पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जन्मापासून जडलेल्या हृदयविकारांवर मात केलेल्या मुलांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


​या मुलांच्या अद्वितीय उत्साहाचे आणि धैर्याचे पंतप्रधानांनी केले कौतुक

योगाभ्यास आणि नियमित आरोग्यदायी सवयींच्या माध्यमातून उत्तम आरोग्य राखण्याचा पंतप्रधानांनी दिला सल्ला

मातृभूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक पेड माँ के नाम अभियानात सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Posted On: 01 NOV 2025 7:22PM by PIB Mumbai

 

दिल की बात या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधील नवा रायपूर इथल्या श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात आयोजित केलेल्या गिफ्ट ऑफ लाईफ या उपक्रमाच्या निमित्ताने जन्मापासून जडलेल्या हृदयविकारांवर यशस्वी उपचार घेतलेल्या 2,500 मुलांशी संवाद साधला.

या संवादादरम्यान​ एका युवा हॉकीपटूने आपले अनुभव आणि वाटचालीविषयी पंतप्रधानांना सांगितले. आपण पाच पदके जिंकली असून, शाळेतील तपासणीदरम्यान, आपल्याला हृदयविकार झाल्याचे निदान झाल्याची माहिती तिने दिली. सहा महिन्यांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता ती पुन्हा हॉकी खेळू लागली असल्याचे तिने सांगितले. पंतप्रधानांनी तिच्या भविष्यातील आकांक्षांबाबत तिच्याकडे विचारपूस केली. त्यावर तिने डॉक्टर बनून सर्व मुलांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधानांनी तिला ती मोठ्यांवरही उपचार करेल का, याबाबतही विचारणा केली, त्यावर तिने आत्मविश्वासाने होकार दिला. पंतप्रधानांना पहिल्यांदाच भेटता आल्याबद्दलही तिने आनंद व्यक्त केला.

आणखी एका मुलीसोबत झालेल्या संवादात, ​त्या मुलीने तिच्यावर एक वर्षापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि तीला देखील डॉक्टर बनून सर्वांची सेवा करावीशी वाटते याबद्दल पंतप्रधानांना सांगितले. उपचारादरम्यान तिला रडू आले होते का, याबाबत पंतप्रधान मोदी यांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यावर, आपल्याला रडू आले नव्हते असे तिने सांगितले. तिने पंतप्रधानांना एक प्रेरणादायी कविताही ऐकवली. पंतप्रधानांनी तिच्या या सादरीकरणाचे कौतुकही केले.

आणखी ​एका मुलाने त्याच्यावर 2014 मध्ये तो केवळ 14 महिन्यांचा असताना शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली. आता मात्र आपण तंदुरुस्त असून क्रिकेटमध्ये सक्रिय असल्याचे त्याने सांगितले. पंतप्रधानांनी त्याला नियमित तपासणीसाठी जातो का, याबद्दल विचारपूस केली. त्यानेही आपण नियमित तपासणी करत असल्याचे आणि आता आरोग्याच्या कोणतीही समस्या नसल्याचे पंतप्रधानांना सांगितले, यावर पंतप्रधानांनीही आनंद व्यक्त केला. आपण नियमितपणे क्रिकेट खेळत असल्याची माहितीही मुलाने दिली. त्याने पंतप्रधानांकडे त्यांना अधिक जवळून भेटण्याची विनंती केली, आणि पंतप्रधानांनीही ती आनंदाने मान्य केली.

​दुसऱ्या एका लहान मुलाशी झालेल्या संवादात, मोदी यांनी त्याला रुग्णालयाला दिलेली भेट आणि इंजेक्शन घेताना कसे वाटले याबद्दलचा अनुभव विचारला. तेव्हा आपण घाबरलो नसल्याचे आणि त्यामुळेच लवकर बरे झाल्याचे त्याने सांगितले. पंतप्रधानांनी त्याला शिक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो याबाबतही विचारले. त्यावर त्याने आपले शिक्षक आपल्या शैक्षणिक कामगिरीची प्रशंसा करतात, अशी माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी त्याच्या प्रामाणिकपणाचेही कौतुक केले.

या संवादात एका मुलीने सांगितले ती सातवीत शिकत असून, गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी शिक्षिका बनण्याची तिची इच्छा पंतप्रधानांकडे बोलून दाखवली. शिक्षणामुळेच देशाची प्रगती होते, असे आपले मतही तिने पंतप्रधानांकडे व्यक्त केले.

या संवादात पंतप्रधानांनी मुलांना, कोणाचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे, असा प्रश्नही विचारला. मुलांनाही त्यांना श्री सत्य साई बाबा यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाल्याची माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी मुलांना श्री सत्य साई बाबा यांनी पुटपर्थी आणि आसपासच्या परिसरातील पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य कसे दूर केले, आणि सुमारे 400 गावांना पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करून दिले, याबद्दल सांगितले. पाणी वाचवण्याचा आणि वृक्षारोपणाचा संदेशही त्यांनी मुलांना दिला.  एक पेड माँ के नाम या आपल्या मोहिमेची माहिती त्यांनी मुलांना दिली. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाने मातृभूमी आणि स्वतःच्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन त्यांनी केले.

या संवादादरम्यान ​पश्चिम बंगालमधील अभिक नावाच्या एका मुलाने सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे आपले स्वप्न पंतप्रधानांना सांगितले. पंतप्रधानांनी त्याला यामागचे कारण विचारले. अभिक यानेही, जसे देशाचे सैनिक देशाचे संरक्षण करतात, तसेच आपल्यालाही देशाचे संरक्षण करायचे आहे, असे उत्तर दिले. पंतप्रधानांनी अभिकच्या या उत्साहाचे कौतुक केले.

​एका लहान मुलीने पंतप्रधानांना भेटण्याचे आपले जुने स्वप्न होते असे सांगितले, तसेच आपण पंतप्रधानांना बातम्यांमध्ये पाहिले असल्याचे सांगितले.

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांशी संवाद साधता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि कोणतेही चांगले काम पूर्ण करण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे, असा सल्लाही मुलांना दिला. त्यांनी मुलांना योगाभ्यास आणि शिस्तबद्ध झोपेच्या सवयींच्या माध्यमातून आपले आरोग्य चांगले राखण्याचा सल्लाही दिला. त्यांनी मुलांना स्वतःच्या कल्याणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आणि, ते नियमितपणे हे सल्ले पाळतील असे वचन त्यांच्याकडून घेतले. या संवादानंतर सर्व मुलांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी त्यांचा निरोप घेतला.

***

माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2185352) Visitor Counter : 15