पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद, गुजरात येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण


सुदर्शन चक्रधारी मोहन आणि चरखाधारी मोहन यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत भारत आज अधिक सामर्थ्यशाली होत आहे: पंतप्रधान

आज दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार कुठेही लपले असले तरी त्यांना सोडले जात नाही: पंतप्रधान

आमचे सरकार लघु उद्योजक, शेतकरी किंवा पशुपालकांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही: पंतप्रधान

आज गुजरातच्या भूमीवर प्रत्येक प्रकारचा उद्योग विस्तारत आहे: पंतप्रधान

नव-मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय अशा दोघांनाही सक्षम करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे: पंतप्रधान

या दिवाळीत, व्यापारी समुदाय असो किंवा इतर कुटुंबे, सर्वांना आनंदाचा दुहेरी बोनस मिळेल: पंतप्रधान

सणांच्या काळात केली जाणारी सर्व खरेदी, भेटवस्तू आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू मेड इन इंडिया असू द्या: पंतप्रधान

Posted On: 25 AUG 2025 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे 5,400 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, संपूर्ण देश सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाने भरलेला आहे. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज गुजरातच्या प्रगतीशी जोडलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे. त्यांनी सांगितले की, अनेक प्रकल्प जनतेच्या चरणी समर्पित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि या विकास उपक्रमांसाठी त्यांनी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन केले.

या पावसाळ्यात गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे आणि भारतातील काही ठिकाणी ढगफुटी होत आहे हे लक्षात घेऊन मोदी यांनी सर्व बाधित कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली. निसर्गाचा हा प्रकोप संपूर्ण देशासाठी एक आव्हान बनला आहे असे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधून मदत आणि बचाव कार्यात सक्रियपणे सहभागी आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

गुजरात ही दोन मोहनांची भूमी आहे हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी पहिल्याचा उल्लेख सुदर्शन चक्राचे धारक - द्वारकाधीश श्रीकृष्ण असा केला. दुसऱ्याचे वर्णन त्यांनी चरख्याचे वाहक - साबरमतीचे संत, पूज्य बापू असे केले. "सुदर्शन चक्रधारी मोहन आणि चरखाधारी मोहन यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून भारत आज अधिक सामर्थ्यशाली होत आहे", असे मोदी म्हणाले.

सुदर्शन-चक्रधारी मोहन यांनी आपल्याला राष्ट्र आणि समाजाचे रक्षण कसे करायचे हे शिकवले असे प्रतिपादन त्यांनी केले. पाताळातही शत्रूंना शिक्षा करण्यास सक्षम असणारे सुदर्शन चक्र न्याय आणि सुरक्षेची ढाल बनले. आज भारताच्या निर्णयांमध्ये अशीच भावना प्रतिबिंबित होते, असे त्यांनी स्पष्ट केले. आज भारत दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या सूत्रधारांना सोडत नाही, मग ते कुठेही लपले तरी, असे मोदी म्हणाले. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला कसा घेतला हे जगाने पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि सुदर्शन-चक्रधारी मोहन यांच्या प्रेरणेने देशाच्या दृढनिश्चयाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वदेशीच्या माध्यमातून भारताच्या समृद्धीचा मार्ग दाखविणारे चरखाधारी मोहन - पूज्य बापू - यांच्या वारशाचे स्मरण करून पंतप्रधानांनी नमूद केले की साबरमती आश्रम बापूंच्या नावाने अनेक दशके सत्ता उपभोगणाऱ्या पक्षाच्या कृती आणि निष्क्रियतेचा साक्षीदार आहे. त्यांनी विचारणा केली की स्वदेशीचा मंत्र घेऊन त्या पक्षाने काय केले ? साठ ते पासष्ट वर्षे देशावर राज्य करणाऱ्या, भारताला परदेशी राष्ट्रांवर अवलंबून ठेवणाऱ्या पक्षावर टीका करताना मोदी यांनी आरोप केला की आयातीत फेरफार करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला चालना देण्यासाठी हे केले जात होते. पंतप्रधानांनी सांगितले की आज भारताने आत्मनिर्भरतेला विकसित राष्ट्र उभारणीचा पाया बनवले आहे. शेतकरी, मच्छिमार, पशुपालक आणि उद्योजकांच्या बळावर भारत या मार्गावर वेगाने प्रगती करत आहे, असे सांगत मोदी यांनी गुजरातमध्ये मोठ्या संख्येने पशुपालक आहेत यावर भर दिला. ते म्हणाले की भारताचे दुग्ध क्षेत्र हा ताकदवान स्रोत आहे आणि त्याने या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवले आहे. आर्थिक स्वार्थापोटी चालणारे राजकारण जग पाहत आहे, असा इशारा पंतप्रधानांनी दिला. अहमदाबादच्या मातीतून मोदी यांनी सांगितले की लघु उद्योजक, दुकानदार, शेतकरी आणि पशुपालकांचे कल्याण त्यांच्यासाठी सर्वतोपरी आहे. त्यांनी आश्वासन दिले की त्यांचे सरकार लघु उद्योजक, शेतकरी किंवा पशुपालकांच्या हिताचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही.

"आत्मनिर्भर भारत मोहिमेला गुजरात प्रचंड गती देत आहे. ही प्रगती दोन दशकांच्या समर्पित प्रयत्नांचे परिणाम आहेत", असे मोदी यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, आजच्या तरुणांनी असे दिवस पाहिलेले नाहीत जेव्हा या प्रदेशात वारंवार संचारबंदी लागत असे. व्यापार आणि व्यवसाय करणे अत्यंत कठीण असायचे, याची आठवण करून देत पंतप्रधानांनी नमूद केले की, वातावरण अशांततेचे होते. तथापि त्यांनी अधोरेखित केले की आज अहमदाबाद देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे आणि हे परिवर्तन शक्य करण्याचे श्रेय तेथील लोकांना जाते.

गुजरातमध्ये निर्माण झालेल्या शांतता आणि सुरक्षिततेच्या वातावरणाचे राज्यभर सकारात्मक परिणाम होत आहेत हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले की, “आज गुजरातमध्ये सर्व प्रकारचे उद्योग विस्तारत आहेत”. उत्पादन केंद्र म्हणून गुजरात उदयास येत असून संपूर्ण राज्याला त्याचा अभिमान वाटतो. दाहोद येथील रेल्वे कारखान्यात शक्तिशाली इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिने तयार केली जात आहेत, त्या ठिकाणच्या त्यांच्या अलिकडच्या भेटीची आठवण करून देताना मोदी यांनी नमूद केले की गुजरातमध्ये बनवलेले मेट्रो कोच आता इतर देशांमध्ये निर्यात केले जात आहेत. त्यांनी पुढे सांगितले की गुजरातमध्ये मोटारसायकली आणि मोटारींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या राज्यात कारखाने उभारत आहेत. गुजरातने आधीच विविध विमान घटकांचे उत्पादन आणि निर्यात करायला सुरुवात केली आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी जाहीर केले की वडोदराने आता वाहतूक विमानांचे उत्पादन सुरू केले आहे. 

गुजरात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे एक प्रमुख केंद्र बनत आहे यावर भर देऊन पंतप्रधानांनी सांगितले की ते उद्या हंसलपूरला भेट देणार आहेत जिथे इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतील एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू होत आहे. सेमीकंडक्टरशिवाय आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवता येत नाहीत हे अधोरेखित करून मोदी म्हणाले की गुजरात सेमीकंडक्टर क्षेत्रात एक प्रमुख नाव बनण्यास सज्ज आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की गुजरातने कापड, रत्ने आणि दागिन्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की औषध उत्पादन क्षेत्रात - औषधे आणि लसींसह - देशाच्या निर्यातीपैकी जवळपास एक तृतीयांश निर्यात गुजरातमधून होते.

"भारत सौर, पवन आणि अणुऊर्जा क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे आणि या प्रगतीत गुजरातचे योगदान सर्वाधिक आहे", हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. गुजरात हरित ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्सचे प्रमुख केंद्र म्हणूनही उदयास येत आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या पेट्रोकेमिकल गरजा पूर्ण करण्यात गुजरातची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. प्लास्टिक उद्योग, कृत्रिम धागे, खते, औषधे, रंग उद्योग आणि सौंदर्यप्रसाधने - हे सर्व उद्योग पेट्रोकेमिकल क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत हे लक्षात आणून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की गुजरातमध्ये पारंपरिक उद्योगांचा विस्तार होत आहे आणि नवीन उद्योग स्थापन होत आहेत. हे सर्व प्रयत्न आत्मनिर्भर भारत उपक्रमाला बळकटी देत आहेत, असेही ते म्हणाले. ही वाढ गुजरातच्या तरुणांसाठी सतत रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे, असे त्यांनी सांगितले.

उद्योग असो, शेती असो किंवा पर्यटन असो - सर्वच क्षेत्रांसाठी उत्कृष्ट संपर्क सुविधा आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 20-25 वर्षांत गुजरातच्या संपर्क सुविधेत संपूर्ण परिवर्तन झाले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. आज अनेक रस्ते आणि रेल्वेशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. सरदार पटेल रिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्कुलर रोड आता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत असून तो सहा पदरी रस्त्यात विकसित केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या विस्तारीकरणामुळे शहरातील सर्वाधिक गर्दी असलेल्या भागात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल यावर त्यांनी भर दिला. विरमगाम-खुद्रद-रामपुरा रस्त्याच्या रुंदीकरणामुळे या भागातील शेतकरी आणि उद्योगांना फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. नव्याने बांधलेले अंडरपास आणि रेल्वे ओव्हरब्रिजमुळे शहराची संपर्क सुविधा आणखी सुधारेल, असे त्यांनी नमूद केले.

एक काळ असा होता की जेव्हा या भागात केवळ जुन्या लाल रंगाच्या बसेस चालत असत, पण आज बीआरटीएस जनमार्ग आणि वातानुकूलित-इलेक्ट्रिक बसेस आधुनिक सुविधा घेऊन आल्या आहेत, अशी आठवण त्यांनी करून दिली. मेट्रो रेल्वेचे जाळे देखील वेगाने विस्तार होत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. यामुळे अहमदाबादच्या नागरिकांचा प्रवास सुलभ झाला आहे, असे त्यांनी सांगितले. गुजरातमधील प्रत्येक शहर एका मोठ्या औद्योगिक कॉरिडॉरने वेढलेले आहे, असे त्यांनी नमूद केले. परंतु, दहा वर्षांपूर्वीपर्यंत बंदरे आणि अशा औद्योगिक समूहांमध्ये योग्य रेल्वे संपर्क व्यवस्थेचा अभाव होता, हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर आपण गुजरातमधील या समस्येवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, असे ते म्हणाले. गेल्या अकरा वर्षांत, जवळजवळ संपूर्ण राज्यात 3,000 किलोमीटरचे नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात आले आहेत, आणि गुजरातमधील रेल्वेच्या संपूर्ण जाळ्याचे आता पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. गुजरातसाठी आज जाहीर केलेले रेल्वे प्रकल्प शेतकरी, उद्योग आणि यात्रेकरू या सर्वांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरी गरिबांना सन्मानाचे जीवन देण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे हे स्पष्ट करताना, पंतप्रधान मोदी यांनी ‘रामापीर नो टेकरो’ हा या वचनबद्धतेचा थेट पुरावा असल्याचे सांगितले. पूज्य बापूंनी नेहमीच गरिबांच्या प्रतिष्ठेवर भर दिला होता याचे पंतप्रधानांनी स्मरण केले आणि साबरमती आश्रमाजवळ बांधण्यात आलेली नवीन घरे या दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहेत, असे त्यांनी सांगितले. गरिबांसाठी 1,500 कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे म्हणजे असंख्य नवीन स्वप्नांची पायाभरणी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आगामी नवरात्रीत आणि दिवाळीत या घरांमध्ये राहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणखी वाढेल, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासोबतच, पूज्य बापूंना खरी श्रद्धांजली म्हणून बापूंच्या आश्रमाचे नूतनीकरण देखील सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधानांनी सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळा उभारणीचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर आपण साबरमती आश्रमाचे नूतनीकरण साध्य केले आहे असे त्यांनी नमूद केले. ज्याप्रमाणे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे देश आणि जगासाठी प्रेरणेचे केंद्र बनले आहे, त्याचप्रमाणे साबरमती आश्रमाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर ते जागतिक शांततेचे सर्वात मोठे प्रतीक बनेल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर साबरमती आश्रम शांततेसाठी जगातील सर्वात मोठे प्रेरणास्थान म्हणून उदयास येईल, हे आपले शब्द सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

"कामगारांच्या कुटुंबांसाठी चांगले जीवन सुनिश्चित करणे हे आपल्या सरकारचे मुख्य ध्येय आहे", असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये झोपडपट्टीवासीयांसाठी कायमस्वरूपी प्रवेशद्वार असलेल्या सोसायटी बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता, यांची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. गेल्या काही वर्षांत असे असंख्य गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले आहेत, झोपडपट्ट्यांच्या जागी सन्माननीय निवास स्थाने उभी राहिली आहेत आणि हे अभियान असेच सुरू राहणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

“मी उपेक्षितांची पूजा करतो” हे अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, शहरी गरिबांचे जीवनमान सुधारणे हे आपल्या सरकारचे प्रमुख प्राधान्य आहे. पूर्वी रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाले दुर्लक्षित होते, हे त्यांनी लक्षात आणून दिले. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत, देशभरातील सुमारे सत्तर लाख फेरीवाले आणि हातगाडा चालवणाऱ्यांना बँकांकडून आर्थिक मदत मिळाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गुजरातमधील लाखो लाभार्थ्यांनाही या उपक्रमाद्वारे मदत मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मागील अकरा वर्षांत 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे तसेच जागतिक आर्थिक संस्थांमध्ये याची चर्चा आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या व्यक्तींनी देशात नवीन मध्यमवर्गाच्या उदयाला हातभार लावला आहे, असेही त्यांनी नमूद केले. "आपले सरकार नवमध्यमवर्ग आणि पारंपरिक मध्यमवर्ग दोघांनाही सशक्त बनवण्यासाठी निरंतर काम करत आहे", असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. सरकार आता वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करत आहे, अशी घोषणा त्यांनी केली. या सुधारणा लघु उद्योजकांना सहाय्यक ठरतील आणि अनेक वस्तूंवरील कर कमी होतील, असे ते म्हणाले. या दिवाळीत देशभरातील व्यापारी समुदाय आणि देशातील कुटुंबांना आनंदाचा दुहेरी बोनस मिळेल, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत वीज देयके शून्यावर आणली जात आहेत, हे अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की गुजरातमधील सुमारे सहा लाख कुटुंबे आधीच या योजनेत सामील झाली आहेत. केवळ गुजरातमधील या कुटुंबांना सरकारने 3,000 कोटी रुपयांहून अधिक निधी दिला आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या वीज बिलांमध्ये लक्षणीय मासिक बचत होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. 

पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबाद शहर आता स्वप्न आणि संकल्पांचे शहर बनत असल्याचे सांगितले. एकेकाळी अहमदाबादची थट्टा करत त्याला “गर्दाबाद” म्हटले जात असे, असे त्यांनी स्मरण केले. उडणारी धूळ आणि घाण हेच या शहराचे दुर्दैव झाले होते, असे सांगत त्यांनी आज अहमदाबाद स्वच्छतेबद्दल राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याचे श्रेय अहमदाबादच्या प्रत्येक नागरिकाच्या सामूहिक प्रयत्नांना आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की आजची तरुण पिढी साबरमती नदीची जुनी अवस्था,जेव्हा ती एखाद्या कोरड्या गटारासारखी दिसत असे,ती त्यांनी पाहिलेली नाही. अहमदाबादकरांनी ही परिस्थिती बदलण्याचा संकल्प केला आणि आज साबरमती रिव्हरफ्रंट हे शहराच्या अभिमानाचे प्रतीक बनले आहे. कांकरीया तलाव एकेकाळी गवतामुळे हिरवा आणि दुर्गंधीयुक्त होत असे, त्यामुळे आजूबाजूला चालणेही कठीण झाले होते. ही जागा असामाजिक घटकांचे ठिकाण बनली होती. पण आज तोच तलाव उत्तम पर्यटनस्थळात बदलला आहे. बोटिंग आणि किड्स सिटीमुळे मुलांसाठी आनंद आणि शिक्षण एकत्र अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  कांकरीया कार्निव्हल आता अहमदाबादची नवी ओळख ठरत आहे. या सर्व घडामोडी अहमदाबादचा बदललेला चेहरा प्रतिबिंबित करतात असे पंतप्रधानांनी सांगितले.

अहमदाबाद मोठे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी नमूद केले की अहमदाबाद युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणून मान्यता प्राप्त आहे. ऐतिहासिक दरवाजे, साबरमती आश्रम आणि समृद्ध वारसा यामुळे अहमदाबाद जागतिक नकाशावर चमकत आहे. आधुनिक व नाविन्यपूर्ण पर्यटनाच्या नव्या संधी जलद गतीने वाढत आहेत. अहमदाबाद आता कॉन्सर्ट इकॉनॉमीचेही प्रमुख केंद्र ठरत आहे. नुकत्याच झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टने जागतिक लक्ष वेधले. एक लाख क्षमतेचे अहमदाबादचे स्टेडियम मोठे आकर्षण ठरत असून मोठ्या संगीत कार्यक्रमांसोबतच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची शहराची क्षमता अधोरेखित करते.

नवरात्र, विजयादशमी, धनत्रयोदशी व दिवाळी या सणांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की हे सण केवळ सांस्कृतिक उत्सव नसून आत्मनिर्भरतेचे उत्सव म्हणूनही पाहिले पाहिजेत. त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केले की या सणांमध्ये खरेदी केलेले सर्व वस्तू, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू या मेड इन इंडिया असाव्यात. खरी भेट तीच जी भारतात तयार झाली आहे, असे सांगत त्यांनी दुकानदारांनाही भारतीय उत्पादने अभिमानाने विक्री करण्याचे आवाहन केले. या छोट्या पण महत्त्वपूर्ण पावलांमुळे हे सण भारताच्या समृद्धीचे भव्य उत्सव ठरतील, असे त्यांनी सांगितले. विकासात्मक उपक्रमांबद्दल सर्व नागरिकांचे अभिनंदन करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा व संपर्क व्यवस्थेच्या बांधिलकीनुसार, राष्ट्राला  1,400 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. यात मेहसाणा–पालनपूर रेल्वे मार्गाचे 65 कि.मी. दुपदरीकरण (530 कोटी रुपये), कलोल–कडी–काटोसण रोड (37 कि.मी.) व बेचराजी–रणुज (40 कि.मी.) रेल्वे मार्गांचे गेज रूपांतर (860 कोटी रुपये) समाविष्ट आहे. ब्रॉड-गेज क्षमतेमुळे हे प्रकल्प प्रवाशांना अधिक सुरक्षित व अखंड प्रवासाचा अनुभव देतील, तसेच व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल. काटोसण रोड–साबरमती प्रवासी गाडीचे  उद्घाटन धार्मिक स्थळांपर्यंतची पोहोच सुलभ करेल, तर बेचराजी येथून सुरू होणारी मालवाहू गाडी राज्यातील औद्योगिक केंद्रांना अधिक मजबूत जोडणी देईल व रोजगार संधी निर्माण करेल.

वाहतूक सुरक्षितता व  संपर्क वाढवण्यासाठी  पंतप्रधानांनी विरमगाम–खुडाद–रामपूरा मार्गाचे रुंदीकरण, अहमदाबाद–मेहसाणा–पालनपूर मार्गावरील सहा लेन वाहन अंडरपास, अहमदाबाद–विरमगाम मार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिज यांसह अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन केले. हे प्रकल्प औद्योगिक वाढीस, वाहतुकीच्या कार्यक्षमतेस आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला गती देतील.

वीज क्षेत्राला मोठी चालना देत, पंतप्रधानांनी उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेड (यूजीव्हीसीएल) अंतर्गत अहमदाबाद, मेहसाणा व गांधीनगर येथील 1000 कोटी रुपयांच्या वितरण प्रकल्पांचे उद्घाटन केले. हे प्रकल्प वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह करतील.

पीएमएवाय (यू) अंतर्गत रामापीर नो टेकरोच्या सेक्टर 3 मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले. अहमदाबादभोवती सरदार पटेल रिंग रोडवरील रुंदीकरण प्रकल्प, पाणी व मलनिस्सारण व्यवस्थेसाठीच्या महत्वाच्या शहरी पायाभूत प्रकल्पांचे भूमिपूजनही पंतप्रधानांनी केले.

गुजरातमधील प्रशासनिक कार्यक्षमता व सार्वजनिक सेवा वितरण सशक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. अहमदाबाद पश्चिम येथे नागरिक केंद्रित सेवा सुधारण्याच्या उद्देशाने  नवी मुद्रांक व नोंदणी इमारत आणि गांधीनगर येथे राज्यस्तरीय डेटा स्टोरेज सेंटर उभारण्याचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यामुळे सुरक्षित डेटा व्यवस्थापन आणि डिजिटल गव्हर्नन्स क्षमता अधिक मजबूत होणार आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

आशिष सांगळे/नं‍दिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160978)