पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सुरक्षित आणि संरक्षित जागतिक स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी तयार करण्यासाठी अमेरिका आणि भारताच्या भागीदारीपूर्ण उपक्रमाचा पथदर्शी आराखडा

Posted On: 22 SEP 2024 8:12AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

परस्पर सामायिक राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर परस्परांमधले सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, अमेरिका आणि भारत कायमच एकमेकांसोबत चिरकाल टिकणारी वचनबद्धता दर्शवत आले आहेत. आमच्या आर्थिक वाढीच्या धोरण आराखड्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून, आम्ही स्वच्छ ऊर्जा संक्रमणाचे लाभ मिळवण्यासाठी एकत्र मिळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. यात आमच्या नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या नोकऱ्यांची निर्मिती, जागतिक पातळीवर स्वच्छ ऊर्जा वापरात आणण्याच्या प्रक्रियेला गती देणे आणि हवामानविषयक जागतिक उद्दिष्टे साध्य करणे या ध्येयांचाही समावेश आहे.

ही उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेला पाठबळ देण्याकरता, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक सुट्या भागांची उत्पादन क्षमता वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानासह वित्तीय तसेच धोरणात्मक पाठबळाची व्याप्ती वाढवावी असा भारत आणि अमेरिकेचा हेतू आहे. आणि या सोबतच आफ्रिकेच्या क्षेत्रातील भागीदारींवर भर देत परस्पर सहकार्याचा विस्तार करण्याचाही दोन्ही देशांचा मानस आहे. या प्रयत्नांमुळे भारत आणि अमेरिकेमधील सद्यस्थितीतील स्वच्छ ऊर्जा सहकार्य नवी उंची गाठेल. यात 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी प्रारंभ केल्या गेलेल्या स्वच्छ ऊर्जा उपक्रमाचाही समावेश आहे. या उपक्रमाअंतर्गत अमेरिकेचा ऊर्जा विभाग आणि भारत सरकारच्या मंत्रालयांच्या नेतृत्वात स्वच्छ ऊर्जाविषयक धोरणात्मक भागीदारीची सुरुवात झाली होती. या भागीदारीच्या माध्यमातून भारतात इलेक्ट्रिक बसगाड्यांचा पुरवठा करण्यासाठी अमेरिकेतील प्रयोगशाळांद्वारे तंत्रज्ञानविषयक सहकार्याचे पाठबळ दिले गेले, तसेच पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझमसारख्या अद्वितीय वित्तीय मंचाची स्थापनाही केली गेली. भारत आणि अमेरिकेमधील ही भागीदारी, जगासमोर अभिनव स्वरुपाच्या स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे असे अनोखे उदाहरण मांडणार हे, जी तंत्रज्ञानाधारित औद्योगिक पायावर केंद्रिभूत असेल, परस्परांसोबत सामायिक करण्यायोग्य असेल, तसेच कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणारे असेल. आणि यातूनच हे दोन्ही देश परस्परांना 21 व्या शतकात स्वच्छ आर्थिक विकासाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम करणार आहेत.

या भागीदारीचा प्रारंभ व्हावा यासाठी, अमेरिका आणि भारत आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँकेच्या (IBRD) माध्यमातून,  भारतात देशांतर्गत स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळी उभारणीला चालना देणाऱ्या  प्रकल्पासह इतर प्रकल्पांसाठी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सची नवी बहुपदरी वित्तीय गुंतवणूक करण्यावर काम करत आहेत. या वित्तीय सहकार्यामुळे आवश्यक तंत्रज्ञान क्षेत्रात पुरवठाक्षम उत्पादन क्षमतेच्या विस्ताराला पाठबळ मिळू शकणार आहे. याअंतर्गत सौर, पवन, विद्युत घट (battery) बॅटरी, ऊर्जा निर्मितीयुक्त वितरण व्यवस्था (energy grid system) तसेच उच्च - कार्यक्षमतेची वातानुकूलन यंत्रे आणि सीलिंग फॅन पुरवठा साखळीवर भर दिला जाऊ शकेल. कालांतराने, प्राधान्यक्रमावरच्या स्वच्छ ऊर्जा उत्पादन क्षेत्रांला अतिरिक्त वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार आहोत. याकरता सार्वजनिक आणि खाजगी वित्तीय साधनांचा उपयोग करून घेतला जाईल. या माध्यमातून लवचिक स्वरुपाच्या हरित वित्तीय सहकार्यविषयक उपाययोजनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठीचा अभिनव पथदर्शी मार्ग तयार होऊ शकणार आहे.

स्वच्छ ऊर्जा मूल्य साखळीशी संबंधित प्रत्येक टप्प्यावरील पथदर्शी प्रकल्पांचा संच निश्चित करण्यासाठी, निगडीत असू शकणाऱ्या सरकारी संस्था, नागरी समाजिक संस्था, अमेरिका तसेच भारतातील खाजगी क्षेत्र, लोकहितासाठी काम करणाऱ्या संस्था तसेच बहुउद्देशीय विकास बँका अशा सर्वच घटकांसोबत काम करण्याचा मानस अमेरिका आणि भारताने बाळगला आहे. त्यादृष्टीने आम्ही आखलेल्या पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या तसेच निश्चित केलेल्या क्षेत्रांमधील पुरवठा साखळीचा विस्तार करण्यात आणि त्यात विविधता आणण्यासाठी अर्थपूर्ण ठरणारे योगदान देऊ करणाऱ्या घटकांचा विचार केला जाणार आहे. या सोबतच अमेरिका आणि भारत, परस्परांमधली भागीदारी सुरू करून उत्तरोत्तर तिची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी वचनबद्ध आहेत, आणि त्यासाठीच दोन्ही देशांची सरकारे, खाली नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या आधारे या उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींसोबत काम करण्यासाठीही वचनबद्ध आहेत.

स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळीतील एखाद्या विशिष्ट घटकाशी संबंधित उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अल्प मुदतीच्या गुंतवणुकीच्या संधी निश्चित केल्या जातील. या सुरुवातीच्या टप्प्यावर स्वच्छ ऊर्जेशी संबंधित पुढे दिलेल्या घटकांवर भर दिला जाईल:

  • सौर चकत्या तसेच चकत्यांच्या उत्पादनासाठी लागणारी उपकरणे आणि अत्यंत अत्याधुनिक सौर विद्युत घट (solar cell)
  • पवन ऊर्जा टर्बाईनच्या संरक्षण आच्छादनाचे सुटे भाग (Wind turbine nacelle components)
  • ऊर्जा संवाहक, वायरी (cabling), रोहित्र (transformers) अशा विद्युत प्रवाह वाहिन्यांसाठीचे सुटे भाग, तसेच अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान 
  • विद्युत घटासह, ऊर्जा साठवणुकीसाठी आवश्यक सुटे भाग 
  • दुचाकी तसेच तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी विद्युत घटांचे संच, तसेच शून्य कार्बन उत्सर्जनक्षम ई-बस आणि ट्रकचे सुटे भाग
  • उच्च - कार्यक्षम वातानूकुलन यंत्रे आणि छताच्या पंख्यांचे सुटे भाग

वर नमूद केलेल्या पुरवठा साखळीशी संबंधित उपलब्ध संधींचा लाभ घेण्यासाठी तसेच प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प संचांसाठी सुरुवातीच्या टप्प्यावरचे पाठबळ देण्यासाठी खाजगी क्षेत्रासोबत भागीदारी केली जाईल. यादृष्टीने तात्विक पातळीवर आफ्रिकेमध्ये स्वच्छ ऊर्जा उत्पादनांची अंमलबाजणी करण्यावर भर असलेल्या एका प्रकल्पाची निवड केली गेली आहे. यासाठी आवश्यक अतिरिक्त गुंतवणुकीचे नियोजन आणि निधीचे स्रोत कालांतराने विकसित केले जाऊ शकतील. हा प्रयत्न सौर, पवन, विद्युत घट आणि अत्यावश्यक खनिज क्षेत्रांशी संबंधित यूएस डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (DFC) च्या सहकार्याने खाजगी क्षेत्रासोबतच्या भागीदारीने केला जाणार आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा क्षेत्रासाठी आवश्यक घटकांच्या उत्पादनाला अर्थ पुरवठा करण्याच्या संधी सातत्यपूर्ण रितीने निर्माण करता येतील. अशा प्रकारची गुंतवणूक ही भारताच्या हरित संक्रमण निधीअंतर्गत येऊ शकते. यामुळे नवीकरणीय ऊर्जा, साठवणूक आणि ई - मोबिलिटी साठी अर्थ पुरवठा करण्यात मदत मिळू शकते. यातून स्थानिक उत्पादनांची मागणी अधिक ठोस होऊ शकते. यासोबतच एव्हरसोर्स कॅपिटल या  भारताच्या खाजगी क्षेत्रातील समभाग इक्विटी फंड व्यवस्थापकाला, अक्षय ऊर्जा, कार्यक्षम वातानूकुलन, वीज प्रवाहाचे वितरण यासंबंधीच्या स्वच्छ तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी यूएस डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने 900 दशलक्ष डॉलर्सच्या निधीचे पाठबळ उभे करून दिले जाऊ शकते.

आफ्रिकेतील भागीदारांनी या क्षेत्रात स्वच्छ ऊर्जा साधनांची अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय वचनबद्धता व्यक्त केली आहे. त्याअंतर्गत सौर ऊर्जा आणि विद्युत घट साठवणुकीसाठी उपलब्ध संधींवर भर दिला गेला आहे. या भागीदारांसोबत त्रिपक्षीय संबंध प्रस्थापित करून, भारत आणि अमेरिका या भागीदारांसोबत त्यांच्या क्षेत्रात सौर ऊर्जा साधनांचा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू करण्याच्या मोठ्या संधीला प्रत्यक्ष अंमलबजावणीचे स्वरुप देण्यासाठी बहुपातळीवर काम करू शकतील, त्यादृष्टीने आखलेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक वातावरण नेमकेपणाने समजून घेऊ शकतील, प्रकल्प यशस्वी व्हावेत आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करता यावी यासाठी भागीदारीसोबतच अर्थ पुरवठ्याचे प्रारुपही अधिक बळकट करू शकतील. या सगळ्याच्या अनुषंगाने गुंतवणुकीच्या संधींचा शोध आणि त्याबद्दल अधिक नेमकेपणाने समजून घेण्यासाठी,  सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रासोबतच्या भागीदारीची नेमकी क्षेत्र निश्चित करण्यासाठी, आणि स्थानिक आफ्रिकी उत्पादकांसोबतच्या भागीदारीचा विस्तार करण्यासाठी भारतीय कंपन्यांना सहकार्य करावे हाच अमेरिकेचा मानस आहे. त्यादृष्टीनेच या क्षेत्रातील आरोग्य सुविधा केंद्रांच्या परिसरात स्वच्छ ऊर्जा साधनांच्या वापराची अंमबलबजावणी व्हावी, तसेच इलेक्ट्रिक वाहने वापरात यावीत यासाठी यूएस डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या संस्था भारतातील आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सहकार्याने आघाडीवर राहून प्रयत्न करत आहेत.

स्थानिक पातळीवर उत्पादन घेतलेल्या स्वच्छ तंत्रज्ञानाच्या मागणीला निश्चित बळकटी देऊ शकतील अशी धोरणे आखण्याच्या दृष्टीने सल्लामसलत करण्यासाठी परस्परांसोबत तसेच या उद्योग क्षेत्रासोबत परस्पर सहकार्याच्या अशा भागीदाऱ्या केल्या जात आहेत. त्यादृष्टीनेच अमेरिकेचा द्विपक्षीय पायाभूत सुविधा कायदा आणि महागाई घट कायदा हे ऐतिहासिक मानले गेलेले कायदे आहेत. स्वच्छ ऊर्जाविषयक तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणातील वापरासाठी गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने या कायद्यांची आखणी केली गेली होती. आणि त्याला समांतरपणे स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळीला योग्यरित्या अपेक्षित लक्ष्यापर्यंत पोहचवण्यासाठी अमेरिकेच्या उत्पादन क्षमतेचे पुनरुज्जीवन देखील केले गेले होते. अगदी अशाच रितीने, भारताने उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनांच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 4.5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. मात्र त्याचवेळी जागतिक बाजारपेठेशी संबंधित विविध परिस्थितीजन्य पैलू आणि या क्षेत्रातून मिळणारा अल्प स्वरुपातील नफ्याचा वाव लक्षात घेऊन, या गुंतवणुकीचा विस्तार आणि संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त धोरणांचीही आखणी करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हीच बाब गृहीत धरून मागणीशी संबंधित अनिश्चितता कमी करता यावी त्याचवेळी उत्पादनासाठी आवश्यक सामग्री, तांत्रज्ञानविषयक कौशल्य, अर्थ पुरवठा आणि उत्पादनासाठी आवश्यक इतर घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आणि संरक्षित असतील, याची सुनिश्चिती करण्यासाठी धोरणात्मक चौकटींची आखणी कशी करावी याबद्दलचे परस्परांचे अनुभव एकमेकांसोबत सामाईक करणे महत्वाचे असल्याचे तत्वही दोन्ही देशांनी मान्य केले आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आखलेल्या या पथदर्शी आराखड्याचा हेतू प्रकल्पांसाठी प्रारंभीच्या टप्प्यावरचे छोट्या कालावधीच्या स्वरुपातली सहकार्यविषयक व्यवस्था म्हणून काम करणे असा आहे. यामुळे या भागीदारीअंतर्गत आवश्यकतेनुसार बैठकांच्या सत्राच्या आयोजनासाठी तसेच ही भागीदारी एक मैलाचा दगड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेला दीर्घकाली पथदर्श आराखडा तयार करण्यासाठी मदतीचे ठरणारे अनुभव मिळू शकतील. महत्वाचे म्हणजे हा पथदर्शी आराखडा, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गतचे अधिकार किंवा जबाबदाऱ्या निर्माण करण्याच्या हेतूने आखलेला नाही.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179969) Visitor Counter : 7