मंत्रिमंडळ
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने केला ठराव संमत
Posted On:
12 NOV 2025 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत दि. 10 नोव्हेंबर 2025, संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार स्फोटाच्या दहशतवादी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला गेला. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली म्हणून मंत्रिमंडळाने दोन मिनिटे मौन राखले.
या बैठकीत मंत्रिमंडळाने खाली नमूद ठरावही संमत केला:
दि. 10 नोव्हेंबर 2025 च्या संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात, देशविघातक शक्तींनी घडवलेली एक घृणास्पद दहशतवादी घटना देशाने अनुभवली. या स्फोटात अनेकांना जीव गमवावे लागले, तसेच अनेकजण जखमी झाले.
हिंसाचाराच्या या अर्थहीन कृत्याला बळी पडलेल्यांना हे मंत्रिमंडळ अंतःकरणापासून श्रद्धांजली अर्पित करते, तसेच शोकाकुल कुटुंबांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करते.
सर्व जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे होवोत यासाठीही हे मंत्रिमंडळ प्रार्थना करते, तसेच पीडितांना सेवा शुश्रुषा देत असलेल्या आणि त्यांना पाठबळ पुरवत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांच्या तत्पर प्रयत्नांचेही कौतुक करते.
निष्पापांचे जीव घेणाऱ्या या कारस्थानी आणि भ्याड कृत्याचा हे मंत्रिमंडळ निःसंदिग्धपणे धिक्कार करत आहे.
हे मंत्रिमंडळ सर्व स्वरुपातील दहशतवाद आणि दहशतवादी हेतूं विरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणाप्रति भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे.
या मंत्रिमंडळाने जगातील अनेक सरकारांनी सोबत असल्याबाबत आणि पाठबळ देण्यासंदर्भात केलेल्या निवेदनांचीही नोंद घेतली असून, त्यांचे आभार मानत आहे.
सर्व अधिकारी वर्ग, सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीत धैर्य आणि कारुण्याचे दर्शन घडवत पार पाडलेली जबाबदारी, वेळेत आणि समन्वयाने दिलेल्या प्रतिसादाचीही प्रशंसापूर्वक दखल या मंत्रिमंडळाने घेतली आहे. या सर्वांची समर्पणवृत्ती आणि कर्तव्यभावना अत्यंत प्रशंसनीय आहे.
या घटनेचे गुन्हेगार, त्यांचे सहकारी आणि त्यांचे प्रायोजक यांची ओळख पटवून, विना विलंब त्यांचा न्याय केला जावा यासाठी या मंत्रिमंडळाच्या वतीने या घटनेचा तपास अतिशय तातडीने आणि व्यावसायिकतेने पुढे नेण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. सरकार सर्वोच्च स्तरावरून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेच्या आपल्या दृढ वचनबद्धतेला अनुसरून, सर्व भारतीयांचे जीवन आणि कल्याणाचे रक्षण करण्याप्रति सरकारच्या दृढ निर्धाराची ग्वाही हे मंत्रिंडळ पुन्हा एकदा देत आहे.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189459)
Visitor Counter : 31