राष्ट्रपती कार्यालय
भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
तुम्ही आता इतरांसाठी आदर्श ठरल्या आहात; तरुण पिढीला, विशेषतः मुलींना, आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुमच्याकडून प्रेरणा मिळेल - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांची प्रशंसा
Posted On:
06 NOV 2025 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2025
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांनी आज (6 नोव्हेंबर 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
राष्ट्रपतींनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रत्येक सदस्याचे अभिनंदन केले. क्रिकेट संघाच्या सदस्यांनी क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास घडविला आहे, असे असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले. देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात लाखो भारतीय या विजयाचा आनंद साजरा करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

हा संघ भारताचे प्रतिबिंब आहे, असे त्या म्हणाल्या. या संघात वेगवेगळ्या प्रदेशांतून, वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमींतून, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या खेळाडूंचा समावेश आहे, तरीही हा संघ सर्वजण मिळून एकच आहे - टीम इंडिया. हा संघ भारताच्या सर्वोत्तमतेचे दर्शन घडवितो.
राष्ट्रपती म्हणाल्या की, सात वेळा विश्वविजेत्या आणि त्यावेळी अपराजित ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून भारतीय महिला संघाने सर्व देशवासीयांना त्यांच्या क्षमतेवर असलेला विश्वास अधिक बळकट केला, असे राष्ट्रपती म्हणाल्या. कठीण सामन्यात एका मजबूत संघाविरुद्ध मोठ्या फरकाने अंतिम सामना जिंकणे हे टीम इंडियाच्या उत्कृष्टतेचे एक संस्मरणीय उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.

हे खेळाडू आता समाजासाठी आदर्श बनले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. तरुण पिढी, विशेषतः मुली, या खेळाडूंच्या यशातून प्रेरणा घेऊन जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतील. ज्या गुणांमुळे या खेळाडूंनी इतिहास घडविला, त्याच गुणांच्या बळावर त्या भविष्यातही भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानी ठेवतील.
राष्ट्रपती म्हणाल्या की, संघातील सदस्यांनी आशा आणि निराशेचे अनेक चढ-उतार अनुभवले असतील. कधीकधी त्यांची झोपही उडाली असेल. परंतु त्यांनी सर्व आव्हानांवर मात केली. न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला होता की अनेक चढ – उतार असले तरी आपल्या मुली नक्कीच विजयी होतील.

भारतीय संघाच्या यशाच्या पाठीशी संघाचे कठोर परिश्रम, उत्कृष्ट क्रीडा कौशल्य, दृढनिश्चय तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आणि क्रिकेट प्रेमींचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत, हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. क्रिकेटसारख्या सांघिक खेळात, सर्व संघ सदस्यांना नेहमीच पूर्णपणे समर्पित राहणे आवश्यक असते, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपतीनी मुख्य प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या योगदानाची प्रशंसा केली. भारतीय संघ आपल्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे भविष्यातही नवीन विक्रम प्रस्थापित करत राहील, अशा शुभेच्छा राष्ट्रपतींनी दिल्या.

* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2187012)
Visitor Counter : 13