पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सी-295 विमानांच्या निर्मितीसाठी टाटा विमाननिर्मिती संकुलाचे संयुक्त उद्घाटन
वडोदरामधली सी-295 विमान सुविधा जागतिक एरोस्पेस निर्मितीमध्ये भारताचे विश्वासू भागीदार म्हणून स्थान अधिक मजबूत करते: पंतप्रधान
मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड: पंतप्रधान
सी-295 विमान कारखाना नव्या भारताची नवीन कार्यसंस्कृती प्रतिबिंबित करतो : पंतप्रधान
भारताची संरक्षण उत्पादन परिसंस्था नवी उंची गाठत आहे: पंतप्रधान
Posted On:
28 OCT 2024 11:37AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी आज गुजरातमधल्या वडोदरा इथल्या टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडच्या आवारात सी-295 विमानांच्या निर्मितीसाठी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे संयुक्त उद्घाटन केले. यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी तिथे आयोजित प्रदर्शनाची पाहणी केली.
स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांचा हा पहिला भारत दौरा असून, आज दोन्ही देशांमधल्या भागीदारीला नवी दिशा मिळत आहे, असे उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. सी-295 विमान निर्मिती संकुलाच्या उद्घाटनामुळे केवळ दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील असे नाही, तर ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या अभियानालाही गती मिळेल, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. मोदी यांनी यावेळी एअरबस आणि टाटाच्या संपूर्ण चमूला शुभेच्छा दिल्या. तसेच, पंतप्रधानांनी दिवंगत रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
सी-295 विमान कारखाना हा नव्या भारताच्या नवीन कार्यसंस्कृतीचे प्रतिबिंब आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतात कोणत्याही प्रकल्पाच्या संकल्पना ते अंमलबजावणीपर्यंतचा वेग इथे पाहता येतो असेही ते म्हणाले. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या या कारखान्याच्या पायाभरणीची आठवण करून देत, ही सुविधा आता सी-295 विमानांच्या उत्पादनासाठी सज्ज आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणीतला अनावश्यक विलंब दूर करण्यावर भर देताना, पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना वडोदरा येथे बॉम्बार्डियर ट्रेन कोच निर्मिती सुविधेच्या स्थापनेची आठवण करून दिली आणि तो कारखाना विक्रमी वेळेत उत्पादनासाठी तयार झाला होता अशी माहिती दिली. या कारखान्यात बनवलेले मेट्रो कोच आज इतर राष्ट्रांना निर्यात केले जात आहेत, असेही ते म्हणाले. आज उद्घाटन झालेल्या सुविधेत बनवलेली विमानेही निर्यात केली जातील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
प्रसिद्ध स्पॅनिश कवी आंतोनियो मशादो यांचा उल्लेख करत, आपण ध्येयाकडे वाटचाल सुरू करताच, ध्येयाचा मार्ग आपोआप तयार होतो असे पंतप्रधान म्हणाले. भारताची संरक्षण उत्पादन परिसंस्था आज नवीन शिखरे गाठत असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी ठोस पावले उचलली नसती, तर आज हे शक्य झाले नसते. एक दशकापूर्वी, संरक्षण उत्पादनाची ओळख आयातीवर अवलंबून होती आणि भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन होऊ शकेल, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. सरकारने एका नव्या मार्गावर चालण्याचा आणि भारतासाठी नवीन उद्दिष्टे निश्चित करण्याचा निर्णय घेतला, त्याचे परिणाम आज स्पष्ट दिसत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या संरक्षण क्षेत्रातील परिवर्तन हे योग्य योजना आणि भागीदारीमुळे शक्यतांचे समृद्धीत कसे रूपांतर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दशकात धोरणात्मक निर्णयांनी भारतातील संरक्षण उद्योगाच्या वाढीला चालना दिली आहे. आम्ही संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवला, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना अधिक कार्यक्षम बनवले, आयुध निर्मितीचे सात मोठ्या कंपन्यांमध्ये पुनर्गठन केले आणि डीआरडीओ व हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांना सक्षम केले, असे मोदी म्हणाले. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स योजनेमुळे गेल्या पाच-सहा वर्षांत सुमारे 1,000 संरक्षण स्टार्टअप्सच्या वाढीला चालना मिळाली आहे. गेल्या दशकात भारताची संरक्षण निर्यात 30 पटींनी वाढली असून, देश आता 100 हून अधिक देशांना उपकरणे निर्यात करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधानांनी कौशल्य आणि रोजगार निर्मितीवर भर देताना सांगितले की, एअरबस-टाटा कारखान्यासारख्या प्रकल्पांमुळे हजारो नोकऱ्या निर्माण होतील. हा कारखाना 18,000 विमान भागांच्या स्वदेशी निर्मितीला पाठबळ देईल, त्यामुळे देशभरात सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी प्रचंड संधी उपलब्ध होतील. आजही भारत हा जगातील प्रमुख विमान कंपन्यांसाठी सुटे भागांचा सर्वात मोठा पुरवठादार देश असल्याचे नमूद करत मोदी म्हणाले की, नवीन विमान निर्मिती कारखाना भारतातील नवीन कौशल्ये आणि नवीन उद्योगांना मोठी चालना देईल.
आपण आजच्या कार्यक्रमाकडे वाहतूक विमान निर्मितीच्या पलीकडे पाहत आहोत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गेल्या दशकात भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातल्या अभूतपूर्व वाढीवर प्रकाश टाकत मोदी म्हणाले की, भारत देशातल्या शेकडो लहान शहरांना हवाई संपर्काद्वारे जोडत आहे आणि त्याच वेळी भारताला विमान वाहतूक आणि एमआरओ क्षेत्राचे केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. या परिसंस्थेमुळे भविष्यात मेड इन इंडिया नागरी विमानांचा मार्ग मोकळा होईल. विविध भारतीय एअरलाइन्सनी 1200 नवीन विमानांची ऑर्डर दिली असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की, याचा अर्थ भविष्यात भारत आणि जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरी विमानांची रचना करण्यापासून ते निर्मितीपर्यंत हा नवीन कारखाना मोठी भूमिका बजावेल.
वडोदरा शहर हे सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांचे भक्कम केंद्र असल्याचे नमूद करून, मोदी म्हणाले की, हे शहर भारताच्या या प्रयत्नांमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल. आता हा संपूर्ण प्रदेश भारतात विमान निर्मितीचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे, असेही त्यांनी सांगितले. भारत आणि स्पेनमधील सांस्कृतिक संबंधांचे महत्त्व सांगताना, फादर कार्लोस व्हॅले स्पेनमधून येऊन गुजरातमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी आपल्या आयुष्याची पन्नास वर्षे येथे घालवली, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी आपल्या विचारांनी आणि लेखनाने संस्कृती समृद्ध केली. भारत सरकारने त्यांच्या महान योगदानाबद्दल त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले, अशी माहिती त्यांनी दिली.
योग स्पेनमध्येही खूप लोकप्रिय आहे आणि स्पॅनिश फुटबॉलही भारतात पसंत केला जातो असे मोदी यांनी सांगितले. रिअल माद्रिद आणि बार्सिलोना क्लब यांच्यात काल झालेल्या फुटबॉल सामन्याबद्दल भाष्य करताना मोदी म्हणाले की, बार्सिलोनाचा मोठा विजय हा भारतातही चर्चेचा विषय होता आणि दोन्ही क्लबच्या चाहत्यांचा उत्साह स्पेनप्रमाणेच भारतातही होता. खाद्यपदार्थ असोत, चित्रपट किंवा फुटबॉल, आमच्या लोकांमध्ये असलेल्या मजबूत नात्यांनी नेहमीच आमचे संबंध दृढ केले आहेत, असे मोदी म्हणाले. भारत आणि स्पेनने 2026 हे वर्ष भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि एआय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
भाषणाचा समारोप करताना, आजचा कार्यक्रम भारत आणि स्पेन यांच्यात अनेक नवीन संयुक्त सहकार्य प्रकल्पांना प्रेरणा देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी स्पॅनिश उद्योग आणि नवसंशोधकांना भारतात येण्यासाठी आणि देशाच्या विकास प्रवासात भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यांना प्रोत्साहित केले.
याप्रसंगी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
सी-295 कार्यक्रमांतर्गत एकूण 56 विमानांचा पुरवठा केला जाणार असून, त्यापैकी 16 विमाने एअरबस थेट स्पेनमधून देणार आहे आणि उर्वरित 40 विमाने भारतात तयार केली जाणार आहेत.
ही 40 विमाने भारतात बनवण्याची जबाबदारी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडवर सोपवण्यात आली आहे. ही सुविधा भारतातल्या लष्करी विमानांसाठी खाजगी क्षेत्रातील पहिली फायनल असेंब्ली लाईन (FAL) ठरली आहे. यामध्ये विमानांच्या निर्मितीपासून ते जुळवणी, चाचणी, वितरण आणि देखभालीपर्यंत संपूर्ण परिसंस्था विकसित केली जाईल. टाटा व्यतिरिक्त, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुख संरक्षण कंपन्या तसेच खाजगी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या कार्यक्रमाला हातभार लावणार आहेत. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये, पंतप्रधानांनी वडोदरा फायनल असेंब्ली लाईनची पायाभरणी केली होती.
* * *
आशिष सांगळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178697)
Visitor Counter : 4
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam