहे. सत्य साईबाबा यांनी मानवी जीवनाचा गाभा म्हणून सेवेचा विचार मांडला, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. सत्यसाईबाबांच्या 'Love All, Serve All- सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा' या शब्दांचे स्मरण करून देत, 'सेवा म्हणजे कार्याद्वारे झालेले प्रेम'- असे बाबांना वाटत  असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शिक्षण, आरोग्यसेवा, ग्रामविकास आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या बाबांच्या अनेक संस्था म्हणजे त्यांच्या या तत्त्वज्ञानाचा जागता पुरावा होय असे पंतप्रधान म्हणाले. अध्यात्म आणि सेवा एकमेकांपासून भिन्न नाहीत, तर एकाच सत्याचे ते दोन अविष्कार आहेत- हेच या संस्था दाखवून देतात, असे त्यांनी अधोरेखित केले. शारीरिक अस्तित्व शिल्लक असताना लोकांना प्रेरणा देणे ही असामान्य गोष्ट नाही, बाबांच्या संस्थांची सेवाकार्ये मात्र त्यांचे शारीरिक अस्तित्व नसतानाही दिवसेंदिवस वृद्धी पावत आहेत- याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. यावरून हेच दिसते की, खऱ्या महात्म्यांचा प्रभाव सरत्या काळानुसार ओसरत नाही, तर उलट वाढत जातो, असेही ते म्हणाले.

श्री सत्य साईबाबांची शिकवण केवळ पुस्तके, ग्रंथ किंवा एखाद्या आश्रमाच्या सीमांपुरती कधीच मर्यादित नव्हती, तर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव लोकांमध्ये प्रत्यक्ष दृश्यमान आहे- असे पंतप्रधान म्हणाले. शहरांपासून ते दुर्गम खेड्यांपर्यंत, शाळांपासून ते आदिवासी पाड्यांपर्यंत भारतभरात संस्कृती, शिक्षण आणि वैद्यकीय सेवांचा लक्षणीय ओघ दिसून येतो. बाबांच्या लक्षावधी अनुयायांनी स्वतःला या कार्यात निःस्वार्थपणे झोकून दिले आहे, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. 'मानवसेवा हीच माधवसेवा' हे बाबांच्या भक्तांचे परमोच्च आदर्शभूत तत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले. करुणा, कर्तव्य, शिस्त आणि तत्वज्ञानाचे सार यांना मूर्तिमंत स्वरूप देणारे अनेक विचार बाबांनी भक्तांमध्ये रुजवले, असे सांगून पंतप्रधानांनी बाबांच्या- "सदैव मदत करा, कदापि कोणाला दुखवू नका' आणि 'कमी बोला, अधिक काम करा' या मार्गदर्शक तत्त्वांचे स्मरण केले. श्री सत्य साईबाबा यांनी दिलेल्या अशा जीवनमंत्रांचे प्रतिध्वनी आजही भक्तांच्या अंतःकरणांमध्ये निनादत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

श्री सत्य साईबाबांनी समाजाच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग केला असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि निःस्वार्थ सेवा, चरित्रनिर्माण, आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाशी त्याचा संबंध जोडून दाखवला. बाबांनी कोणतेही तत्त्वज्ञान लादले नाही, तर गरिबांना मदत करण्यासाठी आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी कार्य केले, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गुजरातच्या भूकंपानंतर मदतकार्यासाठी बाबांचे सेवादल आघाडीवर होते, याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. बाबांच्या अनुयायांनी अनेक दिवस पूर्ण समर्पणानिशी सेवा केली नि भूकंपग्रस्त कुटुंबांपर्यंत मदत, अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्यात व मानसिक आधार देण्यात मोलाचे योगदान दिले असे पंतप्रधानांनी सांगितले.  

जर एखाद्याचे एकाच बैठकीत हृदय परीवर्तन होऊ  शकले किंवा त्याच्या जीवनाची दिशा बदलता आली तर त्यातून अशा व्यक्तीची महानताच स्पष्ट होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.या कार्यक्रमातूनही,बाबांच्या  संदेशामुळे अनेक व्यक्तींचे जीवन पूर्णपणे बदलले आहे, असे त्यांनी नमूद केले.

श्री सत्य साई बाबा यांच्या प्रेरणेने, श्री सत्य साई केंद्रीय धर्मादाय संस्था (सेंट्रल ट्रस्ट) आणि त्यांच्या संलग्न संस्था संघटितपणे, संस्थात्मक आणि दीर्घकालीन पद्धतीने आपले सेवाकार्य पुढे नेत आहेत याबद्दल समाधान व्यक्त करून, मोदी म्हणाले की आज हे एक व्यवहार्य प्रारुप म्हणून आपल्यासमोर उभे आहे.

पाणी, गृहनिर्माण, आरोग्यसेवा, पोषण, आपत्कालीन मदत आणि स्वच्छ ऊर्जा यासारख्या क्षेत्रात होत असलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.रायलसीमा येथील पिण्याच्या पाण्याच्या तीव्र संकटाला तोंड देण्यासाठी ट्रस्टने टाकलेली 3000 किलोमीटरहून अधिक लांबीची पाईपलाईन ; ओडिशातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी बांधलेली 1000 घरे आणि रुग्णसेवेसाठी कोणतेही शुल्क न आकारता गरीब कुटुंबांसाठी आश्चर्य वाटण्यासारखी अत्याधुनिक  रुग्णालये,अशा अनेक सेवा उपक्रमांचा पंतप्रधानांनी यावेळी विशेष उल्लेख केला.उपचार मोफत असले तर आहेतच शिवाय रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांची कोणतीही गैरसोय होत नाही,असे त्यांनी पुढे सांगितले. आज मुलींच्या नावे 20000 हून अधिक सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांचे शिक्षण आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित झाले आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.

दहा वर्षांपूर्वी भारत सरकारने मुलींच्या शिक्षणावर आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित करून सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती हे लक्षात घेऊन, मोदी यांनी अधोरेखित केले; की ही देशातील अशा काही योजनांपैकी एक आहे ज्यातून आपल्या मुलींना 8.2 टक्के इतका सर्वाधिक व्याजदर दिला जातो.या योजनेअंतर्गत संपूर्ण भारतात मुलींसाठी 4 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत असे सांगत पंतप्रधान म्हणाले, कीआतापर्यंत या खात्यांमधून 3.25 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने 20,000 सुकन्या समृद्धी खाती उघडली गेली असून श्री सत्य साई कुटुंबाच्या या उदात्त उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वाराणसीमध्ये मुलींसाठी 27,000 सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आली होती आणि प्रत्येक खात्यात 300 रुपये हस्तांतरित करण्यात आले होते,असे आपल्या स्वतःच्या मतदारसंघाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी नमूद केले.सुकन्या समृद्धी योजना मुलींचे शिक्षण आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या अकरा वर्षांत भारतात अशा असंख्य योजना सुरू करण्यात आल्या आहेत ज्यामुळे नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेत लक्षणीय वाढ झाली आहे,याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. अधिकाधिक गरीब आणि वंचितांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणले जात आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. 2014 मध्ये केवळ 25 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळाला होता, तर आज ही संख्या जवळपास 100 कोटींवर पोहोचली आहे. भारताच्या कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनांची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे,असे  मोदी यांनी पुढे नमूद केले. 

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी सांगितले की, या दिवशी त्यांना एका गोदान कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमामध्‍ये सत्यसाई न्यासाच्यावतीने गरीब शेतकरी कुटुंबांना 100  गायी दान केल्या गेल्या.  भारतीय परंपरेमध्‍ये  गायीला जीवन, समृद्धी आणि करुणेचे प्रतीक मानले जाते, यावर भर देवून पंतप्रधान म्हणाले,  या गायींमुळे  प्राप्तकर्त्या कुटुंबांच्या आर्थिक, पौष्टिक आणि सामाजिक स्थिरतेला आधार दिला गेला. पंतप्रधानांनी सांगितले की, गोरक्षणाद्वारे समृद्धीचा संदेश जगभर दिसून येतो. त्यांनी आठवण करून दिली की,  राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत काही वर्षांपूर्वी वाराणसीमध्ये 480 हून अधिक गीर गायींचे असेच वाटप  करण्यात आले होते आणि आज तेथे गीर गायी आणि वासरांची संख्या सुमारे 1,700 झाली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, वाराणसीमध्ये एक नवीन परंपरा सुरू झाली आहे,अशा पध्‍दतीने वितरण केलेल्या  गाईपासून जन्मलेली मादी- वासरे, पाडसे  इतर प्रदेशातील शेतकऱ्यांना मोफत दिली जातात. त्यामुळे गीर गायींची संख्या आता वाढत आहे. पंतप्रधान  मोदी यांनी  आणखी एका गोष्‍ट स्‍मरणपूर्वक सांगितली.  साधारण  ७-८ वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रवांडा येथील त्यांच्या भेटीदरम्यान भारताने 200 गीर गायी भेट दिल्या होत्या. त्यांनी नमूद केले की,  आपल्याकडे असणा-या  परंपरेशी बरेचसे साम्य असलेली रवांडामध्ये "गिरिंका" नावाची एक परंपरा  आहे, ज्याचा अर्थ "तुम्हाला गाय मिळेल". तिथे  जन्मलेली पहिले  मादी वासरू हे  शेजारच्या कुटुंबाला भेट दिले  जाते. या प्रथेमुळे रवांडामध्ये पोषण, दूध उत्पादन, उत्पन्न आणि सामाजिक एकता वाढली आहे.

ब्राझीलने भारतातील गीर आणि कांकरेज गायींच्या जाती स्वीकारल्या आहेत. त्याचबरोबर  आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक व्यवस्थापनाद्वारे उन्नत कार्यपध्‍दतीने त्यांचे पालन केले जात आहे. यामुळे  या गाई  उत्कृष्ट दुग्धजन्य पदार्थ उत्पादन कामगिरीचा  स्रोत बनल्या आहेत;  यावर पंतप्रधानांनी भर दिला. या उदाहरणांवरून एक गोष्‍ट लक्षात येते की, परंपरा, करुणा आणि वैज्ञानिक विचारसरणी यांच्या  एकत्रिकरणामुळे  गायीविषयी श्रध्‍दा व्यक्त करतानाही, हा प्राणी   सक्षमीकरण, पोषण आणि आर्थिक प्रगतीचे प्रतीक कसे बनवले जावू शकते.  हीच  परंपरा येथे उदात्त हेतूने पुढे नेली जात आहे,  याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

विकसित राष्ट्र  भारत 'कर्तव्य काळा' च्या भावनेने आगामी वर्षांकडे पहात आहे;  आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी  नागरिकांच्या सक्रीय सहभागाची आवश्यकता आहे, असे  अधोरेखित करून, श्री सत्य साई बाबा यांचे जन्मशताब्दी वर्ष  हे या प्रवासात प्रेरणादायी स्‍त्रोत   आहे ,  यावर  त्यांनी भर दिला. विकसित भारताच्या उभारणीसाठी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी सर्वांना या विशेष वर्षात "व्होकल फॉर लोकल" हा मंत्र बळकट करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी आठवण करून दिली की,  स्थानिक उत्पादने खरेदी केल्याने कुटुंब, लघु उद्योग आणि स्थानिक पुरवठा साखळी थेट सक्षम होते, ज्यामुळे आत्मनिर्भर भारताचा मार्ग प्रशस्त होत आहे.

श्री सत्य साई बाबा यांच्या प्रेरणेने आज इथे  उपस्थित असलेले सर्वजण राष्ट्र उभारणीत सतत योगदान देत आहेत, याची आवर्जुन दखल घेवून,  श्री मोदी यांनी निरीक्षण नोंदवले की,  या पवित्र भूमीत खरोखरच एक अद्वितीय ऊर्जा आहे - जिथे प्रत्येक पाहुण्यांच्या  भाषणातून  करुणा प्रतिबिंबित होते,  त्यांच्या विचारातून शांती प्रतिबिंबित होते आणि कृतीतून  सेवा प्रतिबिंबित होते. पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की,  जिथे जिथे वंचितपणा  किंवा वेदना- दुःख असेल तिथे भक्त आशा आणि प्रकाशाचा किरण म्हणून उभे राहतील. या भावनेने, त्यांनी प्रेम, शांती आणि सेवेच्या या पवित्र मोहिमेला पुढे नेल्याबद्दल सत्य साई कुटुंब, संस्था, स्वयंसेवक आणि जगभरातील भक्त, अनुयायी अशा सर्वांना   हार्दिक शुभेच्छा देऊन भाषणाचा  समारोप केला.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री - एन चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री,  के राममोहन नायडू,  जी किशन रेड्डी,  भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्यासह या कार्यक्रमात इतर मान्यवरांसह उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथील भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या पवित्र मंदिराला आणि महासमाधीला भेट दिली आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभात सहभागी होऊन, पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी भगवान श्री सत्य साई बाबा यांचे जीवन, शिकवण आणि चिरस्थायी वारसा यांचा सन्मान करणारे एक विशेष ‘स्मृतिनाणे’ आणि टपाल तिकिटांचा संच जारी केला.

 

 

 

 

 

 

 

* * *

निलिमा चितळे/गोपाळ चिप्पलकट्टी/संजना चिटणीस/जाई वैशंपायन/संपदा पाटगांवकर/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2191713) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam