गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामधून 11 वर्षात साध्य झालेल्या प्रगतीचा आराखडा, वर्तमानकाळाचे सामर्थ्य आणि समृध्द भारतासाठी आखलेले धोरण स्पष्‍ट – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन


नागरिकांना कर दिलासा देवून त्यांच्या सुलभ जीवनमानासाठी येत्या दिवाळीत जीएसटीमध्‍ये भविष्यवादी सुधारणा घडवून आणण्याची पंतप्रधानांनी केली घोषणा

खासगी क्षेत्रात पहिल्यांदाच नोकऱ्या करणाऱ्यांना 15,000 रुपये; 1 लाख कोटी रुपये मूल्याच्या ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ सुरु करून पंतप्रधानांनी युवा वर्गाला दिली भेट

Posted On: 15 AUG 2025 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, गेल्या 11 वर्षात साध्य केलेल्या प्रगतीचा आराखडा, वर्तमानकाळाचे सामर्थ्य आणि समृध्द भारतासाठी आखलेले धोरण असे संबोधले आहे.

समाज माध्‍यम ‘एक्स’ व्दारे पाठवलेल्या संदेशांच्या मालिकेत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणतात की, ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांचा केलेला खात्मा असो अथवा ‘सुदर्शन चक्र मोहिमे’च्या माध्यमातून देशाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण असो, किंवा उच्च-शक्तीच्या लोकसंख्याशास्त्रीय मोहिमे’द्वारे घुसखोरीमुक्त भारताच्या निर्मितीचा निर्धार असो, मोदी सरकार सर्वकाळ देशाला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाविषयी सरकारची अविचल कटिबद्धता अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांनी अणुउर्जा, महत्त्वाची खनिजे,विद्युत, अंतराळ क्षेत्र आणि जेट इंजिने या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. त्याशिवाय नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच लहान उद्योगांना चालना देण्यासाठी येत्या दिवाळीच्या काळात ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ सुरु करण्याची तसेच वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) बाबतीत लक्षणीय दिलासा देणाऱ्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, 1 लाख कोटी रुपयांच्या निधीसह ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’ लागू करण्याची घोषणा करून, पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी देशातील युवा वर्गाला एक उपहार दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिवाळीच्या सणाची भेट देत भविष्यवादी जीएसटी सुधारणांची घोषणा केली. या सुधारणा लहान उद्योगांसाठी अत्यंत लाभदायक ठरतीलच पण त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेला नवी उभारी देत दैनंदिन वापरातील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती देखील सामान्यांच्या आवाक्यात आणतील असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या ऐतिहासिक भाषणात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गेल्या 100 वर्षांच्या समृध्द इतिहासाची तसेच राष्ट्रउभारणीविषयी संघाने दिलेल्या योगदानाची नोंद घेतली. तसेच देशाच्या 100 वर्षांतील प्रगतीच्या प्रवासामध्ये ज्या स्वयंसेवकांनी अभूतपूर्व योगदान दिले त्यांना आदरांजली वाहिली. गेल्या शतकभरात आरएसएसने सेवाभाव, समर्पण, संघटना तसेच शिस्तीसह व्यक्तिगत विकासाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीचा संकल्प पूर्ण केला आहे असे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

* * *

सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156950)