पंतप्रधान कार्यालय
फॅक्ट शीट- हिंद-प्रशांत क्षेत्रात कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी क्वाड देशांकडून कर्करोग मूनशॉट उपक्रमाचा प्रारंभ
Posted On:
22 SEP 2024 8:55AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2024
हिंद-प्रशांत क्षेत्रात कर्करोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आज, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान अभूतपूर्व प्रयत्न सुरू करत आहेत ज्याची सुरुवात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून होईल, जो मोठ्या प्रमाणात टाळता येण्याजोगा आजार असून तो आजही या क्षेत्रात एक प्रमुख आरोग्य संकट ठरत आहे. कर्करोगाच्या इतर प्रकारांवरही मात करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. हा उपक्रम क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत केलेल्या विस्तृत घोषणांचा एक भाग आहे.
क्वाड कर्करोग मूनशॉट उपक्रम हिंद-प्रशांत क्षेत्रात आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून, संशोधन सहयोग वाढवून, डेटा प्रणाली तयार करून आणि कर्करोग प्रतिबंध, निदान, उपचार आणि काळजीसाठी अधिक समर्थन प्रदान करून संपूर्ण कर्करोग सेवा परिसंस्था मजबूत करण्यासाठी काम करेल.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, लसीकरणाद्वारे टाळता येण्याजोगा आणि लवकर निदान झाल्यास उपचार करता येण्याजोगा असला तरीही, हिंद-प्रशांत प्रदेशातील महिलांमध्ये कर्करोगामुळे मृत्यू ओढवण्याचे तिसरे प्रमुख कारण आहे. हिंद-प्रशांत प्रदेशातील 10 पैकी एका पेक्षा कमी महिलांनी त्यांची मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) लसीकरण शृंखला पूर्ण केली आहे आणि 10% पेक्षा कमी महिलांनी नुकतीच तपासणी केली आहे. या प्रदेशातील अनेक देशांना आरोग्यसेवा उपलब्धता, मर्यादित संसाधने आणि लसीकरण दरातील असमानता यासंबंधी आव्हानांचा सामना करावा लागतो. या उपक्रमाद्वारे, क्वाड देश एचपीव्ही लसीकरणाला प्रोत्साहन देऊन, तपासणीसाठी जाणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढवून आणि कमी सेवा मिळणाऱ्या भागात उपचाराच्या पर्यायांचा आणि सेवांचा विस्तार करून ही तफावत दूर करण्यासाठी कार्य करतील.
एकंदरीत, आपल्या वैज्ञानिक तज्ज्ञांच्या मते क्वाड कर्करोग मूनशॉट येत्या काही दशकांत लाखो महिलांना जीवनदान देईल. कर्करोगाचा अंत करण्यासाठी बायडेन-हॅरिस प्रशासनाच्या दृढ वचनबद्धतेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे हे आपण जाणतोच. दोनएक वर्षांपूर्वी, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि प्रथम महिला जिल बायडेन यांनी अमेरिकेतील कर्करोगाचा मृत्यू दर किमान निम्म्याने कमी करण्यासाठी, 2047 पर्यंत कर्करोगामुळे होणारे 4 दशलक्षाहून अधिक मृत्यू रोखण्यासाठी, आणि कर्करोगग्रस्त लोकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी कर्करोग मूनशॉट उपक्रम पुन्हा सुरू केला.
कर्करोग हे एक जागतिक आव्हान आहे ज्यासाठी कोणत्याही एका राष्ट्राच्या प्रयत्नांच्या पलीकडे सामूहिक कृती आणि सहकार्य आवश्यक आहे. कर्करोग रोखण्यासाठी, त्याच्या निदानासाठी, उपचारासाठी आणि रुग्णावर आणि आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा कर्करोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी एकत्र काम करून नाविन्यपूर्ण धोरणे राबविणे हे क्वाडचे उद्दिष्ट आहे. कर्करोगाच्या क्षेत्रातील संशोधन आणि विकासामध्ये प्रगती करण्यासाठी आणि प्रदेशातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या समर्थनार्थ खाजगी क्षेत्रातील आणि बिगर-सरकारी क्षेत्रातील उपक्रम वाढवण्यासाठी, संबंधित राष्ट्रीय संदर्भांतर्गत काम करण्याचा देखील क्वाड भागीदार देशांचा मानस आहे. आज क्वाड देशांना आपली सरकारे आणि बिगर-सरकारी योगदानकर्त्यांकडून खालील महत्त्वाकांक्षी वचनबद्धता जाहीर करण्यात आनंद होत आहे:
क्वाड देश
हिंद-प्रशांत क्षेत्रात एचपीव्ही लसींसह जीएव्हीआय प्रति त्यांची भक्कम बांधिलकी कायम ठेवण्याचा क्वाड देशांचा मानस आहे. अमेरिकेने आगामी पाच वर्षांत किमान 1.58 अब्ज डॉलरची प्रारंभिक जबाबदारी घेतली आहे.
याव्यतिरिक्त, क्वाड देश गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीची किंमत कमी करण्यासाठी एचपीव्ही निदान सामग्रीच्या घाऊक खरेदीवर संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांसह एकत्र काम करतील आणि वैद्यकीय इमेजिंग आणि रेडिएशन थेरपीची सुविधा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीसोबत काम करतील.
अमेरिका
अमेरिकेचा संरक्षण विभाग, अमेरिकेच्या नौदलाच्या माध्यमातून, 2025 पासून हिंद-प्रशांत भागीदारांसोबत एचपीव्ही तज्ञांच्या देवाणघेवाणीला पाठिंबा देईल. एचपीव्ही लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करून ही भागीदारी भागीदार राष्ट्रांमधील आरोग्यसेवा व्यावसायिकांना प्रशिक्षण, क्षमता बांधणी आणि संपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्यास सक्षम करेल. कर्करोगावरील प्रादेशिक सहकार्य वाढवणे आणि प्रदेशात आरोग्य सुरक्षेला चालना देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) ऑन्कोलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्सचा एफडीए च्या ‘प्रकल्प आशा’ अंतर्गत हितधारकांसोबत सहयोग स्थापित करण्यासाठी पुढील बारा महिन्यांत भारताच्या तांत्रिक भेटीची व्यवस्था करण्याचा मानस आहे. एफडीए इंडिया ऑफिस, अग्रगण्य कर्करोगतज्ज्ञ, रुग्ण समर्थक गट, वैद्यकीय चाचणी प्रायोजक आणि सरकारी हितधारकांबरोबर एकत्र काम करून, ही नवीन भागीदारी वैद्यकीय चाचणी रचना, आचरण आणि व्यवस्थापन यावरील शिक्षणासह क्षमता-वाढीच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करेल ज्यात आंतरराष्ट्रीय मानकांना प्रोत्साहन देणे, मंजुरी प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात मदत करणे, नियामक कौशल्य सामायिक करणे आणि कर्करोगविषयक वैद्यकीय चाचणी प्रवेश वाढवणे या गोष्टी अंतभूत आहेत.
यू.एस. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय) चा हिंद-प्रशांत प्रदेशातील जागतिक कर्करोग संशोधन आणि जागतिक कर्करोग संशोधन प्रशिक्षणाचा प्रमुख निधी पुरवठादार म्हणून आपल्या सहयोगाची व्याप्ती वाढवेल. या पोर्टफोलिओमध्ये सध्या दक्षिण आशिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिकमधील अन्वेषक आणि संस्थांचा समावेश असलेल्या सुमारे 400 सक्रीय प्रकल्पांचा समावेश आहे, ज्यामध्ये विशेषत: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लसीकरण चाचणी, तपासणी आणि उपचार हस्तक्षेप आणि महिला आणि मुलींच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा धोरणांवर लक्ष केंद्रित केलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा समावेश आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण भागीदारी, आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सहयोगी केंद्राद्वारे देशांना प्रदान केलेल्या वैज्ञानिक समर्थनाद्वारे जागतिक कर्करोग नियंत्रणाच्या प्रयत्नांसाठी एनसीआय आपला पाठिंबा अधिक व्यापकपणे वाढवेल.
या जागतिक प्रेक्षकांना आरोग्य व्यावसायिक आणि कर्करोगाने बाधित लोकांसाठी पुराव्यावर आधारित कर्करोगाची माहिती देण्यासाठी एनसीआय हिंद-प्रशांत प्रदेशातील राष्ट्रांसोबत सुरू असलेल्या सहकार्याचा विस्तार करेल. एनसीआय हिंद-प्रशांत क्षेत्रातील आरोग्य व्यावसायिक आणि रुग्णांना तज्ज्ञांद्वारे कर्करोगाबाबत सविस्तर आणि अधिकृत माहिती प्रदान करून क्वाड कर्करोग मूनशॉट उपक्रमाच्या सार्वजनिक शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवेल. यामध्ये प्रौढांमधील आणि बालकांमधील कर्करोग उपचार, तपासणी, प्रतिबंध, आनुवंशिकता, सहाय्यक आणि उपशामक काळजी, आणि एकात्मिक, पर्यायी आणि पूरक उपचार यासारख्या कर्करोगाच्या विषयांवरील माहितीचा व्यापक संग्रह समाविष्ट असेल, ज्यामध्ये तपासणी, प्रतिबंध, निदान आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा उपचार याविषयीच्या माहितीचा समावेश असेल.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमांना पाठबळ देतील, लस वितरणात सुधारणा करतील आणि हिंद-प्रशांत प्रदेशात कर्करोग देखरेख आणि प्रतिबंध प्रणाली मजबूत करतील. यामध्ये फिलीपिन्सच्या आरोग्य मंत्रालयासोबत एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम मूल्यांकनावर काम करणे, भविष्यातील लस वितरणाची माहिती देण्यासाठी वर्तणूक आणि सामाजिक चालकांवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट असेल. सीडीसी या प्रदेशातील समग्र कर्करोग सेवा परिसंस्था बळकट करण्यासाठी कर्करोग नियंत्रण योजना विकासास समर्थन देऊन कर्करोग नियंत्रणाच्या व्यापक प्रयत्नांमध्ये योगदान देईल.
सीडीसी तांत्रिक सहाय्य प्रदान करेल आणि अमेरिकी प्रशांत क्षेत्र आणि स्वतंत्ररित्या संबंधित राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावरील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणी अभ्यासांद्वारे सूचित केलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करेल तसेच अमेरिका प्रशांत द्वीप अधिकारक्षेत्रात (पीआयजे) सीडीसी निधीत राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रमांना समर्थन देणे सुरू ठेवेल. या प्रयत्नांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यात सुधारणा आणण्यासाठी पुराव्यावर आधारित धोरणे सामायिक करणे समाविष्ट असेल. याव्यतिरिक्त, सीडीसी एक अंमलबजावणी मार्गदर्शिका प्रकाशित करेल जी पीआयजे ला त्यांची चाचणी क्षमता सुधारण्यासाठी मदत करू शकेल आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारीला प्रोत्साहन देईल, ज्यामध्ये प्राथमिक एचपीव्ही चाचणी आणि फॉलो-अप चाचणी आयोजित करण्यासाठी वैद्यकीय आणि प्रयोगशाळेची क्षमता निर्माण करण्यावर मार्गदर्शन आणि चाचणी परीक्षणासाठी डेटा प्रणाली सुधारणे समाविष्ट असेल.
यू.एस. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (डीएफसी) कर्करोग, विशेषत: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी, निदान आणि उपचार करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील प्रकल्पांना पाठबळ देईल. वंचित समुदायांमध्ये नाविन्यपूर्ण पध्दती आणि तंत्रज्ञानाच्या उपयोजनाला गती देण्यासाठी डीएफसी कार्य करेल.
यू.एस. एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएआयडी) एचपीव्ही लसीकरण सुविधेची व्याप्ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. अमेरिकन सरकारने जीएव्हीआय या लस आघाडीला किमान 1.58 अब्ज डॉलरचे पाठबळ देण्याची अभूतपूर्व प्रतिज्ञा केली आहे, जी लसीकरण व्याप्ती वाढवण्याच्या जागतिक प्रयत्नांना समर्थन देईल, विशेषतः एचपीव्ही लसींची उपलब्धता वाढवण्यात मदत करेल ज्याद्वारे हिंद-प्रशांत आणि त्याबाहेरील क्षेत्रातील लाखो महिला आणि मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवता येईल.
विदेश विभाग, ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी अँड डिप्लोमसी (जीएचएसडी) - प्रेसिडेंट्स इमर्जन्सी प्लॅन फॉर रिलीफ (पीईपीएफएआर) द्वारे, एचआयव्ही ग्रस्त लोकांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी आणि उपचारांच्या प्रयत्नांच्या जलद विस्तारासाठी सर्वोत्तम पद्धती सामायिक करेल, ज्यामध्ये कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सामग्री खरेदी आणि आरोग्य प्रणाली मजबूत करणे समाविष्ट आहे. हे सहकार्य विद्यमान एचआयव्ही उपचार कार्यक्रमांसह गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीला एकत्रित करण्यासाठी कार्याचा विस्तार करेल, ज्यामुळे जीवदान देणाऱ्या उपक्रमांमध्ये वाढ होईल. तपासणी आणि उपचारांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय पुरवठ्याची पुरवठा साखळी सुधारण्यावरही ते लक्ष केंद्रित करेल.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियन सरकार आणि धर्मादाय योगदानांद्वारे, हिंद-प्रशांत (ईपीआयसीसी) क्षेत्रातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या निर्मूलनात भागीदारीसाठी एकूण निधी वचनबद्धता 29.6 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर पर्यंत वाढेल. ईपीआयसीसी हा एक नवीन कार्यक्रम आहे जो एचपीव्ही संबंधित धोरणे, योजना आणि तयारी सुधारून हिंद-प्रशांत प्रदेशातील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दूर करण्यासाठी अनेक दशकांच्या संशोधन आणि चिकित्सक नेतृत्वावर आधारित आहे. ईपीआयसीसी हा तिमोर-लेस्टे आणि सोलोमन बेटांमध्ये एचपीव्ही कार्यक्रमांच्या भविष्यातील वृद्धीसाठी मार्गदर्शन करत आहे, मलेशिया, फिजी आणि पापुआ न्यू गिनी मध्ये देशाच्या तयारीला समर्थन देण्यासाठी उप-राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांचा विस्तार करत आहे आणि तुवालू, वनातु आणि नाडू मध्ये राष्ट्रीय एचपीव्ही निर्मूलन कार्यक्रमांच्या स्थापनेला समर्थन देत आहे. ईपीआयसीसी सहा प्राधान्य क्षेत्रांमध्ये कार्य करते, ज्यात एचपीव्ही लसीकरण सहकार्याद्वारे प्राथमिक प्रतिबंध मजबूत करणे, एचपीव्ही तपासणी आणि कर्करोग पूर्व उपचारांद्वारे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा दुसरा प्रतिबंध आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणी आणि निदानासाठी प्रयोगशाळा मजबूत करणे, डिजिटल आरोग्याद्वारे डेटा तयार करणे आणि मजबूत सेवा प्रारूप विकसित करणे, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे व्यवस्थापन (उपचारात्मक आणि उपशामक सेवा दोन्हीमध्ये), आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निर्मूलन मार्गाच्या सर्व स्तंभांवर धोरण आणि आदर्श समर्थन यांचा अंतर्भाव आहे.
16.5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर ($11 दशलक्ष) पाठबळ देण्याच्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या वचनबद्धतेसह, ईपीआयसीसी प्रकल्पाची व्याप्ती हिंद-प्रशांत प्रदेशातील अधिक महिलांपर्यंत पोहोचेल. ते हिंद-प्रशांत क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून पुढील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग निर्मूलनावरील जागतिक मंचात सहभागी होण्यासाठी त्या प्रदेशात काम करणाऱ्या भागीदार संस्थांनाही समर्थन देईल.
डॉ. अँड्र्यू फॉरेस्ट एओ आणि निकोला फॉरेस्ट एओ त्यांच्या चॅरिटी माइंडेरू फाउंडेशनद्वारे ईपीआयसीसी मध्ये A$13.1 दशलक्ष ($8.81 दशलक्ष) चे जीवनरक्षक योगदान जमा करत आहेत. या अतिरिक्त निधीमुळे ईपीआयसीसी चा क्षेत्रातील 11 देशांमध्ये विस्तार होईल आणि माइंडेरू ची एकूण वचनबद्धता 21.7 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर होईल. प्रशांत क्षेत्रातील 140,000 महिलांची पुढील चार वर्षांत तपासणी केली जाईल आणि राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम स्थापित केले जातील, ज्यामुळे सरकारांना पुढच्या पिढीतील महिला आणि मुलींसाठी हा कार्यक्रम कायमस्वरूपी राबवता येईल.
भारत
भारत त्याच्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग (एनसीडी) पोर्टलद्वारे डिजिटल आरोग्यातील तांत्रिक कौशल्य सामायिक करेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नेतृत्वाखालील डिजिटल आरोग्यावरील जागतिक उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी भारताच्या $10 दशलक्ष डॉलर पाठबळाच्या बांधिलकीचा भाग म्हणून, भारत हिंद-प्रशांत प्रदेशाला तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. यामध्ये कर्करोग तपासणी आणि काळजी यावरील दीर्घकालीन डेटाचा मागोवा घेणाऱ्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग पोर्टलच्या वापरासाठी तांत्रिक सहाय्य प्रदान करणे समाविष्ट आहे.
भारत हिंद-प्रशांत प्रदेशाला 7.5 दशलक्ष डॉलर किमतीचे एचपीव्ही सॅम्पलिंग किट, शोध उपकरणे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसी पुरवणार आहे. हे महत्त्वपूर्ण योगदान गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंध आणि निदानाच्या स्थानिक प्रयत्नांना बळकट करेल आणि या प्रदेशातील रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण कार्यक्रमांना पाठबळ पुरवत असताना, लवकर निदान आणि प्रतिबंधासाठी परवडणाऱ्या सुलभ साधनांसह समुदायांना सक्षम करेल.
भारत त्याच्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मुखाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लोकसंख्येवर आधारित तपासणीची व्याप्ती वाढवत आहे. विशेषतः, भारत गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी एसिटिक ऍसिड (व्हीआयए) पद्धत वापरतो, जी सोपी, किफायतशीर आणि कार्यक्षम आहे आणि यासाठी प्रगत प्रयोगशाळा पायाभूत सुविधांची आवश्यकता नसते, त्यामुळे हिंद-प्रशांतच्या अन्य प्रदेशांसाठी एक आदर्श ठरू शकते.
भारत त्याच्या "तृतीयक देखभाल कर्करोग केंद्रांचे बळकटीकरण" कार्यक्रमांतर्गत विशेष कर्करोग उपचार केंद्रांमध्ये प्रवेश वाढवत आहे. देशाच्या सर्व भागात, विशेषत: वंचित भागातील लोकांना उच्च-गुणवत्तेची सेवा मिळू शकेल याची खबरदारी घेऊन भारत सरकार देशभरातील उपचार क्षमता सुधारण्यासाठी दोन्ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करत आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय) द्वारे भारत परवडणाऱ्या कर्करोगावरील उपचारांसाठी कटिबद्ध आहे. सर्वसमावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत भारत सर्वाधिक निकड असलेल्या नागरिकांना वित्तीय सुरक्षेची खातरजमा करून परवडणारे कर्करोग उपचार प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नेतृत्वाखालील अंमलबजावणी संशोधनाद्वारे गर्भाशयाच्या कर्करोग निर्मूलनासाठी भारताच्या वचनबद्धतेला आणखी समर्थन दिले जात आहे. गर्भाशयाच्या कर्करोगासाठी तपासणी, लवकर निदान आणि उपचार सुरू करणे हे संशोधनाचे उद्दिष्ट आहे. प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्यासाठी येत्या काही वर्षांत परिणाम आणि निष्कर्ष हिंद-प्रशांत देशांसोबत सामायिक केले जातील.
जपान
कंबोडिया, व्हिएतनाम आणि तिमोर-लेस्टे या हिंद-प्रशांत देशांना जपान कंप्युटेड टोमोग्राफी (सीटी) आणि मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅनर यासारखी उपकरणे आणि अन्य मदत म्हणून सुमारे 27 दशलक्ष डॉलर प्रदान करत आहे. याशिवाय जपान आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही योगदान देत आहे.
जपान आंतरराष्ट्रीय सहयोग संस्था (जेआयसीए) आणि इतर संस्थांद्वारे, जपानने आर्थिक वर्ष 2019 आणि आर्थिक वर्ष 2023 दरम्यान हिंद-प्रशांत प्रदेशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह कर्करोगाचा सामना करण्यासाठी अंदाजे 75 दशलक्ष डॉलरचे पाठबळ देण्याचे मान्य केले आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणे आणि सुविधा, वैद्यकीय निदान, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे आणि तांत्रिक सहाय्य यांचा समावेश आहे.
गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा (cervical cancer) प्रतिबंध आणि नियंत्रणासह लसींची उपलब्धता सुधारावी आणि महिलांच्या आरोग्यविषयक स्थितीत सुधारणा घडवण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी यासाठी जपानने आपली वचनबद्धता दर्शवली आहे. यासाठी जागतिक आरोग्यविषयक उपक्रम तसेच लस आणि लसीकरणविषयक जागतिक आघाडी (Global Alliance for Vaccines and Immunization - Gavi), संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी, (United Nations Population Fund - UNFPA), आंतरराष्ट्रीय नियोजित पालकत्व महासंघ (International Planned Parenthood Federation - IPPF) या आणि अशा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून जपान प्रयत्न करत आहे. महत्वाचे म्हणजे यासंबंधीच्या उपक्रमाला पाठबळ देत आपली वचनबद्धता कायम राखावी हाच जपानचा मानस आहे.
जागतिक पातळीवर आरोग्यविषयक सुविधा सहजतेने उपलब्ध होण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, आपल्या आरोग्यविषयक व्यवस्थेचे सक्षमीकरण घडवून आणत, भारत - प्रशांत क्षेत्रातील गर्भाशयमुखाच्या कर्करोगासह सर्व प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित समस्या हाताळण्याच्या क्षमतेत वृद्धी घडवून आणण्याचा मानस जपानने बाळगला आहे. या सोबतच क्वाड समुहातील प्रत्येक सदस्य देशांमधील कर्करोगाशी संबंधित संस्थांसोबत भागीदारी प्रस्थापित करून, त्या माध्यमातून भारत-प्रशांत क्षेत्रातील गर्भाशयमुखाच्या कर्करोगासह सर्व प्रकारच्या कर्करोगाचा सामना करण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देतच राहणार आहे.
बिगर सरकारी / स्वयंसेवी संस्था
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्वाड समुहातील सर्व सदस्य देशांमधील खाजगी तसेच ना नफा तत्वावर कार्यरत असलेल्या क्षेत्रातील घटकांसोबत सहकार्यपूर्ण भागीदारी अपरिहार्यच आहे. कारण या सर्व घटकांमधील सामूहिक नवोन्मेषता, संसाधने आणि वचनबद्धता ही भारत - प्रशांत क्षेत्रातील कर्करोगाविरोधातल्या लढ्याची प्रगती अधिक पुढे नेण्यासाठी महत्त्वाच्याच ठरणार आहेत. यालाच अनुसरून क्वाड समूह देशांच्या वतीने बिगर सरकारी / स्वयंसेवी योगदानकर्त्यांसाठी खाली नमूद कृती कार्यक्रम जाहीर करत आहोत. हा कृती कार्यक्रम जाहीर करताना आम्हा सर्व देशांना आनंद होत आहे :
कर्करोग तपासणी आणि प्रतिबंधासाठी आवश्यक सेवा सुविधा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने सुधारणा घडवून आणणे
भारत - प्रशांत क्षेत्रात गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध आणि त्यावरच्या उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक बँकेने आपल्या वचनबद्धतेची व्याप्ती कायमच वाढवली आहे. त्यादृष्टीने त्यांनी व्यापक आरोग्यविषयक व्यवस्था स्थापित करण्याचा दृष्टिकोन बाळगला असून, याअंतर्गत जागतिक पातळीवर पुढच्या तीन वर्षांकरता मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गाशी (Human papillomavirus infection - HPV) संबंधित गुंतवणुकीसह सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. महत्वाची बाब अशी की जागतिक बँकेने 2030 पर्यंत 1.5 अब्ज लोकांना गुणवत्तापूर्ण, परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करण्याचे व्यापक ध्येयही समोर ठेवले आहे. त्यांच्या या उद्दिष्टाअंतर्गत महिला, बालके आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी जागतिक वित्तपुरवठा सुविधेचाही (Global Financing Facility - GFF) अंतर्भाव आहे. या अनुषंगानेच जागतिक बँकेने व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, बांगलादेश, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स सारख्या देशांमध्ये प्रकल्पदेखील सुरू केले आहे. याच्या जोडीनेच जागतिक बँक गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची तपासणी, मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गावरील लसीकरण आणि उपचार या आरोग्यविषयक सेवांचा प्राथमिक आरोग्य सेवा व्यवस्थेत एकात्मकपणे अंतर्भाव करून त्यासाठीचे पाठबळही पुरवत आहे. याअंतर्गत वंचित लोकसंख्येला तपासणीसंबंधीची सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देणे, आरोग्य सेवा वितरणाची प्रक्रिया बळकट करणे तसेच निदान आणि उपचारांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी भागीदारीसारख्या लाभदायक पर्यायांचा अवलंब करण्याचा अंतर्भाव केला गेला आहे. या सगळ्याच्या जोडीला पुरवठा साखळीशी संबंधित आव्हानांवर मात करून, मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गावरील लसींचे शाश्वत उत्पादन आणि वितरण सुनिश्चित करण्यासाठीही जागतिक बँक काम करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी या लसी संपूर्ण क्षेत्रात सुलभतेने उपलब्ध होऊ शकतील यावर भर दिला आहे. शाश्वत आणि समन्यायी आरोग्य प्रणाली तयार करणे जे गर्भाशयमुखाच्या कर्करोगासारख्या आरोग्य व्यवस्थेवरच्या वाढत्या ताणाचा सामना करता यावा, तसेच संपूर्ण भारत - प्रशांत क्षेत्रातील महिला आणि मुलींकरता दीर्घकालीन आरोग्यविषयक परिणाम साध्य करण्याकरता पाठबळ देता येऊ शकेल अशा प्रकारची शाश्वत आणि समन्यायी आरोग्य व्यवस्था स्थापित करणे हाच जागतिक बँकेच्या या दृष्टीकोनामागचा उद्देश आहे.
महिलांचे आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरण नेटवर्क (Economic Empowerment Network - WHEN) या संस्थेमधील महिला गुंतवणूकदार आणि सामाजिक कार्यकर्ते पुढच्या तीन वर्षांत 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त संयुक्त गुंतवणूक करणार आहेत. महत्वाचे म्हणजे या गुंतवणूकीतून होणारे आर्थिक सहकार्य हे आग्नेय आशियातील गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी वापरले जाणार आहे. या निधीच्या वापरातून गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध, तपासणी, निदान आणि उपचारविषयक स्थितीत सुधारणा घडवून आणत या संपूर्ण प्रक्रियेतील पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच महिलांचे आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरण नेटवर्क या संस्थेमधील महिला गुंतवणूकदार आणि सामाजिक कार्यकर्ते मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गाची तपासणी, वैद्यकीय प्रतिमाकारक (medical imaging), रोगनिदानशास्त्र, किरणोत्सार आधारित उपचारपद्धती, आरोग्यविषयक सेवा कर्मचाऱ्यांकरता प्रशिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या सौरीकरणासाठीही अनुदान, सवलती आणि भांडवली गुंतवणुकीसारख्या उपाययोजना राबवणार आहेत.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियादेखील लसीकरणविषयक जागतिक आघाडीसोबतच्या भागीदारीत, मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गावरील लसींचे भारत - प्रशांत क्षेत्रात वितरण करता यावे याकरता, या लसींच्या 40 दशलक्ष मात्र खरेदी करण्याकरता पाठबळ पुरवणार आहे. त्यांनी दाखवलेल्या या बांधिलकीचा मागणीच्या आधारे विस्तार करता येणार आहे. यामुळे लसींचा स्थिर पुरवठा सुनिश्चित केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे आजवर अशा सुविधांपासून वंचित राहिलेल्या भागांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे निर्माण झालेले दडपण दूर करता येऊ शकते. अशा प्रकारच्या बांधिलकीतूनच या क्षेत्रात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण रोखण्यात आणि समन्यायी आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करण्यात मदत होऊ शकते.
यासोबतच बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसह इतर काही देणगीदार आणि देशांनीही या वर्षाच्या सुरुवातीलाच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निर्मूलनाच्या प्रयत्नांना मदत करण्याबद्दल वचनबद्धता व्यक्त केली होती. याअंतर्गत फाऊंडेशनने जागतिक पातळीवर मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गावरील लसींची उपलब्धता वेगाने वाढावी यासाठी, मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गावरील उपचारांसाठी नवी रोगप्रतिबंधक औषध तसेच उपाय योजना विकसित करण्यासाठी, तसेच उपचारात्मक लसी आणि निदान साधने विकसित करण्यासाठी, तसेच वैद्यकीय संशोधनपर अभ्यासासाठी आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, चार वर्षांमध्ये 180 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतका निधी उपलब्ध करून देण्याबद्दल वचनबद्धता दर्शवली होती.
सॅबिन व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटदेखील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निर्मूलनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध देशांचा सहभाग असलेल्या एका नव्या आघाडीला पाठबळ पुरवणार आहे. हे काम ते मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गविषयक जागतिक संघ (Global HPV Consortium - GHC) या संस्थेच्या माध्यमातून करणार आहेत. तर गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलन संघ (The Cervical Cancer Elimination Consortium-India - CCEC-I)) या संस्थेची भारतातील शाखा भारत सरकारशी सहकार्यपूर्ण भागीदारी करणार आहे. या माध्यमातून ते आपल्या तपासणी, सुलभ उपलब्धता, उपचार, लसीकरण, शिक्षणिक प्रबोधन अर्थात सेव्ह (SAVE - Screening, Access to Treatment, Vaccination, Education) या एकात्मिक उपक्रमा अंतर्गत गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त (कर्करोग मुक्त) 100 जिल्हे घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यादृष्टीने जिथे शक्य आहे तिथे या तत्वावर जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे. अर्थात हा प्रयत्न मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गविषयक जागतिक संघाच्या भारत - प्रशांत क्षेत्रासाठीच्या वचनबद्धतेचाच भाग असणार आहे. याअंतर्गत याआधी त्यांनी इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाबरोबर सहकार्यपूर्ण भागीदारी केली होती, आणि त्यांचा गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्मूलन राष्ट्रीय आराखडा विकसित करण्यात पाठबळ पुरवले होते.
जपाइगो (Jhpiego) या महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेने देखील फिलिपाईन्सच्या आरोग्य विभागासोबत सहकार्यपूर्ण भागीदारी आणि रोश या जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या मदतीने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करणे, या आजाराच्या तपासणीसाठीच्या साधनांची मागणीचा पाठपुरावा करत ती सुलभतेने उपलब्ध व्हावीत यासाठीचेही प्रयत्न करण्याचे काम करत आहेत. याकरता ते महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या जोखमींबद्दल तसेच मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गाविषयीच्या चाचणीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहेत. ते आपल्या या तपासणी प्रकल्पा अंतर्गत स्क्रीनिंग प्रकल्पाच्या केंद्रीकृत प्रयोगशाळा प्रारुपांच्या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीच्या सुविधांचा विस्तार करत आहेत. यासाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्मूलन धोरणाचा अवलंब केला आहे, ज्या अंतर्गत उच्च कार्यक्षमतेने मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गविषयक चाचण्या घेतल्या जाव्यात आणि औष्णिक पद्धतीअंतर्गत शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शारीरिक ऊती काढून टाकण्याची उपचार पद्धती अंवलंबावी (thermal ablation treatment) अशा शिफारसी जागतिक आरोग्य संघटनेने केल्या आहेत. त्यांचा हा उपक्रम फिलिपिन्समधील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमधील शासकीय आस्थापनांच्या भागीदारीत सुरू आहे. याअंतर्गत उपचारांसाठी शिफारस केलेले मार्ग अबलंबले जात आहेत, आणि उपचार सुलभतेने उपलब्ध होतील याची सुनिश्चितीही केली जात आहे.
