माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
चित्रपट केवळ लोकप्रिय असू नये तर व्यापक जनहिताचा हेतू देखील साध्य व्हायला हवा; राष्ट्रपतींनी केले अधोरेखित
चित्रपटातील महिलांच्या वाढत्या प्रतिनिधित्वाचे राष्ट्रपती मुर्मू यांनी केले कौतुक; पडद्यावर आणि पडद्याबाहेर समान संधी देण्याचे केले आवाहन
चित्रपट क्षेत्रामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल चतुरस्त्र अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
मोहनलाल यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराचे वर्णन 'जादुई आणि पवित्र' असे केले, चित्रपट हा आपल्या हृदयाचा ठोका असल्याचे सांगून, मल्याळम चित्रपटातील दिग्गजांना सन्मान केला समर्पित
विकसित भारत 2047 साकार करण्यासाठी सरकार स्वदेशी चित्रपट उपकरणांना प्रोत्साहन देईल, ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ अर्थव्यवस्था मजबूत करेल आणि आदर्श राज्य चित्रपट नियमन कायदा तयार करेल: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
Posted On:
23 SEP 2025 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिमान वाटण्यासारखे क्षण, टाळ्यांचा कडकडाट आणि उभे राहून दिलेल्या मानवंदनेने नवी दिल्लीतील विज्ञान भवन उजळून निघाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट प्रतिभावंतांचा गौरव केला. कलाकार, मान्यवर आणि चाहत्यांची उपस्थिती देशाच्या हृदयाला आकार देणाऱ्या कथांचा उत्सव या एकाच भावनेने एकवटली होती.

दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, त्यांनी केवळ त्यांच्या अपवादात्मक प्रतिभेचे दर्शन घडवले नाही तर त्यांच्या विशाल कार्यातून भारताची सांस्कृतिक मूल्ये देखील जपली. नाटक ते चित्रपट या त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाची आठवण करून देत राष्ट्रपतींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि महाभारतावरील संस्कृत एकपात्री प्रयोग कर्णभरम ते वानप्रस्थममधील त्यांच्या पुरस्कार विजेत्या भूमिकेच्या कलाकृतींमध्ये भारताच्या सांस्कृतिक वारशाचे त्यांनी उत्कृष्ट दर्शन घडवले. त्यांचे नाव आदराने घेतले जाते आणि अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी एक विशेष स्थान मिळवले आहे.
मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान; अभिनेत्याकडून सिनेमा जगताला मानवंदना -
ज्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला तेव्हा ते भारतीय चित्रपटसृष्टीच्या भव्य कथेतील एक महत्त्वाचे दृश्य आहे असे वाटले. पडद्यावर हजारो आयुष्य जगणाऱ्या या अभिनेत्याने खोडकर महाविद्यालयीन युवक , दुःखी सामान्य माणूस, शूर सैनिक, दुर्बल नायक, अविस्मरणीय मित्र अशा अनेक भूमिका पार पाडल्या. 360 हून अधिक चित्रपटांद्वारे त्यांनी भारतीय तसेच मल्याळम चित्रपटसृष्टीला आकार दिला आहे आणि त्यांना जगासमोर आणले आहे, प्रेक्षकांना जितके त्यांनी हसवले, तितकेच रडवलेही आणि त्याचबरोबर विचार करायला प्रवृत्त केले.
पद्मभूषण, पद्मश्री आणि पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी मोहनलाल यांना आधीच सन्मानित करण्यात आले असून हा क्षण प्रशंसेचा नाही तर सन्मानाने मान उंचावलेल्या राष्ट्राविषयीचा होता. टाळ्यांच्या कडकडाटाने विज्ञान भवन दणाणून गेले असताना, चंदेरी प्रवासामध्ये त्यांची एक विशिष्ट ओळख निर्माण झाली आहे, त्याच विनम्रतेने मोहनलाल यांनी उपस्थित प्रेक्षकांना आणि सहकाऱ्यांना अभिवादन केले. त्या क्षणी, टाळ्या केवळ एका अभिनेत्यासाठी नव्हत्या - तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या कथा, आठवणी आणि सामायिक भावनांसाठी होत्या.
पुरस्कार स्वीकारताना, मोहनलाल यांनी त्यांच्या चित्रपट प्रवासाला आकार देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले की, त्यांनी काम केलेल्या प्रत्येक चित्रपटाने त्यांना खूप प्रभावित केले आहे आणि माध्यम म्हणून सिनेमाची ताकद त्यांना पुन्हा एकदा जाणवून दिली आहे. या सन्मानाला "जादुई आणि पवित्र" असे वर्णन करून, त्यांनी हा पुरस्कार मल्याळम चित्रपटसृष्टीतील महान दिग्गजांना समर्पित केला आणि तो संपूर्ण चित्रपटसृष्टीतील समुदायाचा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी मोहनलाल यांचे एक सच्चे दिग्गज म्हणून कौतुक केले. सरकारने 'वेव्हज् 2025' यामहत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आश्वासन दिले होते आणि तो यशस्वी करून दाखवला, ज्यामुळे भारत जागतिक चित्रपट आणि आशय निर्मितीमध्ये आघाडीवर आला आहे, याची त्यांनी आठवण करून दिली. जग आता भारताकडे कसे पाहत आहे, हे सांगताना ते म्हणाले की, ‘वेव्हज बाजार’ सारखे उपक्रम भारतीय निर्मात्यांना व्यापक बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देत आहेत.
देशातील पहिली 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिनेमा अँड टेक्नॉलॉजी' (IICT) मुंबईतील एनएफडीसी कॅम्पसमध्ये कार्यान्वित झाली आहे. येथे मेटा, एनव्हीडीया, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या आघाडीच्या जागतिक भागीदारांच्या सहकार्याने 17 अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. भारताला जागतिक आशय अर्थव्यवस्था (Global Content Economy) म्हणून स्थान देण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार, मंत्र्यांनी देशी चित्रपट उपकरणे निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे आणि ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी धोरणे तयार करण्याचे उद्दिष्ट सांगितले. ‘आदर्श राज्य सिनेमा नियम' (Model State Cinema Regulation Rules) तयार केले जात आहेत, जे 2047 पर्यंत विकसित भारताच्या सरकारच्या दृष्टीकोनावर भर देत देत असून या प्रवासात निर्मात्यांची अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, संजय जाजू म्हणाले की, सिनेमा म्हणजे कथा, स्वप्ने आणि सामायिक अनुभवांचा उत्सव आहे. या वर्षाला दिग्गजांचे आणि अनेक पहिल्यांचे (many firsts) वर्ष म्हणून अधोरेखित करताना, त्यांनी आशुतोष गोवारीकर, पी. सेशाद्री आणि गोपाळ कृष्ण पै यांच्यासह ज्युरी सदस्यांचे आभार मानले. त्यांनी ‘वेव्ह्स समिट’च्या यशाची पुनरावृत्ती केली, ज्याने सिनेमा, संगीत, गेमिंग आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणले. त्यांनी "एक देश, हजारों कहानियां, एक जुनून" (एक देश, हजारो कथा, एक ध्यास) या भावनेवर भर दिला, जी भारताच्या ज्वलंत सर्जनशील परिसंस्थेचे प्रतिबिंब आहे.
उत्कृष्टतेचा उत्सव: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भारतभर अभिनय, कथा आणि चित्रपटसृष्टीतील नवोन्मेषांचा गौरव करतात.
‘जवान’ चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून जाहीर करण्यात आल्यावर, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट करून त्याच्या त्या भूमिकेला दाद देण्यात आली ज्यातून त्याने भव्यता, आकर्षकता आणि भावनिक खोली यांचा मिलाफ साधत एक उत्कृष्ट अभिनय सादर केला. या भूमिकेसाठी त्याला भव्यता आणि सूक्ष्मता दोन्हीची गरज होती, आणि त्याने आपल्या प्रभावी अभिनयाच्या हुकुमतीने चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेले, जे क्षण अविस्मरणीय आणि मनाला स्पर्श करणारे होते.
