पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वाराणसीहून चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 08 NOV 2025 11:20AM by PIB Mumbai

 

हर-हर महादेव!

नम: पार्वती पतये!

हर-हर महादेव!

उत्तर प्रदेशचे उर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि विकसित भारताचा मजबूत पाया रचण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या उत्कृष्ट कामाचे नेतृत्व करणारे अश्विनी वैष्णव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपल्यासोबत एर्नाकुलम इथून सहभागी झालेले केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सुरेश गोपी जी, जॉर्ज कुरियन जी, केरळमधील या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधीफिरोजपूर इथून जोडले गेलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि पंजाबचे नेते रवनीत सिंग बिट्टू जी, तेथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, लखनौ इथून जोडले गेलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, इतर मान्यवर आणि काशीतील माझे कुटुंबीय.

बाबा विश्वनाथांच्या या पवित्र नगरीततुम्हा सर्वांना आणि काशीच्या सर्व कुटुंबियांना मी अभिवादन करतो! देव दिवाळीनिमित्त किती अद्भुत कार्यक्रम आयोजित केला गेला होता, ते मी पहिले.  आजचा दिवसदेखील खूप शुभ आहेतुम्हा सर्वांना या विकास पर्वाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो!

मित्रांनो,

जगभरातील विकसित देशांमध्ये, आर्थिक विकासाचा एक प्रमुख चालक तिथल्या पायाभूत सुविधा आहेत. ज्या ज्या देशांनी लक्षणीय प्रगती आणि उच्च विकास साध्य केला आहे, त्यांच्या प्रगतीला सर्वात मोठी चालना  पायाभूत सुविधांच्या विकासामुळे मिळाली आहे. अशा क्षेत्राची कल्पना करा जे बराच काळ रेल्वे सेवेपासून वंचित आहे, जिथे रेल्वे रूळ नाहीत, गाड्या येत नाहीत आणि स्थानकही नाही. पण जसे तिथे रेल्वेरूळ  बांधले जाऊ लागतात आणि स्थानक उभारले जाऊ लागते, तेव्हा त्या भागाचा आपोआप विकास होऊ लागते. एखाद्या गावात वर्षानुवर्षे रस्ता नसेल,कुठलाच रस्ता नसेल, लोक कच्च्या मातीच्या रस्त्यांवरून प्रवास करतात. पण जसा एखादा छोटा रस्ता तयार होतो, तसे शेतकरी प्रवास करू लागतात आणि त्यांचे उत्पादन बाजारात पोहोचू लागते. याचा अर्थ पायाभूत सुविधा म्हणजे मोठेमोठे पूल आणि मोठेमोठे महामार्ग एवढ्यापुरताच मर्यादित नसतो. कुठेही, जेव्हा अशा व्यवस्था विकसित होऊ लागतात तेव्हा ते क्षेत्र  विकसित होऊ लागते. जे आपल्या गावाला, आपल्या नगराला, आपल्या शहराला लागू आहे ते संपूर्ण देशालाही लागू आहे. किती विमानतळ बांधण्यात आले, किती वंदे भारत गाड्या धावत आहेत, जगातील किती देशांतून किती विमाने येतात - या सर्व गोष्टी विकासाशी जोडल्या गेल्या आहेत. आणि आज, भारतदेखील या मार्गावर खूप वेगाने वाटचाल करत आहे. याचाच एक भाग म्हणून आज देशाच्या विविध भागात नवीन वंदे भारत गाड्या सुरू केल्या जात आहेत. काशी-खजुराहो वंदे भारत व्यतिरिक्त, फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत, लखनौ-सहारनपूर वंदे भारत आणि एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत या गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या चार नवीन गाड्यांसह, आता देशात एकशे साठहून अधिक नवीन वंदे भारत गाड्या धावत आहेत. मी काशीच्या लोकांचे आणि सर्व देशवासियांचे  या गाड्यांबद्दल मनापासून अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आज, वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारतसारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीचा पाया रचत आहेत. भारतीय रेल्वेच्या परिवर्तनासाठी ही एक संपूर्ण मोहीम आहे. वंदे भारत ही भारतीयांची, भारतीयांद्वारे आणि भारतीयांसाठी बांधलेली रेल्वेगाडी आहे आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे. अन्यथा, पूर्वी तर आपण हे करू शकतो का? हे तर परदेशातच घडू शकते, आपल्या इथे होईल का? पण आता ते घडायला सुरुवात झाली आहे ! नाही का ? हे आपल्या देशात तयार होत आहे की नाही? आपले देशवासी ते बांधत आहेत की नाही? ही आपल्या देशाची ताकद आहे. आणि आता, परदेशी प्रवासीदेखील वंदे भारत पाहून आश्चर्यचकित होतात. आज, भारताने विकसित भारतासाठी आपली संसाधने सर्वोत्तम करण्याची मोहीम सुरू केली आहेया गाड्या त्यात एक मैलाचा दगड बनत आहेत.

मित्रांनो,

आपल्या भारतात शतकानुशतके, तीर्थयात्रांना राष्ट्रीय चेतनेचे माध्यम मानले गेले आहे. ही तीर्थक्षेत्रे केवळ दिव्य दर्शनाचा मार्ग नाहीत तर भारताच्या आत्म्याला जोडणारी पवित्र परंपरा आहेत. प्रयागराज, अयोध्या, हरिद्वार, चित्रकूट, कुरुक्षेत्र आणि इतर असंख्य तीर्थक्षेत्रे आपल्या आध्यात्मिक धारेच्या  केंद्रस्थानी आहेत. आज, जेव्हा ही पवित्र स्थळे वंदे भारत नेटवर्कशी जोडली जात आहेत, तेव्हा एक प्रकारे ती भारताची संस्कृती, श्रद्धा आणि विकासयात्रेला जोडण्याचं कार्यही होत आहे. भारताच्या वारसा शहरांना देशाच्या प्रगतीचे प्रतीक बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मित्रांनो,

या यात्रांचा आर्थिक पैलूदेखील असतो, ज्याची सहसा चर्चा होत नाही. गेल्या 11 वर्षांत, उत्तर प्रदेशातील विकासकार्यांनी तीर्थाटनाला एका नव्या स्तरावर नेले आहे. गेल्या वर्षी, 11 कोटी भाविकांनी बाबा विश्वनाथच्या दर्शनासाठी काशीला भेट दिली.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर 6 कोटींहून अधिक लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. या भाविकांनी उत्तर प्रदेशाच्या (युपी) अर्थव्यवस्थेला हजारो कोटी रुपयांचा फायदा करून दिला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील हॉटेल्स, व्यापारी, वाहतूक कंपन्या, स्थानिक कलाकार, होड्या चालवणारे अशा सर्वांना सातत्याने उत्पन्न मिळवण्याची संधी दिली आहे. यामुळे आता वाराणसीतील शेकडो तरुण, वाहतूक सुविधेपासून बनारसी साड्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत नवनवे व्यवसाय सुरु करत आहेत. या सगळ्यामुळे युपीमध्ये, काशीमध्ये समृद्धीची द्वारे उघडू लागली आहेत.

मित्रांनो,

विकसित काशीसह विकसित भारताचा मंत्र साकार करण्यासाठी आम्ही येथे देखील पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक कामे करत आहोत. काशीमध्ये आज उत्तम रुग्णालये, चांगले रस्ते, पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठ्यासह इंटरनेटद्वारे संपर्कव्यवस्था इत्यादी सुविधांचा सतत विस्तार होतो आहे. विकास होतो आहे आणि गुणवत्तेत सुधारणा देखील होत आहे. रोपवेचे काम देखील वेगाने सुरु आहे. गंजारी आणि सिगरा क्रीडांगणासारख्या क्रीडाविषयक सुविधा देखील आता आपल्याकडे आहेत. वाराणसीला येणे, वाराणसीत मुक्काम करणे आणि वाराणसीतील सोयींचा जीवनात वापर करणे हा सर्वांसाठी विशेष अनुभव असावा असा आमचा प्रयत्न आहे.

मित्रांनो,

आपले सरकार काशीमधील आरोग्य सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. साधारण 10-11 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की एखाद्या गंभीर आजारावर उपचार घ्यायचे असतील तर लोकांकडे केवळ बीएचयुचा पर्याय उपलब्ध होता. आणि तेथे रुग्णांची संख्या इतकी जास्त असायची की रात्र-रात्रभर प्रतीक्षा करून देखील त्यांना उपचार मिळत नसत. कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यावर तर लोक त्यांची जमीन, शेत इत्यादी विकून उपचारांसाठी मुंबईला जात असत. काशीतील जनतेच्या या सर्व चिंता कमी करण्याचे काम आज आमच्या सरकारने केले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी महामना कर्करोग रुग्णालय, डोळ्यांवरील उपचारासाठी शंकर नेत्रालय, बीएचयुमध्ये सुरु झालेले अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर तसेच शताब्दी चिकित्सालय, पांडेयपूरमध्ये सुरु झालेले विभागीय रुग्णालय ही सगळी रुग्णालये आज काशी, पूर्वांचलसह लगतच्या राज्यांसाठी देखील वरदान ठरत आहेत. या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत आणि जनौषधी केंद्रांमुळे आज गरिबांना फायदा झाला आहे, लाखो लोकांच्या कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकत आहे. एकीकडे या आरोग्य सुविधांमुळे लोकांची चिंता दूर झाली आहे तर दुसरीकडे काशी आता या संपूर्ण क्षेत्रातील आरोग्यविषयक राजधानी म्हणून प्रसिद्ध झाली आहे.

मित्रांनो,

आपल्याला काशीच्या विकासाचा हा वेग, ही उर्जा टिकवून ठेवायची आहे, जेणेकरून भव्य काशी लवकरच समृद्ध काशी देखील होईल, आणि संपूर्ण जगभरातून जो कोणी या काशी नगरीत येईल त्या सर्वांना बाबा विश्वनाथाच्या या नगरीत एक वेगळीच उर्जा, एक वेगळाच उत्साह आणि वेगळाच आनंद मिळू शकेल.

मित्रांनो,

आत्ता मी वंदे भारत रेल्वेगाडीत काही विद्यार्थ्यांशी संवाद साधत होतो. मी अश्विनीजींचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी एक उत्तम परंपरा सुरु केली आहे. जेथे वंदे भारत गाडीच्या प्रवासाची सुरुवात होते, त्या ठिकाणी मुलांसाठी विविध विषयांवर आधारित स्पर्धा घेतल्या जातात. विकासाशी संबंधित, वंदे भारत गाड्यांशी संबंधित, वेगवेगळ्या प्रकारे विकसित भारताची कल्पना करून त्या कल्पनाचित्रांशी संदर्भात, कवितांच्या संदर्भात, अशा विविध विषयांवर आधारित स्पर्धा असतात. आणि आज मला मुलांशी बोलण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही, मात्र दोन-चार दिवसांतच, त्यांची जी कल्पकता होती, त्यांनी विकसित काशीचे जे कल्पनाचित्र रेखाटले होते, विकसित भारताचे जे चित्र रंगवले होते, सुरक्षित भारताच्या संदर्भात जे चित्र तयार केले होते, ज्या कविता मी ऐकल्या, 12-12, 14 वर्षांपर्यंतच्या वयाची मुले-मुली इतक्या उत्तम कविता ऐकवत होते. काशीचा खासदार या नात्याने मला या गोष्टीचा इतका अभिमान वाटला, इतका अभिमान वाटला की, माझ्या काशीमध्ये अशी होतकरु मुले आहेत. मी आत्ता येथे काही मुलांना भेटलो, त्यातल्या एका मुलाच्या हातामध्ये थोडसा त्रास आहे, मात्र त्याने जे चित्र काढले होते, त्याचा विषय खरोखरीच माझ्या आवडीचा आहे. म्हणजेच, मी येथील शालेय शिक्षकांचे देखील अत्यंत मनापासून अभिनंदन करतो कारण त्या सर्वांनी या मुलांना अशी प्रेरणा दिली, त्यांना मार्गदर्शन केले. मी या बालकांच्या माता-पित्यांचे देखील अभिनंदन करतो, त्यांनी देखील नक्कीच काहीतरी योगदान दिलेच असेल, तेव्हाच या मुलांनी इतका सुंदर कार्यक्रम केला असेल. माझ्या तर मनात असेही आले की, एकदा येथे या मुलांचे कवी संमेलन भरवावे, आणि त्यातील 8 ते 10 उत्तम मुले असतील त्यांना देशभरात घेऊन जावे, त्यांच्याकडून कविता वाचून घ्याव्यात. हा कार्यक्रम इतका, म्हणजे इतका प्रभावी होता, की माझ्या मनाला काशीचा खासदार म्हणून एक विशेष सुखद अनुभव मिळाला, त्याबद्दल मी या मुलांचे अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. 

मित्रांनो,

आज मला अनेक कार्यक्रमांसाठी जायचे आहे आणि म्हणूनच आज एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. मला लवकर निघायचे देखील आहे आणि सकाळी-सकाळी इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण येथे आलात, ही देखील फार आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा, आज या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि वंदे भारत गाड्यांसाठी तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद!

हर-हर महादेव!

***

जयदेवी पुजारी-स्वामी/सोनाली काकडे/संजना चिटणीस/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2188002) Visitor Counter : 13