गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आसाममध्ये गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्र विंगचे केले उद्घाटन,322 कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांचे दूरस्थ पद्धतीने केले उद्घाटन आणि पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत ईशान्य भारताचा अभूतपूर्व विकास झाला असून या प्रदेशाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अकरा वर्षांचा हा कालखंड सुवर्णाक्षरात लिहिला जाईल असे अमित शाह यांचे गौरवोद्गार
संपूर्ण जग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करत असताना, विरोधी पक्ष नेत्याने द्वेष आणि तिरस्काराचे नकारात्मक राजकारण सुरू केल्याची अमित शाह यांची टीका
विरोधी पक्षनेत्याने पंतप्रधान, त्यांच्या दिवंगत मातोश्री आणि देशातील जनतेची माफी मागावी: अमित शाह
Posted On:
29 AUG 2025 9:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज आसाममध्ये गुवाहाटी येथे राजभवनात ब्रह्मपुत्र विंगचे उद्घाटन केले आणि दूरस्थ पद्धतीने 322 कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत ईशान्य भारताचा अभूतपूर्व विकास झाला आहे. ईशान्य भारताचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील ही अकरा वर्षे सुवर्णाक्षरात लिहिली जातील. ते म्हणाले की, गेल्या अकरा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
अमित शाह म्हणाले की, आज संपूर्ण जगात भारताबरोबरच आपल्या पंतप्रधानांचा सन्मान वाढला असून, 27 देशांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. ते म्हणाले की, एकीकडे संपूर्ण जग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करते, तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याने द्वेष आणि तिरस्काराचे नकारात्मक राजकारण सुरू केले आहे. ते म्हणाले की, बिहारमधील एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरून अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे. शाह म्हणाले की, विरोधकांनी प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधानांविरोधात अपशब्द वापरले आहेत आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, पण तरीही यामधून ते काही शिकले नाहीत. कोणत्याही लोकशाही राष्ट्रात निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा असतो, आणि जर घुसखोरांनी मतदार यादीत घुसून निवडणुका दूषित केल्या, तर कोणताही देश सुरक्षित राहू शकत नाही, असे ते म्हणाले. प्रमुख विरोधी पक्षाने सुरू केलेल्या वाईट प्रयत्नांकडे संपूर्ण देशातील जनता धक्का आणि निराशेने पाहत असून, त्यांच्या या प्रयत्नांना जनाधार मिळणार नाही, असे ते म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी जे घडले त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याने यासाठी पंतप्रधान, त्यांच्या दिवंगत मातोश्री आणि देशातील जनतेची माफी मागावी, असे अमित शाह म्हणाले.
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162089)
Visitor Counter : 15