सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली इथे आज को-ऑप कुंभ 2025 अर्थात सहकार कुंभ 2025 या नागरी सहकारी पतपुरवठा क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती, परिषदेला केले संबोधित


सहकार क्षेत्राच्या मुख्य संघटनेने आज सहकार डिजी पे आणि सहकार डिजी लोन या दोन ॲप सुविधा सुरू केल्या, या सुविधा डिजिटल क्रांतीमधील सहकार क्षेत्राच्या सहभागाचे प्रतीक बनतील

आगामी पाच वर्षांत, 2 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँक स्थापन केली जाणार

नागरी सहकारी बँका छोटे व्यापारी, उद्योजक आणि युवा वर्गाच्या उन्नतीचे साधन बनत आहेत

Posted On: 10 NOV 2025 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर 2025


नवी दिल्ली इथे आज को-ऑप कुंभ 2025 अर्थात सहकार कुंभ 2025 या  नागरी सहकारी पतपुरवठा क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ झाला. या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, सहकार मंत्रालयाचे सचिव आणि इतर अनेक मान्यवरही उपस्थित होते. या परिषदेला अमित शाह यांनी संबोधितही केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने नागरी सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्थांचा सहकार कुंभ आयोजित केला जात असल्याची माहिती शाह यांनी आपल्या संबोधनातून दिली. गेल्या 3 - 4 वर्षांत देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्र आणि सहकारी पतसंस्था क्षेत्र नव्या उर्जेने वाटचाल करू लागले असल्याचे त्यांनी सांगितले. या को-ऑप कुंभ 2025 मध्ये, या क्षेत्रात दडलेल्या अनेक संधींचा लाभ घेण्याच्या दृष्टीने  धोरण, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्पना (innovation) यावर चर्चा केली जाईल, असे त्यांनी पुढे जोडले. ही आंतरराष्ट्रीय परिषद नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या राष्ट्रीय महासंघाने (NAFCUB) आयोजित केली असून, परिषदेचा ‘दिल्ली जाहीरनामा  नागरी सहकारी बँकांच्या विस्तारासाठी मार्गदर्शक आराखडा म्हणून कामी येईल असे ते म्हणाले.

को-ऑप कुंभ 2025 च्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांचे जाळे विस्तारण्याचे देशाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या क्षेत्राच्या मुख्य संघटनेने आज सहकार डिजी पे आणि सहकार डिजी  लोन या सुविधा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. सहकार डिजी पे च्या माध्यमातून, अगदी छोट्या नागरी  सहकारी बँका देखील डिजिटल पेमेंटची सुविधा देऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकाराच्या तत्वाला बळकटी देणे आणि त्याला समांतरपणे दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. नागरी सहकारी बँकांशिवाय इतर  कोणत्याही व्यवस्थेतून हे ध्येय साध्य करता येणार नाही असे ते म्हणाले. यासोबतच नागरी सहकारी बँकांमार्फत सामाजिकदृष्ट्या दुर्बल  परिस्थितीतील घटकांचे सक्षमीकरण करणे हे देखील आपले एक ध्येय असले पाहिजे, असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या अलिकडेच जारी केलेल्या  जागतिक क्रमवारीत अमूलने पहिले तर इफको (IFFCO) अर्थात  भारतीय शेतकरी खत सहकारी संस्थेने दुसरे स्थान पटकावल्याचे त्यांनी सांगितले. यातून आजही सहकाराची कल्पना आणि संस्कृती कालबाह्य झालेली नसल्याचेच दिसून येते असे त्यांनी सांगितले. अमूल देशातील श्वेतक्रांतीचा कारक घटक बनले असून, अमूलचे सदस्य असलेले 3.6 दशलक्ष शेतकरी, 18,000 ग्राम समित्या  आणि 18 जिल्हा संघटनांच्या माध्यमातून, संपूर्ण भारतात दररोज 30 दशलक्ष लिटर दूध संकलित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

इफकोने जगातली दुसरी सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवले आहे. या संस्थेने 41,000 कोटी रुपयांची उलाढाल  आणि 3,000 कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली असल्याचे त्यांनी सांगितले. इफकोची नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ही खत उत्पादने आता ब्राझील, ओमान, अमेरिका आणि जॉर्डनसह 65 देशांमध्ये निर्यात केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.


निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2188561) Visitor Counter : 15