पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत-युके सीईओ फोरममध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2025 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर  2025

माननीय पंतप्रधान स्टार्मर,

भारत आणि युकेमधील व्यापारी नेतेहो,

नमस्कार!

आज भारत-युके सीईओ फोरमच्या बैठकीत सहभागी होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम मी पंतप्रधान स्टार्मर यांच्या मौलिक विचारांबद्दल त्यांचे आभार मानतो.

तुम्हा सर्व व्यापार क्षेत्रातील प्रमुख नेत्यांच्या गेल्या अनेक वर्षांतील अविरत प्रयत्नांमुळे हा फोरम, भारत-युके धोरणात्मक भागीदारीच्या एका महत्त्वपूर्ण आधारस्तंभाच्या रुपात उदयाला आला आहे. आत्ता तुमचे विचार ऐकून आपण नैसर्गिक भागीदार म्हणून आणखी वेगाने प्रगती करू हा माझा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळामध्ये, हे वर्ष भारत-युके संबंधांचे स्थैर्य वाढवणारे ठरले आहे.या वर्षी जुलै महिन्यातील माझ्या युके दौऱ्यादरम्यान आम्ही व्यापक आर्थिक आणि व्यापारी करारावर म्हणजेच सीटा वर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या ऐतिहासिक कामगिरीसाठी मी माझे मित्र पंतप्रधान स्टार्मर यांची कटिबद्धता आणि दूरदृष्टीचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. हा केवळ एक व्यापारी करार नव्हे तर जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सामायिक प्रगती, सामायिक समृद्धी आणि सामायिक लोक यांचा आराखडा आहे.बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासह हा सामंजस्य करार दोन्ही देशांतील एमएसएमई उद्योगांना सशक्त करेल. यातून लाखो तरुणांसाठी रोजगाराचे नवे मार्ग देखील खुले होतील.

मित्रांनो,

या सीटाला त्याची संपूर्ण क्षमता प्राप्त करता यावी म्हणून मी चार नवे पैलू या सीटादरम्यान तुमच्या समोर मांडू इच्छितो. हे जे माझे सीटाचे नवे आयाम आहेत ते याला बराच विस्तृत पाया मिळवून देतील.

सी म्हणजे वाणिज्य आणि अर्थव्यवस्था, 

ई  म्हणजे शिक्षण आणि लोकांमधील बंध
टी म्हणजे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष
ए म्हणजे आकांक्षा

आज आमच्या उभय देशांमध्ये सुमारे 56 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार आहे. वर्ष 2030 पर्यंत हे प्रमाण दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले आहे.

मित्रांनो,

आज भारतात धोरणात्मक स्थैर्य, अंदाजित नियमन आणि मोठ्या प्रमाणातील मागणी आहे. तसेच पायाभूत सुविधा, औषधनिर्माण, वित्तपुरवठा यांच्यासह प्रत्येक क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. युकेमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांच्या शिक्षणसंस्था सुरु करत आहेत ही देखील अत्यंत आनंदाची बाब आहे.येत्या काळात शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील भागीदारी आपल्या नवोन्मेषाची सर्वात मोठी प्रेरक शक्ती बनेल.

मित्रांनो,

आज दूरसंचार, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, क्वांटम, सेमीकंडक्टर, सायबर आणि अवकाश यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या देशांमध्ये सहयोगाच्या असंख्य नव्या संधी निर्माण होत आहेत.संरक्षण क्षेत्रात आपण सह-रचना आणि सह-निर्मितीच्या दिशेने प्रगती करत आहोत. आता या सर्व शक्यतांना मजबूत सहयोगात परिवर्तीत करण्यासाठी वेगाने काम करण्याची वेळ आली आहे. महत्त्वपूर्ण खनिजे, दुर्मिळ पृथ्वी घटक, एपीआय यांचासारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये आपल्याला संरचित पद्धतीने पुढे जायला हवे, यामुळे आपल्या संबंधांना एक भविष्यवादी दिशा मिळेल.

मित्रांनो, 

आपण सर्वांनी फिनटेक क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य पाहिले आहे. आज जगभरातील एकूण रियल टाईम डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार भारतात होत आहेत. आर्थिक सेवा क्षेत्रात युकेचा अनुभव आणि भारताचा डीपीआय एकत्र येऊन संपूर्ण मानवतेचे हित करू शकतात. 

मित्रांनो,

आपल्या संबंधांना नवीन ऊर्जा प्रदान करण्यासाठी पंतप्रधान स्टार्मर आणि मी दृष्टिकोन 2035 ची घोषणा केली होती. हा आपल्या सामायिक महत्त्वकांक्षांचा कच्चा आराखडा आहे. भारत आणि युके सारख्या खुल्या, लोकशाही समुदायादरम्यान असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यात आपण सहकार्य दृढ करू शकत नाही. भारताची प्रतिभा आणि प्रमाण तसेच युकेचे संशोधन आणि विकास आणि कौशल्य- यांचा संगम मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता बाळगून आहे. या आकांक्षा आणि उद्दिष्टे यांना लक्ष्य करण्यासाठी तसेच निर्धारित काळात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपले सहकार्य आणि पाठिंबा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 

मित्रांनो, 

या पैकी अनेक कंपन्या पूर्वीपासूनच भारतामध्ये कार्यरत आहेत. आज भारताच्या अर्थव्यवस्थेत व्यापक प्रमाणात सुधारणा केली जात आहे. अनुपालनाची औपचारिकता कमी करून व्यवसाय सुलभीकरण करण्यावर भर दिला जात आहे. काही दिवसांपूर्वीच वस्तू आणि सेवा कर सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आपले मध्यमवर्गीय तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकास गाथांना नवीन बळ मिळेल आणि तुम्हा सर्वांसाठी नव्या शक्यता निर्माण होतील. 

मित्रांनो, 

पायाभूत सुविधा विकासाला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. आम्ही नव्या पिढीतील बहुतेक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करत आहोत. 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा या लक्षाप्रती आपण जलद गतीने वाटचाल करत आहोत. अणुऊर्जा क्षेत्राची दारे खाजगी क्षेत्रासाठी उघडली जात आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. या सर्व निर्णयामुळे भारत युके सहकार्याला नव्या उंचीवर स्थापित करण्यासाठी अनेक संधी निर्माण होत आहेत. भारताच्या या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी मी आपणा सर्वांना आमंत्रित करतो. भारत आणि युकेमधील व्यवसाय प्रमुख एकत्र येऊन काही अशा क्षेत्रांची निवड करू शकतील का ज्यामध्ये आपण संयुक्त रूपाने जगात प्रथम क्रमांकावर पोहोचू शकू, याचा विचार मी करत आहे. ते क्षेत्र कदाचित फिनटेक असू शकते किंवा हरित हायड्रोजन किंवा सेमीकंडक्टर्स अथवा स्टार्ट अप्स असू शकते. याशिवाय इतरही एखादे क्षेत्र असू शकते. चला, भारत आणि युके एकत्र येऊन जागतिक मापदंड निर्माण करूया! 

पुन्हा एकदा, आपण सर्वजण आपला मौल्यवान वेळ खर्च करून इथे आलात त्यासाठी आपणा सर्वांचे खूप खूप आभार!

गोपाळ ‍चिपलकट्टी/संजना ‍चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/‍प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2176937) आगंतुक पटल : 43
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam