पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचा शुभांशू शुक्ला यांच्यासोबतचा संवाद

Posted On: 19 AUG 2025 10:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2025

पंतप्रधान - तुम्ही सर्व जण एवढा मोठा प्रवास करून परत आला आहात... 

शुभांशू शुक्ला - हो सर. 

पंतप्रधान - तर तुम्हाला काही बदल जाणवत असतील, तुम्ही लोक कुठल्या प्रकारच्या अनुभवातून जाता, ते मी समजू इच्छितो. 

शुभांशू शुक्ला - सर, जेव्हा आम्ही तिथे वातावरणाच्या पलीकडे जातो तेव्हा तिथली स्थिती पूर्णपणे वेगळी असते. तिथे कोणतेही गुरुत्वाकर्षण नसते.

पंतप्रधान - यानात बसण्याच्या व्यवस्थेबाबत विचार केला तर ती तशीच राहते का ? 

शुभांशू शुक्ला - हो सर, ती तशीच राहते. 

पंतप्रधान - आणि तुम्हाला संपूर्ण 23–24 तास त्या जागेत घालवावे लागतात ? 

शुभांशू शुक्ला - हो सर, पण तुम्ही जेव्हा अंतराळात पोहोचता तेव्हा त्या जागेवरून उठू शकता, पट्टा सोडू शकता आणि कॅप्सूलच्या आत तरंगू शकता,  हालचाल करून काही गोष्टी करू शकता. 

पंतप्रधान - एवढी जागा असते त्यात? 

शुभांशू शुक्ला - खूप नाही सर, पण थोडी फार आहे. 

पंतप्रधान - म्हणजे  तुमचे फाइटर जेटचे कॉकपिट आहे, त्यापेक्षा अधिक असेल. 

शुभांशू शुक्ला - त्यापेक्षा अधिक असते, सर.  पण एकदा आपण तिथे पोहोचलो की, अनेक बदल होतात. जसे की, हृदय मंदावते.  तर असे काही  बदल होतात, पण चार ते पाच दिवसात शरीराला त्याची सवय होते आणि तुम्ही तिथे सामान्य होता. आणि जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा पुन्हा सारे तेच बदल होतात. तुम्ही कितीही तंदुरुस्त असलात तरी, परतल्यावर लगेच चालू शकत नाही. मला तेवढे काही जाणवत नव्हते, मी ठीक होतो, पण तरीही, जेव्हा मी माझे पहिले पाऊल टाकले तेव्हा मी पडत होतो आणि लोकांना मला धरावे लागले. नंतर दुसरे आणि तिसरे पाऊल,  आपल्याला जरी माहीत असले चालायचे आहे,  तरी मेंदूला ते पुन्हा समजून घेण्यास वेळ लागतो की अच्छा आता हे नवे वातावरण आहे.

पंतप्रधान - तर हे फक्त शारीरिक प्रशिक्षण नाही तर मनाला प्रशिक्षित करणे अधिक आहे?

शुभांशू शुक्ला -  मनाचे प्रशिक्षण आहे, सर.  शरीरात ताकद असते, स्नायूंमध्ये ताकद असते, पण मेंदूला पुन्हा एकदा नव्याने जोडावे लागते, त्याला पुन्हा समजून घ्यावे लागते की हे एक नवीन वातावरण आहे आणि इथे चालण्यासाठी एवढी मेहनत किंवा ताकद लागेल. ते पुन्हा तो समजून घेतो, सर.

पंतप्रधान - सर्वाधिक काळ तिथे कोण होते आणि किती काळ?

शुभांशू शुक्ला - सध्या काही लोक सलग आठ महिने राहिले आहेत. या मोहिमेमुळेच आठ महिन्यांचा कालावधी सुरू झाला आहे.

पंतप्रधान - आणि ज्यांना तुम्ही तिथे भेटलात...

शुभांशू शुक्ला - हो, त्यापैकी काही डिसेंबरमध्ये परत येतील.

पंतप्रधान - आणि मूग आणि मेथीचे महत्त्व काय आहे?

शुभांशू शुक्ला - खूप महत्त्व आहे, सर. मला खूप आश्चर्य वाटले की लोकांना याबाबत माहिती नव्हती. अंतराळ स्थानकावर अन्न हे खूप मोठे आव्हान आहे. जागा कमी आहे, मालवहन महागडे आहे आणि कायमच कमीतकमी जागेत जास्तीत जास्त कॅलरीज आणि पोषण तुमच्यासाठी पॅक करण्याचा प्रयत्न सुरू असतो.  सर, यासंदर्भात सर्व प्रकारचे प्रयोग सुरू आहेत.  मूग,मेथी वाढवणे खूप सोपे आहे; त्यांना अंतराळ स्थानकावर जास्त संसाधनांची आवश्यकता नाही. फक्त एका ताटलीत थोड्या पाण्यात घालून ते ठेवून द्यायचे आणि आठ दिवसाच्या आत चांगल्या प्रकारे मोड दिसण्यास सुरुवात होते, सर. मी स्वतः अंतराळ स्थानकात ते वाढताना पाहिले आहेत.  मी म्हणेन सर,  आपली, आपल्या देशाची ही जी रहस्ये आहेत, ती  सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण संशोधन करण्याची संधी मिळताच, तिथे पोहोचत आहेत. कोणास ठाऊक, यामुळे आपला अन्न सुरक्षेचा प्रश्न सुटू शकेल.  कारण सर, अंतराळवीरांसाठी, स्टेशनवर एक प्रकारे आहेच, परंतु जर तिथे हा प्रश्न सुटू शकत असेल तर पृथ्वीवरदेखील अन्न सुरक्षा आव्हाने सोडवण्यास ती उपयुक्त ठरू शकतील. 

पंतप्रधान - यावेळी जेव्हा एक भारतीय तिथे आला, तेव्हा एका भारतीयाला पाहून वेगवेगळ्या देशांतील इतरांना काय वाटले? त्यांनी काय विचारले आणि ते कशाबद्दल बोलले?

शुभांशू शुक्ला - हो, सर.  गेल्या वर्षभरातील माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की मी जिथे जिथे गेलो आणि ज्यांना ज्यांना भेटलो,  त्यांनी मला भेटून खूप आनंद व्यक्त केला, खूप उत्सुक होते, बोलायला यायचे, मला विचारायचे की तुम्ही लोक काय करत आहात, कसे करत आहात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट  म्हणजे, अंतराळ क्षेत्रात भारताच्या प्रगतीबद्दल सर्वांना माहिती होती आणि गगनयानबद्दल तर काही लोक माझ्यापेक्षाही जास्त उत्साही वाटले, सर.  त्यांनी मला विचारले की आपली ही मोहीम कधी जाणार आहे.  या मोहिमेतील माझ्या साथीदारांनी तर शेवटी माझ्याकडून लिहून आणि सही करून घेतली आहे की जेव्हा आपल्या गगनयानाचे प्रक्षेपण होईल तेव्हा ते पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित केले जाईल आणि यानंतर लवकरात लवकर त्यांना आपल्या वाहनातही बसायचे आहे. तर मला असे वाटते सर, एकूणच खूप जास्त उत्साह आहे.

पंतप्रधान  - ते सगळे जण तुम्हाला तंत्रज्ञान कुशल म्हणत असत, याचे कारण काय ?

शुभांशू शुक्ला – ते असे म्हणतात हा त्याचा दयाळूपणा आहे असे  मला वाटते  सर.पण माझे जे प्रशिक्षण झाले आहे सर, हवाई दलात माझे जे प्रशिक्षण झाले आहे आणि त्यानंतर आम्ही टेस्ट पायलटचे प्रशिक्षण घेतले सर.मी जेव्हा हवाई दलात भर्ती झालो तेव्हा मला वाटले होते की आता अभ्यास करावा लागणार नाही.मात्र त्यानंतर मला खूप अभ्यास करावा लागला होता आणि टेस्ट पायलट झाल्यानंतर तर एक प्रकारे ही अभियांत्रिकीची शाखाच बनते सर.यामध्ये पण प्रशिक्षण घेतले,आपल्या वैज्ञानिकांनी आम्हाला दोन-चार वर्षे शिक्षण दिले. तर मला वाटते आम्ही या मिशनसाठी  जेव्हा पोहोचलो तेव्हा पूर्णपणे सज्ज होतो.

पंतप्रधान- मी आपल्याला जो गृहपाठ सांगितला होता त्याची प्रगती कुठवर झाली ?

शुभांशू शुक्ला- खूपच छान प्रगती झाली आहे सर, आणि मला लोक हसलेही होते, त्या भेटीनंतर सगळ्यांनी मला चिडवले होते की पंतप्रधानांनी मला गृहपाठ दिला आहे. हो, दिला होता आणि अतिशय आवश्यक आहे सर,आम्हाला  हे जाणवून देणे, मी गेलोच होतो त्यासाठी. मिशन तर यशस्वी झाले आहे सर, आम्ही परतलो आहोत.मात्र हे मिशन म्हणजे समाप्ती नव्हे तर सुरवात आहे.

पंतप्रधान- हे तर मी त्या दिवशीही सांगितले होते.

शुभांशू शुक्ला-  आपण त्या दिवशी सांगितले होते.

पंतप्रधान- हे आपले पहिले पाऊल आहे.

शुभांशू शुक्ला- पहिले पाऊल आहे सर.तर या पहिल्या पाऊलाचा जो मुख्य उद्देश होता तो हाच होता की आम्ही बरेच काही शिकून आत्मसात करू शकतो सर.

पंतप्रधान – हे पहा, सर्वात मोठे काम होईल, आपल्याकडे अंतराळवीरांचा मोठा समूह असला पाहिजे. आपल्याकडे 40-50 लोक अशा प्रकारे तयार असावे,आतापर्यंत कदाचित अतिशय कमी मुलांच्या मनात हे आले असेल, अरे हो, हे पण चांगले आहे.मात्र आता आपण आल्यानंतर त्यांचा विश्वासही आणखी वाढेल,आकर्षणही वाढेल.

शुभांशू शुक्ला-  सर, मी जेव्हा लहान होतो,राकेश शर्मा सर 1984 मध्ये पहिल्यांदा  अंतराळात गेले होते मात्र अंतराळवीर बनण्याचे स्वप्न माझ्या मनात कधी आले नाही कारण आपल्याकडे काही कार्यक्रम नव्हता, काही नव्हते. मात्र मी गेलो अंतराळ स्थानकात गेलो तेव्हा या वेळी माझा तीन-चार वेळा मुलांशी संवाद झाला, एक वेळेला लाईव्ह  कार्यक्रम होता सर आणि दोन वेळेला रेडीओ द्वारे संवाद झाला.तीनही कार्यक्रमात सर, एक मुलगा होता, मी कसा अंतराळवीर बनू शकतो असा प्रश्न त्याने केला. मला वाटते हे देशाचे मोठे यश आहे, आजच्या भारतात त्याला केवळ स्वप्न पाहण्याची आवश्यकता नाही, त्याला हे माहित आहे की हे शक्य आहे, आपल्याकडे पर्याय आहे आणि आपण अंतराळवीर बनू शकतो आणि आपण जसे म्हटले आहे सर, की ही माझी जबाबदारी आहे, आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी मला प्राप्त झाली असे मला वाटते आणि आता माझी जबाबदारी आहे की जास्तीत जास्त लोकांना मी इथपर्यंत आणावे.       

पंतप्रधान – आता अंतराळ स्थानक आणि गगनयान..

शुभांशू शुक्ला- सर

पंतप्रधान- आपली दोन मोठी मिशन आहेत ...

शुभांशू शुक्ला- सर

पंतप्रधान- त्यामध्ये आपला अनुभव मोठा कामी येईल.

शुभांशू शुक्ला- मला वाटते सर,आपल्याकडे विशेषकरून एक अतिशय मोठी संधी आहे, कारण ज्या प्रकारे अंतरल कार्यक्रमासंदर्भात आपल्या सरकारकडून एक कटिबद्धता आहे, अपयश आले तरीही अंतराळ कार्यक्रमासाठी दरवर्षी सातत्यपूर्ण बजेट आहे,  अपयश येऊनही जसे की चंद्रयान – 2 यशस्वी झाले नाही त्यानंतर आपण म्हटले की नाही, आम्ही आगेकूच करतच राहणार,चंद्रयान -3 यशस्वी झाले. अपयश आल्यानंतरही जर इतके पाठबळ मिळत आहे आणि हे अवघे जग पाहत आहे सर. आपली  क्षमताही आहे, परिस्थितीही आहे तर आपण इथे एक नेतृत्वाची भूमिका प्राप्त करू शकतो सर. एक फार मोठे साधन होईल सर,जर असे एक अंतराळ स्थानक जिथे भारत नेतृत्व करेल मात्र बाकीचे लोकही त्याचा भाग होतील. अंतराळ उत्पादनात आत्मनिर्भरता यासंदर्भातले आपले वक्तव्य मी ऐकले आहे सर.तर या सर्व बाबी  एकाच पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत, आपण जो दृष्टीकोन आत्ता दिला आहे, गगनयानाचा, BAS आणि  पुन्हा चंद्रावर उतरण्याचा, सर, हे फार मोठे स्वप्न आहे सर.

पंतप्रधान- आपण जर आत्मनिर्भर होऊन काम केले तर उत्तम करू.

शुभांशू शुक्ला- नक्कीच सर.

शुभांशू शुक्ला- अंतराळात मी  फोटो वगैरे अनेक गोष्टींचा प्रयत्न केला , तर भारत इथून सुरु होत आहे, सर हा त्रिकोण बेंगळूरु आहे, सर, हे हैदराबाद पार होत आहे आणि हा जो फ्लाश आपण पाहत आहात सर ही  वीज चमकत आहे सर.हे डोंगर  आहेत सर आणि इथून जात जो गडद भाग येतो,सर हा हिमालय आहे आणि वरच्या दिशेने  जात आहेत ते तारे आहेत आणि त्यांना ओलांडून जाताच पाठीमागून  सूर्य उगवतोय सर.

सोनल तुपे/जयदेवी पुजारी स्वामी/सोनाली काकडे/निलीमा चितळे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2159951) Visitor Counter : 15