पंतप्रधान कार्यालय
उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
03 NOV 2025 12:37PM by PIB Mumbai
देशाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, नोबेल पुरस्कार विजेते सर आंद्रे गीम, आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व शास्त्रज्ञ, नवोन्मेषक, भारत आणि परदेशातील शैक्षणिक सदस्य आणि इतर मान्यवर, सभ्य स्त्री-पुरूषहो!
आजचा कार्यक्रम विज्ञानाशी संबंधित आहे, मात्र मी आधी भारताच्या क्रिकेटमधील दिमाखदार विजयाबद्दल बोलेन. आपल्या क्रिकेट संघाच्या यशाने संपूर्ण भारत आनंदित आहे. हा भारताचा पहिला महिला विश्वचषक आहे. मी आपल्या महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या यशामुळे देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा मिळेल.
मित्रहो,
भारताने काल विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगातही आपला ठसा उमटवला. भारतीय शास्त्रज्ञांनी काल भारताचा सर्वात वजनदार संप्रेषण उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचे आणि इस्रोचे मी मनापासून अभिनंदन करतो.
मित्रहो,
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. एकविसाव्या शतकात, जगभरातील तज्ञांनी उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांवर चर्चा करण्यासाठी आणि एकत्रितपणे एक अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता होती. या गरजेने एका कल्पनेला जन्म दिला आणि या कल्पनेतून या परिषदेचे स्वप्न जन्माला आले. आज या परिषदेच्या रूपात ते स्वप्न आकार घेत आहे याचा मला आनंद वाटतो. अनेक मंत्रालये, खाजगी क्षेत्रे, स्टार्टअप्स आणि विद्यार्थी या प्रयत्नात एकत्र आले आहेत. आज आपल्यासोबत नोबेल पुरस्कार विजेते उपस्थित असणे ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि या परिषदेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.
एकविसाव्या शतकातील हा अभूतपूर्व बदलाचा काळ आहे. आज आपण जागतिक व्यवस्थेत एक नवीन बदल पाहत आहोत. बदलाची ही गती रेषीय नाही तर घातांकीय आहे. या दृष्टिकोनासह, भारत उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या सर्व पैलूंना पुढे नेत आहे, त्यांच्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे संशोधन निधी. "जय जवान, जय किसान" या दृष्टिकोनाशी तुम्ही सर्वजण फार पूर्वीपासून परिचित आहात. संशोधनावर लक्ष केंद्रित करून, आम्ही त्यात "जय विज्ञान" आणि "जय अनुसंधान" ची भर घातली आहे. आमच्या विद्यापीठांमध्ये संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. त्याचबरोबर आम्ही संशोधन, विकास आणि नवोपक्रम योजना सुरू केली आहे आणि त्यासाठी एक लाख कोटी रुपये राखून ठेवले आहेत. तुम्हाला वाटेल की हे एक लाख कोटी रुपये मोदीजींकडेच राहतील, म्हणून कदाचित तुम्ही टाळ्या वाजवत नाहीत. हे एक लाख कोटी रुपये तुमच्यासाठी, तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी, तुमच्यासाठी संधींचे नवीन दरवाजे उघडण्यासाठी आहेत. खाजगी क्षेत्रातही संशोधन आणि विकासाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पहिल्यांदाच, उच्च-जोखीम आणि उच्च-प्रभाव असणाऱ्या प्रकल्पांसाठी भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे.
मित्रहो,
भारतात नवोपक्रमांची आधुनिक परिसंस्था तयार करण्यासाठी, आम्ही संशोधन सुलभतेवर देखील लक्ष केंद्रित करत आहोत. यासाठी, आमच्या सरकारने आर्थिक नियम आणि खरेदी धोरणांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. मूळ नमूने प्रयोगशाळेतून लवकर बाजारपेठेत यावे, यासाठी आम्ही नियम, प्रोत्साहने आणि पुरवठा साखळ्यांमध्येही सुधारणा केल्या आहेत.
मित्रहो,
भारताला नवोन्मेषाचे केंद्र बनवण्यासाठी गेल्या काही वर्षांत घेतलेल्या धोरणांचा आणि निर्णयांचा परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे. मी तुमच्यासमोर मोठ्या समाधानाने काही आकडेवारी सादर करू इच्छितो. मी सहज समाधानी होणारा माणूस नसलो तरी हे समाधान भूतकाळाच्या संदर्भात आहे; भविष्याच्या संदर्भात माझे अजूनही पुरेसे समाधान झालेले नाही. आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मागच्या दशकात आपला संशोधन आणि विकास खर्च दुप्पट झाला आहे, भारतात नोंदणीकृत पेटंटची संख्या 17 पट वाढली आहे, 17 पट... ही संख्या 17 पट वाढली आहे. स्टार्टअप्समध्येही भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप परिसंस्था बनला आहे. आज आपले 6000 पेक्षा जास्त डीप-टेक स्टार्टअप्स स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत साहित्यासारख्या क्षेत्रात काम करत आहेत. भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रानेही भरारी घेतली आहे. जैव अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचे झाले तर 2014 साली त्याचे मूल्य 10 अब्ज डॉलर्स होती, पण आज ते जवळजवळ 140 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.
मित्रहो,
गेल्या काही वर्षांत, आपण अनेक उदयोन्मुख क्षेत्रांमध्येही प्रगती केली आहे. भारताने हरीत हायड्रोजन, क्वांटम कॉम्प्युटिंग, खोल समुद्रातील संशोधन आणि दुर्मिळ खनिजे अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपली आशादायक उपस्थिती प्रस्थापित केली आहे.
मित्रहो,
जेव्हा विज्ञान मोठ्या प्रमाणात पोहोचते, जेव्हा नवोपक्रम सर्वसमावेशक बनतो आणि जेव्हा तंत्रज्ञान परिवर्तन घडवून आणते, तेव्हा मोठ्या कामगिरीचा पाया मजबूत आणि सज्ज होतो. गेल्या 10-11 वर्षांतील भारताचा प्रवास या दृष्टिकोनाचे उदाहरण देतो. भारत आता तंत्रज्ञानाचा ग्राहक नाही, तर तंत्रज्ञानाद्वारे परिवर्तनाचा प्रणेता आहे. कोविड दरम्यान आम्ही विक्रमी वेळेत स्वदेशी लस विकसित केली. आम्ही जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवला.
मित्रहो
एवढ्या मोठ्या प्रमाणात धोरणे आणि कार्यक्रम यशस्वीरित्या अंमलात आणणे कसे शक्य आहे? हे शक्य झाले कारण आज जर एखाद्या देशाकडे जगातील पहिली आणि सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असेल तर तो देश भारत आहे. आम्ही 2 लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडले आहे. आम्ही मोबाइल डेटाला सर्वसामान्य लोकांसाठी सहज-साध्य केले आहे.
मित्रांनो,
अलिकडच्या वर्षांत, आपला अंतराळ कार्यक्रम चंद्र आणि मंगळावर पोहोचला आहे, एवढेच नव्हे तर आपण आपल्या शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांनाही अंतराळ विज्ञानाच्या फायद्यांशी जोडले आहे. आणि या सर्व यशांमध्ये तुम्ही सर्वांनी निश्चितच योगदान दिले आहे.
मित्रांनो,
जेव्हा नवोपक्रम सर्वसमावेशक असतो, तेव्हा त्याचे प्राथमिक लाभार्थी देखील त्याचे नेतृत्व करणारे व्यक्ति बनतात. भारतीय महिला याचे एक उत्तम उदाहरण आहेत. तुम्ही पहा, जेव्हा जग भारताच्या अंतराळ मोहिमांची चर्चा करते तेव्हा भारतीय महिला शास्त्रज्ञांची अनेकदा चर्चा होते.
पेटंट दाखल करण्याच्या बाबतीतही, भारतात महिलांनी दरवर्षी दाखल केलेल्या पेटंटची संख्या दशकापूर्वी 100 पेक्षा कमी होती. आता ती दरवर्षी 5,000 पेक्षा जास्त झाली आहे. STEM शिक्षणात महिलांचा वाटा देखील सुमारे 43 टक्के आहे, जो जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
मी एका सर्वात विकसित देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांसोबत लिफ्टमध्ये जात होतो. आम्ही लिफ्टमध्ये बोललो आणि त्यांनी मला विचारले, "भारतात मुली विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करतात का?" म्हणजे त्यांच्या साठी ही बाब चकित करणारी होती . जेव्हा मी त्यांना सांगितले की आमच्या देशात इतकी जास्त संख्या आहे, तेव्हा त्यांना धक्का बसला. "भारताच्या मुलींनी हे सिद्ध केले आहे," "आणि आजही, मी येथे पाहतो की आमच्या किती मुली आणि बहिणी आहेत. ही आकडेवारी आपल्याला सांगते की भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिला किती वेगाने प्रगती करत आहेत."
मित्रांनो,
इतिहासात असे काही क्षण आहेत जे पिढ्यांना प्रेरणा देतात. काही वर्षांपूर्वी, आपल्या मुलांनी चांद्रयानाचा प्रवास आणि त्याचे यश पाहिले आणि ते यश त्यांना विज्ञानाशी खोलवर जोडण्याची संधी आणि कारण बनले. त्यांनी अपयश आणि यश दोन्ही पाहिले. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाच्या अलीकडील अंतराळ स्थानकाच्या भेटीमुळे मुलांमध्ये एक नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे. आपण नवीन पिढीमध्ये या उत्सुकतेचा फायदा घेतला पाहिजे.
