पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत एका विशेष कृषी कार्यक्रमात होणार सहभागी


पंतप्रधानांच्या हस्ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील 42,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्प आणि योजनांचा शुभारंभ, उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण होणार

पंतप्रधान 24,000 कोटी रुपये खर्चाच्या पीएम धन धान्य कृषी योजनेचा करणार प्रारंभ

100 जिल्ह्यांमध्ये शेतीत परिवर्तन घडवून आणण्याचे योजनेचे उद्दिष्ट

पंतप्रधानांच्या हस्ते 11,440 कोटी रुपये खर्चाच्या डाळींमधील आत्मनिर्भरता अभियानाचा होणार शुभारंभ

उत्पादकता सुधारत, लागवडीखालील क्षेत्र वाढवून मूल्य साखळी बळकट करत डाळींमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्याचे अभियानाचे ध्येय

पंतप्रधान डाळींच्या लागवडीत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांशीही साधणार संवाद

Posted On: 10 OCT 2025 6:10PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत एका विशेष कृषी कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करतील.

हा कार्यक्रम शेतकरी कल्याण, कृषी आत्मनिर्भरता आणि ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करतो. आधुनिक कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना पाठबळ देणे आणि कृषक-केंद्रित उपक्रमांमध्ये महत्त्वाचे टप्पे साजरे करणे यावर या कार्यक्रमाचा भर असेल.

पंतप्रधान कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख योजनांचा शुभारंभ करतील. पंतप्रधानांच्या हस्ते 24,000 कोटी रुपये खर्चाच्या पीएम धन धान्य कृषी योजनेचा प्रारंभ होईल. कृषी उत्पादकता वाढवणे, पिकांमधील वैविध्य आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब वाढवणे, पंचायत आणि तालुका पातळीवर काढणीपश्चात साठवण वाढवणे, सिंचन सुविधा सुधारणे आणि निवडक 100 जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते 11,440 कोटी रुपये खर्चाच्या डाळींमधील आत्मनिर्भरता अभियानाचाही शुभारंभ होणार आहे. डाळींच्या उत्पादकतेची पातळी सुधारणे, डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवणे, खरेदी, साठवणूक, प्रक्रिया - मूल्य साखळी मजबूत करणे आणि नुकसान कमी करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील, तर सुमारे 815 कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांची पायाभरणी करतील.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये बंगळुरू आणि जम्मू-काश्मीरमधील कृत्रिम रेतन प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. अमरेली आणि बनास येथे उत्कृष्टता केंद्र; राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत आसाममध्ये आयव्हीएफ लॅबची स्थापना; मेहसाणा, इंदूर आणि भिलवाडा येथे दूध पावडर प्लांट; आसाममधील तेजपूर येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य खाद्य  प्लांट; कृषी-प्रक्रिया समूहासाठी पायाभूत सुविधा, एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे.

याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आंध्र प्रदेशातील कृष्णा येथे एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा (विकिरण); उत्तराखंडमधील ट्राउट फिशरीज; नागालँडमधील एकात्मिक एक्वा पार्क; पुद्दुचेरीतील कराइकल येथे स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर; आणि ओडिशातील हिराकुड येथे अत्याधुनिक एकात्मिक एक्वापार्क यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना तसेच मैत्री तंत्रज्ञ आणि प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (PACS) अंतर्गत प्रमाणित झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करतील

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान राष्ट्रीय नैसर्गिक शेती  अभियानांतर्गत प्रमाणित शेतकऱ्यांना, MAITRI तंत्रज्ञांना आणि प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था (PACS) यांना प्रमाणपत्रांचे वितरण करतील, ज्या आता अनुक्रमे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे (PMKSKs) आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) मध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमात सरकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून गाठलेल्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचा गौरव केला जाईल, यात 50 लाख शेतकऱ्यांनी 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये घेतलेल्या सदस्यत्वाचा समावेश आहे. यापैकी 1,100 शेतकरी उत्पादक संस्थांनी 2024-25 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल नोंदवली आहे.

इतर उल्लेखनीय यशस्वी टप्प्यांमध्ये  नैसर्गिक शेतीच्या पद्धतींचे पालन करणाऱ्या 50,000 शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण, ग्रामीण भागात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवा पुरवणाऱ्या 38,000 MAITRI तंत्रज्ञांना प्रमाणपत्रांचे वितरण, 10,000 हून अधिक बहुउद्देशीय आणि ई-प्राथमिक कृषी पतसंस्थांना मंजुरी आणि कार्यान्वित करणे ,आणि प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांची स्थापना आणि बळकटीकरण यांचा समावेश आहे. 10,000 हून  अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्थांनी आपले कार्यक्षेत्र विस्तारून प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे (PMKSKs) आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली आहे.

या कार्यक्रमादरम्यानडाळींच्या उत्पादनात केंद्र सरकारच्या मूल्य साखळी आधारित दृष्टिकोनाचा लाभ  कृषी, पशुपालन आणि मत्स्योद्योग क्षेत्रात लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघटना (FPO) मधील सदस्यत्व आणि कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत मदत मिळाल्यानेही फायदा झाला आहे.

***

गोपाळ चिप्पलकट्टी / वासंती जोशी / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2177593) Visitor Counter : 9