अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
जागतिक स्तरावरील कृषी-खाद्यान्न मूल्य साखळीतील भारताचे स्थान बळकट करत, वर्ल्ड फूड इंडिया 2025 शिखर परिषदेचा समारोप
भारताच्या या सर्वात भव्य खाद्यान्न आणि कृषी एकत्रीकरण कार्यक्रमात 95,000 हून अधिक लोकांचा सहभाग
भारतातील खाद्यान्न मूल्य साखळीचा विस्तार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सरकारे आणि व्यवसायांचे सहकार्य
जागतिक खरेदीदार तसेच गुणवत्ता आणि सुरक्षितता यांना मिळालेली धोरणात्मक चालना यांच्या बळावर सागरी खाद्यान्न (सीफूड) उद्योगाला मिळाली गती
धोरणे तसेच उद्योगविषयक चर्चांमध्ये शाश्वतता, पोषण आणि नव्या प्रकारचे अन्न पदार्थ यांच्यावर अधिक भर
Posted On:
29 SEP 2025 5:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025
भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाटचालीतील महत्त्वाचा क्षण अधोरेखित करत नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे गेले चार दिवस सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया 2025 शिखर परिषदेचा आज समारोप झाला. रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव तसेच केंद्रीय मंत्री चिराग पासवान, प्रतापराव जाधव, केंद्रीय अन्नप्रक्रिया आणि रेल्वे राज्यमंत्री रावनीत सिंह यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले होते. या परिषदेने जागतिक नेते, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती तसेच नवोन्मेष कर्ते यांना खाद्यान्न आणि कृषी क्षेत्राच्या भविष्याविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र आणले.
उपस्थितांना उद्देशून केलेल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधानांनी भारतातील कृषीविषयक वैविध्य, मध्यमवर्गाकडून वाढती मागणी तसेच 100% थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय), उत्पादनाशी संलग्न अनुदान योजना आणि मेगा फूड पार्क इत्यादी सरकारी उपक्रम यांना अधोरेखित करत विश्वासार्ह जागतिक पुरवठादार म्हणून भारताच्या भूमिकेवर अधिक भर दिला. या प्रसंगी मुलभूत स्तरावरील उद्योजकांना सशक्त करण्याप्रती सरकारच्या बांधिलकीचे दर्शन घडवत पंतप्रधानांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 26,000 लाभार्थ्यांना सूक्ष्म प्रकल्पांसाठी 2,518 कोटी रुपयांची पत-संलग्न अनुदाने देखील जारी केली.
सदर शिखर परिषदेच्या काळात, या वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाने भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या गुंतवणूक वचनबद्धतांपैकी एक असलेला, 1,02,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे सामंजस्य करार करण्यासाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून दिले. केंद्रीय अन्न-प्रकिया उद्योग मंत्रालयाने तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच अन्नाचे पोषणमूल्य वर्धन, न्यूट्रास्युटिकल्स आणि स्टार्ट-अप उद्भावन यांना पाठींबा देत एनआयएफटीईएम-टी आणि एनआयएफटीईएम-के यांसह इतर अनेक आघाडीच्या शैक्षणिक तसेच संशोधन संबंधी संस्थांशी सहयोग घडणे शक्य करून दिले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच चिराग पासवान यांच्या सह-अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरील गोलमेज बैठकीत आघाडीच्या भारतीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे 100 हून अधिक सीईओ सहभागी झाले. या बैठकीत झालेल्या चर्चांमध्ये शाश्वत गुंतवणूक, जैवविघटनकारी पॅकेजिंग, टाकाऊ पदार्थांची पुनर्प्रक्रिया, नील अर्थव्यवस्थेची क्षमता तसेच खर्च कमी करुन स्पर्धात्मकतेत सुधारणा करण्यासाठी लॉजिस्टिक्स आणि वाहतून क्षेत्रांमध्ये सुधारणा इत्यादी विषयांवर चर्चा झाली.
परिषदेच्या कालावधीत रशिया, श्रीलंका, मोरोक्को, मालदीव, पोर्तुगाल, न्युझीलंड, झिम्बाब्वे, युगांडा, इस्वातिनी, कोटे द आयव्हर आणि कुवेत या देशांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या भारतीय समकक्षांशी कृषी तसेच अन्न प्रक्रिया या क्षेत्रांमध्ये अधिक दृढ सहकार्याचे मार्ग शोधण्यासाठी झालेल्या सरकार–ते-सरकार बैठकींच्या मालिकांद्वारे भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीप्रती वाटचाल आणखी बळकट केली. सदर चर्चांमधून जागतिक कृषी-खाद्यान्न मूल्य साखळ्यांतील विश्वासू भागीदार म्हणून भारताची भूमिका आणखी सशक्त झाली.
वर्ल्ड फूड इंडिया 2025 ची तांत्रिक कार्यक्रमपत्रिका देखील तितकीच सशक्त होती. यामध्ये भागीदार देश, लक्ष्यित देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योग संघटना यांच्यातर्फे आयोजित चाळीस सत्रांचा समावेश होता. सदर सत्रांमध्ये पाळीव प्राण्यांचे खाद्य, न्यूट्रास्युटिकल्स, वनस्पती-आधारित खाद्यान्ने, अल्कोहोलिक पेये आणि विशेष खाद्यपदार्थ यांसारख्या क्षेत्रांतील संधींचा शोध घेण्यात आला तर तिसऱ्या जागतिक अन्न नियामकांच्या परिषदेने जोखीम व्यवस्थापनासाठी डिजिटल साधने, नव्या युगातील नियामकीय कौशल्ये, सरकारी-खासगी भागीदारीच्या माध्यमातून अन्न सुरक्षा तसेच लठ्ठपणाच्या समस्येवर उपाय योजण्यासाठी पोषण-केंद्रीत नीती या मुद्द्यांवरील विचार विनिमयासाठीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
या कार्यक्रमादरम्यान चार दिवसांमध्ये आयोजित झालेल्या 10,500 व्यापार-ते-व्यापार बैठका तसेच 18,000 हून अधिक रिव्हर्स खरेदीदार-विक्रेता बैठकींतून उद्योग क्षेत्र आणि सरकारच्या सशक्त सहभागाचे दर्शन घडले. या परिषदेत एकूण 95,000 हून अधिक लोकांनी दिलेल्या भेटीमधून सदर कार्यक्रमाची भव्यता आणि लोकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता दिसून आली.
वर्ल्ड फूड इंडिया 2025 च्या काळातच दिल्लीत प्रगती मैदान येथे समांतरपणे आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय सागरी खाद्यान्न (सीफूड) कार्यक्रमाचे 25 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शो मध्ये भारतातील सागरी खाद्यान्न निर्यात क्षेत्राच्या क्षमता खुल्या करण्यावर केंद्रित संबंधित उद्योग क्षेत्रातील जाणकारांची व्याख्याने, गोलमेज बैठका, तांत्रिक सत्रे आणि रिव्हर्स खरेदीदार-विक्रेता बैठका यांचा समावेश होता.
वर्ल्ड फूड इंडिया 2025 चा समारोप होत असताना, या कार्यक्रमाने अन्न प्रकिया, नवोन्मेष आणि शाश्वत पद्धतींसाठीचे जागतिक केंद्र म्हणून भारताच्या उदयाला दुजोरा दिला. विक्रमी प्रमाणातील गुंतवणूक, अधिक दृढ आंतरराष्ट्रीय भागिदाऱ्या तसेच भारताला कृषी-खाद्यान्न मूल्य साखळीतील जागतिक नेता बनवण्याच्या संकल्पनेशी सशक्त सुसंगता यांसह या कार्यक्रमाने या क्षेत्रातील विकास आणि जागतिक सहयोगासाठीचा मजबूत पाया घातला आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172798)
Visitor Counter : 5