पंतप्रधान कार्यालय
शासनाच्या प्रमुखपदावर राहून सेवाकार्याच्या 25 व्या वर्षाचा आरंभ होत असल्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांविषयी व्यक्त केली कृतज्ञता
2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याच्या प्रसंगाचे पंतप्रधानांनी केले स्मरण
नेहमी गरीबांसाठी काम करावे आणि कधीही लाच घेऊ नये, असा आईने दिलेला सल्ला पंतप्रधानांनी केला सामायिक
गुजरातचे परिवर्तन दुष्काळग्रस्त राज्य ते सुशासनाचे ऊर्जा केंद्रामध्ये झाल्याची पंतप्रधानांनी दिली माहिती
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याची पंतप्रधानांनी पुन्हा दिली ग्वाही
Posted On:
07 OCT 2025 2:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2025
शासनाच्या प्रमुखपदावर राहून सेवा देण्याच्या कार्याच्या 25 व्या वर्षाचा आरंभ होत असल्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. यानिमित्ताने पंतप्रधानांनी 2001 मध्ये आजच्याच दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासूनचा आपल्या प्रवासाला उजाळा दिला आहे. लोकांचे जीवनमान सुधारणे आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देणे यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलो आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्यावर अत्यंत कठीण परिस्थितीत गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावर्षी झालेल्या मोठ्या भूकंपामुळे राज्यावर मोठे संकट ओढावले होते, त्याआधीही मागील काही वर्षांमध्ये मोठी आणि विनाशकारी चक्रीवादळे, सततचे दुष्काळ आणि राजकीय अस्थिरता अशा संकटांचाही सामना राज्याला करावा लागला होता, असे त्यांनी सांगितले. या आव्हानांमुळेच लोकांची सेवा करण्याचा तसेच नव्या उत्साहाने आणि आशेने गुजरातची पुनर्रचना करण्याचा निश्चय अधिक बळकट झाला, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आपल्या आईने सांगितलेल्या गोष्टींचेही मोदी यांनी स्मरण केले आहे. आपण नेहमी गरीबांसाठी काम करावे आणि कधीही लाच घेऊ नये, असे आपल्या आईने सांगितले होते असे ते म्हणाले. आपण जे काही कार्य करीत आहोत, त्यामागे उदात्त, चांगला हेतू आणि अखेरच्या व्यक्तीपर्यंत सेवा देण्याच्या संकल्पाची प्रेरणा असेल, याची ग्वाही आपण लोकांना दिली होती असेही त्यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील आपल्या कार्यकाळालाही त्यांनी उजाळा दिला. हे राज्य पुन्हा कधीही उभे राहू शकत नाही, असे त्यावेळी लोकांना वाटत होते. शेतकऱ्यांनी वीज आणि पाण्याच्या कमतरतेबद्दल तक्रारी केल्या होत्या, शेती अधोगतीला गेली होती आणि औद्योगिक विकास थांबला होता. मात्र सामूहिक प्रयत्नांतून गुजरात सुशासनाच्या ऊर्जा केंद्रात रूपांतरित झाले, असे ते म्हणाले. एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेले हे राज्य शेतीत उत्कृष्ट कामगिरीची नोंद करणारे ठरले, व्यापाराचा उत्पादन आणि औद्योगिक क्षमतेमध्ये विस्तार झाला आणि सामाजिक तसेच भौतिक पायाभूत सुविधांनाही चालना मिळाली, असे त्यांनी नमूद केले आहे.
2013 मध्ये, ज्यावेळी देशाला विश्वासार्हता आणि शासनव्यवस्थेच्या संकटाचा सामना करावा लागत होता, अशा परिस्थितीत 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जबाबदारी देण्यात आली होती याचेही त्यांनी स्मरण केले आहे. भारतातील लोकांनी आपल्या आघाडीला प्रचंड बहुमत दिले आणि आपल्या पक्षालाही स्पष्ट बहुमत दिले, यामुळे नव्या आत्मविश्वासाच्या आणि ध्येयाच्या युगाचा प्रारंभ झाला असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या 11 वर्षांत भारताने अनेक परिवर्तनाचे टप्पे गाठले आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. 25 कोटींहून अधिक लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढले गेले आहेत आणि आज देश प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमधील एक आशादायी केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अविरत प्रयत्न आणि सुधारणांद्वारे देशभरातील लोकांचे, विशेषत: महिला शक्ती, युवा शक्ती आणि मेहनती अन्नदात्यांने सक्षमीकरण केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारताला सर्व क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनवावे, हीच आजची लोकभावना आहे, ‘’ गर्व से कहो, यह स्वदेशी है’’ या आवाहनातून त्याची प्रचिती येते असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताच्या नागरिकांनी सातत्याने दाखवलेला विश्वास आणि स्नेह यासाठीही त्यांनी नागरिकांविषयी पुन्हा आभार व्यक्त केले. देशाची सेवा करणे हाच सर्वात मोठा सन्मान आहे असे ते म्हणाले. राज्य घटनेतील मूल्यांपासून मार्गदर्शन घेत, विकसित भारताचे सामूहिक स्वप्न साकार करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याची ग्वाही देखील त्यांनी पुन्हा एकदा दिली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मालिकेत म्हटले आहे :
''वर्ष 2001 मध्ये आजच्याच दिवशी मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच शपथ घेतली. माझ्या देशवासीयांच्या निरंतर आशीर्वादामुळे सरकारचा प्रमुख म्हणून मी आपल्या सेवेच्या 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारताच्या लोकांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्व कालखंडात आपल्या लोकांचे जीवन सुधारण्याचा आणि आपल्या सर्वांचे पालनपोषण करणाऱ्या या महान राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचा माझा सतत प्रयत्न राहिला आहे.”
"अत्यंत कठीण परिस्थितीत माझ्या पक्षाने मला गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. त्याच वर्षी राज्यात मोठ्या भूकंपाचे संकट आले होते. त्या पूर्वीच्या वर्षांमध्ये मोठे चक्रीवादळ, सलग दुष्काळ आणि राजकीय अस्थिरता राहिली होती. त्या आव्हानांमुळे लोकांची सेवा करण्याचा आणि गुजरातची नव्या जोमाने आणि आशेने पुनर्बांधणी करण्याचा माझा संकल्प दृढ झाला."
"मला आठवते की, ज्यावेळी मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; त्यावेळी माझ्या आईने मला सांगितले होते - 'मला तुझ्या कामाची फारशी समज नाही पण मी फक्त दोन गोष्टी सांगू इच्छिते. पहिली, तू नेहमीच गरीबांसाठी काम करशील आणि दुसरी, तू कधीही लाच घेणार नाहीस.' मी लोकांना असेही सांगितले की, मी जे काही करेन ते सर्वोत्तम हेतूने असेल आणि रांगेत असलेल्या शेवटच्या व्यक्तीची सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने प्रेरित असेल."
"ही 25 वर्षे अनेक अनुभवांनी भरलेली आहेत. एकत्रितपणे, आम्ही उल्लेखनीय प्रगती केली आहे. मला अजूनही आठवते की जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा असे मानले जात होते की, गुजरात पुन्हा कधीही उभा राहू शकणार नाही. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक वीज आणि पाण्याच्या टंचाईची तक्रार करत होते. शेती मंदीच्या स्थितीत होती आणि औद्योगिक विकास ठप्प झाला होता. त्या स्थितीत, आम्ही सर्वांनी मिळून गुजरातला सुशासनाचे शक्तिकेंद्र बनवण्यासाठी काम केले."
"दुष्काळग्रस्त राज्य असलेले गुजरात हे कृषी क्षेत्रात अव्वल कामगिरी करणारे राज्य बनले. व्यापार संस्कृतीचा विस्तार औद्योगिक आणि निर्मिती क्षमतांमध्ये झाला. नियमित संचारबंदी भूतकाळातील गोष्ट बनली. सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांना चालना मिळाली. हे परिणाम साध्य करण्यासाठी लोकांसोबत काम करता आल्याचे खूप समाधान लाभले."
''वर्ष 2013 मध्ये माझ्यावर 2014 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. त्या काळात देश विश्वास आणि प्रशासनाच्या संकटाचा सामना करत होता. तत्कालीन यूपीए सरकार भ्रष्टाचार, घराणेशाही आणि धोरणात्मक पक्षाघाताचे सर्वात वाईट स्वरूप म्हणून मानले जात होते. जागतिक व्यवस्थेत भारताकडे एक कमकुवत दुवा म्हणून पाहिले जात होते. परंतु, भारतातील लोकांनी समंजसपणा दाखवत आमच्या युतीला प्रचंड बहुमत दिले आणि आमच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल, याची सुनिश्चिती केली. अशी गोष्ट तीन दशकांनंतर पहिल्यांदाच घडली होती."
''गेल्या 11 वर्षात आपण भारताच्या लोकांनी एकत्रितपणे काम केले आहे आणि अनेक परिवर्तने घडवून आणली आहेत. आपल्या अभूतपूर्व प्रयत्नांमुळे संपूर्ण भारतातील लोकांना, विशेषतः आपली नारी शक्ती, युवा शक्ती आणि कष्टाळू अन्नदात्यांचे सक्षमीकरण झाले आहे. 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यात आले आहे. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताकडे एक उज्ज्वल स्थान म्हणून पाहिले जाते. जगातील सर्वात मोठी आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षा योजना असलेल्या देशांपैकी एक म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. आपले शेतकरी नवनवीन शोध घेत आहेत आणि आपला देश आत्मनिर्भर राहण्याची सुनिश्चिती करत आहेत. आम्ही व्यापक सुधारणा हाती घेतल्या आहेत आणि 'गर्व से कहो, ये स्वदेशी है' या नाऱ्यातून भारताला सर्व क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर बनवण्याची लोकोपयोगी भावना प्रतिबिंबित होते."
"भारतीय जनतेने दर्शविलेला अढळ विश्वास आणि प्रेम याबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या प्रिय राष्ट्राची सेवा करणे हा सर्वोच्च सन्मान आहे, एक कर्तव्य आहे जे माझ्यात कृतज्ञता आणि ध्येय जागवते. आपल्या राज्यघटनेची मूल्ये माझी निरंतर मार्गदर्शक असून विकसित भारताचे आपले सामूहिक स्वप्न साकार करण्यासाठी मी येणाऱ्या काळात आणखी कठोर परिश्रम करेन."
सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175731)
Visitor Counter : 18
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam