पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चीनमधील तियानजिन येथील पंचविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

Posted On: 01 SEP 2025 11:53AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिनांक 31 ऑगस्ट ते 1  सप्टेंबर 2025 दरम्यान चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) राष्ट्रप्रमुखांच्या पंचविसाव्या बैठकीत सहभाग झाले आहेत. या शिखर परिषदेत एससीओचे विकासविषयक धोरण, जागतिक प्रशासनात करण्याच्या सुधारणा, दहशतवाद विरोधी धोरण, शांतता आणि सुरक्षा, आर्थिक आणि वित्तीय सहकार्य आणि शाश्वत विकास यावर सफल चर्चा झाली.

या शिखर परिषदेला संबोधित करताना, पंतप्रधानांनी एससीओच्या चौकटीअंतर्गत एकमेकांतील सहकार्य मजबूत करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. भारत सुरक्षा, दळणवळण आणि संधी या तीन स्तंभांखाली अधिक कृतिशील राहू इच्छितो, असे या संदर्भात बोलताना त्यांनी नमूद केले. शांतता, सुरक्षा आणि स्थिरता ही प्रगती आणि समृद्धीसाठी महत्त्वाची आहे यावर भर देत, त्यांनी सदस्य देशांना सर्वप्रकारच्या स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दृढ आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना वित्तपुरवठा आणि कट्टरतावादाच्या विरोधात संयुक्तपणे  कारवाई करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सदस्य देशांनी दाखवलेल्या एकतेबद्दल आभार मानत, दहशतवादाशी सामना करताना कोणतेही दुहेरी निकष नसावेत यावर त्यांनी भर दिला आणि सीमेपलीकडून दहशतवाद घडवून आणणाऱ्या आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरण्याचे आवाहन गटाला केले.

विकासाला चालना देण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची भूमिका अधोरेखित करताना,पंतप्रधानांनी सांगितले की भारताने चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक क्षेत्र या सारख्या प्रकल्पांना भक्कमपणे पाठिंबा दिला आहे. एससीओ छत्राखाली,ज्यांचा पाठपुरावा करायची आवश्यकता आहे; अशा स्टार्ट-अप्स, नवोन्मेष, युवा सक्षमीकरण आणि सामायिक परंपरागत वारसा या क्षेत्रातील संधींवरही पंतप्रधानांनी भाष्य केले.पंतप्रधानांनी लोकांचे आपापसातील संबंध आणि सांस्कृतिक समज वाढविण्यासाठी या समूहाअतर्गत  एक सभ्यता संवाद मंच सुरू करण्याचाही प्रस्ताव मांडला.

पंतप्रधानांनी समूहाच्या सुधारणा-केंद्रित धोरणाला पाठिंबा दर्शविला. या संदर्भात, त्यांनी संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर सुरक्षा हाताळण्यासाठी केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेचे स्वागत केले. संयुक्त राष्ट्रांसह विविध संस्थांमध्ये सुधारणा करण्यासाठी समूहाने असाच दृष्टिकोन बाळगावा असेही  आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले.

पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल [लिंक]

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अत्यंत जिव्हाळ्याने केलेल्या आतिथ्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांची प्रशंसा केली. त्यांनी एससीओचे पुढील अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल किर्गिस्तानचे देखील अभिनंदन केले. शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी, एससीओ सदस्य देशांनी तियानजिन घोषणापत्राचा  स्वीकार केला.

***

सोनल तुपे / संपदा पाटगावकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2162650) Visitor Counter : 2