ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कूलस्कल्प्टिंग द्वारे चरबी घटवण्यासंबंधी (फॅट-लॉस) दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल व्हीएलसीसी लिमिटेडवर 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
Posted On:
23 AUG 2025 12:43PM by PIB Mumbai
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने यूएस- एफडीए मान्यताप्राप्त कूलस्कल्प्टिंग प्रक्रियेच्या माध्यमातून चरबी घटवण्याशी (फॅट-लॉस आणि स्लिमिंग) संबंधित उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल व्हीएलसीसी लिमिटेडवर 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
यापूर्वी, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने काया लिमिटेडवर देखील कूलस्कल्प्टिंग उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. काया कंपनीच्या जाहिरातींमध्ये कायाचे शस्त्रक्रिया रहित चरबी घटवणारे उपचार आणि काया कूलस्कल्प्टिंगसह इंच इंच चरबी कमी करते, असे दावे करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, पूर्ण शरीरावरील मोठ्या प्रमाणात चरबी कमी झाल्याचे उपचारांआधी आणि नंतरच्या दिशाभूल करणाऱ्या प्रतिमा देखील दाखवण्यात आल्या होत्या. हे दावे यूएस-एफडीएच्या वास्तविक मंजुरीपेक्षा जास्त असून, या प्रक्रियेचे वजन कमी करणारे उपचार म्हणून चुकीचे सादरीकरण करण्यात आले होते. काया लिमिटेडने त्यानंतर सीसीपीएच्या आदेशाचे पालन करून दंडाची रक्कम जमा केली आहे.
सडपातळ शरीर व सौंदर्य क्षेत्रातील जाहिरातींच्या परीक्षणाद्वारे व्हीएलसीसी लिमिटेडचा मुद्दा सीसीपीएकडे तक्रार म्हणून आला होता. तपासणीदरम्यान असे आढळून आले की, व्हीएलसीसीने एकाच सत्रात मोठ्या प्रमाणात वजन कमी होणे आणि घेर कमी होणे यासंबंधी अतिशयोक्तीपूर्ण दावे केले होते. हे दावे कूलस्कल्प्टिंग मशिनला दिलेल्या प्रत्यक्ष मंजुरीपेक्षा खूपच जास्त होते, त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल झाली. अधिकच्या तपासात असे आढळून आले की व्हीएलसीसीच्या जाहिरातींमध्ये कूलस्कल्प्टिंग आणि संबंधित प्रक्रिया कायमस्वरूपी वजन कमी करण्याचा आणि आकार कमी करण्याचा उपाय म्हणून सादर करण्यात आल्या होत्या. अशा जाहिरातींमुळे ग्राहकांना चुकीचा समज झाला की कूलस्कल्प्टिंग प्रक्रिया कायमस्वरूपी आणि लक्षणीय वजन कमी करते. प्रत्यक्षात, ही प्रक्रिया केवळ विशिष्ट शरीराच्या भागात स्थानिक चरबी कमी करण्यासाठी आणि फक्त 30 किंवा त्यापेक्षा कमी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) असलेल्या व्यक्तींसाठी लागू आहे.
ग्राहकांना सूचना करण्यात येते की, त्वरित वजन कमी होईल किंवा कायमस्वरूपी आकार घटेल, अशा आश्वासन देणाऱ्या कूलस्कल्प्टिंगसंबंधी जाहिरातींना बळी पडू नये.
***
सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2160135)