गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह 16 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल (एएनटीएफ) प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे करणार उद्घाटन
Posted On:
13 SEP 2025 6:03PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह 16 सप्टेंबर 2025 रोजी मंगळवारी नवी दिल्लीत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल एएनटीएफ) प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या प्रसंगी अमित शहा अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) चा 2024 या वर्षीचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करतील आणि ऑनलाईन अंमली पदार्थ विल्हेवाट मोहिमेचा प्रारंभ करतील. ही परिषद 16 आणि 17 सप्टेंबर रोजी होणार असून, 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या एएनटीएफ प्रमुखांसोबतच अन्य शासकीय विभागांतील संबंधित हितधारकही परिषदेला उपस्थित राहतील.
ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “नशामुक्त भारत” या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने एक रणनीतिक व्यासपीठ ठरेल. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाद्वारे आयोजित या परिषदेची संकल्पना “एकत्रित निर्धार, सामायिक जबाबदारी ही आहे. या परिषदेत देशभरातील विविध संबंधित यंत्रणांच्या अंमली पदार्थविरोधातल्या संयुक्त प्रयत्नांचा सखोल आढावा घेण्यात येईल आणि भावी कृती आराखड्यावर व्यापक चर्चा होईल. शिवाय देशातील अंमली पदार्थांचा पुरवठा, मागणी नियंत्रण आणि हानी कमी करणे या विविध पैलूंवर तसेच त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणामांवर चर्चा केली जाईल. देशातील अंमली पदार्थविरोधी कायद्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारमंथन होणार आहे. याशिवाय, या समस्येचा सामना करण्यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली जाईल.
या कार्यक्रमात नशामुक्त भारत @ 2047, प्रीकर्सर्स, सिंथेटिक ड्रग्स व क्लॅन लॅब्स यासह आठ तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
मोदी सरकारने अंमली पदार्थांविरोधात “शून्य सहनशीलता धोरण” स्वीकारले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2021 मध्ये सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना समर्पित अंमली पदार्थविरोधी कृती दल स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
***
निलिमा चितळे / गजेंद्र देवडा / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166419)
Visitor Counter : 2