इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) भुवनेश्वर येथे ‘नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा’ स्थापन करण्यास मंजुरी
देशातील स्वदेशी चिप निर्मिती व पॅकेजिंग क्षमतांच्या विकासासाठी नवे पाऊल
Posted On:
05 OCT 2025 12:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2025
भारतातील तरुणांना उद्योगक्षम कौशल्यांनी सज्ज करण्याच्या उद्देशाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच ‘नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा’ भुवनेश्वर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था येथे स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी निधी संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना अंतर्गत दिला जाणार असून, त्याचा एकूण अंदाजित खर्च रु. 4.95 कोटी इतका आहे.
प्रयोगशाळेचे उद्दिष्ट
भारतातील तरुण पिढीला उद्योगक्षम कौशल्ये प्रदान करून देशाच्या कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीस हातभार लावण्यास नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा मदत करणार आहे. ही प्रयोगशाळा भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वरला सेमीकंडक्टर संशोधन व कौशल्यविकासाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करेल.
या माध्यमातून देशभर उभ्या राहत असलेल्या चिप मॅन्युफॅक्चरिंग व पॅकेजिंग युनिट्ससाठी कुशल मनुष्यबळ तयार होईल.
‘मेक इन इंडिया’ व ‘डिझाइन इन इंडिया’ उपक्रमांना चालना
ही नवीन प्रयोगशाळा भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व ‘डिझाइन इन इंडिया’ या प्रमुख उपक्रमांना चालना देणार आहे. भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला ती उत्प्रेरकाचे कार्य करेल. सध्या भारत हा जगातील सुमारे 20 टक्के चिप डिझाइन प्रतिभेचा केंद्रबिंदू आहे. देशातील 295 विद्यापीठांमधील विद्यार्थी उद्योगक्षेत्राने उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक इडीए साधनांचा वापर करत आहेत. याशिवाय 20 संस्थांतील विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेल्या 28 चिप्सना मोहाली येथील एससीएल मध्ये टेप-आऊट करण्यात आले आहे.
आयआयटी भुवनेश्वरचीच निवड का?
अलीकडेच भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत ओडिशा राज्यातील दोन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. सिलिकॉन कार्बाइड आधारित कंपाऊंड सेमीकंडक्टरसाठी एक एकात्मिक सुविधा, आणि अॅडव्हान्स्ड 3 डी ग्लास पॅकेजिंग सुविधा, असे हे दोन प्रकल्प आहेत. आयआयटी भुवनेश्वरमध्ये आधीच ‘सिलिकॉन कार्बाइड रिसर्च अँड इनोव्हेशन सेंटर कार्यरत आहे. प्रस्तावित नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा संस्थेतील विद्यमान क्लीनरूम सुविधांना बळकट करेल व देशातील सेमीकंडक्टर उद्योगासाठी संशोधन आणि विकास सुविधांचा विस्तार करेल.
प्रयोगशाळेच्या सुविधा
या प्रयोगशाळेत सेमीकंडक्टर प्रशिक्षण, डिझाइन व फॅब्रिकेशनसाठी आवश्यक तसेच अत्यावश्यक उपकरणे व सॉफ्टवेअर असतील. त्यातील उपकरणांवर अंदाजे रु. 4.6 कोटी, तर सॉफ्टवेअरवर रु. 35 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. ही प्रयोगशाळा भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक गतिमान करेल आणि देशातील युवकांना जागतिक दर्जाच्या कौशल्यांनी सुसज्ज करून ‘नवभारत’च्या डिजिटल भविष्यास आकार देईल.
* * *
शिल्पा नीलकंठ/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174984)
Visitor Counter : 8