पंतप्रधान कार्यालय
19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण (वियनतियाने, लाओ पीडीआर)
Posted On:
11 OCT 2024 11:49AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2024
माननीय, महोदय
नमस्कार.
सर्वप्रथम, "टायफून यागी" वादळामुळे बाधित झालेल्यांबद्दल मी माझ्या गहिऱ्या संवेदना व्यक्त करतो.
या कठीण काळात, आम्ही ऑपरेशन सद्भावच्या माध्यमातून मानवतावादी मदत पुरवली आहे.
मित्रांनो,
भारताने नेहमीच, आसियान (ASEAN) या आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेच्या एकतेला आणि केंद्रीय भूमिकेला सातत्याने पाठिंबा दिला आहे. भारताच्या हिंद-प्रशांत दृष्टीकोन आणि क्वाड सहकार्यामध्ये देखील आसियानची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या "हिंद-प्रशांत महासागर उपक्रमात" (Indo-Pacific Oceans Initiative) आणि "आसियान आउटलुक ऑन इंडो-पॅसिफिक" मध्ये महत्त्वाचे साम्य आहे. एक मुक्त, खुले, सर्वसमावेशक, समृद्ध आणि नियमाधारित हिंद-प्रशांत क्षेत्र संपूर्ण प्रदेशाच्या शांतता आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
दक्षिण चीन समुद्रातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य, संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्राच्या हिताचे आहे.
आमचा विश्वास आहे, की सागरी हालचाली-घडामोडी, 'युएनसीएलओएस- (युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सी) या सागरी कायद्यां संबंधी संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसारच पार पाडल्या पाहिजेत. सागरी आणि हवाई क्षेत्रातील वाहतुकीचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे आवश्यक आहे. एक मजबूत आणि प्रभावी 'आचारसंहिता' (Code of Conduct) विकसित केली पाहिजे. आणि, ती प्रादेशिक देशांच्या परराष्ट्र धोरणांवर कोणतेही निर्बंध लादणारी नसावी.
आमचा दृष्टीकोन विकासावर केंद्रित असावा, विस्तारवादावर नाही.
मित्रांनो,
म्यानमारमधील परिस्थिती हाताळण्यासाठी आसियानच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करतो आणि त्यांच्या 'पंच-सूत्रीय सहमतीला' आमचा पाठिंबा आहे. याव्यतिरिक्त, माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत कायम सुरु ठेवणे आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटते. या प्रक्रियेत म्यानमारला एकटे पाडण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे.
एक शेजारी देश म्हणून, भारत आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करत राहील.
मित्रांनो,
जगाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे 'ग्लोबल साउथ' मधील देशांवर सर्वाधिक नकारात्मक परिणाम झाला आहे. युरेशिया आणि मध्य पूर्व सारख्या प्रदेशांमध्ये शक्य तितक्या लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावे, अशी सामुहिक इच्छा आहे.
मी बुद्धाच्या भूमीतून आलो आहे, आणि मी वारंवार सांगितले आहे की हे युद्धाचे युग नाही. समस्यांवरचे उपाय, हे युद्धभूमीवर सापडत नाहीत. सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे आवश्यक आहे. मानवतावादी दृष्टिकोनातून आपण संवाद आणि मुत्सद्देगिरीवर अधिक भर दिला पाहिजे.
एक 'विश्वबंधू' म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, भारत या दिशेने आपले योगदान देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहील.
दहशतवाद देखील, जागतिक शांतता आणि सुरक्षे पुढील एक गंभीर आव्हान आहे. त्याचा सामना करण्यासाठी, मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या शक्तींनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आणि, सायबर, सागरी आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये आपण परस्पर सहकार्य अधिक मजबूत केले पाहिजे.
मित्रांनो,
नालंदाचे पुनरुज्जीवन करण्याचे वचन आम्ही पूर्व आशिया शिखर परिषदेत दिले होते. या वर्षी जूनमध्ये, नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करून आम्ही ते वचन पूर्ण केले. नालंदामध्ये होणाऱ्या 'हेड्स ऑफ हायर एज्युकेशन कॉन्क्लेव्ह' या उच्च शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या परिसंवादा मध्ये सहभागी होण्यासाठी मी येथे उपस्थित असलेल्या सर्व देशांना आमंत्रित करतो.
मित्रांनो,
'पूर्व आशिया शिखर परिषद' ही भारताच्या 'अॅक्ट ईस्ट पॉलिसी' चा (पूर्वेकडील राष्ट्राभिमुख धोरण) एक प्रमुख आधारस्तंभ आहे.
आजच्या शिखर परिषदेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल मी, पंतप्रधान सोनेसय सिपहानदोन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
पुढील अध्यक्षपदासाठी मी मलेशियाला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या यशस्वी अध्यक्षपदासाठी भारताचे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन देतो.
खूप खूप धन्यवाद.
* * *
नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184145)
Visitor Counter : 6
Read this release in:
Odia
,
हिन्दी
,
Punjabi
,
Gujarati
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam