पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात होणार सहभागी


पंतप्रधान विशेषत्वाने तयार केलेले स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करणार

शताब्दी समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि भारताच्या एकतेतील भूमिका अधोरेखित केली जाणार

Posted On: 30 SEP 2025 10:30AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10: 30 वाजता नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. या प्रसंगी, पंतप्रधान राष्ट्रासाठी आरएसएसच्या योगदानावर प्रकाश टाकणारे विशेषत्वाने तयार केलेले स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करतील आणि सभेला संबोधित करतील.

1925 मध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर, येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, नागरिकांमध्ये सांस्कृतिक जागरूकता, शिस्त, सेवा आणि सामाजिक जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने स्वयंसेवक-आधारित संघटना म्हणून केली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय पुनर्बांधणीसाठी एक अद्वितीय लोक-संवर्धन चळवळ आहे. शतकानुशतके परकीय राजवटीला प्रतिकार म्हणून संघाचा उदय पाहिला गेला आहे. संघाची सातत्यपूर्ण वाढ धर्मात रुजलेल्या भारताच्या राष्ट्रीय गौरवाच्या दृष्टिकोनाच्या भावनिक अनुनादामुळे झाली आहे.

संघाचा मुख्य भर देशभक्ती आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीवर आहे. मातृभूमीची भक्ती, शिस्त, आत्मसंयम, धैर्य आणि वीरता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात येतो. संघाचे अंतिम ध्येय भारताची "सर्वंगीण उन्नती" (सर्वांगीण विकास) हे आहे. या ध्येयासाठी प्रत्येक स्वयंसेवक स्वतःला समर्पित करतो.

गेल्या शतकात, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आणि आपत्ती निवारणात राष्ट्रीय स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पूर, भूकंप आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये संघ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संलग्न संघटनांनी युवक, महिला आणि शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी, सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना बळकटी देण्यासाठी योगदान दिले आहे.

शताब्दी उत्सव केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक प्रवासात आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशात त्यांनी दिलेल्या चिरस्थायी योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आहे. 

***

NehaKulkarni/HemangiKanekar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172997) Visitor Counter : 36