पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 08 OCT 2025 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर  2025

मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,

इंडिया मोबाईल कॉंग्रेसच्या या विशेष आवृत्तीत मी आपणा  सर्व अतिथींचे अभिनंदन करतो. आताच आपल्या अनेक स्टार्ट अप्सनी अनेक महत्वाच्या विषयांवर सादरीकरणे केली. वित्तीय घोटाळे रोखणे,क्वांटम  कम्युनिकेशन, 6जी, ऑप्टीकल कम्युनिकेशन, सेमी कंडक्टर यासारख्या अनेक महत्वाच्या विषयांवरचे सादरीकरण पाहिल्यानंतर, भारताचे तंत्रज्ञान विषयक भविष्य सक्षम हाती आहे, हा विश्वास दृढ होतो. या कार्यक्रमासाठी आणि सर्व नव्या उपक्रमांसाठी आपणा सर्वाना मी शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आयएमसीचे हे आयोजन आता फक्त मोबाईल किंवा टेलिकॉमपुरते मर्यादित राहिलेले नाही.केवळ काही वर्षातच  आयएमसीचे हे आयोजन आशियातला सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच बनले आहे.

मित्रहो,

आयएमसीची ही यशोगाथा कशी लिहिली गेली ? याला दिशा कोणी दिली ?

मित्रहो,

ही यशोगाथा लिहिली आहे भारताच्या तंत्रज्ञान स्वीकारण्‍याच्या मानसिकतेने, याचे नेतृत्व केले आहे, आमच्या युवा वर्गाने,भारताच्या प्रतिभेने,याला वेग दिला आहे आमच्या नवोन्मेषकांनी, आमच्या स्टार्टअप्सनी आणि म्हणूनच हे शक्य झाले आहे.कारण आज सरकार देशाची  प्रतिभा आणि  क्षमता यांच्यासमवेत संपूर्ण ताकदीने उभी आहे. टेलीकॉम टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट फंड,डिजिटल कम्युनिकेशन्स इनोव्हेशन्स स्क्वेअर या योजनांच्या द्वारे आम्ही स्टार्टअप्सना निधी उपलब्ध करून देत आहोत. 5 जी,6 जी, प्रगत ऑप्टीकल कम्युनिकेशन्स आणि टेरा – हर्टझ या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांसाठी  सरकार निधीचे पाठबळ पुरवत आहे ज्यायोगे आपल्या स्टार्टअप्सना  आपली उत्पादने उभी करणे शक्य होईल.आम्ही  स्टार्टअप्स आणि देशाच्या महत्वाच्या संशोधन संस्था यामध्ये भागीदारी सुलभ करत आहोत.आज सरकारच्या मदतीने,भारतीय उद्योग क्षेत्र,स्टार्टअप्स  आणि शिक्षण क्षेत्र अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र काम करत आहेत.स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि ते  व्यापक करणे असो,संशोधन आणि विकासाद्वारे  बौद्धिक संपदा निर्मिती असो,जागतिक मानक विकासामध्ये योगदान असो, प्रत्येक पैलूमध्ये भारत आगेकूच करत आहे. याच प्रयत्नांचा परिपाक म्हणजे भारत आज एक प्रभावी मंच म्हणून पुढे आला आहे.

मित्रहो,  

इंडिया मोबाईल काँग्रेस आणि दूरसंवाद क्षेत्रातली भारताची यशस्वी कामगिरी आत्मनिर्भर भारत दृष्टीकोनाची ताकद दर्शवते. मी जेव्हा मेक इन इंडिया संकल्पाबाबत बोलत होतो तेव्हा काही लोक त्याची कशी खिल्ली उडवत होते हे आपल्याला आठवतच असेल. शंका-कुशंका काढण्यातच धन्यता मानणारे लोक,प्रगत तंत्रज्ञान युक्त वस्तूंची निर्मिती भारत कसा करेल अशा शंका उपस्थित करत होते. कारण त्यांच्या कार्यकाळात नवे तंत्रज्ञान भारतात येईपर्यंत कित्येक दशके लागत असत.याचे उत्तर देशाने दिले.जो देश एकेकाळी 2जी साठी धडपडत होता आज त्याच देशातल्या जवळ-जवळ प्रत्येक जिल्ह्यात 5 जी पोहोचले आहे. 2014 च्या तुलनेत आपले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सहा पट वाढले आहे.मोबाईल फोन उत्पादनात अठ्ठावीस पट आणि निर्यातीत 127 पट वृद्धी झाली आहे. गेल्या एका दशकात मोबाईल फोन उत्पादन क्षेत्राने लाखो थेट रोजगाराची निर्मिती केली आहे. नुकतीच एका मोठ्या स्मार्ट फोन कंपनीची आकडेवारी समोर आली आहे.आज 45  भारतीय कंपन्या त्या मोठ्या कंपनीच्या पुरवठा साखळीशी जोडलेल्या आहेत.यातून देशात सुमारे साडेतीन लाख रोजगार निर्माण झाले आहेत. आज देशात कितीतरी कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहेत.यामधला अप्रत्यक्ष रोजगार जर जमेस धरला तर रोजगाराचा हा आकडा किती मोठा होतो याची कल्पना आपण करू शकतो.

मित्रहो,

काही दिवसांपूर्वीच भारताने आपले  4 जी स्टॅक  आणले आहे. ही देशाची मोठी कामगिरी आहे. असे सामर्थ्य बाळगणाऱ्या पाच देशांच्या रांगेत भारताने आता स्थान प्राप्त केले आहे. डिजिटल स्वयंपूर्णतेच्या दिशेने,तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेने देशाचे हे मोठे पाऊल आहे. स्वदेशी 4जी आणि 5 जी स्टॅकद्वारे आपल्यासाठी अखंड कनेक्टीव्हिटी तर सुनिश्चित होईलच त्याचबरोबर देशवासियांना वेगवान इंटरनेट आणि विश्वासार्ह सेवाही देता येणार आहे.याच उद्देशाने आम्ही मेड इन इंडिया  4जी  स्टॅक आणले त्याच दिवशी देशात एकाच वेळी सुमारे  एक लाख 4जी  टॉवर्सही कार्यरत करण्यात आले.जगातल्या काही देशांना एक लाख टॉवर्स म्हटल्यानंतर आश्चर्य वाटते,लोकांना हे आकडे फार मोठे वाटतात.याबरोबरच एकाच वेळी 2 कोटी पेक्षा जास्त लोक डिजिटल चळवळीचा भाग बनले आहेत.यातले अनेक भाग दुर्गम होते.ते डिजिटल कनेक्टीव्हिटीमध्ये मागे राहिले होते.आता अशा सर्व भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटी पोहोचली आहे.

मित्रहो,

भारताच्या मेड इन इंडिया 4जी स्टॅकचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.आपले 4जी स्टॅक  निर्यातक्षमही आहे. म्हणजेच हे भारताच्या व्यवसाय व्यापकतेचाही भाग बनेल.यातून 2030 चा भारत म्हणजेच ‘भारत 6 जी व्हिजन’ साकारण्यात मदतही होईल.

मित्रहो,

10 वर्षात भारताची तंत्रज्ञान क्रांती अतिशय झपाट्याने आगेकूच करत आहे आणि हा वेग आणि व्यापकता साध्य करण्यासाठी दीर्घ काळापासून भक्कम कायदा आणि आधुनिक धोरणाच्या पायाची गरज भासत होती.यासाठी आम्ही दूरसंवाद कायदा तयार केला.       

या एका कायद्याने  ‘The Indian Telegraph Act’ आणि ‘The Indian Wireless Telegraph Act’ या दोन्ही कायद्यांची जागा घेतली. हे कायदे तेव्हाचे होते, जेव्हा इथे बसलेल्या आपल्यासारख्या कोणाचा जन्मही झाला नव्हता. आणि म्हणूनच, धोरणात्मक स्तरावर याची गरज होती की आपण 21व्या शतकातील दृष्टिकोनानुसार एक नवी व्यवस्था तयार करावी, आणि आपण तेच केले आहे. हा नवीन कायदा नियामक म्हणून नव्हे, तर सुविधादाता  म्हणून काम करतो. आता मंजुरी सोप्या झाल्या आहेत, राइट-ऑफ-वे परवानग्या लवकर मिळतात. याचा परिणामही दिसत आहे. फायबर आणि टॉवर नेटवर्कचा विस्तार झपाट्याने होत आहे. यामुळे व्यवसायसुलभता वाढली आहे, गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत आहे, आणि उद्योगांना दीर्घकालीन नियोजन सोपे झाले आहे.

मित्रांनो,

आज आपण देशात सायबर सुरक्षेलाही तितकेच प्राधान्य देत आहोत. सायबर फसवणुकीविरुद्ध कायदे कठोर केले आहेत, आणि उत्तरदायित्व  देखील वाढवले आहे. तसेच, तक्रार निवारण  यंत्रणाही सुधारली आहे. उद्योग आणि ग्राहक, या दोघांनाही, याचा खूप मोठा फायदा मिळत आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण जग भारताच्या क्षमतेचे महत्त्व मान्य करत आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार बाजारपेठ आपल्याकडे आहे. दुसरी सर्वात मोठी 5जी  बाजारपेठ येथे आहे. आणि बाजारपेठेसोबतच, आपल्याकडे मनुष्यबळ देखील आहे, वाहतूक साधने देखील आहेत आणि मानसिकता  देखील आहे. आणि जेव्हा मनुष्यबळाबद्दल बोलतो, तेव्हा भारतात प्रमाण (Scale) आणि कौशल्य (Skill) दोन्ही एकाच वेळी दिसतात. आज भारत जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या असलेला देश आहे, आणि ही पिढी मोठ्या स्तरावर कुशल बनवली जात आहे. भारत आज जगात सर्वात वेगाने वाढणारी ‘ डेव्हलपर’ लोकसंख्‍या असलेला देश आहे.

मित्रांनो,

आज भारतात एक जीबी वायरलेस डेटाची किंमत, एक कप चहाच्या किमतीपेक्षाही कमी आहे, चहाचे उदाहरण देण्याची माझी सवय आहे. प्रति वापरकर्ता डेटा वापरात  आपण जगातील अग्रगण्य देशांमध्ये येतो. याचा अर्थ असा आहे की भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी आता कोणताही विशेषाधिकार  किंवा चैन राहिलेली नाही. हा भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.

मित्रांनो,

उद्योग आणि गुंतवणूक वाढवण्याच्या मानसिकतेतही भारत सर्वात पुढे दिसतो. भारताची लोकशाही व्यवस्था, सरकारचा स्वागत करण्याचा दृष्टिकोन  आणि व्यवसायसुलभतेची धोरणे, यांमुळे भारताची ओळख गुंतवणूकदार-स्नेही ठिकाण  म्हणून झाली आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील आपले यश, या गोष्टीचा दाखला आहे की सरकार डिजिटल फर्स्ट मानसिकतेशी  कशा प्रकारे जोडलेले आहे. म्हणून मी पूर्ण विश्वासाने म्हणतो – ‘’This Is The Best Time To Invest, Innovate And Make In India!’’ म्हणजेच भारतामध्‍ये उत्पादन करण्‍यासाठी  गुंतवणूक करणे आणि नवोन्‍मेष संकल्पना राबविण्‍यासाठी सध्‍याचा काळ हा सर्वोत्तम आहे. उत्पादन क्षेत्रापासून सेमीकंडक्टर पर्यंत, मोबाईलपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि स्टार्टअप्सपर्यंत प्रत्येक क्षेत्रात, भारतात खूप संधी आहेत, खूप ऊर्जा आहे.

मित्रांनो,

काही आठवड्यांपूर्वीच 15 ऑगस्टला मी लाल किल्ल्यावरून घोषणा केली आहे, की हे वर्ष मोठ्या बदलांचे, मोठ्या सुधारणांचे  वर्ष आहे. आपण सुधारणांची गती वाढवत आहोत, आणि म्हणूनच आपल्या उद्योगाची, आपल्या इनोव्हेटर्सची जबाबदारीही वाढत आहे. आणि यात आपल्या स्टार्टअप्सची, आपल्या तरुण इनोव्हेटर्सची खूप मोठी भूमिका आहे. आपल्या वेगाने, आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेने स्टार्टअप्स नवीन मार्ग, नवीन संधी निर्माण करत आहेत. आणि म्हणूनच मला हे पाहून आनंद झाला की IMC ने देखील या वर्षी 500 हून अधिक स्टार्टअप्सना बोलावून, त्यांना गुंतवणूकदार आणि जागतिक मार्गदर्शकांशी  जोडण्याची संधी दिली आहे.

मित्रांनो,

या क्षेत्राच्या वाढीमध्ये आपल्या स्थापित उद्योजकांची भूमिका सतत वाढत आहे. हे उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी, स्थैर्य, प्रमाण  आणि दिशा  देतात. त्यांच्याकडे संशोधन आणि विकासाची (Research and Development) क्षमता आहे. आणि म्हणूनच, आपल्याला स्टार्टअप्सचा वेग  आणि स्थापित उद्योजकांचे प्रमाण या दोहोंमधून ऊर्जा मिळेल.

मित्रांनो,

आपल्या उद्योगाशी संबंधित असे अनेक विषय आहेत, ज्यावर स्टार्टअप्सचे युवा, आपल्या शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, संशोधन समुदाय  आणि धोरणकर्ते, सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. आयएमसी  सारखा मंच असे संवाद सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरले, तर कदाचित आपला फायदा अनेक पटीने वाढेल.

मित्रांनो,

आपल्याला पाहावे लागेल की,  जागतिक पुरवठा साखळीमध्‍ये  कुठे अडथळे येत आहेत. मोबाईल, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि संपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्थेमध्ये, जिथे कुठे जागतिक समस्या  आहेत, तिथे भारताकडे जगाला तोडगा  देण्याची संधी आहे. उदाहरणार्थ, आम्ही ओळखले की सेमीकंडक्टर उत्पादनाची क्षमता, आता काही मोजक्या देशांपर्यंत मर्यादित होती, आणि संपूर्ण जगाला विविधताकरण हवे होते. आज भारताने या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारतात 10 सेमीकंडक्टर उत्पादन युनिट्सवर काम सुरू आहे.

मित्रांनो,

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात, जागतिक कंपन्या विश्वसनीय भागीदारांच्या शोधात आहेत, जे प्रमाण आणि विश्वसनीयता  या दोन्हीत योग्य ठरतील. जगाला दूरसंचार नेटवर्क उपकरणांची रचना आणि उत्पादनासाठीही  विश्वासार्ह भागीदार हवे आहेत. भारतीय कंपन्या विश्वसनीय जागतिक पुरवठादार आणि रचना भागीदार  बनू शकत नाहीत का?

मित्रांनो,

मोबाईल उत्पादनात चिपसेट्स आणि बॅटरीपासून, डिस्प्ले आणि सेन्सर्सपर्यंत, हे काम देशाच्या आत आणखी वाढवण्याची गरज आहे. जग पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक डेटा  तयार करत आहे. त्यामुळे साठवण, सुरक्षा  आणि सार्वभौमत्व यांसारखे प्रश्न खूप महत्वपूर्ण होतील. डेटा सेंटर्स आणि क्लाउड पायाभूत सुविधांवर  काम करून भारत एक जागतिक डेटा केंद्र  बनू शकतो.

मित्रांनो,

मला आशा आहे की येणाऱ्या सत्रांमध्ये, आपण याच दृष्टिकोनाला, याच लक्ष्याला घेऊन पुढे जाऊ. पुन्हा एकदा IMC च्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत.

आपले खूप खूप धन्यवाद. 


सुवर्णा बेडेकर/निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2176640) Visitor Counter : 17