पंतप्रधान कार्यालय
आसाममध्ये दरांग येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
14 SEP 2025 4:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2025
भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.
आसामचे लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल जी, आसाम सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, उपस्थित लोकप्रतिनिधी आणि सतत पाऊस कोसळत असतांनाही तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, नॉमोश्कार। अहोमर बिकाश जात्रार एइ ऐतिहाशिक दिनटुत दरंगबासीर लॉगते, हमॉग्र ऑहोमबासीक मय आन्तोरिक उलोग आरु ओभिनोन्दोन जोनाइशु।
मित्रांनो,
ऑपरेशन सिंदूर नंतर काल पहिल्यांदाच माझे आसामला येणे झाले. आई कामाख्याच्या आशीर्वादाने, ऑपरेशन सिंदूरला मोठे यश आले. म्हणूनच, आज आई कामाख्याच्या या भूमीवर येऊन मला एक वेगळीच अनुभूती येत आहे, आणि आज या प्रदेशात जन्माष्टमी साजरी होत आहे हि देखील दुधात साखर आहे, म्हणून मी जन्माष्टमीच्या या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की, चक्रधारी श्रीकृष्णाची मंगलदोई नगरी हे असे ठिकाण आहे जिथे संस्कृतीचा त्रिवेणी इतिहासाचा गौरव आणि भविष्याची आशा सर्वांचा संगम एकत्रितपणे होत असतो. हे क्षेत्र आसामची ओळख कायम राखणारे केंद्रबिंदूही आहे. मी प्रेरणादायी बाबींचा उल्लेख केला, श्रीकृष्णाचे स्मरण केले, आणि भविष्यातील सुरक्षा धोरणात ‘सुदर्शन चक्रची कल्पना लोकांसमोर मांडली आहे. या पराक्रमी भूमीत तुम्हासारख्या जनतेचे दर्शन घेण्याचे मला भाग्य प्राप्त झाले , मी धन्य झालो आहे.
बंधू- भगिनींनो,
काही दिवसांपूर्वीच आपण भारतरत्न शुधा कांठो भूपेंद्र हजारी यांचा जन्मदिवस साजरा केला. काल त्यांच्या सन्मानार्थ झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात भाग घेण्याचा मला योग आला. आसामच्या अशा महान संततींनी आणि आपल्या पूर्वजांनी जे स्वप्न पाहिले होते, ते आज भाजपचे डबल इंजिन सरकार प्रामाणिकपणे पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे.
बंधू- भगिनींनो,
काल जेव्हा मी भूपेन दा जींच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात होतो, तेव्हा रात्री मुख्यमंत्री महोदयांनी मला एक गोष्ट सांगितली आणि आज सकाळी त्यांनी ती चित्रफीत देखील दाखवली. ते पाहून मला खूप वेदना झाली. त्यांनी मला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांचे एक वक्तव्य दाखवले. ज्या दिवशी केंद्र सरकारने या देशाच्या महान सुपुत्राला, आसामचा अभिमान असलेल्या भूपेनदा हजारिका यांना भारतरत्नाने सन्मानित केले, त्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी असे वक्तव्य केले होते. खरे तर त्यावेळी ते माझ्या लक्षात आले नाही; आज मला ते दाखवण्यात आले, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी म्हटले होते, मोदी नाचणाऱ्या-गाणाऱ्या लोकांना भारतरत्न देत आहे.
मित्रांनो,
1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धानंतर, पंडित नेहरूंनी जे म्हटले होते, ते ईशान्येकडील लोकांच्या त्या जखमा आजही बऱ्या झालेल्या नाहीत आणि काँग्रेसची सध्याची पिढीही त्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. लोकांनी माझ्या विरुद्ध कितीही अपशब्द वापरले तरी, ते मी सहन करतो मी भगवान शिवाचा भक्त आहे, मी सर्व विष पचवतो. पण जेव्हा दुसऱ्याचा निर्लज्जपणे अपमान केला जातो तेव्हा मी ते सहन करू शकत नाही. तुम्ही मला सांगा की भूपेन दा यांना भारतरत्न देण्याचा माझा निर्णय योग्य आहे की नाही? जोरात सांगा की तो योग्य आहे की नाही? भूपेन दा यांना भारतरत्न देण्यात आला, काँग्रेसने त्याची हेटाळणी केली. त्यांनी चूक केली की नाही? काँग्रेस अशा प्रकारे आसामच्या सुपुत्राचा, भारताच्या सुपुत्राचा अपमान करते, त्यामुळे खूप त्रास होतो.
मित्रांनो,
मला माहित आहे की, आता त्यांची संपूर्ण व्यवस्था माझ्यावर हल्ला करेल. मोदींनी पुन्हा रडणे सुरु केले म्हणतील. पण माझ्यासाठी, जनता माझा देव आहे, आणि माझ्या आत्म्याचा आवाज त्यांच्यापर्यंत नाही पोहोचणार तर मग कुठे पोहोचेल ? तेच माझे स्वामी आहेत, तेच माझे पूज्य आहेत, आणि तेच माझे नियंत्रणकर्ते आहेत. माझ्याकडे दुसरा कोणताही रिमोट कंट्रोल नाही, 140 कोटी देशबांधव माझे रिमोट कंट्रोल आहेत. काही लोकांचा अहंकार इतका प्रचंड आहे की ते स्वतःला मोठे समजून सामान्य कामगारासारख्या लोकांवर अन्याय करतात. जेव्हा त्या अन्यायामुळे कामगाराला वेदना होतात आणि तो व्यक्त होतो, तेव्हा ते लोक त्यालाच दोषी ठरवतात. तुला रडण्याचाही अधिकार नाही; तू लहान आहेस, आमच्यासमोर तोंड कसं उघडलंस? सार्वजनिक जीवनात असा अहंकार योग्य नाही.
आसामच्या जनतेने, देशाच्या जनतेने, संगीतप्रेमी लोकांनी, कलाप्रेमी लोकांनी, भारताच्या आत्म्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या लोकांनी काँग्रेसकडून उत्तर मागितले पाहिजे की त्यांनी भूपेन दा यांचा अपमान का केला?
मित्रांनो,
आसामच्या या सांस्कृतिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करणे, तसेच आसामचा वेगाने विकास करणे, हयालाच दुहेरी इंजिन सरकारने प्राधान्य दिले आहे. जरा एसपीजीच्या लोक, कोणी भाऊ त्यांनी चित्र काढून आणले आहे, ते कदाचित देऊ इच्छितात. ज्यांनी चित्र काढले आहे, त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मागे तुमचे नाव आणि पत्ता लिहा, मी तुम्हाला नक्की पत्र लिहीन. खूप सुंदर चित्र , तुम्ही माझ्या आईचेही काढले आहे. आसामचे हे प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. तो एक तरुण केव्हापासून एक गमछा घेऊन उभा आहे, तोही घ्या. माझ्यासाठी तर हा जन्माष्टमीचा प्रसाद आहे. आसाममधील एखाद्या गरीब आईने हा गमछा बनवला असेल. खूप खूप धन्यवाद भावा, तुम्ही दिलेल्या या प्रसादासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. मला मिळेल, तो द्या भावा, मिळेल, मी खूप आभारी आहे तुमचा. आणखी एक आहे, तोही घ्या, कदाचित तो हिमंता यांना द्यायचा आहे. ठीक आहे, जिथे पोहचायला हवा योग्य ठिकाणी पोहचेल.तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद तरुणा. पाहा, अनेक मुलांनी काही चित्र काढून आणली आहेत, जरा घ्या हो भाऊ, इतक्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत लोक. अशी छोटी छोटी मुले, असे सौभाग्य कुठे मिळते भाऊ . धन्यवाद मित्रा, धन्यवाद भावा, तुम्ही दोघे भाऊ आहात का, नाही, दोघेही काळ्या रंगाचे टी-शर्ट घालून आला आहात. पण खूप खूप धन्यवाद मित्रांनो.
मित्रांनो,
सरकार आणि आसाममधील जनतेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज आसाम देश-विदेशात आपले नाव गाजवत आहे. बघा भाऊ , ही मुलगी काहीतरी घेऊन आली आहे, ते घ्या, मुलीला तर अजिबात निराश नाही करू शकत. धन्यवाद पोरी. पोरी, तू नाव लिहिले आहेस का मागे, जर तू नाव लिहिले असेल तर मी तुला पत्र लिहीन, तुझे नाव आणि पत्ता लिहून दे पोरी.
मित्रांनो,
आज भारत, जगातील सर्वात वेगाने प्रगती करत असलेला देश आहे, त्याचवेळी आसामही देशातील सर्वात वेगाने प्रगती करत असलेल्या राज्यांपैकी एक बनले आहे. एक काळ होता, जेव्हा आसाम विकासात मागे पडला होता, देशासोबत त्याच वेगाने वाटचाल करू शकत नव्हता, पण आज आसाम जवळपास 13 टक्के विकास दराने पुढे जात आहे. बेटा , खूप खूप धन्यवाद.
मित्रांनो,
13 टक्के दराने विकास, 13 टक्के दराने विकास, हे खूप मोठे यश आहे, हे तुमचे यश आहे, होऊन जाऊ द्यात टाळ्या आज तुमच्या नावावर. आमच्या नावाने तर तुम्ही खूप टाळ्या वाजवता, मी आज तुमच्या घामासाठी टाळी वाजवू इच्छितो. हे यश आसामवासियांच्या परिश्रमाचे आणि भाजपच्या दुहेरी इंजिन सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम आहे. मला आनंद आहे की आसामची जनता ही भागीदारी सातत्याने मजबूत करत आहे. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत हिमंताजी आणि त्यांच्या टीमला वारंवार मोठा पाठिंबा मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीतही आसामने आम्हा सर्वांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे, आपला आशीर्वाद दिला आहे.
मित्रांनो,
भाजपा सरकार, आसामला भारताच्या विकासाचे प्रगतीचे इंजिन बनवण्याचे ध्येय बाळगून काम करत आहे. आजचा हा कार्यक्रमही आमच्या याच संकल्पाचा भाग आहे. आता काही वेळापूर्वी, या व्यासपीठावरून जवळपास 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे. आमचे दुहेरी इंजिन सरकार, आसामला आघाडीचे कनेक्टेड राज्य, आणि आघाडीचे आरोग्य सेवा केंद्र म्हणून विकसित करत आहे. हे प्रकल्प याच संकल्पाला अधिक बळकट करतील. तुम्हा सर्वांचे दरांग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी, महामार्गासाठी, रिंग रोडसाठी खूप खूप अभिनंदन.
मित्रांनो,
संपूर्ण देश आज विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकजुट होऊन पुढे वाटचाल करत आहे. विशेषतः आपले जे युवा सहकारी आहेत, त्यांच्यासाठी विकसित भारत स्वप्नही आहे आणि संकल्पही आहे. आणि हा संकल्प साकारण्यात, आपल्या ईशान्य भारताची खूप मोठी भूमिका आहे. हे मी केवळ यामुळे म्हणत नाही की मला तुम्हा लोकांबद्दल खूप प्रेम आहे, खूप आदर आहे, ईशान्य भारताप्रती मला आपुलकी आहे, केवळ यामुळे म्हणत नाही आहे, मी यासाठी म्हणत आहे, यामागे ठोस कारणे आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, मोठी शहरे, मोठी अर्थव्यवस्था, मोठे-मोठे कारखाने, पश्चिम आणि दक्षिण भारतातच विकसित झाले. या काळात पूर्व भारताचा खूप मोठा भाग, खूप मोठी लोकसंख्या विकासाच्या शर्यतीत मागे राहिली.
आता भाजप सरकार ही परिस्थिती बदलत आहे.21व्या शतकाची 25 वर्ष उलटून गेली आहेत. आपण ज्यांचे गाणे गात होतो ना, काँग्रेसच्या काळापासून ऐकत आलो होतो, 21वे शतक येत आहे, 21वे शतक येत आहे, ते येऊनही एक चतुर्थांश काळ संपलाही आहे. आता या 21व्या शतकाचा पुढचा भाग हा पुर्वेचा आहे, इशान्येचा आहे. आता तुमचा काळ आला आहे, आसामचा,ईशान्यचा काळ आला आहे, तुमचा काळ आला आहे. माझ्या तरुण मित्रांनो, आता वेळ तुमच्या मुठीत आहे. अरे आणखी एक मुलगा काहीतरी घेऊन आला आहे, घ्या भाऊ, आता हे लोकही माझ्या अडचणी समजून घेतात. आईचे चित्र घेऊन येतात, तर मन होते की घ्यावे. दे बाळा, हे माझ्याकडेच राहील. मागे आपला नाव-पत्ता लिहून दे, मी ते घेईन , तुला पत्र लिहीन. हे घेऊन एसपीजीवाल्यांना देऊन टाका.
मित्रांनो,
कोणत्याही प्रदेशाच्या जलद विकासासाठी जलद जोडणी फारच आवश्यक असते. म्हणूनच आमच्या सरकारचा ईशान्य प्रदेशात जोडणीवर विशेष भर राहिला आहे. रस्ता, रेल्वे, हवाई अशी भौतिक जोडणी असो किंवा 5जी इंटरनेट, ब्रॉडबँड अशी डिजिटल जोडणी,यामुळे तुम्हाला सुविधा मिळाल्या, जीवन सोपे झाले, व्यवसाय करणे सोपे झाले. या जोडणीमुळे प्रवास सोपा झाला, पर्यटनाला चालना मिळाली आणि आमच्या तरुणांसाठी नोकरी-रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या.
मित्रांनो,
कनेक्टिव्हिटीच्या या महाअभियानाचा आसामलाही खूप फायदा झाला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत दिल्लीमध्ये काँग्रेसचे सरकार होते, आसाममध्येही अनेक दशके काँग्रेस होती. पण 60-65 वर्षांत काँग्रेसने ब्रह्मपुत्रेवर फक्त तीन पूल बांधले, 60-65 वर्षांत तीन! आणि मग तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, तर एका दशकात आमच्या सरकारने सहा मोठे पूल उभारले. सहा मोठे पूल! आता मला सांगा, इतके काम झाले तर तुम्ही आनंदी व्हाल की नाही? तुमचे आशीर्वाद मिळतील की नाही? तुमचे प्रेम मिळेल की नाही? तुम्ही खुश आहात ना? मी अजून काम करू इच्छितो, फक्त आशीर्वाद देत रहा. आज कुरुवा–नारेंगी पुलाचे भूमिपूजन झाले आहे. या पुलामुळे गुवाहाटी आणि दरांगमधील अंतर फक्त काही मिनिटांचे होईल. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा वेळ वाचेल, पैसा वाचेल, वाहतूक खर्च कमी होईल, वेळेची बचत होईल, ट्रॅफिकची समस्या कमी होईल आणि परिणामी दरही कमी होतील.
मित्रांनो,
नवीन वळण रस्त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.जेव्हा हा वळण मार्ग तयार होईल, तेव्हा वरच्या आसामकडे जाणाऱ्या गाड्यांना शहरात प्रवेश करण्याची गरजच राहणार नाही. हा वळण मार्ग 5 राष्ट्रीय महामार्ग, 2 राज्य महामार्ग, एक विमानतळ, तीन रेल्वे स्थानके आणि एक आंतरिक जलवाहतूक केंद्र यांना एकमेकांशी जोडणार आहे. म्हणजेच, आसाममध्ये पहिल्यांदाच अखंड बहुविध वाहतूक संपर्काचे संपूर्ण जाळे उभारले जाणार आहे. हा आहे,‘दुहेरी’ इंजिनच्या भाजप सरकारचा विकासाचा आराखडा.
मित्रांनो,
आपण आजच्याच नव्हे, तर पुढील 25-50 वर्षांच्या गरजांनुसार देश तयार करत आहोत. कारण 2047 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील ना, तेव्हा विकसित भारत घडवायचाच आहे मित्रांनो. तो तुमच्यासाठी घडवायचा आहे, तुमच्या मुलांसाठी घडवायचा आहे, तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घडवायचा आहे. याच मालिकेत मी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की आता जीएसटीमध्ये नव्या युगातील सुधारणा होणार आहेत. आज मी या सुधारणांची आनंदवार्ता घेऊन तुमच्यात आलो आहे. आजपासून नेमके 9 दिवसांनी, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, जीएसटीच्या दरांमध्ये मोठी घट होईल. आणि याचा फायदा आसामसह देशातील प्रत्येक कुटुंबाला होणार आहे. रोजच्या वापरातील अनेक वस्तू अधिक स्वस्त होतील. आम्ही सिमेंटवरील कर कमी केला आहे, त्यामुळे ज्याला घर बांधायचे आहे त्याचा खर्च कमी होईल. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील अनेक महागडी औषधे स्वस्त होणार आहेत, विमा घेणे स्वस्त होईल. आणि ज्या तरुणांना दुचाकी घ्यायची आहे, नवीन गाडी विकत घ्यायची आहे, तीही स्वस्त होणार आहे. आजकाल तुम्ही पाहत असाल, मोटर कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा लागली आहे. जाहिराती देत आहेत, 60 हजार कमी, 80 हजार कमी, 1 लाख रुपयांपर्यंत कमी, सतत अशाच जाहिराती येत आहेत. म्हणजे माता-भगिनी असोत, तरुण असोत, शेतकरी असोत, दुकानदार असोत, सगळ्यांचाच फायदा होणार आहे. हा निर्णय तुमच्या सणांची चमक आणखी वाढवणार आहे.
मित्रांनो,
सणासुदीच्या या दिवसांत माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी माझं म्हणणं सांगू? तुम्ही म्हणाल तर सांगतो. सांगू? सगळेजण हात वर करुन सांगा मी माझं म्हणणं सांगू का? माझं म्हणणं तुम्ही ऐकाल? बस बाळा बस, धन्यवाद बाळा धन्यवाद.त्याला त्रास देऊ नका. त्याला काहीतरी शारीरिक त्रास आहे. कृपया त्याला त्रास देऊ नका. कॅमेरामन कृपया त्याच्याकडची चिठ्ठी घ्या. बाळा तू बस, काळजी करू नको. अरे त्याला त्रास देऊ नका, त्याला त्रास होतोय. माझी तुम्हाला विनंती आहे की त्याला त्रास देऊ नका, मला ते चांगलं वाटत नाही. तुम्ही इथे आलात इतके कष्ट सहन करुन इथवर आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
मित्रांनो,
जरा पुन्हा एकदा हात उंचावून सांगा ,की मी जे सांगेन ते तुम्ही ऐकाल का? असं नाही, सगळ्यांनी हात वर केले पाहिजेत. मी जे सांगेन ते ऐकाल, नक्की ऐकाल. एवढं तुम्ही केलंत तर देशाची प्रगती होईल. माझ्यासाठी नाही तर देशासाठी मी तुमच्याकडे एक मागणी करतोय, मी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे मागणं मागतोय. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सणांसाठी जी काही खरेदी कराल, ती स्वदेशी उत्पादनं असतील असं वचन मला द्या. स्वदेशी, भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी कराल ना? आणि स्वदेशीची माझी व्याख्या खूप सोपी आहे. कंपनी कुठल्याही देशातून आलेली असेल, नाव कुठल्याही देशाचं असेल मात्र त्याचं उत्पादन भारतात झालं असलं पाहिजे. गुंतवणूक जगातल्या कुठल्याही देशातून झालेली असली तरी उत्पादन भारतात तयार झालेलं असावं. पैसे कुठल्याही देशातल्या लोकांनी गुंतवलेले असले; तरी उत्पादन भारतातल्या तरुणांच्या हातांनी तयार केलेलं असावं, आणि जी उत्पादनं मेड इन इंडिया असतील त्यांना भारतीय मातीचा गंध असायला हवा. अशाच वस्तू खरेदी कराल ना? सगळ्यांनी हात वर करुन सांगा, स्वदेशीची खरेदी कराल ना? सगळ्यांनी एका सुरात जोरात सांगा, स्वदेशीचीच खरेदी कराल ना? आणखी मोठ्या आवाजात सांगा, कराल ना? जे दुकानदार मालाची विक्री करतात त्यांनाही माझं सांगणं आहे; आपल्या दुकानावर स्वदेशीची पाटी लावा. लावाल ना? आपल्या गावातल्या प्रत्येक दुकानावर पाटी लावा. त्या पाटीवर लिहा, ‘अभिमानाने म्हणा हे स्वदेशी आहे, अभिमानाने सांगा हे स्वदेशी आहे.’
स्वदेशीचं सामर्थ्य मी तुम्हाला समजावून सांगतो. साधारण 50 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी तेव्हा काही काळासाठी कन्याकुमारीत राहात होतो. हा गमछा माझ्याजवळ होता. माझ्या सामानात तीन चार गमछे मी ठेवतोच. तर असंच एकदा कन्याकुमारीत मी हा गमछा असा घालून फिरत होतो; तेव्हा लांबून काही लोक पळत माझ्याकडे आले आणि नमस्कार करुन माझा हात पकडला. मला म्हणाले तुम्ही आसामचे आहात ना? मी सांगितलं नाही; मी तर गुजरातचा आहे. तर ते म्हणाले की, तुमचा गमछा पाहून आसामचे आहात असं वाटलं म्हणून तुमच्याकडे आलो. ही ताकद आहे स्वदेशीची, या देशाच्या मातीची! काहीही ओळख नसताना माझ्या गळ्यात गमछा असल्यामुळे, आसामच्या लोकांना माझ्याबद्दल आपलेपणा वाटला. म्हणूनच मी म्हणतोय मला वचन द्या की आम्ही स्वदेशीच खरेदी करू. व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा. यासाठी आपण सर्वांनी केलेले प्रयत्न आपल्या देशाचं सामर्थ्य वाढवतील.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत, देशात आणखी एका क्षेत्रात खूप मोठं काम झालं आहे. ते म्हणजे आरोग्यसेवा क्षेत्र. आपल्याकडे केवळ मोठ्या शहरांमधेच मोठी रुग्णालयं होती, तिथं मोठ्या शहरात उपचारांसाठी जाणं खूपच खर्चिक होतं. आम्ही एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांचं जाळं देशाच्या कोनाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. भाऊ, आता बसा; आता मला बोलू द्या. आता बसा तुम्ही, बसा. अरे तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. कॅमेरामन त्यांच्याकडून चिठ्ठी घ्या. माझ्या या दिव्यांग बंधुंना कशाला त्रास देताय तुम्ही. धन्यवाद मित्रा. इथं आसाममध्ये तर आम्ही खास कर्करोगासाठी विशेष रुग्णालयं उभारली. गेल्या 11 वर्षांत भारतातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे. याचाच अर्थ स्वातंत्र्याच्या 60-65 वर्षांत जितकी वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन झाली; तेवढी आम्ही गेल्या 11 वर्षांत स्थापन केली. बघा मित्रांनो, 60-70 वर्षांत जेवढं काम झालं; तेवढं तर आम्ही 10-11 वर्षांतच केलं. इथं आसाममध्ये 2014 च्या आधी केवळ 6 वैद्यकीय महाविद्यालयं होती. आता दरांगमधल्या वैद्यकीय महाविद्यालयाचं काम पूर्ण झाल्यावर इथं 24 वैद्यकीय महाविद्यालयं असतील. जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयं तयार होतात; तेव्हा उपचारांच्या चांगल्या सुविधा निर्माण होण्याबरोबरच जास्तीतजास्त युवकांना डॉक्टर होण्याची संधीपण मिळते, हे तर तुम्हाला माहिती आहेच. पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची मर्यादित संख्या असल्यामुळे अनेक तरुणांना डॉक्टर होता येत नव्हतं. गेल्या 11 वर्षांत देशभरात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशाची संख्या दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. एवढंच नाही तर आम्ही आणखी एक उद्दीष्ट ठरवलं आहे. येत्या 4-5 वर्षांत आम्ही वैद्यकीय शाखेसाठी प्रवेशाची संख्या एक लाखानं वाढवणार आहोत. एक लाख नवीन जागा म्हणजे, आणखी एक लाख तरुण डॉक्टर होतील.
मित्रांनो,
आपण असं काम करतोय , एकीकडे या देशात 3 करोड़ लखपती दीदी तयार करतोय तर दुसरीकडे 1 लाख नवीन डॉक्टरानांही तयार करतोय.
मित्रांनो,
आसाम देशभक्तांची भूमी आहे .परकीय आक्रमकांपासून देशाचे रक्षण करायचे असो, की स्वातंत्र्याच्या लढ्यात दिलेले बलिदान असो, आसामची भूमिका फार महत्त्वाची आहे. पथरुघाटचा शेतकरी सत्याग्रह हा देश कसा विसरू शकतो? ते ऐतिहासिक स्थळ इथे जवळच आहे. आज मी शहीदांच्या या पवित्र भूमीवर उभा आहे तेव्हा काँग्रेसची आणखी एक कृती उघड करणे गरजेचे आहे . काँग्रेस आपल्या राजकारणासाठी अशा व्यक्ती आणि अशा विचारांच्या मागे उभी राहते, ज्या भारतविरोधी असतात. ऑपरेशन सिंदूरच्या काळातही हेच दिसले.जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा संपूर्ण देश दहशतीने रंगलेला होता आणि काँग्रेस मात्र मौन धारण करून गप्प होती.
आज आपली सेना ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या काना - कोपऱ्यातून दहशतवादी नेत्यांचा नायनाट करते.परंतु काँग्रेस काहीवेळा पाकिस्तानच्या बाजूने उभी राहते. काँग्रेसचे लोक आपल्या सेनेऐवजी दहशतवादींना साथ देणाऱ्यांचा अजेंडा पुढे नेताना दिसतात; पाकिस्तानाचे खोटे आरोप हेच काँग्रेसचा अजेंडा बनतात. त्यामुळे काँग्रेसपासून तुम्ही सतर्क राहाच.
मित्रांनो,
काँग्रेससाठी तिची वोटबँक महत्त्वाची असते. देशहिताची त्यांनी कधी पर्वा केली नाही. आज काँग्रेस देशविरोधी आणि घुसखोरांना मोठी मदत करणाऱ्या पक्षासारखी वागत आहे. काँग्रेसची जेव्हा सत्ता होती, तेव्हा तिने घुसखोरांना प्रोत्साहन दिलं आणि आता ती अपेक्षा करते की घुसखोर कायमचे इथे बसून देशाचे भविष्य ठरवतील. मँगलदोईत आसामची ओळख बचावण्यासाठी घुसखोरांविरुद्ध मोठं आंदोलन उभं झालं होतं; पण पूर्वीच्या काँग्रेस सरकारने तुमच्यावर आरोप केले आणि तुम्हाला यातून यातना भोगाव्या लागल्या. काँग्रेसने जमिनीवर बेकायदेशीर ताबे होऊ दिले, श्रद्धास्थळे, शेतकरी आणि आदिवासी जमिनीची लूट झाली. पण भाजप - राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. इथे बेकायदेशीर ताबे हटवले जात आहेत.
हेमंता यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये लाखो एकर जमिनी घुसखोरांकडून मुक्त करण्यात आल्या; दरांग जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जमिनी मोकळ्या करण्यात आल्या. गोरुखुंटी भागात काँग्रेसच्या काळात घुसखोरांनी कब्जा केला होता,आज ती जमीन परत घेतली आहे. आता तेथे शेतकऱ्यांसाठी गोरुखुंटी कृषी प्रकल्प सुरू आहे. त्या भागातील तरुण आता ‘कृषि सैनिक’ बनून शेती करतात - मोहरी , मका, उडद, तीळ, भोपळे वगैरे पिकं तिकडं वाढत आहेत. म्हणजे जी जमीन आधी घुसखोरांच्या ताब्यात होती, आज तीच जमीन आसाममध्ये कृषी विकासाचे नवीन केंद्र बनली आहे.
मित्रांनो,
भाजप सरकार घुसखोरांना देशाच्या संसाधनांवर ताबा मिळू देणार नाही. भारताचा शेतकरी, युवक आणि आदिवासी लोकांचे हक्क आम्ही कुणासाठीही सोडणार नाही. हे घुसखोर आपल्या मातांवर–बहिणींवर–मुलींवर अत्याचार करतात.हे होऊ देणार नाही.घुसखोरी द्वारे सीमेवर लोकसंख्याशास्त्रीय बदल करण्याचा कट रचला जातोय, जो राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. त्यामुळे देशात आता लोकसंख्याशास्त्रीय स्थितीला तोंड देणारी मोहीम सुरू केली आहे.भाजपाचे लक्ष्य आहे."घुसखोरांपासून देशाचे रक्षण करणं आणि त्यांच्यापासून देशाला मुक्त करणं."
आणि त्या राजकीय नेत्यांना मी असं सांगतो- जे आव्हान घेऊन तुम्ही मैदानात आला आहात ना, ते मी स्विकारतो. लिहून ठेवा..... मी पाहीन की तुम्ही घुसखोरांना वाचवण्यासाठी किती ताकद वापरता आणि आम्ही घुसखोरांना हाकलण्यासाठी कसे आमचे जीवन व्यतीत करतो- होऊ द्या सामना. जे लोक घुसखोरांना वाचवायला निघाले आहेत त्यांना याची किंमत मोजावी लागेल. हे लक्षात ठेवा - हा देश त्यांना माफ करणार नाही.
मित्रांनो,
आसामचा वारसा जपायचा आहे आणि आसामचा वेगवान विकास करायचा आहे, यासाठी आपल्याला एकत्र काम करावं लागेल. आपल्याला आसाम आणि ईशान्य भारताला विकसित भारताच्या विकासाचे इंजिन बनवायचं आहे. या विकास प्रकल्पांसाठी माझ्या शुभेच्छा . माझ्यासोबत बोला — भारत मातेचा विजय असो! दोन्ही हात वर करून जोरात नारा द्या — भारत मातेचा विजय असो! (पुन्हा) भारत मातेचा विजय असो!
खूप-खूप धन्यवाद.
सुषमा काणे/राज दळेकर/तुषार पवार/नितीन गायकवाड/सुरेखा जोशी/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
(Release ID: 2167131)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam