पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही आयोजित जागतिक शिखर परिषदेला 2024 ला केले संबोधित
जग चिंतामग्न असताना, भारत आशेचे किरण पसरवत आहे: पंतप्रधान
आज भारत प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विभागात अभूतपूर्व वेगाने काम करत आहे: पंतप्रधान
भारत आज एक विकसनशील देश आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे: पंतप्रधान
भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे: ज्यात उत्तुंग भरारी मारण्याची क्षमता आहे: पंतप्रधान
भारत आता आधुनिक विचारसरणीने आगेकूच करत आहे: पंतप्रधान
भारतातील 140 कोटी नागरिक विकसित भारताच्या संकल्पात सामील झाले आहेत, ते स्वतः ही मोहीम चालवत आहेत: पंतप्रधान
भारताला दुहेरी एआय पॉवर, त्यातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (फर्स्ट एआय,आर्टिफिशियल इंटेलिजन्स), दुसरी एआय(सेकंड एआय, अॅस्पिरेशनल इंडिया) यांचा लाभ मिळत आहे: पंतप्रधान
भारत गृहीत धरलेल्या संबंधांवर विश्वास ठेवत नाही, आमच्या संबंधांचा पाया निष्ठा आणि विश्वासार्हता आहे: पंतप्रधान
तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण भारताने विश्वाला सार्वजनिक पायाभूत सुविधांचा नवा मार्ग दाखवला आहे: पंतप्रधान
डिजिटल नवोन्मेष आणि लोकशाही मूल्ये एकत्र राहू शकतात हे भारताने दाखवून दिले आहे: पंतप्रधान
Posted On:
21 OCT 2024 12:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2024 ला संबोधित केले. प्रथम पंतप्रधानांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि सांगितले की या शिखर परिषदेत अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. आपले विचार मांडणाऱ्या विविध क्षेत्रातील जागतिक नेत्यांच्या उपस्थितीची त्यांनी नोंद घेतली.
गेल्या 4-5 वर्षांचा विचार करताना, भविष्यातील चिंतांवरील चर्चा ही एक संकल्पना सर्वत्र दिसून येत आहे, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. कोविड महामारी, कोविडनंतरचा आर्थिक ताण, महागाई आणि बेरोजगारी, हवामान बदल, सतत सुरू असलेली युद्धे, पुरवठा साखळीतील व्यत्यय, निष्पाप लोकांचे मृत्यू, भू-राजकीय तणाव आणि संघर्ष ही अलिकडची आव्हाने सर्व जागतिक शिखर परिषदांतील चर्चेचे विषय बनले आहेत; असे त्यांनी नमूद केले. त्यावेळी भारतात होणाऱ्या चर्चांशी साम्य दाखवत, पंतप्रधानांनी अधोरेखित केले, की भारत त्याची शताब्दी साजरी करत आहे. “जागतिक अशांततेच्या या काळात भारत आशेचा किरण बनला आहे. जेव्हा जग चिंताग्रस्त असते तेव्हा भारत आशेचे किरण पसरवत असतो",असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "आज भारत प्रत्येक क्षेत्रात आणि विभागात अभूतपूर्व वेगाने काम करत आहे", असे पंतप्रधान म्हणाले. भारतावरही या जागतिक परिस्थितीचा परीणाम झाला आहे आणि आव्हाने उभी आहेत, तथापि सर्वत्र सकारात्मकतेची जाणीव अनुभवायला मिळते.
“आज भारत प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक विभागात अभूतपूर्व वेगाने कार्य करत आहे”,असे मोदी म्हणाले. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे 125 दिवस पूर्ण झाल्याची नोंद करताना, मोदी यांनी देशात केलेल्या कामांवर प्रकाश टाकला. गरिबांसाठी 3 कोटी नवीन पक्की घरे बांधण्यासाठी सरकारने दिलेली मान्यता, 9 लाख कोटी रुपयांचे सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, 15 नवीन वंदे भारत रेल्वेगाड्यांची सुरुवात, 8 नवीन विमानतळांची पायाभरणी, तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे दिलेले पॅकेज, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21,000 कोटी रुपये हस्तांतरित करणे, 70 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत उपचार योजना, सुमारे 5 लाख घरांत छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थापना, एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत 90 कोटी रोपांची लागवड, 12 नवीन औद्योगिक प्रदेशांना (नोड्स) दिलेली मंजुरी, सेन्सेक्स आणि निफ्टी मधे झालेली सुमारे 5-7 टक्के वाढ आणि भारताच्या परकीय चलनात 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत झालेली वाढ, यासारख्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी गेल्या 125 दिवसांत भारतात आयोजित आंतरराष्ट्रीय एसएमयू, ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल, ग्लोबल सेमीकंडक्टर इकोसिस्टमवरील चर्चा, अक्षय्य ऊर्जा आणि नागरी विमान वाहतूक यावर झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांचा उल्लेख केला. "ही केवळ समारंभांची यादी नाही, तर भारताशी संबंधित आशेची यादी आहे, जी देशाची दिशा आणि जगाच्या आशा दर्शवते", असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. याअंतर्गत, असे महत्वाचे मुद्दे आहेत जे जगाचे भविष्य घडवतील आणि यावर भारतात चर्चा होत आहे, असे ते म्हणाले.
सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताचा विकास वेगाने होत असून अनेक रेटिंग एजन्सींनी त्यांच्या विकासाचे अंदाज वर्तवले आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी मार्क मोबियस सारख्या तज्ञांनी केलेल्या प्रशंसेकडेही लक्ष वेधले, त्यांनी जागतिक निधी गुंतवणूकदारांना त्यांच्या निधीपैकी किमान 50% निधी भारताच्या भांडवली बाजारात गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. "जेव्हा असे अनुभवी तज्ञ भारतातील मोठी गुंतवणुक करण्याचा सल्ला देतात तेव्हा ते आपल्या क्षमतेबद्दल एक उत्तम संदेशही देतात",असेही ते पुढे म्हणाले.
"आजचा भारत हे एक विकसनशील राष्ट्र आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे", यावर भर देत भारत गरिबीच्या आव्हानांना समजतो आणि प्रगतीचा मार्ग कसा आखायचा हे जाणतो, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. त्यांनी सरकारच्या जलद धोरणात्मक आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रिया तसेच केलेल्या नवीन सुधारणांवर प्रकाश टाकला. आत्मसंतुष्टीच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, की ही मानसिकता देशाला पुढे नेत नाही. गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत, 12 कोटी शौचालये बांधली गेली आहेत आणि 16 कोटी गॅस जोडण्या करून दिल्या आहेत, परंतु ते पुरेसे नाही, असे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, गेल्या 10 वर्षात भारताने 350 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये, 15 हून अधिक एम्स संस्था बांधल्या आहेत, 1.5 लाखांहून अधिक स्टार्टअप्सची स्थापना केली आहे आणि 8 कोटी तरुणांना मुद्रा कर्जे दिली आहेत. "हे पुरेसे नाही", यावर भर देत भारतातील तरुणांची सतत प्रगती होण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जगातील सर्वात तरुण नागरीकांची संख्या असलेल्या राष्ट्रांपैकी एक म्हणून, भारताची क्षमता आपल्याला उत्तुंग उंचीवर नेऊ शकते आणि आपल्याला जलदगतीने आणि कार्यक्षमतेने बरेच काही साध्य करायचे आहे यावर त्यांनी भर दिला.
देशाच्या मानसिकतेतील बदल अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नमूद केले, की प्रत्येक सरकार अनेकदा त्यांच्या कामगिरीची तुलना मागील प्रशासनांशी करतात आणि त्यांना मागे टाकणे हे आपल्या 10-15 वर्षांचे यश मानतात. भारत हा दृष्टिकोन बदलत आहे आणि यश आता कामगिरीने मोजले जात नाही तर भविष्याच्या दिशेकडे पहात मोजले जात आहे, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी भारताच्या भविष्याभिमुख दृष्टिकोनावर भाष्य केले आणि ते म्हणाले, की भारत आता भविष्य-केंद्रित दृष्टि ठेवून पुढे आगेकूच करत आहे. “2047 पर्यंत विकसित भारताचे आमचे ध्येय हे केवळ सरकारचे स्वप्न नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा ते प्रतिबिंबित करते. आता त्याचे स्वरूप केवळ सार्वजनिक सहभागासाठी मोहीम असे राहिलेले नाही तर ती राष्ट्रीय आत्मभावनेची चळवळ आहे”, असे मोदी यांनी नमूद केले. विकसित भारताच्या दृष्टिकोनाच्या रुपरेषेवर सरकारने काम सुरू केले, तेव्हा लाखो नागरिकांनी त्यांच्या सूचना दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि विविध संघटनांमध्ये वादविवाद आणि चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आणि या सूचनांच्या आधारे सरकारने पुढील 25 वर्षांसाठी ध्येये निश्चित केली."आज, विकसित भारतावरील चर्चा आपल्या राष्ट्रीय जाणीवेचा भाग आहेत आणि सार्वजनिक शक्तीचे राष्ट्रीय शक्तीमध्ये रूपांतर करण्याचे खरे उदाहरण बनले आहे", असेही ते पुढे म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, की हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग आहे आणि जगाचे वर्तमान आणि भविष्य एआयशी जोडलेले आहे. ते म्हणाले की, भारताला दुहेरी एआय शक्तीचा लाभ मिळालेला आहे, पहिला एआय, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दुसरा एआय, आकांक्षी भारत. मोदी म्हणाले, की जेव्हा आकांक्षित भारत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची शक्ती एकत्र येते तेव्हा विकासाचा वेग वाढणे हे स्वाभाविक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ भारतासाठी तंत्रज्ञान नाही तर भारतातील तरुणांसाठी नवीन संधींचे प्रवेशद्वार आहे,असे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी या वर्षी इंडिया एआय मिशनच्या झालेल्या प्रारंभाचा आणि आरोग्यसेवा, शिक्षण आणि स्टार्टअप्स सारख्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढविण्यावर भर दिला."भारत जागतिक दर्जाचे एआय उपाय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि क्वाड सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे आम्ही हे पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेत आहोत",असे ते म्हणाले. आकांक्षित भारतावर लक्ष केंद्रित करताना पंतप्रधान म्हणाले की, मध्यमवर्गीय, सामान्य नागरिक यांचे जीवनमान वाढवणे, लघु व्यवसाय, एमएसएमई, तरुण आणि महिलांना सक्षम करणे हे सरकारच्या धोरणात्मक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून वाहतूक व्यवस्थेतील भारताच्या उल्लेखनीय प्रगतीकडे लक्ष वेधले आणि सांगितले की सरकारने जलद, समावेशक भौतिक दळणवळण सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे जे विकसनशील समाजासाठी, विशेषतः भारतासारख्या विशाल आणि विविध देशात आवश्यक आहे. पंतप्रधान म्हणाले, की यामुळे हवाई प्रवासावर विशेष भर देण्यात आला आहे. परवडणाऱ्या हवाई प्रवासाच्या त्यांच्या दृष्टिकोनाची आठवण करून देताना ते म्हणाले, की आता साधी 'हवाई चप्पल' वापरणाऱ्यांना सुध्दा हवाई प्रवास परवडेल आणि उडान योजनेचा उल्लेख केला; जी कार्यान्वित होऊन 8 वर्षे झाली आहेत. त्यांनी माहिती दिली की द्वितीय श्रेणीच्या आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये नवीन विमानतळांच्या नेटवर्कमुळे जनतेसाठी हवाई प्रवास परवडणारा झाला आहे. उडान योजनेच्या यशावर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी नमूद केले, की उडान अंतर्गत आतापर्यंत सुमारे 3 लाख उड्डाणे चालविली गेली आहेत, ज्यातून 1.5 कोटी सामान्य नागरिक प्रवास करतात. त्यांनी पुढे सांगितले की या उपक्रमांतर्गत 600 हून अधिक मार्ग आहेत जे लहान शहरांना जोडतात. 2014 मध्ये भारतातील विमानतळांची संख्या सुमारे 70 होती, तर आता ती 150 पेक्षा जास्त झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारतातील तरुणांना जागतिक विकासासाठी प्रेरक शक्ती बनवून सक्षम करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर पंतप्रधानांनी भर दिला आणि शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि रोजगारावर सरकारचे लक्ष असल्याचे अधोरेखित केले. गेल्या 10 वर्षातील प्रयत्नांचे परिणाम आता दिसून येत आहेत असे त्यांनी सांगितले आणि टाईम्स हायर एज्युकेशनच्या ताज्या क्रमवारीत संशोधन गुणवत्तेत भारताने जागतिक स्तरावर सर्वोच्च सुधारणा केल्या असल्याचे दिसून आले आहे, असे त्यांनी नमूद केले. गेल्या 8-9 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारतीय विद्यापीठांचा सहभाग 30 वरून 100 पेक्षा अधिक झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. गेल्या दहा वर्षांत क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारताची उपस्थिती 300% पेक्षा जास्त वाढली आहे, तर भारतात दाखल केलेल्या पेटंट आणि ट्रेडमार्कची संख्या आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, भारत वेगाने संशोधन आणि विकासाचे जागतिक केंद्र बनत आहे; जगभरातील 2500 हून अधिक कंपन्यांची भारतात संशोधन केंद्रे आहेत आणि देशातील स्टार्टअप परिसंस्था अभूतपूर्व विकास करत आहे.
एक विश्वासू मित्र म्हणून, भारताचे जागतिक स्तरावरील वाढते महत्त्व अधोरेखित करताना, मोदी म्हणाले की भारत अनेक क्षेत्रांमध्ये जागतिक भविष्याला दिशा देण्यात पुढाकार घेत आहे. कोविड-19 महामारीच्या आजाराचा विचार करताना, भारताला आवश्यक औषधे आणि लसींच्या क्षमतेतून करोडो डॉलर्स कमावता आले असते, असे मोदी म्हणाले. "भारताला त्यातून आपला फायदा करून घेता आला असता पण मानवतेचे नुकसान झाले असते. ही आपली मूल्ये नाहीत. आम्ही या आव्हानात्मक काळात शेकडो देशांना औषधे आणि जीवनरक्षक लसी पुरवल्या,भारत कठीण काळात जगाला मदत करू शकला यात मला समाधान आहे", असे ते म्हणाले. मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देताना, पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या संबंधांचा पाया श्रध्दा आणि विश्वासार्हता आहे, ते संबंधांना गृहीत धरण्यावर विश्वास ठेवत नाही आणि जगालाही हे समजत आहे. जगासोबतच्या भारताच्या सुसंवादी संबंधांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, "भारत हा असा देश आहे ज्याच्या प्रगतीमुळे इतर जण त्यांचा द्वेष किंवा मत्सर करत नाही. "आपल्या प्रगतीमुळे जग आनंदित होते कारण संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो." जगासाठी भारताने दिलेल्या समृद्ध योगदानाचा उल्लेख करताना, मोदी म्हणाले की, भूतकाळात भारताने जागतिक विकास वाढविण्यात सकारात्मक भूमिका बजावली आहे, तसेच त्याच्या कल्पना, नवोन्मेष आणि उत्पादनांनी शतकानुशतके जगावर अमिट छाप सोडली आहे.पंतप्रधान म्हणाले की, वसाहतवादामुळे भारत औद्योगिक क्रांतीचा फायदा घेऊ शकला नाही. "हे चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (उद्योग 4.0) युग आहे. भारत आता गुलाम राहिलेला नाही. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत आणि म्हणूनच, आता आपण विकासासाठी सज्ज आहोत," असे मोदी पुढे म्हणाले.
भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी (उद्योग4.0) आवश्यक असलेली कौशल्ये आणि पायाभूत सुविधांवर वेगाने काम करत आहे,यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या दशकात त्यांनी जी 20 आणि जी 7 शिखर परिषदेसह विविध जागतिक व्यासपीठांवर भाग घेतला आहे आणि त्यात भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. ज्यांनी आधार आणि डिजीलॉकर सारख्या भारताच्या नवोपक्रमांची प्रशंसा करणाऱ्या पॉल रोमर यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले "आज, संपूर्ण जग भारताच्या विकास आराखड्याकडे पाहत आहे, इंटरनेटच्या युगात भारताला अग्रक्रम मिळाला नव्हता (पहिला-मूव्हर)", असे मोदी यांनी नमूद केले. खाजगी प्लॅटफॉर्मने फायदा असलेल्या देशांमध्ये डिजिटल जागेचे नेतृत्व केले. ते म्हणाले की, भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करून जगाला एक नवीन प्रारुप प्रदान केले आहे आणि जलद आणि गळती-मुक्त सेवा वितरणासाठी एक मजबूत प्रणाली प्रदान करणारी जेएएम त्रिमूर्ती - जनधन, आधार आणि मोबाइल अधोरेखित केली आहे. त्यांनी 500 दशलक्षाहून अधिक दैनिक डिजिटल व्यवहारांना चालना देणाऱ्या युपीआय बद्दल देखील सांगितले आणि ते म्हणाले की, यामागील प्रेरक शक्ती कंपन्या नाहीत तर आपले छोटे दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेते आहेत. त्यांनी पायाभूत सुविधा प्रकल्प बांधकामातील गुन्ह्यांचे निर्मूलन करण्यासाठी तयार केलेल्या पीएम गति शक्ती प्लॅटफॉर्मचा देखील उल्लेख केला, जो आता लॉजिस्टिक्स परिसंस्थेत परिवर्तन करण्यास मदत करत आहे. त्याचप्रमाणे, ओएनडीसी प्लॅटफॉर्म एक नवोन्मेष असल्याचे सिद्ध होत आहे, जे ऑनलाइन रिटेलमधील लोकशाहीकरण आणि पारदर्शकता वाढवते. भारताने हे दाखवून दिले आहे, की डिजिटल नवोन्मेष आणि लोकशाही मूल्ये एकत्र राहू शकतात. आणि तंत्रज्ञान हे नियंत्रण आणि विभाजनाऐवजी सर्वसमावेशकता, पारदर्शकता आणि सक्षमीकरणाचे साधन आहे, या कल्पनेला बळकटी दिली, असे मोदी यांनी अधोरेखित केले.
21 वे शतक हा मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा काळ आहे असे सांगून, आजच्या काळातील तातडीच्या गरजांवर भर देत, मोदी म्हणाले की स्थिरता, शाश्वतता आणि उपाय या काळाच्या गरजा आहेत. मानवतेच्या उत्तम भविष्यासाठी हे घटक आवश्यक आहेत, भारत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी नमूद केले. भारतीय जनतेच्या अढळ पाठिंब्याची त्यांनी नोंद घेतली आणि सांगितले की, जनतेने सलग तिसऱ्यांदा सरकारला जनादेश दिला आहे, हरियाणामधील अलिकडच्या निवडणुकांचा संदर्भ देत सहा दशकांत प्रथमच स्थिरतेचा मजबूत संदेश देत, तेथे जनतेने ही भावना बळकट केली आहे, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी हवामान बदलाच्या जागतिक संकटावर प्रकाश टाकला आणि म्हटले की, हे संपूर्ण मानवतेसमोरील संकट आहे. जागतिक हवामान आव्हानात भारताचे कमीत कमी योगदान असूनही, देश मात्र ते सोडवण्यात पुढाकार घेत आहे, असे ते म्हणाले. सरकारने हरित संक्रमणाला विकासाचा प्रमुख चालक बनवले आहे आणि शाश्वतता ही भारताच्या विकास नियोजनाची केंद्रबिंदू आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.त्यांनी या वचनबद्धतेची उदाहरणे देऊन पंतप्रधान सूर्यगड मोफत वीज योजना आणि शेतीसाठी सौर पंप योजना, ईव्ही क्रांती, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम, मोठे पवन ऊर्जा फार्म, एलईडी लाईट चळवळ, सौरऊर्जेवर चालणारे विमानतळ आणि बायोगॅस संयंत्र यांचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की प्रत्येक कार्यक्रम हिरव्या भविष्यासाठी आणि हिरव्या रोजगारांसाठी दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो.
स्थिरता आणि शाश्वततेसोबतच, भारत जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाय प्रदान करण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की गेल्या दशकात, भारताने या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या असंख्य उपक्रमांवर काम केले आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती, भारत-मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉर, जागतिक जैवइंधन आघाडी, तसेच योग, आयुर्वेद, मिशन लाइफ आणि मिशन मिलेट्समधील प्रयत्नांचा समावेश आहे. "हे सर्व उपक्रम जगातील महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतात," असे ते म्हणाले.
“भारत जसजसा प्रगती करेल तसतसे जगाला आणखी फायदा होईल,” असे भारताच्या विकासाबद्दल अभिमान व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले. भारतीय शतक संपूर्ण मानवतेसाठी विजय मिळवेल, अशा भविष्याचे ते स्वप्न पहात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारताचे शतक प्रत्येकाच्या प्रतिभेमुळे भरभराटीला येते आणि नवोपक्रमांनी समृद्ध होते,असे ते म्हणाले. जागतिक स्थिरता आणि शांतता वाढविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व मोदी यांनी अधोरेखित केले. “हे असे शतक आहे ज्यात भारतीय उपक्रम जग अधिक स्थिर करण्यासाठी योगदान देतात आणि जागतिक शांतता वाढवतात”, असे मोदी यांनी समारोप करताना सांगितले.
* * *
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178612)
Visitor Counter : 7
Read this release in:
Odia
,
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam