पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभविषयी पंतप्रधानांनी लोकसभेत केलेले निवेदन

Posted On: 18 MAR 2025 1:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2025

 

माननीय अध्यक्ष महोदय,

मी प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभाविषयी निवेदन करण्यासाठी येथे उपस्थित झालो आहे. आज मी या सदनाच्या माध्यमातून कोट्यवधी देशवासियांना नमन करतो, ज्यांच्यामुळे महाकुंभाचे यशस्वी आयोजन झाले. महाकुंभाच्या यशामध्ये अनेक लोकांचे योगदान आहे. मी सरकारचे, समाजाचे, सर्व कर्मयोग्यांचे अभिनंदन करतो. देशभरातील भाविकांचे, उत्तर प्रदेशच्या जनतेचे, विशेषतः प्रयागराजच्या जनतेचे आभार मानतो.

अध्यक्ष महोदय,

आपल्या सर्वांना माहीत आहेच की गंगा मातेला पृथ्वीवर आणण्यासाठी एक भगीरथ प्रयत्न करावा लागला होता. तशाच प्रकारचा महाप्रयत्न या महाकुंभाच्या भव्य आयोजनात देखील आपण पाहिला आहे. मी लाल किल्ल्यावरून सर्वांच्या प्रयत्नांच्या महत्त्वावर भर दिला होता. संपूर्ण जगाने महाकुंभाच्या रुपात भारताच्या विराट स्वरुपाचे दर्शन घेतले. सर्वांचा प्रयास हेच साक्षात स्वरुप आहे. हा सर्वसामान्य लोकांचा, सर्वसामान्य लोकांच्या संकल्पांचा, सर्वसामान्य लोकांच्या श्रद्धेने प्रेरित असलेला महाकुंभ होता.  

आदरणीय अध्यक्ष महोदय,

महाकुंभात आपण आपल्या राष्ट्रीय चेतनेच्या जागृतीचे विराट दर्शन घेतले आहे. ही जी राष्ट्रीय चेतना आहे, जी देशाला नव्या संकल्पांच्या दिशेने घेऊन जाते, नव्या संकल्पांच्या पूर्ततेसाठी प्रेरित करते. महाकुंभाने त्या लोकांच्या सर्व शंका-कुशंकाना देखील योग्य उत्तर दिले आहे ज्यांना नेहमीच आपल्या सामर्थ्याविषयी साशंकता असते.

अध्यक्ष महोदय,

गेल्या वर्षी अयोध्येच्या राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपण सर्वांनी याचा देखील अनुभव घेतला होता की पुढील 1000 वर्षांसाठी देश कशा प्रकारे तयार होत आहे. यानंतर बरोबर एक वर्षाने महाकुंभाच्या या आयोजनाने आपल्या सर्वांचा हा विचार आणखी दृढ केला आहे. देशाची ही सामूहिक चेतना देशाच्या सामर्थ्याचे कथन करते. कोणत्याही देशाच्या जीवनात, मानवी जीवनाच्या इतिहासात देखील असे अनेक टप्पे येतात, जे शतकांसाठी, भावी पिढ्यांसाठी उदाहरण ठरतात. आपल्या देशाच्या इतिहासात देखील असे क्षण आले आहेत, ज्यांनी देशाला नवी दिशा दिली आहे, देशाला हलवून हलवून जागे केले आहे. जसे भक्ती चळवळीच्या कालखंडात आपण पाहिले की देशाच्या कानाकोपऱ्यात आध्यात्मिक चेतना कशा प्रकारे उदयाला आली होती. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये एका शतकापूर्वी जे भाषण केले होते, तो भारताच्या आध्यात्मिक चेतनेचा जयघोष होता, त्याने भारतीयांचा स्वाभिमान जागृत केला होता. आपल्या स्वातंत्र्य चळवळीत देखील असे अनेक टप्पे आले आहेत. 1857 चा स्वातंत्र्य संग्राम असो, वीर भगतसिंग यांच्या हौतात्म्याचा काळ असो, नेताजी सुभाषबाबूंचा चलो दिल्लीचा नारा असो, गांधीजींची दांडी यात्रा असो, अशाच टप्प्यांमधून प्रेरणा घेऊन भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले. मी प्रयागराज महाकुंभ हा देखील अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा टप्पा मानतो, ज्यामध्ये जागृत होणाऱ्या देशाचे प्रतिबिंब दिसून येते.   

अध्यक्ष महोदय,

आम्ही सुमारे दीड महिना भारतात महाकुंभाचा उत्साह पाहिला, आकांक्षांचा अनुभव घेतला. कशा प्रकारे सोयीसुविधा- गैरसोयी यांच्या चिंतावर मात करणारे, कोट्यवधी भाविक श्रद्धेच्या भावनेने एकत्र आले ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. मात्र. या आकांक्षा, हा उत्साह केवळ इथपर्यंत मर्यादित नव्हता. गेल्या आठवड्यात मी मॉरिशसला गेलो होतो, प्रयागराजहून महाकुंभाच्या काळातील पवित्र जल घेऊन गेलो होतो. ज्यावेळी हे पवित्र जल मॉरिशसच्या गंगा तलावात अर्पित करण्यात आले, त्यावेळी तेथील श्रद्धेचे, आस्थेचे, उत्सवाचे, वातावरण होते ते पाहण्यासारखे होते. यातून हे दिसून येते की आज आपली परंपरा, आपली संस्कृती, आपल्या संस्कारांना आत्मसात करण्याची, त्या साजऱ्या करण्याची भावना किती प्रबळ होत आहे.    

अध्यक्ष महोदय,

मी हे देखील पाहात आहे की पिढ्यान पिढ्या आपले संस्कार पुढे वाटचाल करण्याचा जो क्रम आहे तो देखील किती सहजतेने पुढे जात आहे. तुम्ही पहा, आपली जी आधुनिक युवा पिढी आहे, ती किती श्रद्धाभावनेने महाकुंभासोबत जोडली गेली होती, इतर उत्सवांसोबत जोडलेली असते. आज भारताचा युवा वर्ग आपल्या परंपरा, आपल्या आस्था, आपल्या श्रद्धांचा अभिमानाने अंगिकार करत आहे.

अध्यक्ष महोदय,

जेव्हा एखाद्या समाजाच्या भावनांमध्ये आपल्या वारशाविषयीच्या अभिमानाचा भाव वृद्धिंगत होतो, त्यावेळी आपल्याला अशीच भव्य-प्रेरक चित्रे दिसतात, जी आपण महाकुंभाच्या काळात पाहिली आहेत. यामुळे परस्परांमधील बंधुभाव वाढतो आणि हा आत्मविश्वास वाढतो की एका देशाच्या रुपात आपण मोठी लक्ष्ये प्राप्त करू शकतो. आपल्या परंपरांसोबत, आपल्या आस्थांसोबत, आपल्या वारशासोबत जोडले जाण्याची ही भावना आजच्या भारताची सर्वात मोठी पूंजी आहे. 

अध्यक्ष महोदय,

महाकुंभातून अनेक प्रकारचे अमृत बाहेर पडले आहे. एकतेचे अमृत हा याचा सर्वात मोठा पवित्र प्रसाद आहे. महाकुंभाचे आयोजन अशा प्रकारे झाले, ज्यामध्ये देशाच्या प्रत्येक क्षेत्रातून, प्रत्येक कोपऱ्यातून आलेले लोक एकत्र झाले, लोक अहंभावनेचा त्याग करून वयम् च्या भावनेने, मी नाही आम्हीच्या भावनेने प्रयागराजमध्ये एकत्र आले. वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक पवित्र त्रिवेणीचा भाग बनले. जेव्हा वेगवेगळ्या प्रदेशातून येणारे कोट्यवधी लोक राष्ट्रवादाची भावना बळकट करतात तेव्हा देशाची एकता वाढते. जेव्हा वेगवेगळ्या भाषा आणि बोली बोलणारे लोक संगमाच्या तटावर हर हर गंगेचा जयघोष करतात तेव्हा 'एक भारत श्रेष्ठ भारत' ची झलक दिसते आणि एकतेची भावना वाढते. महाकुंभात आपण पाहिले आहे की त्यामध्ये लहान-मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. हे भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. एकतेचे अद्भुत तत्व आपल्यामध्ये भिनलेले आहे. आपल्या एकतेचे सामर्थ्य इतके आहे की ते भेदण्याचे सर्व प्रयत्न देखील ते भेदून टाकते. एकतेची हीच भावना भारतीयांचे खूप मोठे भाग्य आहे. आज संपूर्ण जगात जी विखुरलेली स्थिती आहे, याच कालखंडात एकजुटीचे हे विराट प्रदर्शन आपली सर्वात मोठी ताकद आहे. अनेकतेमध्ये एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे, हे आपण नेहमीच सांगत आलेलो आहोत, हे आपल्याला नेहमीच जाणवले आहे आणि याच विराट रुपाचा आपण प्रयागराज महाकुंभात अनुभव घेतला आहे. अनेकतेमधील एकतेचे हेच वैशिष्ट्य आपण निरंतर समृद्ध करत राहणे हे आपले उत्तरदायित्व आहे.

अध्यक्ष महोदय,

महाकुंभातून आपल्याला अनेक प्रकारच्या प्रेरणा देखील मिळाल्या आहेत. आपल्या देशात इतक्या लहान मोठ्या नद्या आहेत, काही नद्या अशा देखील आहेत, ज्यांचे अस्तित्व धोक्यात आहेत. कुंभातून प्रेरणा घेत आपल्याला नदी उत्सवाच्या परंपरांचा नवा विस्तार केला पाहिजे, याविषयी आपल्याला नक्कीच विचार केला पाहिजे, यामुळे वर्तमान पिढीला पाण्याचे महत्त्व समजेल. नद्यांच्या स्वच्छतेला बळ मिळेल, नद्यांचे संरक्षण होईल.

अध्यक्ष महोदय,

मला खात्री आहे, महाकुंभातून मिळालेले अमृत आपल्या संकल्पांच्या सिद्धीचे अतिशय भक्कम माध्यम बनेल. मी पुन्हा एकदा महाकुंभाच्या आयोजनाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे कौतुक करतो, देशाच्या सर्व भाविकांना नमन करतो, सदनाच्या वतीने आपल्या शुभेच्छा देतो. 

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2168570) Visitor Counter : 9