पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 16 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशला भेट देणार


पंतप्रधान कुर्नूलमध्ये सुमारे 13,430 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार

उद्योग, वीज पारेषण, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह विविध क्षेत्रांमधील प्रकल्पांचा यात समावेश

पंतप्रधान श्रीशैलम येथील श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करणार आणि दर्शन घेणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे स्मरण करण्यासाठी पंतप्रधान श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देणार

Posted On: 14 OCT 2025 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑक्‍टोबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी 11:15 च्या सुमारास, ते नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम स्थित श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करून  दर्शन घेतील.  त्यानंतर, दुपारी 12:15  वाजता ते श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देतील.

त्यानंतर पंतप्रधान कुर्नूलला जातील, तिथे ते दुपारी 2:30 वाजता सुमारे 13,430 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण  करतील. याप्रसंगी ते एका जाहीर  सभेलाही संबोधित करतील.

श्रीशैलम येथे पंतप्रधान

पंतप्रधान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 52 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करतील आणि दर्शन घेतील. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच मंदिर परिसरात ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ यांचे सहअस्तित्व असून ते अशा प्रकारचे संपूर्ण देशातील एकमेव आहे.

पंतप्रधान श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला देखील भेट देतील, हे एक स्मारक संकुल आहे ज्यामध्ये ध्यान मंदिर (ध्यानधारणा सभागृह) समाविष्ट आहे ज्यामध्ये चार कोपऱ्यांमध्ये चार प्रतिष्ठित किल्ले - प्रतापगड, राजगड, रायगड आणि शिवनेरी यांच्या प्रतिकृती  आहेत. त्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्यानस्थ पुतळा आहे. हे केंद्र श्री शिवाजी स्मारक समितीद्वारे चालवले जाते, जे 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पवित्र मंदिराला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ श्रीशैलम येथे स्थापन करण्यात आले.

 

पंतप्रधान कुरनूल येथे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 13,430 कोटी रुपयांच्या विविध  विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. हे प्रकल्प उद्योग, वीज पारेषण, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील आहेत, ज्यातून प्रादेशिक पायाभूत सुविधा वाढवणे, औद्योगिकीकरणाला गती देणे आणि राज्यात समावेशक सामाजिक-आर्थिक विकास घडवून आणण्याप्रती  सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित होते.

पंतप्रधान कुरनूल-III पूलिंग स्टेशन येथे 2,880  कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या पारेषण व्यवस्था मजबुतीकरणाची पायाभरणी करतील. या प्रकल्पात 765 केव्ही डबल-सर्किट कुरनूल-III पूलिंग स्टेशन-चिलाकलुरिपेटा पारेषण लाइनचे बांधकाम समाविष्ट आहे, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन क्षमता 6,000 एमव्हीएने वाढेल आणि देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेचे मोठ्या प्रमाणात पारेषण  सक्षम होईल.

पंतप्रधान कुर्नूलमधील ओरवाकल औद्योगिक क्षेत्र आणि कडापा येथील कोप्पर्थी औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी देखील करतील. या दोन्ही प्रकल्पांमध्ये एकूण गुंतवणूक सुमारे 4,920 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे अत्याधुनिक, बहुऔद्योगिक केंद्र राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्ट (एनआयसीडीआयटी) तसेच आंध्र प्रदेश औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ लिमिटेड (एपीआयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे. या केंद्रात प्लग-अँड-प्ले पायाभूत सुविधा आणि वॉक-टू-वर्क संकल्पना असलेली रचना करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि सुमारे एक लाख रोजगार निर्माण होतील, परिणामी आंध्र प्रदेशच्या रायलसीमा प्रदेशात औद्योगिक विकास आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल.

रस्ते पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, पंतप्रधान सब्बावरम ते शीलानगर पर्यंत 960 कोटी रुपये खर्चाच्या सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्गाची पायाभरणी करतील. विशाखापट्टणममधील वाहतूक कोंडी कमी करणे तसेच व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, एकूण 1,140 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाच्या सहा रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल, ज्यामध्ये पिलेरू-कलूर विभागाचे चौपदरीकरण, कडापा/नेल्लोर सीमेपासून सीएस पुरमपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण, राष्ट्रीय महामार्ग-165 वरील गुडीवाडा आणि नुजेला रेल्वे स्थानकांदरम्यानचा चारपदरी रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी), राष्ट्रीय महामार्ग-716 वरील पापाग्नी नदीवरील मोठा पूल, राष्ट्रीय महामार्ग-565 वरील कानिगिरी बायपास आणि राष्ट्रीय महामार्ग-544DD वरील एन. गुंडलपल्ली टाउन बायपास विभागाची सुधारणा यांचा समावेश आहे. हे प्रकल्प सुरक्षितता वाढवतील, प्रवासाचा वेळ कमी करतील आणि आंध्र प्रदेशातील प्रादेशिक संपर्क अधिक बळकट करतील.

पंतप्रधान 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रमुख रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि राष्ट्रसमर्पण करतील. या प्रकल्पांमध्ये कोट्टावलसा-विजियानगरम चौथ्या रेल्वे मार्गाची पायाभरणी, पेंडुर्ती आणि सिम्हाचलम उत्तर दरम्यान रेल्वे उड्डाणपूलाची पायाभरणी, तसेच कोट्टावलसा-बोद्दावरा विभाग आणि शिमिलीगुडा-गोरापूर विभागाच्या दुहेरीकरणाचे राष्ट्रार्पण यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासी आणि मालवाहतुकीची गती आणि सुरक्षितता वाढेल, तसेच औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल. यामुळे स्थानिक समुदायासाठी रोजगारांच्या संधी निर्माण होतील.

ऊर्जा क्षेत्रात, पंतप्रधान गेल इंडिया लिमिटेडची श्रीकाकुलम-अंगुल नैसर्गिक वायू पाइपलाइन राष्ट्राला समर्पित करतील. ही पाईपलाईन एकूण 1,730 कोटी रुपये खर्चून टाकण्यात आली आहे, त्यापैकी आंध्र प्रदेशात सुमारे 124 किमी आणि ओडिशामध्ये 298 किमी लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. पंतप्रधान आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे इंडियन ऑइलच्या 60 टीएमटीपीए (हजार मेट्रिक टन प्रतिवर्ष) एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतील, जो सुमारे 200 कोटी रुपये गुंतवणुकीतून स्थापन झाला आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील चार जिल्ह्यांमध्ये, तामिळनाडूतील दोन जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकातील एका जिल्ह्यात 80 वितरकांद्वारे 7.2 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देईल. या प्रदेशातील घरे आणि व्यवसायांसाठी विश्वासार्ह एलपीजी पुरवठा सुनिश्चित करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.

संरक्षण उत्पादन मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सुमारे 360 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत कृष्णा जिल्ह्यातील निम्मलुरु येथे उभारलेल्या प्रगत नाईट व्हिजन उत्पादनांच्या कारखान्याचे राष्ट्रार्पण करतील. या कारखान्यात भारतीय संरक्षण दलांसाठी प्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणालीचे उत्पादन होणार असून त्यामुळे संरक्षण उत्पादनात क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढेल आणि या प्रदेशात कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2179153) Visitor Counter : 5