वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जीएसटीतील सुधारणा व्यापारासाठी परिवर्तनकारी ठरतील: भारत न्युट्राव्हर्स एक्स्पो 2025 मध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
नव्या दरांचा लाभ ग्राहकांकडे संपूर्णतः हस्तांतरित व्हायला हवा : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
आपण भारतीय उत्पादनांची- मेहनती भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असायला हवे: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
04 SEP 2025 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
भारत न्युट्राव्हर्स एक्स्पो 2025 मध्ये बोलताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले की, न्युट्रास्युटीकल्स उद्योग जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीत काल जाहीर झालेल्या परिवर्तनकारी बदलांचा सर्वाधिक लाभ मिळालेल्या अनेक लाभार्थ्यांपैकी एक आहे. ते पुढे म्हणाले की जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे उपभोग्यतेच्या संदर्भातील मागणीला प्रचंड आणि अभूतपूर्व अशी चालना मिळणार आहे. उद्योगक्षेत्र आता सर्वासाठीच लाभदायी स्थिती निर्माण करत अधिक मोठ्या प्रमाणातील विक्रीची आकांक्षा धरू शकते याकडे त्यांनी निर्देश केला. अधिक व्यापक संधींमधून व्यापारांना लाभ होईल मात्र जीएसटीचा संपूर्ण लाभ ग्राहकांकडे हस्तांतरित केला जाईल यावर केंद्रीय मंत्री गोयल यांनी अधिक भर दिला. देशाला सणानिमित्त भेट दिल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
नव्या रचनेंतर्गत, अनेक श्रेणींवरील जीएसटी कमी करून 5% करण्यात आला असून त्यामुळे विविध क्षेत्रांना लक्षणीय बचतीचा लाभ होणार आहे यावर केंद्रीय मंत्री गोयल यांनी अधिक भर दिला. आणि हा बदल मागणीचा सशक्त प्रोत्साहक म्हणून कार्य करेल कारण कमी झालेल्या किंमतीमुळे अधिक वापराला चालना मिळून उद्योगांच्या वाढीला वेग येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जीएसटी दरांमध्ये झालेल्या कपातीमुळे वाचलेला प्रत्येक रुपया ग्राहकांकडे हस्तांतरित केला जाणे आणि भारतीय उत्पादनांची धडाडीने जाहिरात करणे अशी दोन मजबूत वचने उद्योग क्षेत्राने पंतप्रधानांना द्यावीत असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केले.
यामध्ये, त्या उद्योगांची मालकी भारतीय उद्योजकाकडे आहे अथवा परदेशी गुंतवणूकदाराकडे आहे याने फारसा फरक पडत नाही, तर त्या उद्योगांतून निर्माण होणारी उत्पादने भारतात उत्पादित झाली आहेत, त्या प्रक्रियेत भारतीय तरुणांसाठी रोजगार निर्माण झाले आहेत तसेच स्थानिक समुदायांसाठी संधी निर्माण करत ते उद्योग देशाच्या विकास गाथेत योगदान देत आहे हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे आहे ही बाब गोयल यांनी अधोरेखित केली.
एखादी कंपनी भारतात गुंतवणूक करत आहे, नोकऱ्या निर्माण करत आहे, संधींची निर्मिती करत आहे आणि देशाच्या विकास गाथेत योगदान देत आहे असे असेल तर ती कंपनी भारतीय आहे की परदेशी याने फरक पडत नाही यावर केंद्रीय मंत्र्यांनी अधिक भर दिला. भारताच्या मजबूत आर्थिक कामगिरीचा संदर्भ देत, यावर्षी पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 7.8%ची वाढ झाली हे ठळकपणे नमूद केले. जागतिक उलथापालथ आणि अनिश्चिततेचे वातावरण असूनही, भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचे स्थान टिकवून आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करारी नेतृत्वाखाली आपली अर्थव्यवस्था पुढची दोन दशके अशीच आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत एक समृद्ध आणि विकसित राष्ट्राच्या रुपात उदयाला येईल यावर अधिक भर देत, भारताचा जीडीपी 4 ट्रिलीयन डॉलर्सवरुन वाढवून वर्ष 2047 पर्यंत 30 ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत नेण्याच्या सरकारच्या निश्चयाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की न्युट्रास्युटीकल्स क्षेत्राकडून मिळालेल्या मोठ्या पाठबळासह, आणि आरोग्यदायी खाद्य उत्पादनांच्या मदतीने घडलेला तंदुरुस्त आणि निरोगी भारत ही देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163827)
Visitor Counter : 2