पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाद्वारे न्यूज 9 जागतिक शिखर परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

Posted On: 22 NOV 2024 10:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 नोव्‍हेंबर 2024

गुटेन आबेन्ड

स्टुटगार्डच्या न्यूज 9 जागतिक शिखर परिषदेत सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांना माझा नमस्कार! मंत्री विनफ्रीड, मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया आणि या शिखर परिषदेला उपस्थित असलेले मान्यवर! 

इंडो-जर्मन भागीदारीत आज एक नवा अध्याय जोडला जात आहे. भारतातील टीव्ही-9 ने वी. एफ.  बी. स्टुटगार्ट आणि बॅडेन-वर्टेमबर्गसह जर्मनीमध्ये या शिखर परिषदेच आयोजन केले आहे. मला आनंद आहे की भारतातील एक माध्यम गट आजच्या माहितीच्या युगात जर्मनी आणि जर्मन लोकांशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे भारतातील लोकांना  आणि जर्मनीच्या लोकांना एकमेकांना समजून घेण्यासाठी एक व्यासपीठही मिळेल. मला आनंद आहे की, न्यूज-9 इंग्रजी न्यूज चॅनेलही सुरू होत आहे.

मित्रांनो, 

“भारत-जर्मनी: शाश्वत विकासाचा आराखडा” ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे. आणि ही संकल्पना दोन्ही देशांच्या विश्वासार्ह भागीदारीचेही प्रतीक आहे. गेल्या दोन दिवसांत तुम्ही सर्वांनी आर्थिक मुद्द्यांवर तसेच क्रीडा आणि करमणुकीशी संबंधित मुद्द्यांवर खूप सकारात्मक चर्चा केली आहे. 

मित्रांनो,

युरोप भू-राजकीय संबंध आणि व्यापार आणि गुंतवणूक या दोन्ही दृष्टीने भारतासाठी एक महत्त्वाचे धोरणात्मक क्षेत्र आहे. आणि जर्मनी आमच्या सर्वात महत्त्वाच्या भागीदारांपैकी एक आहे. 2024 मध्ये भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि हे वर्ष, या भागीदारीसाठी ऐतिहासिक, विशेष आहे. गेल्या महिन्यातच चॅन्सेलर शोल्झ आपल्या तिसऱ्या भारत दौऱ्यावर होते. 12 वर्षांनंतर प्रथमच  जर्मन व्यवसायांची आशिया-पॅसिफिक परिषद दिल्लीत आयोजित करण्यात आली. यामध्ये जर्मनीने ‘फोकस ऑन इंडिया’ दस्तऐवज जारी केला. एवढेच नाही, भारतासाठी  कुशल कामगार धोरण ही सुरू केले आहे. जर्मनीने तयार केलेले हे पहिले देशविशिष्ट धोरण आहे.

मित्रांनो,

भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे झाली असतील, पण आमचे सांस्कृतिक आणि बौद्धिक संबंध शतकानुशतके जुने आहे. युरोपमधील पहिले संस्कृत व्याकरण पुस्तक तयार करणारी व्यक्ती जर्मन होती. दोन जर्मन व्यापाऱ्यांमुळे जर्मनी हा युरोपमधील पहिला देश बनला, जिथे तामिळ आणि तेलगू भाषेत पुस्तके छापली गेली. आज जर्मनीत सुमारे 3 लाख भारतीय राहतात. भारतातील 50,000 विद्यार्थी जर्मन विद्यापीठांमध्ये शिकतात आणि येथे शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचा हा सर्वात मोठा गट आहे. भारत-जर्मनी संबंधांचा आणखी एक पैलू भारतात दिसून येतो. आज भारतात 1800 हून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांनी गेल्या 3-4 वर्षांत 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकही केली आहे. दोन्ही देशांमध्ये आज सुमारे 34 अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार आहे. मला विश्वास आहे की, येत्या काही वर्षांत हा व्यापार आणखी वाढेल. कारण गेल्या काही वर्षांत भारत आणि जर्मनीची परस्पर भागीदारी सातत्याने मजबूत झाली आहे.'

मित्रांनो, 

आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. जगातील प्रत्येक देशाला विकासासाठी भारताशी भागीदारी करायची आहे. जर्मनीचा ‘फोकस ऑन इंडिया’ दस्तऐवज हे देखील याचे उत्तम उदाहरण आहे. आज संपूर्ण जग भारताचे धोरणात्मक महत्त्व कसे मान्य करत आहे हे या दस्तऐवजातून दिसून येते. जगाच्या विचारसरणीतील होत असलेल्या बदलासाठी, गेल्या 10 वर्षांपासून भारतात सुरू असलेल्या सुधारणा, कामगिरी, परिवर्तनाच्या मंत्राने मोठी भूमिका बजावली आहे. भारताने प्रत्येक क्षेत्रात नवीन धोरणे आखली. 21 व्या शतकात वेगवान प्रगतीसाठी स्वतःला तयार केले. आम्ही लाल फिती संपवून व्यवसाय सुलभता सुधारली. भारताने तीस हजारांहून अधिक अनुपालन रद्द केले, बँकांचे बळकटीकरण केले, जेणेकरून विकासासाठी वेळेवर आणि परवडणारे भांडवल उपलब्ध होईल. आम्ही जीएसटी ही कार्यक्षम व्यवस्था आणून गुंतागुंतीची कर प्रणाली बदलली आणि सोपी केली. आम्ही देशात पुरोगामी आणि स्थिर धोरण बनविण्याचे वातावरण निर्माण केले, जेणेकरून आमचे उद्योग पुढे जाऊ शकतील. आज भारतात एक मजबूत पाया तयार झाला आहे, ज्यावर विकसित भारताची भव्य इमारत बांधली जाईल. आणि जर्मनी यामध्ये भारताचा विश्वासू भागीदार असेल.

मित्रांनो, 

जर्मनीच्या विकासाच्या प्रवासात उत्पादन आणि अभियांत्रिकीला खूप महत्त्व आहे. भारतही आज जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मेक इन इंडियाशी जोडलेल्या उत्पादकांना भारत आज उत्पादन-संलग्न प्रोत्साहन देत आहे. आणि मला तुम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आमच्या उत्पादन लँडस्केपमध्ये मोठा बदल झाला आहे. आज भारत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. आज भारत जगातील सर्वात मोठा दुचाकी उत्पादक देश आहे. दुसरा सर्वात मोठा स्टील आणि सिमेंट उत्पादक आहे आणि चौथा सर्वात मोठा चार चाकी उत्पादक आहे. भारताचा सेमीकंडक्टर उद्योगही लवकरच जगात आपला ठसा उमटवणार आहे. याचे कारण असे की, गेल्या काही वर्षांत आपल्या सरकारने पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, लॉजिस्टिक खर्चात कपात, व्यवसाय सुलभता आणि स्थिर प्रशासन यासाठी सातत्याने धोरणे आणि नवीन निर्णय घेतले आहेत. कोणत्याही देशाच्या जलद विकासासाठी भौतिक, सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. भारतात या तिन्ही आघाड्यांवर पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. डिजिटल तंत्रज्ञानावर आपल्या गुंतवणुकीचा आणि नवनिर्मितीचा प्रभाव आज जग पाहत आहे. भारत हा जगातील सर्वात अद्वितीय डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असलेला देश आहे.

मित्रांनो, 

आज भारतात अनेक जर्मन कंपन्या आहेत. मी या कंपन्यांना गुंतवणूक आणि वाढीसाठी आमंत्रित करतो. अशा अनेक जर्मन कंपन्या आहेत, ज्यांनी अद्याप भारतात प्रवेश केलेला नाही. मी त्यांनाही भारतात येण्याचे आमंत्रण देतो. आणि मी दिल्लीत जर्मन कंपन्यांच्या आशिया-पॅसिफिक परिषदेत म्हटल्याप्रमाणे, भारताच्या प्रगतीशी जोडण्याची वेळ आली आहे, ही योग्य वेळ आहे.भारताची गतिशीलता आणि जर्मनीची अचूकता, जर्मनीची अभियांत्रिकी आणि भारताचे नवोन्मेष- हा समन्वय हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे. जगातील एक प्राचीन संस्कृती म्हणून, आम्ही नेहमीच जगभरातील लोकांचे स्वागत केले आहे, त्यांना आमच्या देशाचा एक भाग बनवले आहे. जगाचे समृद्ध भविष्य घडवण्यात भागीदार होण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो. 

धन्यवाद. 

डँके!

 

* * *

आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175380) Visitor Counter : 6