पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते 2 सप्टेंबरला नवी दिल्लीतील यशोभूमी येथे ‘सेमिकॉन इंडिया - 2025’ चे होणार उद्घाटन


पंतप्रधान 3 सप्टेंबरला सेमिकॉन इंडियामध्ये सीईओ गोलमेज बैठकीतही सहभागी होणार, सेमिकॉन इंडिया - 2025 भारतात मजबूत आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देणार

परिषदेत सेमीकंडक्टर फॅब्स, अॅडव्हान्स्ड पॅकेजिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन व विकास, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि गुंतवणूक संधींवर लक्ष केंद्रित केले जाणार

48 हून अधिक देशांमधून 2,500 हून अधिक प्रतिनिधी होणार सहभागी

Posted On: 01 SEP 2025 3:30PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील यशोभूमी इथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी आयोजित सेमिकॉन इंडिया - 2025’ चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून या परिषदेत सहभागी होतील.  यात ते सीईओ गोलमेज बैठकीतही भाग घेतील.  2 ते 4 सप्टेंबर या तीन दिवसांच्या परिषदेत भारतात मजबूत, लवचिक आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाईल. यामध्ये सेमिकॉन इंडिया कार्यक्रमातील प्रगती, सेमीकंडक्टर फॅब आणि प्रगत पॅकेजिंग प्रकल्प, पायाभूत सुविधांची तयारी, स्मार्ट उत्पादन, संशोधन आणि विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यातील नवे शोध, गुंतवणूक संधी, राज्यस्तरीय धोरणांची अंमलबजावणी यासारख्या विषयांवर सत्रे आयोजित केली जातील. याशिवाय, डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (डीएलआय) योजनेअंतर्गत उपक्रम, स्टार्टअप परिसंस्थेची वाढ, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भविष्यातला आराखडा यावरही प्रकाश टाकला जाईल. या परिषदेत 20,750 हून अधिक सहभागी उपस्थित राहतील, यामध्ये 48 हून अधिक देशांमधले 2,500 हून अधिक प्रतिनिधी, 50 हून अधिक जागतिक नेत्यांसह 150 हून अधिक वक्ते आणि 350 हून अधिक प्रदर्शकांचा समावेश आहे. याशिवाय, 6 देशांच्या गोलमेज चर्चा, देशांची पॅव्हिलियन्स, तसेच कामगार विकास आणि स्टार्टअप्ससाठी समर्पित विशेष पॅव्हिलियन्स यांचाही समावेश असेल. सेमीकंडक्टर क्षेत्रातील तांत्रिक प्रगती आणि विविध देशांच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला बळकट करण्याच्या धोरणांचा जास्तीत जास्त प्रचार करणे हे जागतिक स्तरावर आयोजित सेमिकॉन परिषदांचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांच्या भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि तंत्रज्ञान विकासाचे केंद्र म्हणून प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनाला पुढे नेत, 2022 मध्ये बेंगळुरू, 2023 मध्ये गांधीनगर आणि 2024 मध्ये ग्रेटर नोएडा येथे अशा परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या.

***

शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2162769) Visitor Counter : 2