हा सन्मान सर्वांसोबत सामायिक करतच, विक्रांत मेस्सी यांना ‘बारावी फेल’ या चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्काराने गौरवण्यात आले. एका तरुण व्यक्तीने संयमाने आणि तितक्या दृढ निर्धाराने कशारितीने संकटांचा सामना केला, हे त्यांनी प्रेरणादायी पद्धतीने आपल्या अभिनयातून साकारले. या दोघांना मिळालेल्या पुरस्कारांतून भारतीय चित्रपटांच्या भव्यता आणि सोप्या पण प्रामाणिकतेने मानवी संकटांवर मात करण्याच्या कथेची मांडणी या दुहेरी रूपाचे दर्शन घडते.
राणी मुखर्जी यांना ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान केला गेला, तो क्षणही उत्कट भावनांची प्रचिती देणारा ठरला. एका आईच्या वेदना आणि सामर्थ्यावर आधारित त्यांची भूमिका कला आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुभव यांच्यातील सीमारेषा पुसून टाकणारी होती, आणि यामुळेच सभागृहातील प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकीचे भाव दिसले.
सहाय्यक भूमिकांचाही तितकाच आदरपूर्वक सन्मान केला गेला. याच भूमिका चित्रपटांचा आत्मा ठरतात. विजयराघवन आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेते म्हणून सन्मानित करण्यात आले. वरकरणी लहान वाटणारी पात्रेही संपूर्ण कथेचे भार कशारितीने पेलतात हे त्यांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले. उर्वशी आणि जानकी बोडीवाला यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या अभिनयातील कमालीच्या अस्सलतेने आणि परिणामकारकतेमुळे, प्रेक्षकांच्या मनात त्यांची पात्रे आणि भावना कायमच्या घर करून राहिल्या आहेत.
अभिनयापलीकडेही या चित्रपटांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षा, संघर्ष आणि कल्पनाशक्तीच्या कथाही मांडल्या गेल्या आहेत. ‘12th फेल’ ला चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या (कथात्मक) पुरस्काराने गौरवले गेले. या चित्रपटातून मांडलेली दृढ संकल्पाची कथा अनेकांसाठी आरसा दाखवणारी ठरली. फ्लॉवरिंग मॅन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाच्या आणि गॉड वल्चर अँड ह्युमन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. यातून सहज न दिसणार्या सत्यासाठी दस्तऐवजीकरणाची, प्रश्न विचारण्याची आणि ते उजेडात आणण्याच्या चित्रपटांच्या अद्भूत क्षमतेचे दर्शन घडले.
नवीन वर्गवारीअंतर्गत हनु-मॅन या चित्रपटाला AVGC (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले. यातून कथांची दृश्यात्मक स्वरुपात मांडणी करण्याच्या कलेतील भारताची वाढती ताकद दिसून आली. गिद्ध: द स्कॅव्हेंजर या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार आपल्या नावे केला.
हे पुरस्कार म्हणजे केवळ कामगिरीच्या नोंदीची सूची नव्हती, तर त्या ही पलिकडे तो विविधांगी मते - विचार - आवाजांचा एक मिलाफ होता. यात तारे आणि नवोदित कलाकार, मुख्यप्रवाहातील आणि प्रायोगिक चित्रपट असे व्यापक घटक सामावलेले होते. यातूनही भारतीय चित्रपटांमध्ये राष्ट्राची स्वप्ने आणि त्याचे भविष्य घडवण्याचा आत्मविश्वास या दोन्ही क्षमता असल्याची पेरचिती पुन्हा एकदा आली .
पुरस्कारांची संपूर्ण यादी खाली दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहे:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2151537
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170395)
Visitor Counter : 13