पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंगापूरच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेतील निवेदन

Posted On: 04 SEP 2025 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

महामहिम पंतप्रधान वोंग,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांचे सहकारी,

नमस्कार!

पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान वोंग यांच्या पहिल्या भारत भेटीचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. ही भेट आणखी खास आहे कारण यावर्षी आम्ही द्विपक्षीय संबंधांचा साठावा वर्धापनदिन साजरा करत आहोत.

मित्रहो,

गेल्या वर्षी माझ्या सिंगापूर दौऱ्यात आम्ही आमच्या संबंधांना व्यापक सामरिक भागीदारीचा दर्जा दिला होता. या वर्षभरात परस्पर संवाद आणि सहकार्य गतिशील आणि दृढ झाले आहे. 

आज आग्नेय आशिया क्षेत्रात सिंगापूर हा आपला सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. सिंगापूरमधून भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. आमचे संरक्षण संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. लोकांमधील परस्पर संबंध घनिष्ट आणि उत्साहवर्धक आहेत. 

आज आम्ही आमच्या भागीदारीच्या भविष्याचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. आमचे सहकार्य केवळ पारंपरिक क्षेत्रापुरते मर्यादित राहणार नाही. बदलत्या काळानुसार प्रगत उत्पादन, हरित नौवहन, कौशल्यवर्धन, नागरी आण्विक आणि नागरी जल व्यवस्थापन ही क्षेत्रेही आमच्या सहकार्याचे केंद्रबिंदू ठरतील.

आमच्या व्यापाराला गती देण्यासाठी द्विपक्षीय व्यापक आर्थिक सहकार्य करार आणि आसियानच्या मुक्त व्यापार कराराचा कालबद्ध पद्धतीने आढावा घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंधांमध्ये आमची राज्येदेखील महत्त्वपूर्ण भागीदार असतील. जानेवारी महिन्यात राष्ट्रपती थर्मन भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी ओडिशालाही भेट दिली होती. गेल्या वर्षभरात ओडिशा, तेलंगणा, आसाम आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सिंगापूरचा दौरा केला आहे. गुजरातची गिफ्ट सिटी आपल्या शेअर बाजाराला जोडणारा आणखी एक नवा सेतू बनला आहे.

मित्रहो,

गेल्या वर्षी झालेल्या सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारी करारामुळे संशोधन आणि विकासाला नवीन आयाम मिळाला आहे. 'सेमीकॉन इंडिया' परिषदेत सिंगापूरच्या कंपन्यांचा वाढता सहभाग ही खरोखरच मोठी गोष्ट आहे.

चेन्नईमध्ये राष्ट्रीय कौशल्यवर्धन उत्कृष्टता केंद्राच्या उभारणीत सिंगापूर सहयोग करेल. या केंद्रामुळे प्रगत उत्पादन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार होणार आहे.

मित्रांनो,

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष आपल्या भागिदारीचे मजबूत स्तंभ आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम आणि इतर डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात सहयोग वृद्धिंगत करण्याचा निश्चय आम्ही केला आहे. आज अंतराळ क्षेत्रात झालेल्या करारामुळे अंतराळ विज्ञान क्षेत्रातील सहयोगात नवीन अध्याय जोडला जात आहे. आपल्या युवकांच्या प्रतिभेला एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशाने या वर्षाच्या शेवटी ‘भारत - सिंगापूर हॅकेथॉन’ची पुढील फेरी आयोजित केली जाणार आहे. 

‘यूपीआय’ आणि ‘पे नाऊ’ ही आपल्या डिजिटल संपर्क व्यवस्थेची यशस्वी उदाहरणे आहेत. या व्यवस्थेत नवीन 13 भारतीय बॅंका जोडल्या आहेत, ही आनंदाची बाब आहे. 

हरित आणि डिजिटल शिपींग कॉरिडॉर संबंधात आज झालेल्या करारामुळे सागरी क्षेत्रात हरित इंधन पुरवठा साखळी आणि डिजिटल पोर्ट क्लियरंस या गोष्टींना चालना मिळेल. भारत आपल्या बंदर पायाभूत सुविधा विकासासाठी जलद गतीने काम करत आहे. या कामात सिंगापूरचा अनुभव मोलाचा ठरतो आहे. एस पी ए इंटरनॅशनल या सिंगापूरच्या कंपनीने विकसित केलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मीनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज झाले. या सुविधेमुळे भारताची कंटेनर हाताळणी क्षमता आणखी वाढणार आहे.

मित्रांनो,

सिंगापूर आपल्या ‘ॲक्ट इस्ट’ धोरणाचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. आपण आसियान बरोबर सहयोग तसेच हिंद प्रशांत क्षेत्रात शांती आणि स्थिरता अबाधित राखण्याच्या सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी  आपण एकत्र काम करत राहू.

दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी एक चिंतेची बाब आहे. दहशतवदाविरोधात एकजुटीने लढणे हे सर्व मानवतावादी देशांचे कर्तव्य आहे असे आम्ही समजतो. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांप्रती संवेदना, दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईला पाठिंबा दिल्याबद्दल मी पंतप्रधान वॉन्ग आणि सिंगापूर सरकारचे आभार मानतो.

महामहीम,

आपले संबंध राजनैतिकतेच्या पलीकडे जाणारे आहेत.

ही एक अशी भागीदारी आहे जी एका विशिष्ट हेतूने, सामायिक मूल्यांमध्ये रुजलेली, परस्पर हितसंबंधांनी मार्गदर्शित असलेली तसेच शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी समान दृष्टिकोनाने प्रेरित आहे. 

आपल्या या भागीदारीत तुमच्या व्यक्तिगत वचनबद्धतेसाठी मी आपला आभारी आहे. 

खूप खूप धन्यवाद !

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163720) Visitor Counter : 2