पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत यासारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीचा पाया रचत आहेत: पंतप्रधान
विकसित भारतासाठी आपली संसाधने वाढवण्याचे ध्येय भारताने हाती घेतले आहे आणि या रेल्वेगाड्या त्या प्रवासात मैलाचे दगड ठरतील: पंतप्रधान
पवित्र तीर्थस्थळे आता वंदे भारत गाड्यांच्या जाळ्याद्वारे जोडली जात असून भारताची संस्कृती, श्रद्धा आणि विकास यात्रेच्या संगमाचे प्रतीक ठरत आहेत, वारसा शहरांना राष्ट्रीय प्रगतीच्या प्रतिकांमध्ये परिवर्तित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे: पंतप्रधान
Posted On:
08 NOV 2025 10:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. देशाच्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर असलेल्या वाराणसीतील सर्व कुटुंबांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या. देव दिवाळीच्या काळात झालेल्या अद्वितीय उत्सवाचे त्यांनी कौतुक केले आणि आजचा दिवसदेखील एक शुभ प्रसंग असल्याचे सांगितले. विकासाच्या या उत्सवासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
जगभरातल्या विकसित राष्ट्रांमध्ये भक्कम पायाभूत सुविधा, या आर्थिक विकासाचा एक प्रमुख चालक असल्याकडे लक्ष वेधत, ज्या प्रत्येक देशात लक्षणीय प्रगती आणि विकास झाला आहे, तेथे पायाभूत सुविधांच्या प्रगतीने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतदेखील या मार्गावर वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात देशाच्या विविध प्रदेशातल्या नवीन वंदे भारत गाड्यांची घोषणा पंतप्रधानांनी केली. बनारस-खजुराहो वंदे भारतसोबत, फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत, लखनौ-सहारनपूर वंदे भारत आणि एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत या गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या चार नवीन गाड्यांसह, देशात कार्यरत असलेल्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या आता 160 हून अधिक झाली आहे. या गाड्यांच्या प्रारंभाबद्दल पंतप्रधानांनी वाराणसी तसंच देशातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले.
"वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारतसारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीचा पाया रचत आहेत", असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी भारतीय रेल्वेचे परिवर्तन करण्यासाठी ही एक व्यापक मोहीम असल्याचे अधोरेखित केले. वंदे भारतचे वर्णन त्यांनी ही भारतीयांद्वारे, भारतीयांसाठी, भारतीयांची रेल्वेगाडी असल्याचे करत, ती प्रत्येक भारतीयामध्ये अभिमान निर्माण करत असल्याचे सांगितले. वंदे भारत पाहून परदेशी प्रवासीदेखील आश्चर्यचकित होतात असे ते म्हणाले. विकसित भारतासाठी भारताने आपली संसाधने वृद्धींगत करण्याचे ध्येय हाती घेतले आहे आणि या गाड्या त्या प्रवासात मैलाचे दगड ठरतील असे मोदी यांनी सांगितले.
भारतात शतकानुशतके तीर्थयात्रा या राष्ट्रीय जाणीवेचे माध्यम मानली जात आहेत, यावर भर देऊन पंतप्रधान म्हणाले की या यात्रा केवळ दिव्य दर्शनाचे मार्ग नाहीत तर भारताच्या आत्म्याशी जोडणाऱ्या पवित्र परंपरा आहेत. त्यांनी प्रयागराज, अयोध्या, हरिद्वार, चित्रकूट आणि कुरुक्षेत्र ही राष्ट्राच्या वारशाचे आध्यात्मिक केंद्र असल्याचे नमूद केले. "ही पवित्र स्थळे आता वंदे भारत रेल्वेगाड्यांच्या जाळ्याद्वारे जोडली जात आहेत; हे भारताची संस्कृती, श्रद्धा आणि विकासयात्रेच्या संगमाचे प्रतीक आहे. वारसा शहरांना राष्ट्रीय प्रगतीच्या प्रतिकांमध्ये परिवर्तित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे", असे पंतप्रधानांनी सांगितले.
भारतातील तीर्थयात्रेच्या दुर्लक्षित आर्थिक पैलूवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी नमूद केले की गेल्या 11 वर्षांत उत्तर प्रदेशातील विकासात्मक उपक्रमांमुळे तीर्थयात्रेला एका नवीन उंचीवर नेण्यात यश आले आहे. गेल्या वर्षीच 11 कोटी भाविकांनी बाबा विश्वनाथांच्या दर्शनासाठी वाराणसीला भेट दिली. अयोध्येत राम मंदिर बांधल्यापासून 6 कोटींहून अधिक लोकांनी रामलल्ला मंदिराला भेट दिली आहे. या यात्रेकरूंनी उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत हजारो कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. या गर्दीमुळे राज्यातील हॉटेल्स, व्यापारी, वाहतूक कंपन्या, स्थानिक कलाकार आणि बोट चालकांना शाश्वत कमाईच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परिणामी, वाराणसीतील शेकडो तरुण आता वाहतूक सेवांपासून बनारसी साडी व्यवसायांपर्यंत नवीन उपक्रम सुरू करत आहेत. या विकासामुळे उत्तर प्रदेश आणि वाराणसीमध्ये समृद्धीचे दरवाजे उघडले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
विकसित वाराणसीच्या माध्यमातून विकसित भारताचा मंत्र साकार करण्यासाठी शहरात सतत पायाभूत सुविधांचा विकास सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. वाराणसीमध्ये दर्जेदार रुग्णालये, सुधारित रस्ते, गॅस पाइपलाइन नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी, यांचा प्रारंभ, विस्तार आणि गुणात्मक सुधारणा होत आहे, यावर त्यांनी भर दिला. रोपवे प्रकल्पात जलद प्रगती होत आहे. गंजारी आणि सिगरा स्टेडियमसारख्या क्रीडा पायाभूत सुविधादेखील उपलब्ध आहेत असे त्यांनी नमूद केले. बनारसला भेट देणे, राहणे आणि अनुभवणे ही प्रत्येकासाठी एक विशेष अनुभूती ठरावी, हे उद्दिष्ट असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला.
वाराणसीतील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचे नमूद करत मोदींनी 10–11 वर्षांपूर्वीची परिस्थिती कशी होती याची आठवण करून दिली, ते म्हणाले की त्यावेळी गंभीर आजारांवर उपचारांसाठी बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) हा एकमेव पर्याय होता, परिणामी तेथे येणाऱ्या रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे अनेकांना रात्रभर प्रतीक्षा करूनही उपचार मिळणे शक्य होत नव्हते.कर्करोगासारख्या आजारांवर मुंबईत जाऊन उपचार घेण्यासाठी लोकांना जमीन आणि शेती विकावी लागत होती. या समस्या कमी करण्याचे काम आपल्या सरकारने केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कर्करोगावर उपचारांसाठीचे महामना कॅन्सर हॉस्पिटल, नेत्रचिकित्सेसाठी शंकर नेत्रालय, बीएचयू मध्ये सुरू करण्यात आलेले आधुनिक ट्रॉमा सेंटर आणि शताब्दी रुग्णालय, पांडेयपूर येथील विभागीय रुग्णालय यासारख्या वाराणसी, पूर्वांचल आणि आजूबाजूंच्या राज्यांसाठी वरदान ठरलेल्या संस्थांची त्यांनी यादी सांगितली. या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत आणि जन औषधी केंद्र योजनांचा लाभ मिळत असल्याने लाखो गरीब रुग्णांचा कोट्यावधी रुपयांचा खर्च वाचत आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. यामुळे केवळ लोकांची चिंताच दूर झालेली नाही तर आसपासच्या संपूर्ण भागाची वाराणसी ही आरोग्य राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
वाराणसी शहराची महानता समृद्धीच्या रुपाने वेगाने वाढत राहावी यासाठी विकासाची गती आणि ऊर्जा टिकवून ठेवण्याची गरज मोदींनी स्पष्ट केली तसेच जगभरातून बाबा विश्वनाथांच्या पवित्र शहरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक अनोखी ऊर्जा, उत्साह आणि आनंद अनुभवता यावा असे स्वप्न व्यक्त करून त्यांनी भाषणाचा समारोप केला.
गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याच्या समारंभाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या भेटीचाही मोदींनी उल्लेख केला. नवीन वंदे भारत गाड्यांचा आरंभ करताना विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्याची पद्धत रुढ केल्याबद्दल त्यांनी अश्विनी वैष्णव यांची प्रशंसा केली. विकसित भारत, विकसित काशी, सुरक्षित भारत अशा विविध विषयांवर आधारित स्पर्धेत मुलांनी सादर केलेल्या चित्रांचे आणि कवितांचे त्यांनी कौतुक केले. त्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी दिलेल्या पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाचेही त्यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी यापुढे बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची तसेच 8-10 विजेत्यांना भारतभर इतर स्पर्धांसाठी घेऊन जाता येईल अशीही कल्पना सुचवली. अशी प्रतिभावान मुले असलेल्या वाराणसीचे आपण खासदार असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला आणि त्यांचे अभिनंदन केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी, जॉर्ज कुरियन, रवनीत सिंग बिट्टू आणि अन्य मान्यवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.
पार्श्वभूमी
जागतिक दर्जाच्या रेल्वे सेवांद्वारे नागरिकांना अधिक सुलभपणे, जलद आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या अनुषंगाने 4 नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणे हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्स बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फिरोजपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बेंगळुरू या मार्गांवर धावतील. या गाड्यांमुळे प्रमुख गंतव्य स्थानांदरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्यासोबतच प्रादेशिक वाहतूक सुधारेल, पर्यटनाला चालना मिळेल तसेच देशभरातील आर्थिक क्रियाकलापांना त्यांची मदत होईल.
बनारस-खजुराहो वंदे भारतमुळे या दोन ठिकाणांदरम्यान थेट संपर्क स्थापित होईल, त्यामुळे सध्या चालवण्यात येत असलेल्या विशेष गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ सुमारे 2 तास 40 मिनिटे वाचणार आहे . बनारस-खजुराहो वंदे भारत एक्सप्रेस भारतातील काही सर्वात प्रसिद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना जोडेल, ज्यात वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट आणि खजुराहो यांचा समावेश आहे. या लिंकमुळे केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळणार नाही तर यात्रेकरूंना आणि प्रवाशांना खजुराहो या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जलद, आधुनिक आणि आरामदायी प्रवासाची सोय होईल.
लखनऊ-सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेसद्वारे सुमारे 7 तास 45 मिनिटांत प्रवास करता येणार असल्याने प्रवासाचा जवळजवळ 1 तासाचा वेळ वाचेल. लखनऊ-सहारनपूर वंदे भारत एक्सप्रेसचा लखनऊ, सीतापूर, शाहजहांपूर, बरेली, मुरादाबाद, बिजनौर आणि सहारनपूर येथील प्रवाशांना सर्वाधिक फायदा होईल, तसेच रुरकी मार्गे पवित्र हरिद्वार शहरापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. मध्य आणि पश्चिम उत्तर प्रदेशदरम्यान सुरळीत आणि जलद आंतरशहर प्रवास सुनिश्चित होण्यासोबतच ही सेवा कनेक्टिव्हिटी आणि प्रादेशिक विकासात वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस हा प्रवास अवघ्या 6 तास 40 मिनिटांत पूर्ण करणारी या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन असेल. फिरोजपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस राष्ट्रीय राजधानी आणि पंजाबमधील फिरोजपूर, भटिंडा आणि पटियाला या प्रमुख शहरांमार्गे धावणार असल्याने कनेक्टिव्हिटी वाढेल. या ट्रेनमुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढतील, सीमावर्ती भागांच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देतील तसेच हे भाग राष्ट्रीय पातळीवरील बाजारपेठांशी अधिक जोडले जातील अशी अपेक्षा आहे.
दक्षिण भारतातील, एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस प्रवासाचा वेळ 2 तासांच्या वर कमी होऊन 8 तास 40 मिनिटांत हा प्रवास करता येईल. एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस प्रमुख आयटी आणि व्यावसायिक केंद्रांना जोडणार असल्याने व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. या मार्गामुळे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांदरम्यान अधिक आर्थिक क्रियाकलाप आणि पर्यटनाला चालना मिळेल, परिणामी प्रादेशिक विकासाला आणि सहकार्याला त्याची मदत होईल.
***
सुषमा काणे/सोनाली काकडे/मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2187724)
Visitor Counter : 16