मित्रांनो,
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या दिशेने आपण जितके हुशार तरुणांना प्रेरित करू शकू तितके चांगले. या दृष्टिकोनातून, देशभरात जवळजवळ 10,000 अटल टिंकरिंग लॅब्स स्थापन करण्यात आल्या आहेत. या लॅब्समध्ये 1 कोटींहून अधिक मुले कुतूहल आणि सर्जनशीलतेचे प्रयोग करत आहेत. आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, या लॅब्सच्या यशामुळे, गेल्या काही वर्षांत देशात शेकडो नवीन विद्यापीठे स्थापन झाली आहेत आणि सात नवीन आयआयटी आणि 16 ट्रिपल आयटी देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. तरुण आता त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकीसारखे एसटीईएम अभ्यासक्रम घेऊ शकतील हे नवीन शिक्षण धोरणात, आम्ही सुनिश्चित केले आहे.
मित्रांनो,
आपल्या सरकारच्या पंतप्रधान संशोधन फेलोशिपला तरुण संशोधकांमध्ये मोठे यश मिळाले आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे तरुणांना खूप मदत झाली आहे. आता, आम्ही पुढील पाच वर्षांत 10,000 फेलोशिप देऊन देशात संशोधन आणि विकास अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो,
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परिवर्तनकारी शक्ती समजून घेणे आणि त्याला नैतिक आणि समावेशक बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता पहा. आज, किरकोळ विक्रीपासून लॉजिस्टिक्सपर्यंत, ग्राहक सेवेपासून मुलांच्या गृहपाठापर्यंत सर्वत्र एआयचा वापर केला जात आहे. म्हणूनच, भारतातही, आम्ही एआयची शक्ती समाजाच्या प्रत्येक घटकासाठी उपयुक्त बनवत आहोत. इंडिया एआय मिशनमध्ये ₹10,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली जात आहे.
मित्रांनो,
आज, भारत नैतिक आणि मानव-केंद्रित एआयसाठी जागतिक चौकटीला आकार देत आहे. आमची येणारी एआय गव्हर्नन्स फ्रेमवर्क या दिशेने एक मोठे पाऊल असेल. त्याचे उद्दिष्ट नावीन्यपूर्णता आणि सुरक्षितता एकत्रितपणे विकसित करणे आहे. जेव्हा भारत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये जागतिक एआय शिखर परिषदेचे आयोजन करेल, तेव्हा समावेशक, नैतिक आणि मानव-केंद्रित एआयच्या दिशेने प्रयत्नांना नवीन गती मिळेल.
मित्रांनो,
उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आपली ऊर्जा दुप्पट करण्याची हीच वेळ आहे. विकसित भारताचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी देखील हे महत्त्वाचे आहे. मी तुमच्यासोबत काही कल्पना शेअर करू इच्छितो: आपण अन्न सुरक्षेच्या पलीकडे जाऊन पोषण सुरक्षेकडे जाऊ शकतो का? आपण पुढील पिढीतील जैविकदृष्ट्या सुदृढ पिके विकसित करू शकतो का जी कुपोषणाविरुद्धच्या लढाईत जगाला मदत करतील? आपण कमी किमतीच्या आणि मातीचे आरोग्य वाढवणाऱ्या जैव-खतांमध्ये नवोपक्रम आणू शकतो का जे रासायनिक इनपुटला पर्याय बनतील आणि मातीचे आरोग्य सुधारतील? वैयक्तिकृत औषध आणि रोग अंदाजात नवीन दिशा देण्यासाठी आपण भारताच्या जीनोमिक विविधतेचे चांगले मॅपिंग करू शकतो का? बॅटरीसारख्या स्वच्छ ऊर्जा साठवणुकीत आपण नवीन आणि परवडणारे नवोपक्रम करू शकतो का? प्रत्येक क्षेत्रात, आपण कोणत्या महत्त्वाच्या इनपुटसाठी जगावर अवलंबून आहोत आणि आपण त्यात आत्मनिर्भरता कशी मिळवू शकतो याचा विचार केला पाहिजे.
मित्रांनो,
मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगाशी संबंधित असलेले, या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन नवीन शक्यतांचा शोध घ्याल. जर तुमच्याकडे काही कल्पना असतील तर मी तुमच्यासोबत आहे. आमचे सरकार संशोधनासाठी निधी देण्यास आणि शास्त्रज्ञांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मला हे कॉन्क्लेव्ह एक सामूहिक रोडमॅप तयार करेल असे देखील वाटते. मला खात्री आहे की हे कॉन्क्लेव्ह भारताच्या नवोन्मेषाच्या प्रवासाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. पुन्हा एकदा, तुम्हाला माझ्या शुभेच्छा.
जय विज्ञान, जय अनुसंधान।
खूप खूप धन्यवाद.
***
JaydeviPujariSwami/MadhuriPange/HemangiKenekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186141)
Visitor Counter : 7
Read this release in:
Odia
,
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu