संरक्षण मंत्रालय
ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या वाढत्या संरक्षण सामर्थ्याचा तेजस्वी दाखला - संरक्षणमंत्री
“2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादनाचे आणि 50,000 कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्याची आशा संरक्षण मंत्र्यांनी केली व्यक्त
शैक्षणिक सर्वोत्कृष्टतेच्या पलीकडे जाऊन सृजनशील, नवोन्मेषकर्ते आणि राष्ट्रविकासातील योगदान देणारे बनण्याचे राजनाथ सिंह यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
Posted On:
16 OCT 2025 4:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2025
ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या वाढत्या स्वदेशी सामर्थ्याचा एक तेजस्वी दाखला आहे, जो देशात स्वयंपूर्ण संरक्षण उत्पादन प्रणाली निर्माण करण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या अथक प्रयत्नांचा परिपाक आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. ते आज पुण्यामध्ये सिंबॉयसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी विश्वास आणि चिकाटी यांसारख्या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले.

जेव्हा सरकारने भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू केले, तेव्हा सुरुवातीला ते कठीण वाटत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली गेली नाही आणि याच निर्धारामुळे या प्रयत्नांचे हळूहळू सकारात्मक परिणाम दिसू लागले, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले
"स्वातंत्र्यानंतर आपण शस्त्रास्त्रांसाठी मोठ्या प्रमाणावर इतर देशांवर अवलंबून राहिलो होतो. भारतातच शस्त्रास्त्र निर्मिती करण्याची राजकीय इच्छाशक्ती नव्हती, तसेच संरक्षण उत्पादनास प्रोत्साहन देणारे कायदेही नव्हते. त्यामुळे आपण शस्त्र खरेदी करण्याची सवय लावून घेतली होती.या स्थितीत बदल करणे आवश्यक होते. भारतीय सैनिकांसाठी देशातच स्वदेशी शस्त्रास्त्रे तयार केली जातील, हा आमचा संकल्प आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान संपूर्ण जगाने आपल्या सैनिकांचे शौर्य पाहिले. त्यांनी बहुसंख्य 'मेड इन इंडिया' उपकरणांचा वापर करून निर्धारित उद्दिष्टे गाठली,” असे राजनाथ सिंह यांनी ठामपणे सांगितले.
संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात तरुणांच्या योगदानाची दखल घेत सांगितले की, गेल्या 10 वर्षांत वार्षिक संरक्षण उत्पादन 46,000 कोटी रुपयांपासून वाढून विक्रमी 1.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, यामध्ये सुमारे 33,000 कोटी रुपयांचे योगदान खाजगी क्षेत्राचे आहे. 2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि 50,000 कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचे उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशाच्या पलीकडे जाऊन सृजनशीलकार, नवोन्मेषकर्ते बनण्याचे आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचा ध्यास घेण्याचे आवाहन केले. केवळ पदवी मिळवणे म्हणजे यशस्वी होणे नसून समाजाच्या फायद्यासाठी ज्ञानाचा अर्थपूर्ण वापर करणे हेच खरे यश आहे, यावर त्यांनी भर दिला.
भारताचे भविष्य घडवण्यात कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की तुम्हाला काय माहीत आहे?’ हे विचारण्याचे युग आता संपले आहे. आता , ‘तुम्ही काय करू शकता?’ असे जग विचारते. ज्या ज्ञानाचा उपयोग करता येत नाही, ते ज्ञान अपूर्ण आहे. शिकणे आणि प्रत्यक्ष कृती करणे यातील दुवा म्हणजे कौशल्य.
तंत्रज्ञानाचा, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभाव यावर बोलताना नोकरी गमावण्याची आणि मानवी अनावश्यकतेची भीती त्यांनी दूर केली. एआय मानवांची जागा घेणार नाही, मात्र, जे एआयचा वापर करतात, ते एआयचा वापर न करणाऱ्यांची जागा घेतील, असे ते म्हणाले. तंत्रज्ञान हे केवळ एक साधन राहिले पाहिजे, मानवी संवेदनशीलता, मूल्ये आणि नैतिकतेचा पर्याय होता कामा नये, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी सोशल मीडिया आणि बाह्य दबावांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवरही भाष्य केले. त्यांनी तरुणांना तुलनेत न अडकता स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट ठेवून आपल्या अमृत काळात प्रवेश करत असताना, विद्यार्थीही आपल्या आयुष्याच्या सर्वात निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पुढील 20-25 वर्षे केवळ तुमच्या करिअरलाच नव्हे, तर राष्ट्राच्या भवितव्यालाही आकार देतील. तुमची महत्त्वाकांक्षा देशाच्या परिवर्तनाला ऊर्जा देवो, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचे इतर मंत्री आणि विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179917)
Visitor Counter : 19