पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छता ही सेवा 2024 कार्यक्रमातील पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर

Posted On: 02 OCT 2024 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री. मनोहर लाल जी, श्री. सी.आर. पाटील जी, श्री. तोखन साहू जी, श्री. राज भूषण जी, इतर सर्व मान्यवर, महिला आणि सज्जन हो !

आज पूज्य बापू आणि लाल बहादूर शास्त्री जी यांची जयंती आहे. माँ भारतीच्या या महान सुपुत्रांना मी नम्रपणे वंदन करतो. हा दिवस आपल्या सर्वांना गांधीजी आणि देशातल्या महान नेत्यांनी भारतासाठी कल्पना केलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देतो.

मित्रांनो,

या 2 ऑक्टोबर रोजी, मी कर्तव्याच्या भावनेने भारलेला आहे आणि अत्यंत भावनिकही झालो आहे. स्वच्छ भारत अभियानाला आज 10 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वच्छ भारत अभियानाचा हा प्रवास कोट्यवधी भारतीयांच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. गेल्या 10 वर्षात, असंख्य भारतीयांनी हे अभियान स्विकारले आहे, त्यात आपलेपणा निर्माण केला आहे आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून आत्मसात केले आहे. 10 वर्षांच्या या महत्वपूर्ण टप्प्यावर, मी प्रत्येक नागरिकाचे, आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे, आपल्या धार्मिक नेत्यांचे, आपल्या खेळाडूंचे, आपल्यातील ख्यातनाम व्यक्तिमत्वांचे, स्वयंसेवी संस्थांचे आणि माध्यम मित्रांचे मनापासून कौतुक करतो. तुम्ही सर्वांनी मिळून स्वच्छ भारत अभियान  ही एक मोठी सार्वजनिक चळवळ बनवली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि माजी उपराष्ट्रपतींचे मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन या कार्यक्रमात योगदान सुद्धा दिले आणि देशाला प्रचंड प्रेरणा दिली. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे त्यांच्या योगदानाबद्दल मी मनापासून आभार मानतो. आज देशभरात स्वच्छतेशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. लोक उत्साहाने त्यांची गावे, शहरे, परिसर स्वच्छ करत आहेत मग ते चाळी, फ्लॅट किंवा सोसायटी असो. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींनीही या स्वच्छता अभियानात भाग घेतला आहे आणि त्यांचे नेतृत्व केले आहे. केवळ गेल्या पंधरवड्यातच देशभरातील कोट्यवधी लोकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला आहे. मला माहिती देण्यात आली आहे की "सेवा पखवाडा" (सेवा पंधरवडा) च्या 15 दिवसांत देशभरात 27 लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत, ज्यामध्ये 28 कोटींहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. आपण केवळ सातत्यपूर्ण प्रयत्न करूनच भारत स्वच्छ ठेवू शकतो. मी प्रत्येक भारतीयाचे मनापासून आभार मानतो.

मित्रांनो,

आजच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर स्वच्छतेशी संबंधित सुमारे 10,000 कोटी रुपयांचे नवीन प्रकल्प देखील सुरू करण्यात आले आहेत. अमृत अभियानांतर्गत, देशभरातील अनेक शहरांमध्ये पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील. "नमामि गंगे" शी संबंधित काम असो किंवा "गोबर्धन" संयंत्रांद्वारे कचऱ्यापासून बायोगॅस उत्पादन असो, हे उपक्रम स्वच्छ भारत अभियानाला नवीन उंचीवर नेतील. स्वच्छ भारत अभियान जितके यशस्वी होईल तितका आपला देश अधिक तेज धारण करेल.

मित्रांनो,

आतापासून एक हजार वर्षांनंतरही, जेव्हा 21 व्या शतकातील भारताचा अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत मोहीम निःसंशयपणे लक्षात राहील. स्वच्छ भारत ही या शतकातली जगातील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी लोक-नेतृत्वातील, लोक-चलित सार्वजनिक चळवळ आहे. या मोहिमेने मला लोकांमधील उर्जेचे दर्शन घडले आहे, ज्यांना मी दैवी मानतो. माझ्यासाठी, स्वच्छता ही लोकांच्या सामर्थ्याचा उत्सव बनली आहे. मला बरेच काही स्मरत आहे... जेव्हा ही मोहीम सुरू झाली, तेव्हा लक्षावधी लोकांनी एकाच वेळी स्वच्छतेचा मार्ग अंगीकारला. लग्नांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत, स्वच्छतेचा संदेश सर्वत्र होता. एका वृद्ध मातेने शौचालय बांधण्यासाठी तिच्या शेळ्या विकल्या, तर काहींनी आपले मंगळसूत्र विकले, तर अन्य काहीजणांनी शौचालय बांधण्यासाठी जमीन दान केली. काही निवृत्त शिक्षकांनी त्यांचे निवृत्ती वेतन दान केले तर सैनिकांनी स्वच्छतेसाठी त्यांचे निवृत्ती नंतरचे  निधी समर्पित केले. जर हे दान मंदिरांना किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमांना दिले गेले असते, तर ते वर्तमानपत्रांमध्ये मथळे बनले असते आणि आठवडाभर त्यावर चर्चा होत राहिली असती. परंतु देशात सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे की ज्यांचे चेहरे कधीही दूरचित्रवाणी वर झळकले नाहीत, ज्यांच्या नावे कधीही मथळे सजले नाहीत, त्यांनी वेळ असो वा संपत्ती, या चळवळीला नवीन शक्ती आणि ऊर्जा देऊन योगदान दिले आहे. यातून आपल्या राष्ट्राचे चारित्र्य प्रतिबिंबित होते.

जेव्हा मी एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याबद्दल बोललो तेव्हा कोट्यवधी लोकांनी खरेदीसाठी ज्यूट आणि कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली. त्यांचा मी आभारी आहे. अन्यथा, जर मी एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिक वर बंदी घालण्याबद्दल बोललो असतो, तर प्लास्टिक उद्योगाशी संबंधित लोकांनी याचा निषेध केला असता, उपोषण केले असते... पण त्यांनी तसे केले नाही. आर्थिक नुकसान होऊनही त्यांनी सहकार्य केले. एकदा वापरता येणारे प्लास्टिक बंदी करून मोदी बेरोजगारीला कारणीभूत ठरले असा दावा करून निषेध करू शकणाऱ्या पण तसे न केलेल्या राजकीय पक्षांचेही मी आभार मानतो. त्यांचे लक्ष तिथे गेले नाही याबद्दल मी आभारी आहे, मात्र आता ते होऊ शकते. 

मित्रांनो,

आपला चित्रपट उद्योगही या चळवळीत मागे राहिलेला नाही. व्यावसायिक हितसंबंधांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, या उद्योगाने स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी चित्रपट बनवले. या 10 वर्षांत, आणि मला वाटते की ही एक वेळची बाब नाही, तर ते एक निरंतर चालणारे कार्य आहे जे प्रत्येक क्षणी आणि दररोज करावे लागते. जेव्हा मी यावर भर देतो तेव्हा मी या विश्वासावर जगत असतो. आपल्या स्मरणात असेल की, "मन की बात" मध्ये मी सुमारे 800 वेळा स्वच्छतेचा उल्लेख केला आहे. लोक स्वच्छतेसाठीचे आपले प्रयत्न आणि समर्पण सामायिक करण्यासाठी लाखो पत्रे पाठवतात.