इल्युमिना या जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीनेदेखील भारत - प्रशांत प्रिसिजन मेडिसीन (रुग्णांची जनुकीय पार्श्वभूमी, वातावरण आणि त्यांची जीवनशैली यावर आधारित वैयक्तिक पातळीवर रोग प्रतिबंध आणि उपचार पद्धती) धोरणाचा अवलंब करता येण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे. त्यासाठी ते जनुकीय रोगनिदान चाचणी पद्धतींचा विकास आणि अवलंब करण्याच्या प्रयत्नांना पाठबळ पुरवत आहेत. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आणि या आजाराच्या पुढच्या टप्प्यावर (>50%) पोहोचलेल्या तसेच मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गाची लागण झालेली नसलेल्या (~ 5%) रूग्णांना पॉली (ADP-ribose) पॉलिमरेज (PARP) प्रतिबंधक आणि रोगप्रतिकारक चेकपॉइंट प्रतिबंधक (immune checkpoint inhibitors - ICI) यांसारख्या अचूक निदानविषयक आणि शक्य त्या नेमक्या उपचार पद्धतींची सुविधा मिळेल याची सुनिश्चिती या प्रयत्नांअंतर्गत केली जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील स्त्रीरोग विषयक कर्कार्बुद रोगशास्त्रविषयक (oncology) संस्थांसोबतच्या भागीदारीतही अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.
रोश डायग्नोस्टिक्स ही कंपनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी आणि निदानाविषयीच्या आपल्या उपक्रमांचा विस्तार भारत - प्रशांत क्षेत्रातही करू लागली आहे. रोश डायग्नोस्टिक्स या कंपनीने जपानसोबत सहकार्यपूर्ण भागीदारीत महिलांना शिक्षित करणे, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि रुग्ण सेवेचा कार्यक्षम पाठपुरावा यावा यासाठीच्या डिजिटल उपाययोना विकसित करण्याचे काम केले होते. तसेच ऑस्ट्रेलिया सोबतच्या भागीदारीतही गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या आणि कधीच तपासणी न केलेल्या गटांसोबत, ज्यात अॅब ओरिजिनल या ऑस्ट्रेलियातील आदिवासी समुदायाचा तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँडचा भाग असलेल्या टोरेस स्ट्रेट बेटांवरच्या आदिवासी समुदायाचा आणि सांस्कृतिकदृष्ट्या विविधता असलेल्या इतर समुदायांचा समावेश होता, अशांसोबत गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीविषयी जागरुकता निर्माण करण्याचे काम केले होते. आपल्या या अनुभवांच्या आधारावरच रोश डायग्नोस्टिक्स भारत - प्रशांत क्षेत्रात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणी सुविधांची सुलभ उपलब्धता वाढवण्यासाठी आणि त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
बेक्टन डिकिन्सन अँड कंपनी (BD) ही कंपनी देखील भारत प्रशांत क्षेत्रातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीविषयक उपक्रमांमध्ये व्यापक गुंतवणूक करत आहे. बेक्टन डिकिन्सन अँड कंपनी या कंपनीने 2025 च्या सुरूवातीपर्यंत 1,200 पेक्षा जास्त चिकित्सक आणि सहाय्यक कर्मचार्यांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल प्रशिक्षण देण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यासाठी ते प्रसूतीविषयक आणि स्त्रीरोगविषयक संस्थांबरोबर काम करत आहेत. यासोबतच मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गविषयक तपासणी मोठ्या प्रमाणात करण्याच्या प्रारुपाविषयी सर्वदूर माहिती पोहचवता यावी तसेच अशा तपासणीपासून वंचित राहिलेल्या समुदायांपर्यंत पोहचता यावे यासाठीच्या प्रायोगिक प्रकल्पांमध्येही बेक्टन डिकिन्सन अँड कंपनी गुंतवणूक करत आहेत. बेक्टन डिकिन्सन अँड कंपनी डायरेक्ट रिलीफसोबतची आपली दीर्घकालीन भागीदारीच्या माध्यमातून सेवा अर्थात स्वयंरोजगार महिला संघटनेसोबतही (SEWA - Self-Employed Women’s Association) काम करत आहेत. याअंतर्गत ते 20,000 पेक्षा जास्त महिलांना तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत 400 तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाणार असून, त्यात तपासणी, निदान आणि मानसिक आरोग्यविषयक सहाय्य प्रदान केले जाणार आहे.
समुदायिक आरोग्यविषयक परिणामकारकता वाढवण्यासाठीच्या प्रकल्पाअंतर्गत अर्थात एको प्रकल्पाअंतर्गत (Project ECHO - Extension for Community Healthcare Outcomes Project) गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या परिणामकारक तसेच सुलभतेने उपलब्ध असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि रुग्णसेवेविषयीच्या 10 नव्या शैक्षणिक व्यवस्थांच्या माध्यमातून भारत प्रशांत क्षेत्रात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निर्मूलनाला गती दिली जाणार आहे. सद्यस्थितीत 33 देशांमधील 180 पेक्षा जास्त सार्वजनिक आरोग्यविषयक संस्थामध्ये एको प्रकल्पाचे प्रारुप वापरले जात आहे. हे प्रारुप म्हणजे कर्करोगावरील आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या वैयक्तिक व्यावसायिकांसाठी कर्करोगाशी संबंधित रुग्ण सेवांच्या वितरणात सुधारणा घडवून आणण्याकरता विविध कसोट्यांवर सिद्ध झालेला प्रशिक्षण आणि मार्गदर्शक आराखडाच आहे. प्रोजेक्ट एको अंतर्गत 2028 पर्यंत इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया आणि भारत प्रशांत क्षेत्रातील इतर देशांमधील स्थानिक भागीदार आणि त्यांच्या आरोग्य मंत्रालयांच्या सहकार्याने यासंबंधीच्या 10 नवीन सामुदायिक उपचार कार्यपद्धतींचा प्रारंभ केला जाणार आहे. याअंतर्गत मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्ग लसींच्या वापराची अंमलबजावणी, कर्करोगपूर्व स्थितीतील लक्षण सदृष्य जखमांवरील उपचार आणि अत्यावश्यक उपचारात्मक पद्धतींचा समावेश असणार आहे.
याच तऱ्हेने अमेरिकन कॅन्सर सोसायटीदेखील मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गांशी संबंधित कर्करोगांचा जगावरचा वाढता ताण कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. यादृष्टीने ते भारत प्रशांत क्षेत्रासह जागतिक स्तरावर नागरी समाजिक संघटनांना दिल्या जाणाऱ्या पाठबळाची व्याप्ती वाढवणार आहेत. अशा संस्थाना जे पाठबळ पुरवले जाईल त्यात प्रारंभीच्या टप्प्यावर कर्करोगविषयक नागरी सामाजिक संस्था आणि वैद्यकीय संस्थावर भर दिला जाईल. याअंतर्गत त्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि तांत्रिक सहकार्य पुरवले जाईल. ही मदत विविध कसोट्यांवर सिद्ध झालेल्या, कमी खर्चाच्या अनुभवांवर आधारित उपायोजनांकरता असेल, ज्यांचा उद्देश आरोग्य सेवा प्रदाता व्यापक प्रशिक्षणांद्वारे जीवनरक्षक प्रतिबंधक सेवांची मागणी आणि उपलब्धतेत प्रत्यक्ष अवलंबाच्यादृष्टीने पूरेपूर क्षमतेच्या उपयोगीतेची स्थिती निर्माण करणे असा असेल.
अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (ASCO) ही संस्थाही त्यांनी अतितीव्र गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त महिला रुग्णांचे व्यवस्थापन आणि उपचारांसाठी जारी केलेल्या जागतिक मार्गदर्शक तत्वांचे अद्ययतीकरण करणार आहेत. याअंतर्गत ते गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील उपचारासंदर्भात अनुकूलतम दृष्टीकोनांबद्दच्या नव्या वैज्ञानिक पुराव्यांचा समावेश करून, त्याआधारे केलेल्या नव्या शिफारशींचा अंतर्भाव करणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी ही संस्था आशिया प्रशांत प्रादेशिक परिषदेसह, भागीदार असलेल्या ऑन्कोलॉजीविषक संस्था अशा त्यांच्या सदस्य असलेल्या संस्थासोबत मिळून भारत प्रशांत क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या तसेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठीच्या सहाय्यकारी मार्गदर्शक तत्त्वांच्या वापराला पाठबळ देण्यासाठी काम करणार आहे. यासाठी ते भारत प्रशांत क्षेत्रातील संबंधित रुग्णांवरील उपचारांची परिणामकारता सुधारावी यादृष्टीने कर्करोगविषयक डॉक्टरांच्या माध्यमातून काम करणार आहेत.
भारत प्रशांत क्षेत्रात किरणोत्सार आधारीत उपचार पद्धती आणि वैद्यकीय प्रतिमाकार क्षमता अधिक वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा यंत्रणा (The International Atomic Energy Agency - IAEA) रेज ऑफ होप या उपक्रमाचा विस्तार करत आहे. या उपक्रमाअंतर्गत 13 देश आणि प्रदेशांनी मदतीची विनंती केली आहे. यादृष्टीने जागरूकता वाढविण्याचे आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा यंत्रणेने जपान आणि भारतातील कर्करोगविषयक संस्थांना त्यांच्या रेज ऑफ होप या उपक्रमाचे समन्वयक केंद्र म्हणून नियुक्त केले आहे. या केंद्रांच्या मार्फत शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, नवोन्मेष, गुणवत्तापूर्ण आश्वासनपूर्ती अशा विविध क्षेत्रातील क्षमतावृद्धीसाठीचे उपक्रम राबवले जाणार आहेत.
आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघानेदेखील गर्भाशय मुखाच्या कर्करोगविषयक सुविधांमधली असमानता दूर करत जागतिक परिणाकारकता साध्य करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे. या उपक्रमात या संघाचे 172 देशांमधले 1150 सदस्य काम करणार आहे. जगातील इतर देशांसोबतच भारत प्रशांत क्षेत्राही पुढचे तीन वर्षे हा उपक्रम राबवला जाईल. भारत प्रशांत क्षेत्रातील गर्भाशय मुखाचा कर्करोग भागीदारी कार्यक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ आपली विद्यमान महत्वाची व्यासपीठे, शिक्षण व्यवस्थेतील प्रस्थापित यंत्रणा, यासोबतच त्यांची विस्तृत संपर्क यंत्रणा आणि कोणत्याही क्षेत्रासोबत सहकार्यपूर्ण भागीदारी करण्याची त्यांची विविध कसोट्यांवर सिद्ध झालेली क्षमता या सगळ्याचा पूरेपूर वापर करून, त्या त्या ठिकाणच्या आपल्या भागीदार देशांना सुलभ रुग्ण सेवांची उपलब्धतेत सुधारणा घडवून आण्यासाठी, शाश्वत प्रगती साधण्यासाठी आणि एकूणात जगभरातील लोकसंख्येवरचे कर्करोगाचे दडपण कमी करण्यासाठी पाठबळ पुरवणार आहे.
कर्करोगविषयक संशोधन, पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण व्यवस्थेची क्षमतावृद्धी
अमेरिकेतील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर आणि ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील रॉयल नॉर्थ शोर हॉस्पिटलने 40 दशलक्ष डॉलर्सची सार्वजनिक - खाजगी क्षेत्रातील भागीदारी सुरू केली आहे. ही भागीदारी प्रिसिजन ऑन्कोलॉजी अर्थात रुग्णाची जुनकीय इतिहास - वातावरण आणि जीवनशैलीवर आधारित ऑन्कोलॉजी आणि द्रविकृत बायोप्सी तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चाचण्यांच्या प्रक्रियेला गती देऊ शकेल. यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान आणि निर्मूलनाचाही अंतर्भाव केलेला आहे. या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी ऑस्ट्रेलियातील देणगीदार ग्रेगरी जॉन पोच आणि दिवंगत के व्हॅन नॉर्टन पोच यांनी या दोन्ही संस्थांच्या प्रत्येकी 20 दशलक्ष डॉलर्सची देणगीही दिली आहे. यामुळे भारत प्रशांत क्षेत्रासह इतर भागांसाठीही अत्याधुनिक निदान पद्धती आणि साधने तसेच उपचारांसाठी आवश्यक साधनांच्या विकासाला गती मिळू शकणार आहे.
अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, इंनकॉर्पोरेशन (AWS) भारत प्रशांत क्षेत्रातील संस्थांना गर्भाशय मुखाचा कर्करोगाला प्रतिबंध, या आजाराचे निदान आणि त्यावरच्या उपचारांच्या प्रयत्नांत आपल्या मर्यादीत क्षमतेत मदत करणार आहे. यांतर्गत ते क्लाउड कॉम्प्युटिंग क्रेडिटचा पुरवठा तसेच ते अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसवर उपलब्ध असलेल्या खुल्या माहितीसाठ्याच्या नोंदी केंद्राच्या माध्यमातून अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस मधील तसेच डेटासेटची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. संशोधक अॅमेझॉन वेब सर्व्हिसेचा वापर करून कर्करोगविषयक अनुवांशिक संग्रहातील नोंदी आणि इतर बाबींच्या आधारे विविध प्रकारच्या नमुन्यांचे आकृतीबंध आणि विविधता समजून घेऊ शकतात.
यासोबतच फायझर ही कंपनी देखील भारत प्रशांत क्षेत्रात प्राथमिक स्तरावरील रुग्ण सेवाविषयक ऑन्कोलॉजी क्षमतावृद्धीसाठी आपल्या इंडोव्हेशन या उपक्रमाचा विस्तार करणार आहे. स्थानिक स्टार्टअप्सना पाठबळ देण्याच्या उद्देशाने फायझरने दोन वर्षांपूर्वी इनडोव्हेशन हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत फायझरने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी संबंधित स्टार्टअप्सना सुमारे 1 दशलक्ष डॉलर्सचे आर्थिक अनुदान दिले आहे, यासोबतच त्यांनी विविध सरकार आणि विद्यापीठांसोबतच्या भागीदारीत अनेक उपक्रमांसाठी काम केले आहे. फायझरने आरोग्यविषयक प्राथमिक सेवा केंद्रांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने ऑन्कोलॉजीवरही भर देणे सुरू केले असून, त्याकरता आपल्या उपक्रमाचा विस्तार करायला घेतला आहे. या टप्प्यात, फायझर 10 स्टार्टअप्सना अनुदान देणार आहे. हे अनुदान भारत प्रशांत क्षेत्रातील आरोग्यविषयक प्राथमिक सेवा केंद्रांमध्ये सुरवातीच्या टप्प्यावरच आदाजाराचे निदान करण्याच्या सुविधा, तसेच रुग्ण सेवांमध्ये सुधारणा घडवून आणणे तसेच अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजनांकरता वापरले जाणार आहे.
इलेक्टा ही कंपनी देखील भारत - प्रशांत क्षेत्रातील गर्भाशय मुखाच्या कर्करोग रुग्णसेवा आणि उपचारांमधली दरी भरून काढण्यासाठी, किरणोत्सारी उपचारपद्धतींची क्षमता वाढवून या आजाराचे निर्मुलन करण्यात योगदान देणार आहे. याअंतर्गत आग्नेय आशियात किरणोत्सारी उपचारपद्धतींसंबंधी प्रशिक्षण केंद्र स्थापना करणे, स्थानिक वैद्यकीय केंद्रांसोबत मिळून उपचारविषयक पद्धती विकसित करणे, आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून किरणोत्सारी उपचारपद्धती अंतर्गतची रुग्ण सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लाउड - आधारित मंचांची अंमलबजावणी करणे आणि भारत प्रशांत क्षेत्रातील किरणोत्सारी ऑन्कोलॉजी व्यवस्थेच्या सदस्य असलेल्या केंद्रांचा ठराविक कालांतराने बारकाईने आढावा घेत राहणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.
अमेरिकेतल्या एमडी अँडरसन या कर्करोगविषयक संस्थेने, त्यांच्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयीचे संशोधन, प्रशिक्षण आणि शेक्षणिक उपक्रमांचा भारत प्रशांत क्षेत्रात विस्तार करण्याबद्दल वचनबद्धता व्यक्त केली आहे. एमडी अँडरसन ही संस्था सध्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी, निदान आणि उपचार कार्यक्रमांच्या अंमलबजावणी आणि मूल्यांकनावर इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयासोबत सहकार्यपूर्ण भागीदारीत काम करते आहे. या अंतर्गत ते करते आणि इंडोनेशियामधील वैद्यकीय सेवा प्रदात्यांना, कोल्पोस्कोपी, शस्त्रक्रीयेच्या माध्यमातून शारिरीक ऊती काढून टाकण्याची उपचार पद्धती, लूप इलेक्ट्रोसर्जिकल एक्सिजन प्रक्रिया (LEEP) आणि शस्त्रक्रियांविषयी प्रशिक्षण देऊन सहकार्य करत आहेत. भारत प्रशांत क्षेत्रातील ज्या देशांची आरोग्य मंत्रालये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निर्मुलन करण्याच्या उद्देशाने त्यांच्या देशात, भागीदारीत हा उपक्रम राबवण्यासाठी तयार आहेत, तिथे या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी एमडी अँडरसनने वचनबद्धता दर्शवली आहे.
गर्भाशय मुखाच्या आणि स्तनाच्या कर्करोगाच्या निदान आणि वैद्यकीय प्रतिमाकरण उपाययोनांसंबंधी जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या होलॉजिक ही संस्थेनेदेखील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी भारत प्रशांत क्षेत्रातील सरकारी एजन्सी आणि आरोग्य सेवा प्रदात्यांबरोबर परस्पर सहकार्यपूर्ण भागीदारीत काम करत आहे. या अंतर्गत ते सध्या भारत प्रशांत क्षेत्रातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगासंबंधी रुग्णसेवा - उपचार प्रदात्यांच्या कमतरतेच्या समस्येवर मात करण्यावर काम करत आहेत. याअंतर्गत ते मोठ्या लोकसंख्येकरता गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीत कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच होलॉजिक महिलांच्या आरोग्याविषयी एक व्यापक स्वरुपाचे जागतिक सर्वेक्षण असलेल्या महिला आरोग्यविषयक जागतिक निर्देशांक निरंतर प्रकाशित करत राहणार आहेत. याद्वारे ते जगभरात महिला आणि मुलींच्या आरोग्यविषयक कल्याणासंबंधी उपलब्ध असलेली माहितीमधील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्ग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोग विरोधातील जागतिक पातळीवरील उपक्रमांमुळे भारत प्रशांत क्षेत्रामध्ये, त्या त्या प्रदेशातील भागीदार आणि सहकाऱ्यांसोबत मानवी वर्धित त्वचा विषाणू संसर्गावरील लसीकरण, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी आणि सुरुवातीच्या टप्प्यावरच उपचार करण्यासंबधीचे प्रकल्प अशा उपक्रमांना गती मिळू शकणार आहे. या प्रयत्नांमध्ये बँकॉक मध्ये आशिया प्रशांत प्रदेशासाठी कार्यशाळेचे आयोजन करणे आणि त्या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कर्करोग विषयक क्षेत्रातले ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि संपूर्ण भारत प्रशांत क्षेत्रात (2017) जागरूकतेशी संबंधित उपक्रमांची व्याप्ती आणि विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे अशा उद्देशांचाही समावेश आहे.
* * *
शैलेश पाटील/वासंती जोशी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177367)
Visitor Counter : 7
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam