पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मणिपूरमधील इम्फाळ येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 13 SEP 2025 6:26PM by PIB Mumbai

 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला, राज्य प्रशासनामधील इतर अधिकारीवर्ग आणि मणिपूरच्या  माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो नमस्कार!!

आज मणिपूरच्या विकासासाठी हजारो कोटी रूपयांच्या प्रकल्पांचा शिलान्यास केला तसेच काही प्रकल्पांचे  लोकार्पण केले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे तुम्हां लोकांचे राहणीमान अधिक सुकर होणार आहे आणि जीवनमान उंचावणार आहे. या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधा बळकट होतील आणि मणिपूरच्या युवापिढीसाठी, इथल्या मुला-मुलींसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

मित्रांनो,

ज्या प्रकल्पांचे काम आज सुरू झाले आहे, त्यापैकी दोन प्रकल्प खूप महत्वाचे आहेत. मणिपूर शहरी रस्ते प्रकल्प हा त्यापैकी एक आहे. या प्रकल्पासाठी 3 हजार 600 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. आणि दुसरा प्रकल्प मणिपूर इंफोटेक विकास प्रकल्प आहे. यासाठी 500 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. या प्रकल्पांमुळे इम्फाळमधील रस्त्यांची पायाभूत सुविधा मजबूत होईल आणि मणिपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवीन चैतन्य निर्माण करतील. या सर्व विकास योजनांसाठी मी, मणिपूरच्या सर्व लोकांचे खूप- खूप अभिनंदन करतो. या कामांसाठी अनेक शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

स्वातंत्र्यानंतर देशाच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील भागातील मोठ्या शहरांचा विकास झाला. तिथल्या लोकांची स्वप्ने साकार झाली. तिकडच्या नवयुवकांना नवनवीन संधी मिळाल्या. आता 21 व्या शतकामधला हा काळ पूर्वकडच्या राज्यांचा आहे. ईशान्येकडील भागाचा आहे. त्यामुळेच मणिपूरच्या विकासाला भारत सरकारने सातत्याने प्राधान्य दिले आहे. याचा परिणाम म्हणजे मणिपूरचा विकास दर निरंतर वाढत आहे. 2014 च्या आधी मणिपूरचा विकास दर एक टक्क्यांपेक्षाही कमी होता. एक टक्काही नव्हता. आता मणिपूर पहिल्यापेक्षा अनेकपटींनी वेगाने पुढे जात आहे. मणिपूरमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मला आनंद वाटतो की, मणिपूरमध्ये रस्ते बनविण्याचे काम, राष्ट्रीय महामार्ग बनविण्याचे काम अतिशय वेगाने होत असून, हे काम अनेकपटींनी वाढले आहे. इथे आता गावां-गावांपर्यंत रस्ते जात आहेत, सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडले जाण्याचे काम वेगाने होत आहे.

मित्रांनो,

आपले इम्फाळ म्हणजे अनेक शक्यता- संभावनांचे शहर आहे. विकसित भारतातील  ज्या शहरामध्ये  आपल्या युवकांची स्वप्ने पूर्ण होवू शकतात, अशा शहरांपैकी इंम्फाळ असणार आहे, अशा स्वरूपामध्ये मी इम्फाळकडे  पाहतो.  इथले आपले युवक स्वतःचे स्वप्ने साकार करतील आणि त्याचबरोबर देशाच्या विकासाला गती देतील. असा विचार समोर ठेवून इथे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. शेकडो कोटी रूपये खर्चांचे आणखी अनेक प्रकल्प इथे सुरू करण्यासाठी वेगाने काम केले जात आहे.

मित्रांनो,

इम्फाळ असो, मणिपूरचा इतर कोणताही भाग असो, इथे स्टार्ट अप्ससाठी तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत. आयटी स्पेशल इकोनॉमिक झोनतयार केल्यामुळे याविषयींच्या अनेक शक्यतांना आता बळ मिळेल. या झोनची पहिली वास्तूही आता सज्ज झाली आहे. मणिपूरमध्ये नवीन नागरी सचिवालयाची इमारत बनविण्यात यावी, अशी खूप जुनी मागणी होती. आता ही वास्तूही बांधून तयार आहे. या नवीन इमारतीमुळे नागरिक देवो भवःया मंत्राला अधिक मजबुती मिळेल.

मित्रांनो,

मणिपूरचे अनेक सहकारी मंडळी, कोलकाता आणि दिल्ली येथे कामानिमित्त ये-जा करीत असतात. तिथेही त्यांची अल्प दरामध्ये निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी दोन्ही शहरांमध्ये मणिपूर भवन उभारण्यात आले आहे. या भवनांमुळे मणिपूरच्या कन्यांना खूप मोठी मदत मिळेल. आणि ज्यावेळी मुले तिथे सुरक्षित राहू शकतील, त्यावेळी इथे वास्तव्य करणा-या त्यांच्या माता-पित्यांची चिंताही कमी होईल.

मित्रांनो,

आमचे सरकार, संपूर्ण संवेदनशीलतेने तुमच्या जीवनातील अडथळे, आपत्ती कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मला माहिती आहे की, मणिपूरच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी, महापूर यामुळे खूप गंभीर समस्या निर्माण होते. ही समस्या कमी करण्यासाठीही सरकार अनेक प्रकल्पांवर एकाच वेळी काम करीत आहे.

मित्रांनो,

मणिपूर, देशातील असे राज्य आहे की, ज्या राज्यातल्या माता-भगिनी आर्थिक मोर्चाची आघाडी सांभाळतात. इमा कैथलची परंपरा याचे खूप मोठे प्रमाण आहे. या महिला शक्तीला मी भारताच्या विकास कार्यातीलआत्मनिर्भर भारताच्या वाटचालीतील  महत्वाचामधला - आधाराचा स्तंभ  मानतो. महिला शक्तीकडून मिळणा-या  प्रेरणेचे स्थान मणिपूर आहे. इथे आमचे सरकार बनल्यानंतर, आम्ही महिलांसाठी एक विशेष हाट-बाजार, इमा बाजाराचे निर्माण कार्य सुरू केले होते. मला आनंद वाटतो की, आज चार इमा बाजार स्थानांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या इमा बाजारामुळे मणिपूरच्या भगिनींना खूप मोठी मदत मिळेल.

मित्रांनो,

देशाच्या प्रत्येक नागरिकाचे जीवन सुकर, सुलभ बनविणे, आमचे लक्ष्य आहे. ज्यावेळी इथे सामान पोहोचणे म्हणजे  कितीतरी अवघड काम होते, असे काही जुने दिवसही मणिपूरने पाहिले आहेत. त्यावेळी  दैनंदिन वापरासाठी लागणा-या वस्तू सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या सरकारने त्या जुन्या  त्रासदायक गोष्टींतून मणिपूरला बाहेर काढले आहे. तुम्हा सर्वांसाठी मी आणखी एक आनंदाची बातमी घेवून आलो आहे. आमच्या सरकारला वाटते की, तुम्हा सर्वांची बचत वाढावी आणि तुमचे जीवन आणखी सुकर व्हावे. यासाठी आता सरकारने जीएसटी खूप कमी केला आहे. यामुळे मणिपूरच्या नागरिकांना दुप्पट लाभ होईल. यामुळे दैनंदिन वापरासाठी लागणा-या अनेक वस्तू - जसे की, साबण, शॅम्पू, केसांना लावण्याचे तेल, कपडे, चप्पल, या सर्व वस्तू आता स्वस्त होतील. सीमेंट आणि घर बनविण्यासाठी लागणाऱ्या सामानांचे दरही कमी होतील. सरकारने हॉटेलमधील खाद्यसेवेवरील जीएसटी खूप कमी केला आहे. यामुळे इथल्या गेस्ट हाउस चालवणाऱ्या मंडळींना, टॅक्सी-ढाबे चालकांना त्याचा खूप फायदा होईल. याचा अर्थ इथल्या पर्यटन क्षेत्राच्या वृध्दीला मदत मिळेल.

मित्रांनो,

मणिपूरला हजारो वर्षांचा जुना समृध्द वारसा आहे. इथल्या संस्कृतीची पाळेमुळे घट्ट असून ती खोलवर रूजली आहेत. मणिपूर म्हणजे, भारत मातेच्या मुकुटावर सजलेले मुकुटरत्न आहे. म्हणूनच आपल्याला मणिपूरची विकासवादी छबी, सातत्याने बळकट करायची आहे. मणिपूरमध्ये कोणत्याही प्रकारची होणारी हिंसा ही दुर्दैवी आहे. अशा हिंसेच्या घटना म्हणजे आपल्या पूर्वजांवर आणि आपल्या भावी पिढीवरही खूप मोठा अन्याय आहे. म्हणूनच आपल्याला मणिपूरला सातत्याने शांतता आणि विकासाच्या मार्गावरून पुढे न्यायचे आहे. आणि मणिपूरला पुढे नेण्याचे हे काम आपण सर्वांनी मिळून करायचे आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि भारताच्या संरक्षणात मणिपूरने दिलेल्या योगदानातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. ही मणिपूरचीच भूमी होती, जिथे इंडियन नॅशनल आर्मीने पहिल्यांदा भारताचा स्वतःचा ध्वज फडकवला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरला भारताच्या स्वातंत्र्याचे प्रवेशद्वार म्हटले होते. याच मातीने अनेक वीरांचे बलिदान पाहिले आहे. आमचे सरकार मणिपूरच्या अशा प्रत्येक महान व्यक्तिमत्त्वाकडून प्रेरणा घेऊन पुढे जात आहे. आमच्या सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरील माऊंट हॅरियटचे नाव बदलून माऊंट मणिपूर (Mount Manipur) ठेवण्यात आले आहे. ही मणिपुरी स्वातंत्र्यसैनिकांना भारतातील 140 कोटी देशवासियांची आदरांजली आहे.

मित्रांनो,

आजही मणिपूरचे अनेक सुपुत्र देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारतमातेच्या संरक्षणात गुंतलेले आहेत. नुकतेच ऑपरेशन सिंदूरमध्ये जगाने भारतीय सैन्याचे सामर्थ्य पाहिले आहे. आपल्या सैनिकांनी असे शौर्य गाजवले की पाकिस्तानची सेना त्राहिमाम करू लागली. भारताच्या या यशामध्ये मणिपूरच्या अनेक वीर मुला-मुलींच्या शौर्याचा समावेश आहे. असेच आपले एक धाडसी हुतात्मा दीपक चिंगखम यांच्या शौर्याला मी आज नमन करतो. ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांचे बलिदान देश नेहमी लक्षात ठेवेल.

मित्रांनो,

"मी 2014 मध्ये इथे आलो होतो, तेव्हा मला एक गोष्ट आठवते की, मी म्हटले होते की मणिपुरी संस्कृतीशिवाय भारतीय संस्कृती अपूर्ण आहे आणि मणिपूरच्या खेळाडूशिवाय भारताचे खेळ अपूर्ण आहेत. मणिपूरचा तरुण, तिरंग्याच्या सन्मानासाठी जीव ओतून काम करणारा तरुण आहे. त्याची ही ओळख आपल्याला हिंसाचाराच्या काळ्या छायेत दबू द्यायची नाही."

मित्रांनो,

आज जेव्हा भारत जागतिक खेळांचे ऊर्जागृह बनत आहे, तेव्हा मणिपूरच्या तरुणांची जबाबदारी आणखी वाढली आहे. म्हणूनच, भारत सरकारने पहिल्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी मणिपूरची निवड केली. आज खेलो इंडिया योजना आणि ऑलिंपिक पोडियम योजनेद्वारे मणिपूरच्या अनेक खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. मणिपूरच्या तरुणांसाठी येथे आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा देखील तयार केल्या जात आहेत. पोलो खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, जगातील सर्वात उंच पोलो पुतळ्यासह मारजिंग पोलो संकुल (Marjing Polo Complex) येथे स्थापन करण्यात आले आहे. येथील ऑलिंपियन्सचा सन्मान करण्यासाठी ऑलिंपियन पार्क देखील बनवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने राष्ट्रीय क्रीडा धोरण-खेलो इंडिया धोरण जाहीर केले आहे. यामुळे आगामी काळात मणिपूरच्या तरुणांना खूप जास्त फायदा मिळेल.

मित्रांनो,

मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य यावे, येथील लोकांचे हित सुरक्षित राहावे, ज्या लोकांचा शिबिरांमध्ये राहण्याचा नाईलाज आहे, त्यांचे जीवन पुन्हा रुळावर यावे, यासाठी आमचे सरकार सतत काम करत आहे. सरकारने विस्थापित लोकांसाठी सात हजार नवीन घरे मंजूर केली आहेत. नुकतेच, केंद्र सरकारने मणिपूरसाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देखील जाहीर केले आहे. यामध्ये विस्थापितांना मदत करण्यासाठी 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. ज्यांनी हिंसेची झळ सोसली आहे, त्यांनी लवकरत लवकर सामान्य जीवनाकडे परत यावे, याला आमचे मोठे प्राधान्य आहे. मणिपूर पोलिसांसाठी बनवलेले नवीन मुख्यालय देखील यामध्ये तुमची खूप मदत करेल.

मित्रांनो,

आज मणिपूरच्या या भूमीवरून मी नेपाळमधील माझ्या मित्रांशीही बोलणार आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेला नेपाळ, भारताचा एक चांगला मित्र आहे, एक जवळचा मित्र आहे. आपण समान इतिहासाने, श्रद्धेने जोडलेले आहोत आणि सोबत मिळून पुढे जात आहोत.नेपाळमध्ये हंगामी सरकारच्या पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल मी 140 कोटी भारतीयांच्या वतीने श्रीमती सुशीला जी यांचे हार्दिक अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की त्या नेपाळमध्ये शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतील. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सुशीला जी यांचे आगमन, महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहे.आज नेपाळमधील अशा प्रत्येक व्यक्तीचे मी कौतुक करीन, ज्यांनी अशा अस्थिर परिस्थितीतही लोकशाही मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले.

मित्रांनो,

नेपाळमध्ये घडलेल्या घटनाक्रमात आणखी एक विशेष गोष्ट आहे, ज्याकडे लोकांचे लक्ष गेलेले नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेपाळमधील तरुण-तरुणी नेपाळच्या रस्त्यांवर साफसफाई आणि रंगकाम मोठ्या मेहनतीने आणि पवित्र भावनेने करताना दिसत आहेत. समाज माध्यमांवर येत असलेले त्यांचे फोटो मी देखील पाहिले आहेत. त्यांची ही सकारात्मक विचारसरणी, हे सकारात्मक कार्य केवळ प्रेरणादायीच नाही, तर ते नेपाळच्या नवोदयाचे स्पष्ट संकेतही आहेत. मी नेपाळला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

21व्या शतकात पुढे जात असलेला आपला देश एकच ध्येय घेऊन चालला आहे - विकसित भारताचे ध्येय. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी मणिपूरचा विकासही आवश्यक आहे. आपला मणिपूर अफाट क्षमतांनी भरलेला आहे. विकासाच्या मार्गापासून आपण एक पाऊलही विचलित होऊ नये, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मणिपूरकडे सामर्थ्याची कोणतीही कमतरता नाही, गरज आहे ती आपण संवादाचा मार्ग सतत मजबूत करण्याची. आपल्याला टेकड्या आणि खोऱ्यांमधील सौहार्दाचा एक मजबूत सेतू  तयार करायचा आहे. मला विश्वास आहे की, मणिपूर देशाच्या प्रगतीचे एक खूप मजबूत केंद्र बनेल.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या विकास प्रकल्पांसाठी खूप खूप अभिनंदन.

माझ्यासोबत म्हणा - भारत माता की जय.

भारत माता की जय.

भारत माता की जय.

खूप खूप धन्यवाद.

***

हर्षल अकुडे / सुवर्णा बेडेकर / शैलेश पाटील / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2166484)