राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते 71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण


मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

लोकप्रिय होणे ही कुठल्याही चित्रपटासाठी चांगली गोष्ट असू शकते, परंतु लोकहितासाठी, विशेषतः युवा पिढीसाठी हितावह असणे आणखी चांगली गोष्ट असते : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 23 SEP 2025 9:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (23 सप्टेंबर 2025) नवी दिल्ली येथे विविध श्रेणींमध्ये 71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण झाले. त्यांनी 2023 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान केला.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे मोहनलाल यांचे अभिनंदन केले. मोहनलाल जी यांनी कोमलतेतील कोमल आणि कठोरातील कठोर भावना सहजपणे सादर केल्या आहेत, ज्यामुळे परिपूर्ण अभिनेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे असे त्या म्हणाल्या.

महिला-केंद्रित चांगले चित्रपट बनत आहेत आणि त्यांना पुरस्कारही मिळत आहेत, हे पाहून आनंद झाल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केला. आपण सर्वजण महिलांना काही प्रमाणात गरिबी, पुरुषसत्ताक व्यवस्था किंवा पूर्वग्रहांशी संघर्ष करावा लागत असल्याचे पाहतो हे निरीक्षण त्यांनी मांडले. आज ज्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले, त्यात मुलांना नैतिकतेची शिकवण देणाऱ्या मातांच्या कथा, सामाजिक रूढींचा करण्यासाठी एकत्र येणाऱ्या महिला, घर, कुटुंब आणि समाजव्यवस्था यांच्या गुंतागुंतीमध्ये महिलांची होणारी परवड आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेतील असमानतेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या धैर्यवान महिलांच्या कथांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. अशा संवेदनशील चित्रपटकारांचे त्यांनी कौतुक केले.

जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग हा सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय कला प्रकाराच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात वैविध्यपूर्ण समाजाचे प्रतिनिधित्व करतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या. चित्रपटसृष्टीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीकडे भारतीय जाणीव आणि भारतीय संवेदनशीलता आहे, ती सर्व स्थानिक संदर्भांची गुंफलेली असते, हे पाहून त्यांना आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या. ज्याप्रमाणे भारतीय साहित्य अनेक भाषांमध्ये तयार होते, त्याचप्रमाणे भारतीय चित्रपट अनेक भाषा, बोली, प्रदेश आणि स्थानिक वातावरणात विकसित होत आहेत, असे त्यांनी सांगितले. आपले चित्रपट स्थानिक तसेच राष्ट्रीय स्वरूपाचेही आहेत, ही बाबही त्यांनी नमूद केले.

चित्रपट हा केवळ एक उद्योग नाही, तर तो समाज आणि राष्ट्रात जागरूकता वाढवणारे आणि नागरिकांना अधिक संवेदनशील बनवणारे एक शक्तिशाली माध्यम आहे, असे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. एखाद्या चित्रपटासाठी लोकप्रियता चांगली असू शकते, परंतु सार्वजनिक हितासाठी, विशेषतः तरुण पिढीसाठी, त्याचे हितकारक असणे त्याहूनही चांगले आहे, असे त्या म्हणाल्या. भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर अधिक स्वीकृती मिळावी, त्यांची लोकप्रियता वाढावी आणि त्यांना ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्वांना केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2170379)