पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 12 SEP 2025 11:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 सप्‍टेंबर 2025

 

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावतजी, संस्कृती राज्यमंत्री राव इंद्रजित सिंहजी, सर्व विद्वान आणि स्त्री-पुरुषहो !

आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

जेव्हा आपण एखादी हस्तलिखित प्रत पाहतो, तेव्हा तो अनुभव एका कालखंडातून दुसऱ्या कालखंडातील प्रवासासारखा असतो. आजच्या आणि पूर्वीच्या कालखंडातील परिस्थितीत किती फरक होता, हा विचारही मनात येतो. आज आपण संगणकाच्या कीबोर्डच्या मदतीने इतके काही लिहू शकतो, शब्द खोडण्याचा आणि दुरुस्तीचा पर्यायही असतो, आपण प्रिंटरच्या मदतीने एका पानांच्या हजारो प्रती बनवू शकतो, पण, शेकडो वर्षांपूर्वीच्या त्या जगाची कल्पना करा, ज्यावेळी अशी आधुनिक भौतिक साधने नव्हती, आपल्या पूर्वजांना फक्त बौद्धिक साधनांवरच अवलंबून राहावे लागत होते. एक-एक अक्षर लिहिताना किती लक्ष द्यावे लागत असे, एका-एका ग्रंथासाठी किती कष्ट घ्यावे लागत असायचे, आणि तेव्हाही भारताच्या लोकांनी जगातील मोठ-मोठी ग्रंथालये बनवली होती. आजही, भारताकडे जगातील सर्वात मोठा हस्तलिखित संग्रह आहे. आपल्याकडे सुमारे 1 कोटी हस्तलिखिते आहेत. आणि 1 कोटी हा आकडा काही कमी नाही.

मित्रांनो,

इतिहासाच्या क्रूर तडाख्यात लाखो हस्तलिखिते जाळण्यात आली, लुप्त झाली, पण जी हस्तलिखिते शिल्लक आहेत, ती या गोष्टींची साक्षीदार आहेत की आपल्या पूर्वजांची ज्ञान, विज्ञान, वाचन आणि लेखनावर किती सखोल आणि व्यापक निष्ठा होती. भूर्जपत्र आणि ताडपत्रापासून बनवलेले नाजूक ग्रंथ, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेल्या शब्दांमध्ये धातू गंजण्याचा धोका, पण आपल्या पूर्वजांनी शब्दांना ईश्वर मानून, ‘अक्षर ब्रह्म भावा’ने त्यांची सेवा केली. पिढ्यानपिढ्या कुटुंबांनी त्या पोथ्या आणि हस्तलिखिते जपून ठेवली. ज्ञानाप्रति अपार श्रद्धा, येणाऱ्या पिढ्यांची चिंता, समाजाप्रति जबाबदारी, देशाप्रति समर्पणाची भावना, याचे यापेक्षा मोठे उदाहरण कुठे मिळेल?

मित्रांनो,

भारताची ज्ञान-परंपरा आजपर्यंत इतकी समृद्ध आहे कारण तिचा पाया 4 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. पहिला- जतन, दुसरा नवोन्मेष, तिसरा- भर घालणे आणि चौथा अंगिकार.

मित्रांनो,

जर मी जतनाबद्दल बोलत असेन, तर तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे सर्वात प्राचीन ग्रंथ वेदांना भारतीय संस्कृतीचा पाया मानले आहे, वेद सर्वोच्च आहेत. सुरुवातीला, वेद ‘श्रुति’च्या आधारावर पुढच्या पिढीकडे दिले जात होते. आणि हजारो वर्षांपर्यंत, वेदांचे कोणत्याही त्रुटीशिवाय संपूर्ण प्रमाणिततेने जतन केले गेले. आपल्या या परंपरेचा दुसरा स्तंभ आहे- नवोन्मेष. आपण आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि धातुकामात सातत्याने नवोन्मेष आणला आहे. प्रत्येक पिढी पुढे गेली आणि जुन्या ज्ञानाला अधिक वैज्ञानिक बनवले. सूर्य सिद्धांत आणि वराहमिहिर संहिता सारखे ग्रंथ सतत लिहिले जात होते आणि त्यात नवीन ज्ञानाची भर घातली जात होती. आपल्या संरक्षणाचा तिसरा स्तंभ आहे- भर घालणे, म्हणजे, प्रत्येक पिढी जुने ज्ञान संरक्षित करण्यासोबतच त्यात नवीन योगदानही देत होती. जसे की, मूळ वाल्मीकी रामायणानंतर अनेक रामायणे लिहिली गेली. रामचरितमानस सारखे ग्रंथ आपल्याला मिळाले. वेद आणि उपनिषदांवर भाष्य लिहिले गेले. आपल्या आचार्यांनी द्वैत, अद्वैत सारख्या व्याख्या दिल्या.

मित्रांनो,

त्याचप्रमाणे, चौथा स्तंभ आहे- अंगिकार करणे. म्हणजे, आपण वेळेनुसार स्वतःचे आत्मपरीक्षण देखील केले, आणि गरजेनुसार स्वतःला बदलले देखील. आपण चर्चांवर भर दिला, शास्त्रार्थाच्या परंपरेचे पालन केले. तेव्हा समाजाने कालबाह्य झालेल्या विचारांचा त्याग केला आणि नवीन विचार स्वीकारले. मध्ययुगात जेव्हा समाजात अनेक वाईट गोष्टी आल्या, तेव्हा अशी महान व्यक्तीमत्त्वेही आली, ज्यांनी समाजाची चेतना जागृत ठेवली आणि वारसा जपला, त्याचे रक्षण केले.

मित्रांनो,

राष्ट्रांच्या आधुनिक संकल्पनांव्यतिरिक्त, भारताची एक सांस्कृतिक ओळख आहे, स्वतःची चेतना आहे, स्वतःचा आत्मा आहे. भारताचा इतिहास केवळ राजघराण्यांच्या  जय-पराजयाचा नाही. आपल्याकडे राज्यांचे आणि प्रदेशांचे भूगोल बदलत राहिले, पण हिमालय ते हिंदी महासागरापर्यंत, भारत अखंड राहिला. कारण, भारत स्वतः एक जिवंत प्रवाह आहे, जो त्याच्या विचारांनी, आदर्शांनी आणि मूल्यांनी तयार झाला आहे. भारताच्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये, आपल्याला भारताच्या सततच्या प्रवाहाच्या रेषा पाहायला मिळतात. ही हस्तलिखिते आपल्या विविधतेतील एकतेची घोषणापत्रेही आहेत. आपल्या देशात सुमारे 80 भाषांमध्ये हस्तलिखिते उपलब्ध आहेत. संस्कृत, प्राकृत, आसामी, बांग्ला, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मराठी, अशा कितीतरी भाषांमध्ये ज्ञानाचा अथांग सागर आपल्याकडे उपलब्ध आहे. गिलगिट हस्तलिखिते आपल्याला काश्मीरचा प्रामाणिक इतिहास सांगतात. मी नुकतेच जे लहानसे प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो, तिथे त्याचे सविस्तर वर्णनही आहे, आणि त्याची चित्रेही उपलब्ध आहेत. कौटिल्य अर्थशास्त्राच्या हस्तलिखितात आपल्याला राजकारण आणि अर्थशास्त्रामधील भारताच्या आकलनाची जाणीव होते. आचार्य भद्रबाहूंच्या कल्पसूत्राच्या हस्तलिखितात जैन धर्माचे प्राचीन ज्ञान सुरक्षित आहे. सारनाथच्या हस्तलिखितांमध्ये भगवान बुद्धांचे ज्ञान उपलब्ध आहे. रसमंजरी आणि गीतगोविंद सारख्या हस्तलिखितांनी भक्ती, सौंदर्य आणि साहित्याचे विविध रंग सजवले आहेत.

मित्रांनो,

भारताच्या या हस्तलिखितांमध्ये समस्त मानवजातीच्या विकास यात्रेच्या पाऊलखुणा आहेत. या पुरातन हस्तलिखितांमध्ये तत्त्वज्ञानही आहे, विज्ञानही आहे. यामध्ये वैद्यकीय ज्ञान आहे, तत्त्वमीमांसाही आहे. यामध्ये कला देखील आहे, खगोलविज्ञानही आहे आणि स्थापत्य सुद्धा आहे. तुम्ही किती तरी उदाहरणे घ्या. गणितापासून ते बायनरी (द्विचिन्ह) आधारित संगणक विज्ञानापर्यंत, संपूर्ण आधुनिक विज्ञानाचा पाया शून्यावर आधारलेला आहे. तुम्हा सर्वाना माहिती आहेच की, हा शून्याचा शोध भारतात लागला होता.  आणि, बख्शाली हस्तलिखितामध्ये शून्याचे तेव्हाच्या काळातील प्रयोग आणि गणिती सूत्रांचे दाखले आजही शाबूत आहेत. यशोमित्रची बोवर हस्तलिखित पोथी अनेक शतकांपूर्वीच्या वैद्यकीय विज्ञानाबद्दल माहिती सांगते. चरक संहिता आणि सुश्रुत संहितेसारख्या ग्रंथांच्या हस्तलिखितांनी आयुर्वेदातील ज्ञान आजपर्यंत सुरक्षितपणे जपलं आहे. सुल्व सूत्रात आपल्याला प्राचीन भौमितिक ज्ञान मिळते. कृषी पाराशरमधून शेती बद्दलच्या पारंपरिक ज्ञानाची माहिती मिळते.नाट्यशास्त्रासारख्या ग्रंथांच्या हस्तलिखितांमधून आपल्याला मानवाच्या भावनात्मक विकासाच प्रवास समजून घेण्यास मदत होते.      

मित्रांनो,

प्रत्येक देश आपल्या ऐतिहासिक गोष्टी सांस्कृतिक संपदा आणि महानतेचे रुप म्हणून जगासमोर प्रदर्शित करतात. जगातील देशांमध्ये जर कुठे काही प्राचीन हस्तलिखिते, काही कलात्मक वस्तू असतील तर ते त्या राष्ट्रीय संपत्तीच्या रुपात जतन करतात. आणि भारताकडे तर जुन्या हस्तलिखितांचा एवढा प्रचंड खजिना आहे, ही देशासाठी गौरवाची बाब आहे. अलीकडेच काही दिवसांपूर्वी मी कुवेतला गेलो होतो, तर माझ्या दौऱ्यांदरम्यान माझा असा प्रयत्न असतो की तिथे जर कोणी 4-6 प्रभावक (एन्फ्लूयेनसर)  असतील आणि माझ्याकडे वेळ असेल, तर काही काळ मी त्यांच्याबरोबर घालवतो. त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मला कुवेत मध्ये एक गृहस्थ भेटले, त्यांच्यापाशी शेकडो वर्षांपूर्वी भारतातून समुद्र मार्गाने कसा व्यापार होत असे, या संबंधीची इतकी कागदपत्रे आहेत, आणि त्यांनी त्याचा अफाट संग्रह केला आहे, आणि त्यांना खूप  अभिमान आहे;  कमालीच्या अभिमानाने त्यातील काही गोष्‍टी ते घेऊन माझ्याकडे आले होते.  मी त्या अनोख्‍या गोष्‍टी  पाहिल्या. असं काय-काय असेल, कुठे-कुठे असेल, ते आपल्याला सारं काही संकलित करायचं आहे. आता भारत हा गौरवास्पद वारसा, अभिमानाने जगाच्या समोर मुक्त  करत आहे. आताच इथे असं म्हटलं गेलं की, जगात जेवढी हस्तलिखिते असतील त्यांचा शोध घेऊन आपण इथे आणली पाहिजेत आणि नंतर हळूच म्हटले की,  पंतप्रधानांनी हे केलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे की, आपल्या इथून अनेक मूर्ती  चोरून नेण्यात आल्या , त्यापैकी अतिशय कमी मूर्ती माघारी आल्या होत्या. आज शेकडोंच्या संख्येने जुन्या-जुन्या मूर्ती परत येत आहेत. त्या परत केल्या जात आहेत याचा अर्थ असा नाही त्या माझा धाक बघून मुद्दाम ठरवून दिल्या जात आहेत, हे कारण नाही आहे. तर, त्या अशा हातांमध्ये सुपूर्द केल्या तर त्यांचा गौरव वाढवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल,  असा त्यांना विश्वास वाटत असल्याने त्या परत दिल्या जात आहेत.  आज भारताने जगभर हा विश्वास संपादन केला आहे, लोकांना आता वाटत आहे की,  हे योग्य ठिकाण आहे. जेव्हा मी मंगोलियामध्ये गेलो होतो, तेव्हा माझी काही बौद्ध भिक्खूंसोबत चर्चा सुरू होती, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बरीच हस्तलिखिते आहेत, तेव्हा मी त्यांना विनंती केली की, मी याच्याविषयी काही काम करून शकतो. ती हस्तलिखिते आणली गेली, ती डिडिटाइझ केली आणि त्यानंतर ती त्यांना परत करण्यात आली. आता तो त्यांचा मौल्यवान ठेवा बनला आहे.

मित्रांनो,

ज्ञान भारतम् मिशन हा या महाअभियानाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. देशातील कितीतरी संस्था या प्रयत्नामध्ये लोकसहभागाच्या भावनेने सरकारसोबत काम करत आहेत. काशी नागरी प्रचारणी सभा, कोलकात्याची एशियाटिक सोसायटी, उदयपूरची ‘धरोहर’, गुजरातमधील कोबा येथील आचार्य श्री कैलाशसूरी ज्ञानमंदिर, हरिद्वारची पतंजली, पुण्याची भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, तंजावरचे सरस्वती महाल ग्रंथालय, अशा शेकडो संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत दहा लाखांहून अधिक हस्तलिखिते डिजिटलाइझ केली गेली आहेत. देशातील कितीतरी नागरिकांनी पुढे येऊन आपला कौटुंबिक वारसा देशासाठी उपलब्ध करून दिला आहे. मी यातील सर्व संस्थांचे, अशा सगळ्या नागरिकांचेही आभार मानतो. मी एका विषयाकडे अवश्य लक्ष वेधू इच्छितो, मागील काही दिवसांपर्वी मी काही प्राणीप्रेमींना भेटलो होतो, तुम्हाला का हसू आलं ? आपल्या देशात असे बरेच लोक आहेत, आणि विशेष म्हणजे हे लोक गायीला प्राणी मानत नाहीत. तर, त्यांच्याशी बोलता-बोलता मी त्यांना सांगितलं की, आपल्या देशात आपल्या शास्त्रांमध्ये पशु चिकित्सेबद्दल बरीच माहिती सांगितलेली आहे, ती बऱ्याच हस्तलिखितांमध्ये असण्याची शक्यता आहे. जेव्हा मी गुजरातमध्ये होतो, गुजरातमधील आशियाई सिंहांमध्ये मला बराच रस असल्याने मी त्यामध्ये खूप स्वारस्य दाखवत होतो. तेव्हा मी अशा गोष्टींची माहिती मिळवत असे की, जर त्यांनी मोठी शिकार केल्यानंतर जास्त खाणे झाले आणि त्याचा त्यांना त्रास झाला तर, त्यांना माहिती असतं की असं विशिष्ट झाड असतं, त्याची फळे खाल्ली पाहिजेत ज्यामुळे उलटी होऊ शकते, हे प्राण्यांना माहिती होतं. म्हणजेच जिथे सिंहांचा अधिवास आहे, अशा ठिकाणी नक्कीच त्या फळांची झाडं असली पाहिजेत. आता हे आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. आपल्याकडे अशी अनेक हस्तलिखितं आहेत, ज्यामध्ये हे सगळं लिहिलं गेलेलं आहे. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की, आपल्याकडे एवढं ज्ञान उपलब्ध आहे, ते लिपिबद्ध आहे, त्याचा आपण शोध घ्यायचा आहे, ते शोधून ते आजच्या संदर्भात उपयोगात आणायचं आहे.

मित्रांनो,

भारताने भूतकाळात कधीच आपल्या ज्ञानाची पैशाच्या ताकदीशी तुलना केलेली नाही, आपल्या ऋषींनीदेखील म्हटलेलं आहे-विद्या-दानमतः परम्. म्हणजेच विद्या हे सर्वात मोठं दान आहे. म्हणूनच, प्राचीन काळी भारतातील लोकांनी मुक्त भावाने हस्तलिखितं दानही केली होती. चिनी प्रवासी युआन श्वांग जेव्हा भारतात आला होता, तेव्हा तो साडे सहाशेपेक्षा जास्त हस्तलिखिते आपल्याबरोबर घेऊन गेला होता. आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मला एकदा सांगितलं होतं की, माझा जिथे जन्म झाला, त्या वडनगरमध्ये तो सर्वात जास्त काळ मुक्कामाला होता. पण जेव्हा तो येथून चीनमध्ये परत गेला, तेव्हा तो राष्ट्राध्यक्ष शी यांच्या जन्मगावी रहात होता.

तर ते मला त्यांच्या गावी घेऊन गेले आणि मी त्यांच्या सोबत ह्वेन सँग जिथे राहत होते ते ठिकाण पाहण्यासाठी गेलो. राष्ट्राध्यक्ष शी यांनी मला हस्तलिखिते तपशीलवार दाखवली. त्यात भारताचे वर्णन करणारे काही परिच्छेद होते, जे दुभाष्याने मला तेथे समजावून सांगितले. ते खूप प्रभाव करणारे  आहे. ते प्रत्येक वस्तू पाहत असत आणि विचार करत असत की आपल्याकडे अशा प्रकारचा काय खजिना असावा. भारतातील अनेक हस्तलिखिते आजही चीनमधून जपानला पोहोचली आहेत. सातव्या शतकात, ते जपानमधील होर्युजी मठात राष्ट्रीय खजिना म्हणून जतन केले गेले होते. आजही, भारतातील प्राचीन हस्तलिखिते जगातील अनेक देशांमध्ये जतन केली जातात. ज्ञान भारतम मोहिमेच्या माध्यमातून, आपण मानवतेचा हा सामायिक वारसा एकत्र आणण्याचा प्रयत्न करू.

मित्रांनो, 

आम्ही जी-20 सांस्कृतिक चर्चेदरम्यानही याबाबत पुढाकार घेतला होता. या मोहिमेत आम्ही भारताशी शतकानुशतके जुने सांस्कृतिक संबंध असलेल्या देशांना सहभागी करून घेत आहोत. आम्ही मंगोलियन कांजूरचे पुनर्मुद्रित खंड मंगोलियाच्या राजदूतांना भेट केले होते.

2022 मध्ये, हे 108 खंड मंगोलिया आणि रशियाच्या मठांमध्ये देखील वितरित करण्यात आले. आम्ही थायलंड आणि व्हिएतनाममधील विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आम्ही तेथील विद्वानांना जुन्या हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी प्रशिक्षण देत आहोत. या प्रयत्नांमुळे पाली, लान्ना आणि चाम भाषांमधील अनेक हस्तलिखिते डिजिटलाइझ झाली आहेत. ज्ञान भारतम मोहिमेद्वारे आम्ही हे प्रयत्न अधिक सखोल करू.

मित्रांनो,

ज्ञान भारतम मोहिमेच्या माध्यमातून आणखी एका मोठ्या समस्येवर देखील तोडगा निघेल. भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालीशी संबंधित बरीच महत्त्वपूर्ण  माहिती, जी आपण शतकानुशतके वापरत आहोत, त्याची इतरांकडून नक्कल करून पेटंट करण्यात येते. ही चाचेगिरी थांबवणे देखील आवश्यक आहे. डिजिटल हस्तलिखितांच्या माध्यमातून या प्रयत्नांना अधिक गती मिळेल आणि बौद्धिक चौर्यकर्मालाही आळा बसेल. अखिल जगतालाही सर्व विषयांबाबतच्या मूळ स्रोतांचे देखील प्रामाणिकपणे आकलन होईल.

मित्रांनो,

ज्ञान भारतम हा या मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. यासाठी आम्ही संशोधन आणि नवोन्मेषाची अनेक नवीन क्षेत्र खुली करीत आहोत. आज जगात सुमारे अडीच ट्रिलियन डॉलर्स मूल्य असलेले सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगक्षेत्र आहे. डिजिटाइज्ड हस्तलिखिते या उद्योगाच्या मूल्य साखळींना पोषक ठरतील. ही कोट्यवधी हस्तलिखिते आणि त्यामध्ये दडलेली प्राचीन माहिती एका मोठ्या डेटाबेसच्या स्वरुपात काम करेल. यामुळे 'डेटा-चलित नवोन्मेषाला' एक नाविन्यपूर्ण प्रोत्साहन मिळेल. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत  युवकांसाठी नवनवीन संधी निर्माण होतील. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन झाल्यामुळे, शैक्षणिक संशोधनात नवीन शक्यता आजमावता येतील.

