सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईतील माझगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 'खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांचे 'उद्घाटन


सहकार क्षेत्राच्या क्षमतेचा वापर करून 'आत्मनिर्भर भारत'चा दृष्टिकोन साकारण्यासाठी आणि नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सहकारी चळवळ गरीब मच्छिमारांसाठी समृद्धीचे एक साधन बनेल

आज प्रदान करण्यात आलेल्या ट्रॉलरमुळे आगामी काळात भारताच्या मत्स्यसंपदा क्षमतेचा वापर करण्याची क्षमता वाढेल आणि यातून होणारा नफा सहकार तत्वावर प्रत्येक मच्छिमारांच्या कुटुंबापर्यंत पोहोचेल

जेव्हा गरीब आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो, तेव्हाच देश खऱ्या अर्थाने समृद्ध होतो

मोदी सरकार सहकारी संस्थांद्वारे मासे प्रक्रिया आणि शीतकरण केंद्रे तसेच निर्यात आणि संकलन जहाजे प्रदान करेल

Posted On: 27 OCT 2025 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत माझगाव गोदी येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 'खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांचे' उद्घाटन केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि किनारी भागात सहकार आधारित विकासाला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते म्हणाले की, मोदी  सरकार 'आत्मनिर्भर भारत' दृष्टिकोन साकारण्यासाठी आणि सहकार क्षेत्राच्या क्षमतेचा उपयोग करून नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी वचनबद्ध आहे.

अमित शाह म्हणाले की, आज उद्घाटन करण्यात आलेल्या दोन ट्रॉलर्समुळे येत्या काळात भारताच्या मत्स्यसंपदेचा वापर करण्याची क्षमता वाढेलच,शिवाय सहकाराच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाचा नफा आपल्या कष्टाळू गरीब मच्छिमारांच्या घरापर्यंत नक्की पोहोचेल.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की सध्या मासेमारीसाठी ट्रॉलर्सवर काम करणाऱ्यांना वेतनाच्या आधारावर नियुक्त केले जाते, मात्र आता, सहकाराधारित ट्रॉलर्सद्वारे मिळणारा संपूर्ण नफा त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक मच्छिमाराच्या घरी पोहोचेल. ते म्हणाले की सुरुवातीला असे 14 ट्रॉलर्स पुरवण्यात येणार असले तरी येत्या काळात केंद्र सरकार, केंद्रीय सहकार मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यातर्फे असे आणखी ट्रॉलर्स पुरवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हे ट्रॉलर्स मासेमारीसाठी 25 दिवसांपर्यंत खोल समुद्रात राहू शकतात आणि 20 टन मासे वाहून नेण्याची त्यांची क्षमता आहे. तसेच, या ट्रॉलर्ससोबत मासेमारीत समन्वय राखण्यासाठी आणि ट्रॉलर्सद्वारे समुद्रातून पकडलेले मासे किनाऱ्यावर वाहून नेण्यासाठी मोठी जहाजे तैनात असतील. हे ट्रॉलर्स निवास तसेच जेवणाच्या सुविधांनी सुसज्ज असतील याचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, सुमारे 11,000 किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्यालगत मासेमारी करून उदर निर्वाह चालवणाऱ्या गरीब बंधू-भगिनींसाठी येत्या काळात एक मोठी योजना सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे. ते म्हणाले की दूध उत्पादन असो, कृषी बाजारपेठा असोत किंवा मत्स्यव्यवसाय असो, अशा प्रत्येक क्षेत्रातील नफा त्यात सहभागी कष्टकरी व्यक्तींचा असतो हीच सहकाराची संकल्पना आहे. जेव्हा देशाच्या ग्रामीण भागातील गरीब व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हाच तो देश खऱ्या अर्थाने समृद्ध होतो असे त्यांनी सांगितले. देशाच्या भरभराटीकडे जीडीपीच्या भिंगातून बघणाऱ्यांना आपल्यासारख्या प्रचंड देशाची सामाजिक रचना समजू शकत नाही अशी टिप्पणी त्यांनी केली. 130 कोटींहून अधिक लोकसंख्येच्या आपल्या देशाच्या बाबतीत, केवळ जीडीपीमधील वाढ देशाला संपूर्णपणे विकसित करू शकत नाही; त्यासाठी मानव-केंद्रित दृष्टिकोनाचा अंतर्भाव व्हायलाच हवा असे ते म्हणाले. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक कुटुंबाला समृध्द करण्याच्या ध्येयाशिवाय देश खऱ्या अर्थाने समृध्द होऊ शकत नाही असे ते म्हणाले.

अमित शाह म्हणाले की मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात सहकार हा आपल्या सर्व बंधू आणि भगिनींच्या जीवनाचा पाया बनू लागला आहे आणि आपण त्या दिशेने पुढे वाटचाल करतो आहोत. भविष्यात, प्रक्रिया, निर्यात तसेच मोठ्या संकलक जहाजांच्या वापराच्या योजना आकाराला येत आहेत हे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, यातून प्रक्रिया केल्या जातील, शीतकरण केंद्रे त्यांची  असतील आणि आपल्या बहु-राज्यीय निर्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यात देखील सुलभपणे केली जाईल .

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी मत्स्यव्यवसायासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत,  त्याचे  सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 2014-15  मध्ये   भारताचे एकूण  मत्स्यसंपदा     उत्पादन 102  लाख टन होते;  आता  त्यामध्‍ये वाढ होवून ते 195  लाख टन झाले आहे. सागरी उत्पादन 35 लाख टनांवरून 48  लाख टनांपर्यंत वाढले  आहे. शाह  म्हणाले की,  आपल्याकडे असलेल्या  सुमारे  11,000  किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर सागरी उत्पादन वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे. सहकार मंत्रालयाने या क्षमतेचा वापर करण्याचे आणि सहकारावर आधारित दृष्टिकोनातून आपल्या मच्छीमार बंधू आणि भगिनींपर्यंत नफा पोहोचवण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

याप्रसंगी  अमित शाह म्हणाले की, ज्यावेळी देशातील प्रत्येक कुटुंब आपल्या  मुलांना चांगले शिक्षण देऊ शकते, संतुलित आहार देऊ शकते, घरातील  वृद्ध मंडळी आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते आणि स्वावलंबी बनू शकते त्याचवेळी देश खऱ्या अर्थाने समृद्ध मानले जाऊ शकते. मानवकेंद्रित दृष्टिकोनाने ‘जीडीपी’ साध्य करण्यासाठी सहकारासारखे चांगले  मोठे साधन नाही. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील  गावांना समृद्ध करण्यात राज्यातल्या साखर कारखान्यांनी सर्वात मोठे योगदान दिले आहे. साखर कारखान्यांमधून होणारा संपूर्ण नफा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जातो. त्याचप्रमाणे, गुजरातमध्ये आज लाखो महिला अमूलच्या माध्यमातून 80,000 कोटींचा व्यवसाय करतात. 80,000 कोटींवर मिळणारा  संपूर्ण नफा पशुपालनात गुंतलेल्या अशिक्षित महिलांच्या घरी जातो आणि आता पदवीधर आणि उच्च शिक्षित महिला देखील पशुपालन व्यवसायामध्‍ये अगदी व्‍यावसायिक पध्‍दतीने  प्रवेश करीत  आहेत. हे  आपल्या पूर्वजांचे स्वप्न होते आणि हाच भारताच्या तत्वज्ञानाचा गाभा  आहे.

निलीमा चितळे/शैलेश पाटील/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2183136) Visitor Counter : 19