पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

Posted On: 23 AUG 2025 11:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑगस्‍ट 2025

 

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे साथीदार, इस्रो आणि अंतरिक्ष क्षेत्रातील सर्व शास्त्रज्ञ, अभियंते आणि माझ्या प्रिय देशवासीयांनो !

आपणा सर्वांना राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! ‘आर्यभट्टापासून गगनयानापर्यंत’ ही यावेळच्या अंतराळ दिनाची संकल्पना आहे. यामध्ये गतकाळाचा आत्मविश्वास आणि भविष्याचा संकल्प या दोन्हीचा समावेश आहे. आता आपल्याला माहिती आहेच की एवढ्या कमी वेळातच राष्ट्रीय अंतराळ दिवस आपल्या युवकांमध्ये उत्साह आणि आकर्षणाचे निमित्त बनला आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे . अंतराळ विज्ञान क्षेत्राशी संबंधित सर्वांना , शास्त्रज्ञांना, सर्व युवकांना माझ्याकडून राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नुकतेच भारताने अंतराळ विज्ञान आणि अंतराळ भौतिकी यांच्या आंतरराष्ट्रीय ओलंपियाडचे आयोजन केले. या स्पर्धेत जगातील साठहून अधिक देशांमधील जवळपास 300 पेक्षा जास्त तरुणांनी भाग घेतला. भारतीय तरुणांनी पदकेही जिंकली. हे ऑलिम्पियाड म्हणजे अंतराळ क्षेत्रातील भारताच्या उभरत्या नेतृत्वाचे प्रतीक आहे. 

मित्रहो, 

युवकांमध्ये अंतराळ विज्ञानाबाबतची आवड वाढावी म्हणून भारतीय अंतराळ हॅकेथान आणि रोबोटिक्स चॅलेंज यासारख्या गोष्टी इस्रोने सुरू केल्या याचा मला आनंद वाटतो. या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच विजेत्यांचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. 

मित्र हो,

अंतराळ क्षेत्रात एकापेक्षा एक नवनवे मैलाचे दगड गाठणे हे भारत आणि भारतातील शास्त्रज्ञांच्या अंगवळणी पडले आहे. दोन वर्षांपूर्वीच भारत असा पहिला देश म्हणून गणला गेला, ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचा इतिहास रचला. आपण अंतराळामध्ये डॉकिंग आणि अन्डॉकिंग करण्याची क्षमता असणाऱ्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकाचा देश म्हणून गणले जाऊ लागलो. आत्ताच तीन दिवसांपूर्वी माझी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी भेट झाली. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर तिरंगा फडकावला आणि प्रत्येक भारतीय अभिमानाने भारुन गेला. तो तिरंगा जेव्हा त्यांनी मला दाखवला त्या क्षणी मला जे जाणवले ते शब्दांच्या पलीकडले आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशुबरोबर झालेल्या चर्चेमध्ये मला नवभारताच्या युवकांमधल्या असीम आशा आणि अनेक स्वप्नांचे दर्शन घडले. या स्वप्नांना पुढे नेण्यासाठी आम्ही भारताचा ‘ऍस्ट्रॉनॉट पूल’ सुद्धा तयार करणार आहोत. भारताच्या स्वप्नांना पंख वाढावेत म्हणून आज अंतराळ दिनाच्या दिवशी मी युवा साथीदारांना या एस्ट्रॉनॉट पूलशी जोडून घेण्यासाठी आमंत्रित करत आहे.

मित्रहो,

आज भारत सेमी क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रॉप्युलेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती करत आहे. लवकरच आपणा सर्व वैज्ञानिकांच्या मेहनतीने भारत गगनयानचे उड्डाण करेल आणि येणाऱ्या काळात भारत आपलेच अंतराळ स्थानकसुद्धा उभारेल. आता आपण चंद्र आणि शनीपर्यंत पोहोचलो आहोत. अजून गहन अंतराळात असलेल्या अशा भागांमध्येही आपल्याला डोकावायचे आहे, जिथे मानवतेच्या भविष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे रहस्य दपली आहेत. आकाशगंगांच्या पलीकडे आपले क्षितिज आहे. 

मित्रहो. 

अनंत अंतराळ आपल्याला नेहमीच हा दिलासा देते की येथील कोणताही मुक्काम हा अंतिम मुक्काम नाही. त्याचप्रमाणे अंतराळ क्षेत्रातील धोरण स्तरावर सुद्धा कोणताच मुक्काम शेवटचा असता कामा नये असे मी मानतो. म्हणूनच मी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की आपला मार्ग रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ( सुधारणा, कामगिरी आणि बदल) यांचा आहे. त्यामुळे गेल्या अकरा वर्षांमध्ये देशाने अंतराळ क्षेत्रात एकापेक्षा एक मोठ्या सुधारणा केल्या. एक काळ होता जेव्हा अंतराळासारख्या भविष्यवेधी क्षेत्राला देशात अनेक बंधने होती. आम्ही बंधने तोडली. आम्ही खाजगी क्षेत्राला अंतराळ विज्ञानात परवानगी दिली आणि आज बघा देशातील साडेतीनशेहून अधिक स्टार्टप्स अंतराळविज्ञानात संशोधन आणि संवेगाचे इंजिन बनवून उभे राहत आहेत. या कार्यक्रमांमध्ये त्यांची भरभरुन उपस्थिती दिसून येत आहे. आमच्या खाजगी क्षेत्राने बनवलेले पहिले पीएसएलव्ही रॉकेटसुद्धा लवकरच लाँच होईल. मला याचा आनंद आहे की भारताचा पहिलावहिला खाजगी कम्युनिकेशन सॅटॅलाइटसुद्धा तयार होत आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ‘अर्थ ऑब्झर्वेशन सॅटॅलाइट कॉन्स्टेलेशन’सुद्धा लाँच करण्याची तयारी झाली आहे. अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी किती मोठ्या संख्येने संधी निर्माण होत आहेत याची आपल्याला यावरुन कल्पना येईल.

मित्रहो,

15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावरून मी अशा अनेक क्षेत्रांचा उल्लेख केला होता ज्यामध्ये आत्मनिर्भर होणे भारतासाठी आवश्यक आहे. मी प्रत्येक क्षेत्राला आपले उद्दिष्ट निश्चित करण्यास सांगितले आहे. आजच्या अंतराळ दिनाल मी देशातील स्पेस स्टार्टप्सना विचारणा करतो की आपण अंतराळ क्षेत्रामध्ये येत्या पाच वर्षात पाच यूनिकॉर्न उभे करू शकतो का? आता आपण भारताच्या भूमीवरून  एक वर्षात पाच ते सहा मोठे रॉकेट  लॉन्च होतांना बघत आहोत. माझी इच्छा आहे की खाजगी क्षेत्राने पुढे यावे आणि येत्या पाच वर्षात आपण अशा ठिकाणी पोहोचावे की प्रत्येक वर्षी प्रत्येक आठवड्याला एक अशी वर्षाला पन्नास रॉकेट लॉन्च करता येतील. यासाठी देशाला ज्या नेक्स्ट जनरेशन सुधारणांची गरज आहे त्या करण्याचा सरकारचा विचार आहे आणि इच्छाशक्तीसुद्धा आहे. सरकार प्रत्येक पावलावर आपल्याबरोबर उभे आहे हा विश्वास मी आपणाला देतो. 

मित्रहो, 

भारत अंतराळ विज्ञान हे वैज्ञानिक संशोधनाबरोबरच जीवन सुलभतेचे माध्यम मानतो. आज अंतराळ विज्ञान भारतात प्रशासनाचा भाग बनत आहे. पिक विमा योजनेतील उपग्रहावर आधारित माहिती असेल, मच्छीमारांना उपग्रहापासून मिळणारी माहिती आणि सुरक्षितता असो, आपत्ती व्यवस्थापन असो किंवा प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय प्रमुख योजनेतील भौगोलिक माहितीचा वापर असो, भारताची अंतराळातील प्रगती सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनात सुलभता आणत आहे. केंद्र तसेच राज्यांमध्ये याच दिशेने अंतराळ विज्ञानचा वापर वाढवण्यासाठी उद्या राष्ट्रीय मीट 2.00 चे आयोजन झाले आहे. असेच प्रयत्न पुढे होत राहावेत अशी माझी इच्छा आहे. नागरिकांच्या सेवेसाठी आमच्या स्पेस स्टार्टप्सनी नवीन उपायोजना द्याव्यात, नवीन संशोधने करावीत. येत्या काळात भारताचा अंतराळातील प्रवास नवनवीन उंची गाठेल या खात्रीनिशी आपणा सर्वांना पुन्हा एकदा राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद! 

 

* * *

आशिष सांगळे/विजया सहजराव/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2160267)