मित्रांनो,

या डिजिटलाइज्ड हस्तलिखितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ करावी लागेल. येथे सादरीकरणात जे म्हटले होते की एआय प्रतिभा किंवा मानवी संसाधनांची जागा घेऊ शकत नाही त्याच्याशी मी सहमत आहे आणि अशा प्रकारे अदलाबदली होऊ नये अशी आपलीही इच्छा आहे, अन्यथा आपण नवीन गुलामगिरीचे बळी ठरू. ही एक आधार प्रणाली आहे, ती आपल्याला सामर्थ्य प्रदान करते, आपली ताकद वाढवते, आपला वेग वाढवते. एआयच्या सहाय्याने, या प्राचीन हस्तलिखितांचे सखोलपणे आकलन करता येते आणि त्यांचे विश्लेषण देखील करता येते. आता हेच पहा, सर्व वैदिक गणिताचे ग्रंथ उपलब्ध नाहीत, परंतु जर आपण एआयद्वारे प्रयत्न केला तर अनेक नवीन सूत्रे शोधणे शक्य आहे. आपण ते शोधून काढू शकतो. हस्तलिखितांमध्ये असलेले ज्ञान जगासमोर आणण्यासाठी देखील एआयचा वापर केला जाऊ शकतो. आणखी एक समस्या अशी आहे की आपली हस्तलिखिते विखुरलेल्या स्वरुपात आहेत आणि वेगवेगळ्या कालखंडात विविध प्रकारे सादर केली गेली आहेत. एआयचा फायदा असा होईल की हे सर्व एकत्रितरित्या गोळा करता येईल आणि त्यातून अमृत मंथन करण्यासाठी आपल्याला एक चांगले उपकरण मिळू शकेल, म्हणजे जर विविध 10 ठिकाणी गोष्टी विखुरल्या असतील तर एआयच्या मदतीने आपण त्या एकत्र आणू शकतो आणि त्यांचे निरीक्षण करू शकतो. 

त्याचे आपण... कदाचित असे होऊ शकते की जसे सादरीकरणाच्या सुरुवातीलाच नमूद केले होते त्यानुसार एकाच प्रकारच्या शब्दांचे अनेक उपयोग आहेत, कदाचित जर आपण समजा एखाद्या वेळी 100 प्रश्न निर्माण झाल्यास ते आपण सोडवू, आज आपण लाखो प्रश्नांमध्ये अडकलो आहोत, आपण त्यांची संख्या 100 वर तरी आणू शकतो. कदाचित आपण मानवी शक्तीमध्ये सामील झालो तर त्याचे परिणाम दिसून येतील, पण अशा अनेक अडचणी आहेत, पण त्यावर उपायही आहेत.

मित्रांनो,

मी देशातील सर्व युवकांनी या कामामध्‍ये  पुढाकार येऊन या मोहिमेत सामील व्हावे असे आवाहन करतो. तसेच मंत्री मला सांगत होते की कालपासून आजपर्यंत यामध्ये सहभागी होणाऱ्यांपैकी 70% युवा वर्ग आहे. मला वाटते की, हे त्याच्या यशाचे सर्वात मोठे गमक आहे. युवकांनी जर त्यात रस घ्यायला सुरुवात केली तर मला खात्री आहे की आपण खूप लवकर यशस्वी होऊ. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भूतकाळाचा कसा शोध घेऊ शकतो, पुराव्यावर आधारित निकषांवर हे ज्ञान मानवतेसाठी कसे उपलब्ध करून देऊ शकतो, या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या विद्यापीठांनी, आपल्या संस्थांनी यासाठी नवीन उपक्रम हाती घेतले पाहिजेत. आज संपूर्ण देश स्वदेशीच्या भावनेने आणि स्वावलंबी भारताच्या संकल्पाने पुढे जात आहे. हे अभियान देखील त्याचाच एक विस्तृत भाग आहे. आपल्याला आपल्या वारशाला आपल्या सामर्थ्याचा म्हणजेच शक्तीचा पर्याय बनवायचे आहे. ज्ञान भारतम मोहिमेमुळे भविष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे असे मला वाटते. मला माहित आहे की हे असे विषय आहेत ज्यात कोणतीही चित्ताकर्षता नसते, कोणतीही चमक धमक नसते. मात्र त्याचे सामर्थ्य इतके आहे की शतकानुशतके कोणीही तिला हलवू शकणार नाही, अशा प्रकारच्या सामर्थ्याशी आपली नाळ जुळली पाहिजे. या विश्वासाने, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद

 

* * *

सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/मंजिरी गानू/संदेश नाईक/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2167576) Visitor Counter : 12