मित्रांनो,

आज, जेव्हा मी देश आणि त्याच्या जनतेच्या कामगिरीचा साक्षीदार ठरतो, तेव्हा एक प्रश्न निर्माण होतो: हे आधी का नाही घडले? महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान आपल्याला स्वच्छतेचा मार्ग दाखवला होता. त्यांनी आपल्याला केवळ दाखवलेच नाही तर शिकवलेही. तर मग स्वातंत्र्यानंतर स्वच्छतेकडे लक्ष का दिले गेले नाही? गांधींच्या नावाने सत्ता मिळवणाऱ्या आणि त्यांच्या नावाने मते मागणाऱ्यांना त्यांचा आवडता विषय - स्वच्छतेचा विसर पडला. शौचालयांचा अभाव ही त्यांना देशाची समस्या वाटली नाही, जणू त्यांनी घाण ही जीवनपद्धती म्हणून स्विकारली आहे. परिणामी, लोकांना घाणीत राहणे भाग पडले. घाण ही नित्यनेमाचा भाग बनली. स्वच्छतेची चर्चा होणे बंद झाले. त्यामुळे, जेव्हा मी लाल किल्ल्यावरून हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा वादळ निर्माण झाले. काहींनी माझी थट्टा केली, ते म्हणाले की शौचालये आणि स्वच्छतेबद्दल बोलणे हे भारताच्या पंतप्रधानांचे काम नाही. ते माझी थट्टा करत राहिले.

पण मित्रांनो,

भारताच्या पंतप्रधानांचे पहिले काम म्हणजे या देशातील सामान्य लोकांचे जीवन सुकर करणे. माझी जबाबदारी समजत, मी शौचालयांबद्दल बोललो, मी सॅनिटरी पॅड्सबद्दल बोललो. आणि आज, आपल्याला त्याचे परिणाम दिसत आहेत.

मित्रांनो,

10 वर्षांपूर्वीपर्यंत, भारतातील 60 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला उघड्यावर शौचास जावे लागत होते. हा मानवी प्रतिष्ठेचा अपमान होता. एवढेच नाही तर हा देशातील गरीबांचा, दलितांचा, आदिवासींचा, मागासलेल्या समुदायांचा अपमान होता—पिढ्यानपिढ्या हा अपमान सुरू होता. शौचालयांच्या अभावामुळे आपल्या भगिनी आणि कन्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांना वेदना आणि अस्वस्थता सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता, नैसर्गिक विधींकरिता मोकळे होण्यासाठी अंधाराची वाट पाहत रहावी लागत होती, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला होता. थंडी असो वा पाऊस असो, त्यांना सूर्योदयापूर्वी जावे लागत होते. माझ्या देशातील कोट्यवधी माता दररोज या अग्निपरीक्षेतून जात होत्या. उघड्यावर शौचामुळे होणाऱ्या घाणीच्या परिणामी आपल्या मुलांचे जीवन धोक्यात आले होते. बालमृत्यूचे हे एक प्रमुख कारण ठरत होते. अस्वच्छ परिस्थितीमुळे गावे आणि झोपडपट्ट्यांमध्ये आजारांचा प्रादुर्भाव होणे सामान्य होते.

मित्रांनो,

अशा परिस्थितीत कोणताही देश कसा प्रगती करू शकतो? म्हणूनच आम्ही ठरवले की परिस्थिती जशीच्या तशी कायम राहू शकत नाही. आम्ही याला राष्ट्रीय आणि मानवतावादी आव्हान मानले आणि ते सोडवण्यासाठी एक मोहीम सुरू केली. येथूनच 'स्वच्छ भारत मोहीम' (Clean India Mission) चे बीज रोवले गेले. हा कार्यक्रम, हे मिशन, ही चळवळ, हे अभियान, जनजागृतीचा हा प्रयत्न दुःखाच्या गर्भातून जन्माला आला. आणि दुःखातून जन्म घेतलेले मिशन कधीही मृत्यू पावत नाही. अगदी अल्प काळातच, कोट्यवधी भारतीयांनी मोठे पराक्रम साध्य केले. देशात 12 कोटींहून अधिक शौचालये बांधण्यात आली. शौचालयांची व्याप्ती, जी 40 टक्क्यांपेक्षा कमी होती, ती आता 100 टक्क्यांवर पोहोचली आहे.

मित्रांनो,

स्वच्छ भारत अभियानाचा देशातील सामान्य नागरिकांच्या जीवनावर अमूल्य प्रभाव पडला आहे. नुकत्याच एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पत्रकात एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. हा अभ्यास अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था, कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि ओहायो राज्य विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यात असे आढळून आले की स्वच्छ भारत अभियानाने प्रतिवर्षी 60,000 ते 70,000 मुलांचे प्राण वाचवले आहेत. जरी कोणी रक्तदान करून फक्त एक जीव वाचवला तरी ती एक संस्मरणीय घटना ठरते. परंतु स्वच्छता, कचरा काढून टाकणे आणि घाण काढून टाकणे याद्वारे आपण 60,000-70,000 मुलांचे प्राण वाचवू शकलो आहोत - देवाकडून यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता असू शकतो? WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2014 ते 2019 दरम्यान, 3,00,000 लोकांचे प्राण वाचवले गेले जे अन्यथा अतिसारामुळे गमावले असते. माझ्या मित्रांनो, हे मानवी सेवेचे कर्तव्य बनले आहे. 

युनिसेफच्या एका अहवालात असे म्हटले आहे की घरात शौचालये बांधल्यामुळे 90 टक्क्यांहून अधिक महिलांना आता सुरक्षित भासत आहे. स्वच्छ भारत मोहिमेच्या माध्यमातून महिलांमध्ये संसर्गामुळे होणारे आजारही लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. आणि हे एवढ्यावरच थांबत नाही. हजारो शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्यात आली असल्याने मुलींचे शाळेतून संख्या गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. युनिसेफच्या आणखी एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, स्वच्छतेमुळे ग्रामीण कुटुंबांची दरवर्षी सरासरी 50,000 रुपयांची बचत होत आहे. याआधी, हे निधी वारंवार आजारांवर उपचार करण्यासाठी किंवा आजारपणामुळे काम करण्यातील असमर्थतेमुळे गमावले जात असत.

मित्रांनो,

स्वच्छतेवर भर दिल्याने बालकांचे जीव वाचू शकतात, आणि याबाबत मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देऊ इच्छितो. काही वर्षांपूर्वी, गोरखपूर आणि आसपासच्या भागात मेंदूज्वराने मृत्यू होणाऱ्या शेकडो मुलांबद्दल सतत ब्रेकिंग न्यूज येत होत्या. पण आता, घाण निघून गेल्याने आणि स्वच्छतेच्या आगमनाने, त्या बातम्या देखील गायब झाल्या आहेत. घाणीमुळे काय निघून जाते ते पहा! याचे एक प्रमुख कारण म्हणजे स्वच्छ भारत अभियानाने आणलेली जनजागृती आणि त्यानंतर झालेली स्वच्छता.

मित्रांनो,

स्वच्छतेबाबत वृद्धिंगत झालेल्या आदरामुळे देशात एक महत्त्वपूर्ण मानसिक बदल झाला आहे. हे नमूद करणे आज महत्त्वाचे आहे असे मला वाटते. याआधी, स्वच्छता कामकाजाशी संबंधित लोकांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिले जात असे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्याकडे कसे पाहिले जात असे. समाजातील एक मोठा वर्ग कचरा करणे हा आपला हक्क मानत असे आणि तो स्वच्छ करणे ही दुसऱ्याची जबाबदारी असल्याचे ग्राह्य धरत असे, अहंकाराने जगत असे आणि स्वच्छता करणाऱ्यांना कमी लेखत असे. पण जेव्हा आपण सर्वजण स्वच्छता प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ लागलो, तेव्हा स्वच्छतेमध्ये सहभागी असलेल्यांनाही वाटले की ते करत असलेले काम महत्त्वाचे आहे आणि इतरही त्यांच्या प्रयत्नांचा भाग बनत आहेत. यामुळे एक मोठा मानसिक बदल घडून आला. स्वच्छ भारत अभियानामुळे कुटुंबे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड आदर आणि प्रतिष्ठा निर्माण झाली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या योगदानाचा अभिमान वाटतो. आज, ते आपल्याकडे आदराच्या भावनेने पाहतात. त्यांना आता अभिमान वाटतो की ते केवळ पोट भरण्यासाठी काम करत नाहीत तर देशाच्या लखलखाटात योगदान देत आहेत. स्वच्छ भारत अभियानाने लाखो स्वच्छता कामगारांमध्ये अभिमान आणि सन्मानाची भावना निर्माण झाली आहे. आमचे सरकार स्वच्छता कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना सन्माननीय जीवन प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. सांडपाण्याच्या टाक्यांमध्ये प्रत्यक्ष मानवी प्रवेशामुळे निर्माण होणारे धोके दूर करण्यासाठी देखील आम्ही काम करत आहोत. सरकार, खाजगी क्षेत्र आणि जनता एकत्र काम करत आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाच्या  वापरासह अनेक नवीन स्टार्टअप उदयास येत आहेत, 

मित्रांनो,

स्वच्छ भारत अभियान हा केवळ स्वच्छतेसाठीचा कार्यक्रम नाही तर त्याची व्याप्ती व्यापक रुपात विस्तारत आहे. तो आता स्वच्छता-केंद्रित समृद्धीचा मार्ग मोकळा करत आहे. स्वच्छ भारत अभियानाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील केली आहे. गेल्या काही वर्षांत, कोट्यवधी शौचालयांच्या बांधकामामुळे अनेक क्षेत्रांना फायदा झाला आहे, ज्यामुळे लोकांना रोजगार मिळाला आहे. गावांमध्ये, गवंडी, प्लंबर, कामगार आणि इतर अनेकांना नवीन संधी मिळाल्या आहेत. युनिसेफचा अंदाज आहे की या अभियानामुळे सुमारे 1.25 कोटी लोकांना काही ना काही आर्थिक फायदा किंवा रोजगार मिळाला आहे. या मोहिमेमुळे महिला गवंडींची एक नवीन पिढी उदयास येणे हे देखील याचेच फलित आहे. यापूर्वी, महिला गवंडींबद्दल आपण कधीच ऐकले नव्हते, पण आता तुम्हाला गवंडी म्हणून महिलाही काम करताना दिसतात.

स्वच्छ तंत्रज्ञानामुळे आपल्या युवकांसाठी उत्तम नोकऱ्या आणि संधी निर्माण होत आहेत. स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रात आज सुमारे 5,000 स्टार्टअप्सची नोंदणी झाली आहे. कचऱ्यापासून संपत्तीपर्यंत, कचरा संकलन आणि वाहतूक, पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया यासारख्या तसेच पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. असा अंदाज आहे की या दशकाच्या अखेरीस, या क्षेत्रात 65 लाख नवीन रोजगार निर्माण होतील आणि स्वच्छ भारत अभियान निःसंशयपणे यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

मित्रांनो,

स्वच्छ भारत अभियानाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेलाही एक नवीन चालना दिली आहे. घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून आपण आता कंपोस्ट, बायोगॅस, वीज आणि रस्ते बांधणीसाठी कोळशासारखे साहित्य तयार करत आहोत. गोबरधन योजना आज ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात मोठे बदल घडवून आणत आहे. या योजनेअंतर्गत, गावांमध्ये शेकडो बायोगॅस संयंत्रे उभारली जात आहेत. पशुपालनात गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी वृद्ध पशुधन हाताळणे त्यांच्यावर आर्थिक भार बनू शकते. गोबरधन योजनेमुळे आता दूध निर्मित न करणारे किंवा शेतात काम न करणारे पशुधन देखील उत्पन्नाचे स्रोत बनू शकते. याशिवाय, देशभरात शेकडो सीबीजी प्लांट आधीच उभारण्यात आले आहेत. आज, अनेक नवीन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

मित्रांनो,

या वेगाने बदलणाऱ्या काळात, स्वच्छतेशी संबंधित आव्हाने समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आपली अर्थव्यवस्था जसजशी वाढत जाईल आणि शहरीकरण वाढत जाईल तसतसे कचऱ्याची निर्मिती देखील वाढेल, ज्यामुळे कचरा अधिक प्रमाणात निर्माण होईल. अर्थव्यवस्थेचे सध्याचे "वापरा आणि फेकून द्या" प्रारूप देखील या समस्येला कारणीभूत ठरत आहे. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कचऱ्यासह नवीन प्रकारच्या कचऱ्याचा सामना करावा लागेल. म्हणून, आपण आपल्या भविष्यातील धोरणांमध्ये सुधारणा केली पाहिजे. आपल्याला बांधकामात असे तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता आहे जे पुनर्वापर करण्यायोग्य साहित्याचा अधिक वापर करेल. आपल्या वसाहती, गृहसंकुले आणि इमारतीची रचना अशा प्रकारे केली पाहिजे की ज्यामुळे आपण शून्य कचऱ्याच्या शक्य तितक्या जवळ जाऊ शकू. जर आपण ते शून्य कचऱ्याच्या जवळ आणू शकलो तर ते खरोखरच फार चांगले होईल.

आपण पाणी वाया जाऊ नये आणि प्रक्रिया केलेले सांडपाणी प्रभावीपणे पुनर्वापर केले जावे याची खात्री केली पाहिजे. नमामि गंगे प्रकल्प आपल्यासाठी एक आदर्श आहे. या उपक्रमामुळे गंगा नदी आता खूपच स्वच्छ झाली आहे. अमृत मिशन आणि अमृत सरोवर मोहीम देखील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहेत. हे सरकार आणि सार्वजनिक सहभागाने घडवून आणलेल्या बदलाचे बलशाली प्रारूप आहे. तथापि, मला वाटते की हे पुरेसे नाही. जलसंवर्धन, जलप्रक्रिया आणि आपल्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी आपण नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करत राहिले पाहिजे. पर्यटनाशी स्वच्छता किती जवळून जोडली गेली आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणूनच, आपण आपली पर्यटन स्थळे, पवित्र स्थळे आणि वारसा स्थळे देखील स्वच्छ ठेवली पाहिजेत.

मित्रांनो,

गेल्या 10 वर्षांत, आपण स्वच्छतेच्या बाबतीत बरेच काही साध्य केले आहे. मात्र कचरा निर्माण करणे ही ज्याप्रमाणे दैनंदिन दिनचर्या आहे, त्याचप्रमाणे स्वच्छता राखणे ही देखील दैनंदिन सवय असली पाहिजे. कोणताही व्यक्ती किंवा प्राणी असे म्हणू शकत नाही की ते कधीही कचरा निर्माण करणार नाहीत. जर कचरा अपरिहार्य असेल तर स्वच्छता देखील अपरिहार्य असली पाहिजे. हे काम आपण केवळ एका दिवसासाठी किंवा एका पिढीसाठी नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरू ठेवले पाहिजे. जेव्हा प्रत्येक नागरिक स्वच्छतेला आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजतो, तेव्हा मला या देशातील लोकांवर विश्वास आहे की परिवर्तन निश्चित आहे. देश नक्कीच चमकेल याची हमी आहे.

स्वच्छतेचे ध्येय हे एका दिवसाचे काम नाही तर आयुष्यभर चालणारे कार्य आहे. ते आपण पिढ्यानपिढ्या चालविले पाहिजे. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची नैसर्गिक प्रवृत्ती असली पाहिजे. ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असली पाहिजे आणि आपण घाणीबद्दल असहिष्णुता विकसित केली पाहिजे. आपण आपल्या सभोवतालची घाण सहन करू नये किंवा पाहूही नये. घाणीचा द्वेष आपल्याला स्वच्छतेच्या मागे लागण्यास भाग पाडतो आणि आपल्या ठायी सामर्थ्य प्रदान करतो.

