पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला  केले संबोधित


पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

22 सप्टेंबरपासून, नव्या पिढीतील जीएसटी सुधारणा लागू होतील: पंतप्रधान

प्रत्येक नागरिकासाठी जीएसटी लाभांची  एक नवीन लाट येत आहे: पंतप्रधान

जीएसटी सुधारणा भारताच्या विकासगाथेला गती देतील: पंतप्रधान

नवीन जीएसटी सुधारणा लागू केल्या जात आहेत, आता केवळ 5% आणि 18% कर स्लॅब असतील : पंतप्रधान

जीएसटी कमी झाल्यामुळे नागरिकांसाठी त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल: पंतप्रधान

नव्या पिढीतील जीएसटी सुधारणांमध्ये नागरिकांची सेवा करण्याचे मूलभूत तत्व स्पष्टपणे दिसून येते: पंतप्रधान

देशाच्या गरजा काय आहेत  आणि भारतात जे काही बनवता येऊ शकते  ते भारतातच बनवले पाहिजे: पंतप्रधान

भारताच्या समृद्धीला स्वयंपूर्णतेतूनच बळ मिळेल : पंतप्रधान

चला भारतात बनवलेली उत्पादने खरेदी करूया: पंतप्रधान

Posted On: 21 SEP 2025 5:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाला संबोधित केले. शक्तीच्या उपासनेचे पर्व असलेल्या नवरात्रीच्या प्रारंभानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत ते म्हणाले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत  आहे.  22 सप्टेंबर रोजी सूर्योदयाबरोबरच देशात नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी होईल. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की एका प्रकारे संपूर्ण भारतात जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवामुळे बचत वाढेल आणि लोकांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू खरेदी करणे सुलभ होईल यावर त्यांनी भर दिला. या बचत महोत्सवाचे लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय, युवक , शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचतील असे  मोदी यांनी नमूद केले. या उत्सवाच्या काळात प्रत्येक घरामध्ये आनंद आणि गोडवा वाढेल असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना नव्या  पिढीच्या जीएसटी सुधारणा आणि जीएसटी बचत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. या सुधारणा भारताच्या विकासगाथेला गती देतील, व्यवसाय सुलभ करतील, गुंतवणूक अधिक आकर्षक बनवतील आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्याला समान भागीदार बनवेल असे त्यांनी अधोरेखित केले.

2017 मध्ये भारताने जीएसटी सुधारणांच्या दिशेने पहिले पाऊल उचलले, ज्यामुळे एका जुन्या अध्यायाचा अंत झाला आणि देशाच्या आर्थिक इतिहासात एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली, याची आठवण करून देत, मोदी यांनी अधोरेखित केले की, अनेक दशकांपासून, देशभरात नागरिक आणि व्यापारी सीमाशुल्क , प्रवेश कर, विक्री कर, उत्पादन शुल्क, व्हॅट आणि सेवा कर सारख्या  डझनभर  करांच्या जटिल जाळ्यात अडकले होते. पंतप्रधानांनी  निदर्शनास आणून दिले की, एका शहरातून दुसऱ्या शहरात मालवाहतूक करण्यासाठी अनेक चेकनाके ओलांडून जावे लागत होते , असंख्य फॉर्म भरावे लागत होते आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कर नियमांच्या चक्रव्यूहातून जावे लागत होते. 2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर  एका परदेशी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका  उदाहरणाचा त्यांनी उल्लेख केला. बंगळुरूहून हैदराबादला 570 किलोमीटर दूर माल पाठवणे किती  कठीण होते , कंपनीसमोरील तेव्हाच्या आव्हानांचे वर्णन त्या लेखात केले होते. या अडचणींना कंटाळून त्यांनी बंगळुरूहून आधी युरोपला आणि नंतर तो माल हैदराबादला परत पाठवणे पसंत केले होते. अनेक कर आणि टोलच्या जाळ्यात अडकल्यामुळे देशात अशी परिस्थिती होती असे पंतप्रधान म्हणाले. आधीचे उदाहरण हे लाखो घटनांपैकी फक्त एक आहे. अनेक करांच्या जटिल जाळ्यामुळे दररोज लाखो कंपन्या आणि कोट्यवधी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, असे त्यांनी ठळकपणे सांगितले. एका शहरातून दुसऱ्या शहरात वस्तूंच्या वाहतुकीचा वाढलेला खर्च शेवटी गरीब आणि सामान्य माणसासारख्या ग्राहकांनाच सोसावा लागतो, असे मोदी यांनी जोर देऊन सांगितले.

अस्तित्वात असलेल्या कर गुंतागुंतीतून देशाला मुक्त करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत, मोदींनी आठवण करून दिली की, 2014 मध्ये जनादेश मिळाल्यानंतर सरकारने लोक आणि देशाच्या हितासाठी जीएसटीला प्राधान्य दिले. सर्व संबंधितांशी व्यापक विचारविनिमय करण्यात आला, राज्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक चिंतेचे निराकरण करण्यात आले आणि प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढण्यात आला, असे त्यांनी अधोरेखित केले. सर्व राज्यांना एकत्र आणून स्वतंत्र भारतातील एवढी मोठी कर सुधारणा शक्य झाली, असे त्यांनी नमूद केले. केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच देशाची अनेक करांच्या जाळ्यातून सुटका झाली आणि देशभरात एकसमान करप्रणाली स्थापन झाली, असे पंतप्रधानांनी सांगितले. 'एक देश-एक कर'चे स्वप्न साकार झाले, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सुधारणा ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून, काळ बदलत असताना आणि देशाच्या गरजा विकसित होत असताना, पुढील पिढीच्या सुधारणाही तितक्याच आवश्यक ठरतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाच्या सद्यस्थितीतील गरजा आणि भविष्यातील आकांक्षा लक्षात घेऊन या नवीन जीएसटी सुधारणा लागू केल्या जात आहेत, यावर त्यांनी भर दिला. नवीन रचनेनुसार, फक्त 5% आणि 18% कर स्लॅब प्रामुख्याने राहतील, असे मोदींनी सांगितले. यामुळे, दैनंदिन वापराच्या बहुतेक वस्तू अधिक परवडणाऱ्या होतील, असे ते म्हणाले. अन्नपदार्थ, औषधे, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, आरोग्य आणि जीवन विमा यासह अनेक वस्तू आणि सेवा एकतर करमुक्त असतील किंवा त्यांच्यावर फक्त 5% कर आकारला जाईल, असे त्यांनी सांगितले. पूर्वी 12%, आणि 99%म्हणजे अक्षरशः सर्वच कर असलेल्या वस्तू आता 5% कर चौकटीमध्ये आणल्या गेल्या आहेत, असे पंतप्रधानांनी पुढे नमूद केले.

गेल्या अकरा वर्षांत 25 कोटी भारतीय दारिद्र्यातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणारा एक महत्त्वाचा नव मध्यमवर्ग म्हणून उदयाला आले आहेत, असे ठळकपणे सांगत पंतप्रधानांनी या नव मध्यमवर्गाच्या स्वतःच्या आकांक्षा आणि स्वप्ने आहेत यावर भर दिला. यावर्षी, सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून कर सवलतीची भेट दिली आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनात लक्षणीय सुलभता आणि सोय आली आहे, असे त्यांनी नमूद केले. आता गरीब आणि नव-मध्यमवर्गीयांची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले. त्यांना दुहेरी फायदा मिळत आहे प्रथम आयकर सवलतीद्वारे, आणि आता कमी झालेल्या जीएसटीद्वारे, असेही त्यांनी सांगितले.

जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे नागरिकांना स्वतःची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल, मग ते घर बांधणे असो, टीव्ही किंवा रेफ्रिजरेटर खरेदी करणे असो, किंवा स्कूटर, बाइक किंवा कार खरेदी करणे असो या सर्वांचा खर्च आता कमी होईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तसेच, बहुतेक हॉटेल खोल्यांवरील जीएसटी कमी झाल्यामुळे प्रवासही अधिक परवडणारा होईल, असे त्यांनी सांगितले. जीएसटी सुधारणांना दुकानदारांकडून मिळत असलेल्या उत्साही प्रतिसादाबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सक्रियपणे काम करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी सुधारणांपूर्वी आणि नंतरच्या किमतींची तुलना करणारे फलक प्रमुखपणे लावले जात आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

नागरिक देवो भव' हा मंत्र पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणांमध्ये प्रतिबिंबित होत असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी, प्राप्तिकर सवलत आणि जीएसटी कपात एकत्रितपणे केल्यामुळे, गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयांतून देशातल्या नागरिकांची ₹2.5 लाख कोटींपेक्षा अधिक बचत होणार आहे. म्हणूनच, याला 'बचत उत्सव' असे संबोधित करत असल्याचं ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी स्वावलंबी होण्याच्या मार्गावर अढळ वचनबद्धता आवश्यक आहे यांवर भर देतानामोदी यांनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याची मोठी जबाबदारी एमएसएमई- भारताच्या सूक्ष्म, लघु आणि कुटीर उद्योगांवर असल्याचे ते म्हणाले.  लोकांच्या गरजां पूर्ण करणारे आणि स्वदेशात उत्पादित करता येईल असे जे काही असेल त्याचे देशांतर्गत उत्पादन केले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

जीएसटी दरांमध्ये कपात आणि सोप्या प्रक्रियांमुळे भारतातील एमएसएमई, लघु उद्योग आणि कुटीर उद्योग यांचा लक्षणीय फायदा होणार असल्याचं अधोरेखित करताना पंतप्रधानांनी, या सुधारणांमुळे त्यांच्या विक्रीत वृद्धी होईल आणि त्यांच्यावरील करांचा बोजा कमी होईल, हा दुहेरी फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी एमएसएमई यांच्याकडून उच्च अपेक्षा व्यक्त केल्या आणि समृद्धीच्या शिखरावर असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून त्यांची ऐतिहासिक भूमिका अधोरेखित केली. भारताचे उत्पादन आणि उत्पादन गुणवत्ता ही एकेकाळी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आणि उच्च दर्जाची असल्याचे त्यांनी नमूद केले.  मोदी यांनी, तो अभिमान पुन्हा मिळवण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करतानाच, लघु उद्योगांकडून निर्मित उत्पादनांनी सर्वोच्च जागतिक मानके पूर्ण केली पाहिजेत असे आवाहन केले. भारताच्या उत्पादनांनी सर्व निकष सन्मानाने आणि उत्कृष्टतेने पूर्ण केले पाहिजे आणि भारतीय उत्पादनांनी राष्ट्राची जागतिक ओळख आणि प्रतिष्ठा वृद्धिंगत केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सर्व हितधारकांना हे ध्येय मनात ठेवून काम करण्याचे आवाहन केले.

भारताच्या स्वातंत्रलढ्याला स्वदेशीच्या मंत्राने बळकटी दिल्याचे सांगून, तोच देशाच्या समृद्धीच्या प्रवासाला ताकद देईल असे ते म्हणाले. अनेक परदेशी वस्तू नकळतपणे दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्याचे अधोरेखित केले आणि आपल्या खिशातील कंगवा परदेशी आहे की स्वदेशी आहे हे देखील नागरिकांच्या लक्षात येत असल्याचे म्हटले आहे.

मोदी यांनी, अशा अवलंबित्वापासून स्वतःला मुक्त करण्याच्या गरजेवर भर दिला आणि देशातल्या तरुणांनी कठोर परिश्रम आणि घाम गाळून तयार केलेली स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी प्रत्येक घर स्वदेशीचे प्रतीक ठरावे आणि प्रत्येक दुकान स्वदेशी वस्तूंनी सजवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी नागरिकांना स्वदेशीप्रति त्यांची असलेली वचनबद्धता ''मी स्वदेशी खरेदी करतो," "मी स्वदेशी विकतो'' असे अभिमानाने जाहीर करण्यास प्रोत्साहित केले आणि सांगितले की प्रत्येक भारतीयाच्या मनात ही मानसिकता रुजली पाहिजे. या परिवर्तनामुळे भारताच्या विकासाला चालना मिळणार आहे. सर्व राज्य सरकारांना त्यांच्या प्रदेशात संपूर्ण शक्ती आणि उत्साहाने उत्पादनाला प्रोत्साहन देऊन आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करून आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी मोहिमांना सक्रीय पाठिंबा देण्याचे आवाहन केले. केंद्र आणि राज्य एकत्रितपणे पुढाकार घेतील तेव्हा स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण होईल, प्रत्येक राज्याचा विकास होईल आणि भारत विकसित राष्ट्र होईल, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी जीएसटी बचत उत्सव आणि नवरात्री शुभ मुहूर्तासाठी शुभेच्छा दिल्या.

***

शैलेश पाटील / सुषमा काणे / निखिलेश चित्रे / विजयालक्ष्मी साळवी - साने / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2169309)