आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशात शि योमी जिल्ह्यात 72 महिन्यांच्या कालावधीत 8146.21 कोटी रुपये खर्चून 700 मेगावॉट क्षमतेच्या तातो-II जलविद्युत प्रकल्पाच्या उभारण्यासाठीच्या गुंतवणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 AUG 2025 5:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025

 

अरुणाचल प्रदेशात शि योमी जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या तातो-II जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी 8146.21 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांच्या संदर्भातील मंत्रिमंडळ  समितीने मंजुरी दिली. हा प्रकल्प 72 महिन्यात पूर्ण होईल असा अंदाज आहे.

सुमारे 700 मेगावॉट क्षमतेची (4 x 175 मेगावॉट) स्थापित क्षमता असलेला हा प्रकल्प 2738.06 दशलक्ष युनिट्स (एमयु)उर्जा निर्मिती करेल. या प्रकल्पातून निर्माण झालेल्या वीजेमुळे अरुणाचल प्रदेशातील वीजपुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा होईल आणि राष्ट्रीय ग्रीडचे संतुलन राखण्यात देखील मदत होईल.

उत्तर पूर्व विद्युत उर्जा महामंडळ (एनईईपीसीओ) आणि अरुणाचल राज्य सरकार यांच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून उपरोल्लेखित वीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी होणार आहे. सदर प्रकल्पासाठी या राज्याच्या इक्विटी वाट्यातील 436.13 कोटी रुपयांच्या केंद्रीय वित्तीय मदतीसह केंद्र सरकारतर्फे पायाभूत सुविधा उभारणीअंतर्गत रस्ते,पूल आणि संबंधित पारेषण वाहिन्यांसाठी आर्थिक  मदत म्हणून 458.79 कोटी रुपये देणार आहे.

अरुणाचल प्रदेशाला या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेपैकी 12% वीज मोफत मिळणार असून आणखी 1% वीज स्थानिक क्षेत्र विकास निधी (एलएडीएफ) म्हणून मिळेल. तसेच प्रकल्पाच्या कार्यामुळे या भागाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन तेथे सामाजिक आर्थिक विकासदेखील होणार आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानाचे लक्ष्य आणि उद्दिष्टे यांच्याशी सुसंगत असलेला हा प्रकल्प प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधींच्या निर्मितीसह स्थानिक पुरवठादार/ आस्थापना/ एमएसएमई उद्योगांना देखील विविध लाभ मिळवून देईल.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी विकसित करण्यात येणाऱ्या आणि बहुतांश प्रमाणात स्थानिक वापरासाठी उपलब्ध होणाऱ्या 32.88 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसह त्या भागातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. 20 कोटी रुपयांच्या समर्पित प्रकल्प निधीमधून   शि योमी जिल्ह्याला रुग्णालये, शाळा, बाजारपेठा, क्रीडांगणे, इत्यादींसारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा देखील लाभ होणार आहे. स्थानिक जनतेला या प्रकल्प उभारणीदरम्यान नुकसानभरपाई, रोजगार आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी इत्यादी उपक्रमांतून देखील विविध लाभ होणार आहेत.

 

* * *

सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155640)