आपण पाहिले आहे की घरातील लहान मुले मोठ्यांना त्यांच्या गोष्टी स्वच्छ ठेवण्यास कसे प्रेरित करतात. बरेच लोक मला सांगतात की त्यांची नातवंडे किंवा मुले त्यांना अनेकदा आठवण करून देतात, "मोदीजी काय म्हणाले ते पहा. तुम्ही कचरा का टाकत आहात?" ते लोकांना गाडीच्या खिडकीतून बाटली फेकण्यापासून रोखतात. या चळवळीने त्यांच्यातही एक बीज रोवले आहे. म्हणून, आज मी युवकांना आणि मुलांच्या पुढच्या पिढीला सांगू इच्छितो: चला वचनबद्ध राहूया, इतरांना समजावून सांगूया आणि प्रोत्साहित करत राहूया आणि एकत्र येऊया. देश स्वच्छ होईपर्यंत आपण थांबता कामा नये. गेल्या 10 वर्षांच्या यशावरून आपल्याला दिसून येते की हे शक्य आहे, आपण ते साध्य करू शकतो आणि आपण भारत मातेला घाणीपासून वाचवू शकतो.

मित्रांनो,

आज, मी राज्य सरकारांना हे अभियान जिल्हा, ब्लॉक, गाव, परिसर आणि रस्त्यांच्या पातळीवर घेऊन जाण्याचे आवाहन करू इच्छितो. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि ब्लॉकमध्ये स्वच्छ शाळा, स्वच्छ रुग्णालये, स्वच्छ कार्यालये, स्वच्छ परिसर, स्वच्छ तलाव आणि स्वच्छ विहिरींसाठी स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल आणि मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने बक्षिसे आणि प्रमाणपत्रे दिली पाहिजेत. भारत सरकारने केवळ 2-4 शहरे स्वच्छ किंवा 2-4 जिल्हे स्वच्छ घोषित करणे पुरेसे नाही. आपल्याला हे प्रत्येक क्षेत्रात नेले पाहिजे. आपल्या नगरपालिकांनी सार्वजनिक शौचालये सुस्थितीत आहेत याची सतत खात्री करावी आणि आपण त्यांना त्यासाठी बक्षीस दिले पाहिजे. जुन्या पद्धतीकडे परतणाऱ्या व्यवस्थांपेक्षा वाईट काहीही नाही. मी सर्व स्थानिक संस्थांना स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आणि ती त्यांची सर्वोच्च प्राथमिकता बनवण्याचे आवाहन करू इच्छितो.

चला आपण सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा घेऊया. मी माझ्या देशवासियांना एक विनंती करतो की त्यांनी एक प्रतिज्ञा करावी: आपण कुठेही असलो - घरी, आपल्या परिसरात किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी - आपण घाण निर्माण करणार नाही आणि ती सहन करणार नाही. स्वच्छता ही आपली नैसर्गिक सवय बनू द्या. ज्याप्रमाणे आपण आपली प्रार्थनास्थळे स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या सभोवतालच्या परिसराबद्दलही तीच भावना विकसित केली पाहिजे. 'विकसित भारत' (Developed India) च्या प्रवासात आपण करत असलेले प्रत्येक प्रयत्न "स्वच्छतेमुळे समृद्धी मिळते" या मंत्राला बळकटी देईल. पुन्हा एकदा, मी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो. नव्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने, आपण पुढे जाऊया आणि कचरा निर्माण न करण्याची, स्वच्छतेसाठी शक्य तितके काम करण्याची आणि आपल्या जबाबदारीपासून कधीही मागे न हटण्याची प्रतिज्ञा घेऊन पूज्य बापूंना खरी श्रद्धांजली अर्पण करूया. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. 

खूप खूप धन्यवाद.

 

* * *

आशिष सांगळे/संदेश नाईक/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183111) Visitor Counter : 9