पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाच्या राष्ट्रपतींसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत केलेले निवेदन
Posted On:
14 OCT 2025 7:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2025
महामहिम राष्ट्रपती हुरेलसुख,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यम क्षेत्रातील मित्रहो,
नमस्कार !
सॅन-बान-ओ
राष्ट्रपती हुरेलसुख आणि त्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे भारतात स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे.
मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सहा वर्षांनंतर भारतात आगमन होणे ही एक विशेष बाब आहे. भारत आणि मंगोलिया आपल्या राजनैतिक संबंधांची 70 वर्ष तसेच धोरणात्मक भागीदारीची 10 वर्षे साजरी करत असताना ही भेट होत आहे. या निमित्ताने आम्ही आमचा सामायिक वारसा, वैविध्य आणि घनिष्ठ नागरी संबंधांचे प्रतीक म्हणून एक संयुक्त टपाल तिकीट जारी केले आहे.
मित्रांनो,
आज आमच्या भेटीचा प्रारंभ एक पेड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण करुन झाला. राष्ट्रपती हुरेलसुख यांनी आपल्या दिवंगत मातेच्या नावाने लावलेले वटवृक्षाचे रोप येणाऱ्या कित्येक पिढया आमची प्रगाढ मैत्री आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी असलेल्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून कायम राहील.
मित्रांनो,
दहा वर्षांपूर्वी माझ्या मंगोलिया दौऱ्यात, आम्ही परस्पर भागीदारीला धोरणात्मक भागीदारीचे स्वरूप दिले होते. गेल्या दशकभरात या भागीदारीच्या अनेक पैलूंमध्ये नवीन बंध निर्माण झाले असून त्यांचा नव्याने विस्तार झाला आहे.
संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आमचे सहकार्य देखील सातत्याने मजबूत होत आहे. आम्ही प्रशिक्षण कार्यक्रमांपासून ते दूतावासात संरक्षण अटॅशेच्या (लष्करी अधिकारी) नियुक्तीपर्यंत अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे मंगोलियाच्या सीमा सुरक्षा दलांसाठी भारत एक नवीन क्षमता-निर्मिती कार्यक्रम देखील सुरू करणार आहे.
मित्रांनो,
जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर आमचा दृष्टिकोन आमच्या सामायिक मूल्यांवर आधारलेला आहे. जागतिक व्यासपीठांवर देखील आम्ही घनिष्ट भागीदार आहोत. आम्ही दोन्ही राष्ट्रे मुक्त, खुल्या, समावेशक आणि नियमांवर आधारित हिंद -प्रशांत क्षेत्राचे समर्थन करतो. ग्लोबल साऊथ देशांच्या आवाजाला अधिक बुलंद करण्यासाठी आम्ही एकत्रित कार्य करत आहोत.
मित्रांनो,
भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत - ते आमच्यातील भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. आमच्यातील संबंधांची खरी सखोलता आणि व्याप्ती दोन्ही देशांमधील नागरिकांच्या परस्पर संबंधांमधून दिसून येते.
अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत, या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या ऐतिहासिक संबंधांना नवीन शक्ती देण्यासाठी आम्ही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मला हे सांगताना आनंद वाटतो की, भगवान बुद्धांचे दोन महान शिष्य - सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष पुढच्या वर्षी भारतातून मंगोलियाला पाठविण्यात येतील.
आम्ही -‘गंदन मॉनेस्ट्री‘ मध्ये एका संस्कृत शिक्षकांना पाठविणार आहोत. त्यांच्यामार्फत तिथल्या बौद्ध ग्रंथांचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल. आणि प्राचीन ज्ञान परंपरा पुढे नेण्यासाठी मदत होईल. आम्ही एक दशलक्ष प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगोलियामध्ये बौद्ध धर्मासाठी नालंदा विद्यापीठाची खूप महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे आणि आज आम्ही एक गोष्ट निश्चित केली आहे की, नालंदा आणि ‘गंदन मॉनेस्ट्री‘ यांच्या संयुक्त कार्यातून आम्ही या ऐतिहासिक संबंधांमध्ये नवीन ऊर्जा आणू.
आमचे संबंध केवळ केंद्र सरकारपुरतेच मर्यादित नाहीत- आज लडाख स्वायत्त पर्वतीय विकास मंडळ आणि मंगोलियाच्या ‘‘आर-खॉंगाय परगणा‘‘ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे आपल्या सांस्कृतिक संबंधांना नवीन ऊर्जा मिळेल.
मित्रांनो,
आमच्या सीमारेषा भलेही दोन्ही राष्ट्रांना जोडणा-या नाहीत, परंतु भारताने मंगोलियाला नेहमी आपला एक शेजारी या रूपामध्ये पाहिले आहे. आणि शेजारी या नात्याने आम्ही थेट लोकांचे-लोकांशी संबंध वाढावेत, यासाठी प्रोत्साहन देत राहू. आम्ही निर्णय घेतला आहे की, मंगोलियाच्या नागरिकांना मोफत ई-व्हिसा दिला जाईल. त्याचबरोबर भारत दरवर्षी मंगोलियाच्या युवा सांस्कृतिक राजदूतांची भारत यात्राही प्रायोजित करेल.
मित्रांनो,
मंगोलियाच्या विकास कार्यामध्ये भारत एक दृढ आणि विश्वसनीय भागीदार राहिला आहे.
भारताच्या 1.7 अब्ज डॉलर्सच्या ‘लाइन ऑफ क्रेडिट‘ ने बनविण्यात येत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे मंगोलियाच्या ऊर्जा सुरक्षेला नवीन बळकटी मिळेल. हा भारताचा जगातील सर्वात मोठा विकास भागीदारी प्रकल्प आहे आणि अडीच हजारांपेक्षाही जास्त भारतीय आपल्या मंगोलियातील सहकारी मंडळींबरोबर एकत्रितपणे हा प्रकल्प साकार करीत आहेत.
कौशल्य विकासामध्ये आमचे सहकार्य आणखी वाढविण्यात आले आहे. अटल बिहारी वाजपेयी माहिती तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र आणि भारत-मंगोलिया मैत्री प्रशाला यांच्या माध्यमातून मंगोलियातील युवकांच्या स्वप्नांना नवीन पंख मिळत आहेत. हे सर्व प्रकल्प आमच्यातील दृढ मैत्रीची साक्ष देतात.
याबरोबरच आज आम्ही अनेक अशा प्रकल्पांची घोषणा करणार आहोत की, त्या प्रकल्पांमुळे जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येईल. मंगोलियाच्या लोकांच्या गरजा लक्षात घेवून त्यानुसार आम्ही हे प्रयत्न पुढेही सुरू ठेवणार आहोत.
मला आनंद वाटतो की, आमच्या खाजगी क्षेत्रामध्येही ऊर्जा, दुर्मिळ खनिजे, ‘रेअर -अर्थ’, डिजिटल, खाणकाम, कृषी, दुग्धोत्पादन आणि सहकार क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन शक्यतांचा शोध घेतला जात आहे.
महामहिम,
दोन प्राचीन संस्कृतींमधल्या विश्वास आणि मैत्री यांच्या भक्कम पायावर आपल्यातील हे संबंध टिकून आहेत. समान सांस्कृतिक वारसा, लोकशाही मूल्ये आणि विकास यासाठी समान कटिबद्धता यावर त्यांची जोपासना होत आहे. मला विश्वास आहे की, एकमेकांच्या सहकार्याने संयुक्तपणे ही धोरणात्मक भागिदारी नव्या उंचीवर घेवून जाऊ.
हा ऐतिहासिक दौरा आणि भारताविषयी आपली अतूट वचनबद्धता आणि मैत्री यांच्यासाठी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो.
‘‘बायर-ला‘‘
खूप-खूप धन्यवाद !!
* * *
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179088)
Visitor Counter : 9
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam