पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन
जगाचा भारतावर विश्वास आहे, जगाचा भारताच्या क्षमतांवर विश्वास आहे आणि जग भारतासोबत सेमीकंडक्टर भविष्य घडवण्यास तयार आहे: पंतप्रधान
चिप्स हे डिजिटल हिरे आहेत: पंतप्रधान
पेपरवर्क जितके कमी असेल, तितक्या लवकर वेफरचे काम सुरू होऊ शकेल : पंतप्रधान
भारताची सर्वात लहान चिप लवकरच जगातील सर्वात मोठा बदल घडवून आणेल: पंतप्रधान
तो दिवस दूर नाही जेव्हा जग म्हणेल - याची रचना भारतात झाली आहे, हे भारतात तयार झालेले आहे आणि ते जगासाठी विश्वसनीय आहे : पंतप्रधान
Posted On:
02 SEP 2025 11:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित 'सेमिकॉन इंडिया - 2025' चे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतातील आणि परदेशातील सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीची दखल घेतली. त्यांनी विविध देशांमधील प्रतिष्ठित पाहुणे, स्टार्ट-अपशी संबंधित उद्योजक आणि देशातील विविध राज्यांमधून आलेल्या युवा विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
मोदी म्हणाले की ते काल रात्रीच जपान आणि चीनच्या दौऱ्यावरून परतले आणि आज ते आकांक्षा आणि आत्मविश्वासाने भारलेल्या यशोभूमी येथील सभागृहात प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. तंत्रज्ञानाप्रति आपली रुची नेहमीच नैसर्गिक आणि जगजाहीर असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या जपान भेटीदरम्यान त्यांना जपानचे पंतप्रधान महामहिम शिगेरू इशिबा यांच्यासोबत टोकियो इलेक्ट्रॉन कारखान्याला भेट देण्याची संधी मिळाली. त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज प्रेक्षकांमध्ये उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाकडे असलेला त्यांचा कल त्यांना पुन्हा-पुन्हा अशा लोकांच्या भेटीस घेऊन जातो, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आज प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहून खूप आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जगभरातील 40 ते 50 देशांच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील तज्ञांच्या उपस्थितीची नोंद घेत, मोदी म्हणाले की भारताचा नवोन्मेष आणि युवा शक्ती देखील या कार्यक्रमात ठळकपणे आपले अस्तित्व दाखवून देत आहे. ते म्हणाले की हे अनोखे संयोजन एक स्पष्ट संदेश देते, तो म्हणजे, "जगाचा भारतावर विश्वास आहे, जगाचा भारताच्या क्षमतांवर विश्वास आहे आणि जग भारतासोबत सेमीकंडक्टर भविष्य घडवण्यास तयार आहे". पंतप्रधानांनी सेमीकॉन इंडियामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रतिष्ठित पाहुण्यांचे स्वागत करताना सांगितले की विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासात ते महत्त्वाचे भागीदार आहेत.
अलीकडेच प्रकाशित झालेल्या या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जी डी पी च्या आकडेवारीचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले की भारताने पुन्हा एकदा प्रत्येक अपेक्षेला, प्रत्येक अंदाजाला आणि प्रत्येक भाकिताला मागे टाकले आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था आर्थिक स्वार्थामुळे अनेक चिंता आणि आव्हानांना सामोरे जात असताना भारताने 7.8 टक्के आर्थिक वृद्धी दर गाठला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही वाढ उत्पादकता, सेवा, कृषी आणि बांधकाम क्षेत्रात दृश्यमान असून सगळीकडे उत्साही वातावरण दिसून येत आहे. भारताची जलद वाढ उद्योगांमध्ये आणि प्रत्येक नागरिकामध्ये नवीन ऊर्जा भरत आहे. या वाढीचा मार्ग भारताला विश्वातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने जलदपणे पुढे नेत आहे असे ते म्हणाले. हा वाढीचा प्रवाह भारताला लवकरच जगातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने प्रगती करण्यासाठी प्रवृत्त करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
सेमीकंडक्टर्सच्या या युगात असे नेहमी म्हटले जाते की तेल हे काळे सोने होते, मात्र चिप्स हे डिजिटल हिरे आहेत, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की गेल्या शतकाला तेलाने आकार दिला आणि जगाचे भवितव्य तेलाच्या विहिरी ठरवत असत. या विहिरींमधून किती प्रमाणात तेलाचे उत्खनन केले जाऊ शकते त्यावर जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार अवलंबून असत. मात्र एकविसाव्या शतकातले सामर्थ्य लहान चिप्स मध्ये एकवटलेले आहे असे त्यांनी अधोरेखित केले.
आकाराने लहान असल्या तरी या चिप्समध्ये जागतिक प्रगतीला वेग देण्याची लक्षणीय क्षमता आहे. सेमीकंडक्टरच्या जागतिक बाजारपेठेने आधीच 600 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा पार केला आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारत ज्या वेगाने सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रगती करत आहे त्यानुसार या 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सच्या बाजारपेठेत भारताचा हिस्सा उल्लेखनीय असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत किती वेगाने प्रगती करत आहे हे दाखवण्याची इच्छा असल्याचे सांगताना, पंतप्रधानांनी सांगितले की 2021 मध्ये सेमीकॉन इंडिया कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. 2023 सालापर्यंत भारताचा पहिला सेमीकंडक्टर प्लांट मंजूर झाला होता, 2024 मध्ये आणखी काही प्लांट्सना मंजुरी मिळाली आणि 2025 मध्ये, पाच अतिरिक्त प्रकल्प मंजूर करण्यात आले. सध्या भारतात सेमीकंडक्टरचे दहा प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यात अठरा अब्ज डॉलरपेक्षा जास्त, अर्थात 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आहे. यातून भारतावरील वाढत्या जागतिक विश्वासाचे प्रतिबिंब दिसून येते, असे पंतप्रधान म्हणाले.
सेमीकंडक्टर क्षेत्रात गतीचे महत्व अधोरेखित करताना मोदी म्हणाले, “फाईलपासून कारखान्यापर्यंतचा वेळ जितका कमी असेल आणि कागदपत्रांची संख्या जितकी कमी असेल तितके लवकर वेफर वर्क सुरू होऊ शकेल.” याच दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे यावर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय एकल खिडकी प्रणाली लागू करण्यात आल्यामुळे केंद्र आणि राज्ये दोन्हीकडून सर्व मंजुरी एकाच मंचावर मिळू शकतात. परिणामी, गुंतवणूकदारांना विविध कागदपत्रांपासून मुक्तता मिळाली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. देशभरात प्लग-अँड-प्ले पायाभूत सुविधा मॉडेल अंतर्गत सेमीकंडक्टर पार्क विकसित केले जात आहेत, जे जमीन, वीज पुरवठा, बंदर आणि विमानतळ कनेक्टिव्हिटी आणि कुशल कामगारांच्या समूहाची उपलब्धता यासारख्या सुविधा प्रदान करतात, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. अशा पायाभूत सुविधांची सांगड प्रोत्साहनांसोबत घातल्यावर औद्योगिक वृद्धी अटळ असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पीएलआय प्रोत्साहन असो किंवा संरचना संलग्न अनुदान असो, भारत सर्वतोपरी क्षमता प्रदान करत आहे. म्हणूनच गुंतवणूकीचा ओघ कायम असण्यावर त्यांनी भर दिला. भारत बॅकएंड ऑपरेशन्सच्या पलीकडे जात फूल-स्टॅक सेमीकंडक्टर राष्ट्र बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहे याचा पुनरुच्चार करताना, तो दिवस दूर नाही जेव्हा भारतातील सर्वात लहान चिप जगातील सर्वात मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. ते म्हणाले, "आमचा प्रवास विलंबाने सुरू झाला असला तरी आता आम्हाला कोणीही रोखू शकत नाही." पंतप्रधानांनी माहिती दिली की सीजी पॉवरचा पथदर्शी प्रकल्प 28 ऑगस्ट रोजी, अवघ्या 4-5 दिवसांपूर्वीच सुरू झाला. केन्सचा पथदर्शी प्रकल्प देखील सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मायक्रोन आणि टाटा यांच्याकडून टेस्ट चिप्स चे उत्पादन अगोदरच सुरू झाले असून या वर्षी व्यावसायिक चिप उत्पादन सुरू होईल, जे सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत करत असलेल्या जलद प्रगतीवर प्रकाश टाकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारताची सेमीकंडक्टर यशोगाथा एकाच आधारावर किंवा एकाच तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही यावर भर देताना, देशातील सर्व डिझाइनिंग, उत्पादन, पॅकेजिंग आणि उच्च-तंत्रज्ञान उपकरणांचा समावेश असलेली एक विस्तृत परिसंस्था भारत विकसित करत असल्याचे मोदींनी विशद केले. त्यांनी स्पष्ट केले की सेमीकंडक्टर मिशन फक्त एकच फॅब स्थापित करणे किंवा एकच चिप तयार करण्यापुरते मर्यादित नाही. उलट, भारत एक मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करत आहे ज्यामुळे देश आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होईल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
भारताच्या सेमीकंडक्टर मोहिमेचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य अधोरेखित करताना मोदी म्हणाले की जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानांसोबतच देश या क्षेत्रात प्रगती करत आहे. त्यांनी सांगितले की देशांतर्गत उत्पादन झालेल्या चिप्सद्वारे उदयोन्मुख तंत्रज्ञानांना सक्षम बनवण्यावर भारताचा भर आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की नोएडा आणि बेंगळुरूमध्ये विकसित होत असलेली आरेखन केंद्रे जगातील काही सर्वात प्रगत चिप्सवर काम करत आहेत, जी अब्जावधी ट्रान्झिस्टर साठवण्यास सक्षम आहेत. त्यांनी यावर भर दिला की या चिप्स 21 व्या शतकातील विसर्जित तंत्रज्ञानाला शक्ती देतील. जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रासमोरील आव्हानांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी स्पष्ट केले की भारत त्यावर मात करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. त्यांनी सांगितले की शहरांमध्ये उंच इमारती आणि प्रभावी भौतिक पायाभूत सुविधा दिसत असल्या तरी त्यांचा पाया पोलादाचा असतो. त्याचप्रमाणे भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांचा पाया अत्यावश्यक खनिजांवर उभारला गेला आहे. मोदी म्हणाले की भारत सध्या राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज मोहिमेवर काम करत असून देशांतर्गत दुर्मिळ खनिजांची मागणी पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या चार वर्षांत अत्यावश्यक खनिज प्रकल्पांची लक्षणीय प्रगती झाली आहे.
सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीमध्ये स्टार्ट-अप्स आणि एमएसएमई’ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, याची सरकारला जाणीव असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जगातील सेमीकंडक्टर आरेखन प्रतिभेमध्ये भारताचे 20 टक्के योगदान आहे आणि देशातील युवा हे सेमीकंडक्टर उद्योगासाठी सर्वात मोठ्या मानवी भांडवल कारखान्याचे प्रतिनिधी आहेत. युवा उद्योजक, नवोन्मेषक आणि स्टार्ट-अप्सना संबोधित करताना मोदी यांनी त्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आणि सरकार त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहे याची ग्वाही दिली. आरेखन संलग्न प्रोत्साहन योजना आणि चिप्स-टू-स्टार्टअप कार्यक्रम विशेषतः त्यांच्यासाठीच आरेखित केले आहेत, असे स्पष्ट करून त्यांनी असेही जाहीर केले की आरेखन संलग्न प्रोत्साहन योजनांची उद्दिष्टे अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यांची पुनर्रचना केली जात आहे. पंतप्रधानांनी सांगितले की सरकार या क्षेत्रात भारतीय बौद्धिक संपदा (आयपी) विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे. नुकत्याच सुरू झालेल्या राष्ट्रीय संशोधन निधीमुळे या प्रयत्नांना धोरणात्मक भागीदारीद्वारे पाठिंबा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. अनेक राज्ये सेमीकंडक्टर मोहिमेत सक्रियपणे सहभागी होत आहेत आणि अनेकांनी या क्षेत्रासाठी विशेष धोरणे आखली आहेत, हे लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की ही राज्ये समर्पित पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांनी सर्व राज्यांना सेमीकंडक्टर परिसंस्था तयार करण्यासाठी आणि आपापल्या प्रदेशांमध्ये गुंतवणुकीचे वातावरण वाढवण्यासाठी एकमेकांशी निरोगी स्पर्धा करण्याचे आवाहन केले.
“रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) या मंत्राचा अवलंब करत भारत या टप्प्यावर पोहोचला आहे. पुढील पिढीतील सुधारणांचा नवीन टप्पा लवकरच सुरू केला जाईल,” असे पंतप्रधानांनी नमूद केले, आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या पुढील टप्प्याचे काम सुरू असल्याचा पुनरुच्चार केला. उपस्थित सर्व गुंतवणूकदारांना संबोधित करताना त्यांनी खुल्या मनाने त्यांचे स्वागत करण्याची भारताची तयारी दर्शवली आणि म्हणाले, ‘डिझाइन तयार आहे, मुखवटा संरेखित आहे. आता अचूक अंमलबजावणी आणि मोठ्या प्रमाणात वितरण करण्याची वेळ आली आहे. भारताची धोरणे ही अल्पकालीन संकेत नसून दीर्घकालीन वचनबद्धता आहेत, यावर त्यांनी भर दिला आणि प्रत्येक गुंतवणूकदाराच्या गरजा पूर्ण केल्या जातील याची खात्री दिली. पंतप्रधान म्हणाले, तो दिवस दूर नाही जेव्हा जग म्हणेल - याची रचना भारतात झाली आहे, हे भारतात तयार झालेले आहे आणि ते जगासाठी विश्वसनीय आहे. भारताच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल, प्रत्येक भाग नवोन्मेषाने भारलेला राहील आणि प्रवास त्रुटीमुक्त आणि उच्च कार्यक्षमतेचा असेल, अशी आशा व्यक्त करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, जितिन प्रसाद, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
सेमीकॉन इंडिया - 2025 ही 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय परिषद, भारतात मजबूत, लवचिक आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाची प्रगती, सेमीकंडक्टर फॅब या विषयावरील सत्रे, आणि प्रगत पॅकेजिंग प्रकल्प, पायाभूत सुविधांची तयारी, स्मार्ट उत्पादन, संशोधन आणि विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवोन्मेष, गुंतवणुकीच्या संधी, राज्यस्तरीय धोरण अंमलबजावणी, या आणि इतर विषयांवरील सत्रांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, या कार्यक्रमात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह (DLI) योजनेअंतर्गत उपक्रम, स्टार्टअप परीसंस्थेची वाढ, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रासाठीच्या भविष्यातील रोडमॅपवर प्रकाश टाकला जाईल.
या कार्यक्रमात 20,750 पेक्षा जास्त लोक सहभागी होत असून, यात 48 पेक्षा जास्त देशांचे 2,500 पेक्षा जास्त प्रतिनिधी, 50 पेक्षा जास्त जागतिक नेते, आणि 350 प्रदर्शक, यासह, 150 पेक्षा जास्त वक्त्यांचा समावेश आहे. यामध्ये 6 देशांची गोलमेज चर्चा, वर्कफोर्स डेव्हलपमेंट आणि स्टार्ट-अपसाठी कंट्री पॅव्हेलियन आणि डेडिकेटेड पॅव्हेलियन, या आणि इतर कार्यक्रमांचा समावेश आहे.
***
माधुरी पांगे / सुषमा काणे / भक्ती सोनटक्के / वासंती जोशी / नंदिनी मथुरे / राजश्री आगाशे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163059)
Visitor Counter : 9
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam