पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली इथे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 07 AUG 2025 11:09AM by PIB Mumbai

 

मंत्रिमंडळातले माझे सहकारी शिवराज सिंह चौहान जी, एम एस स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ सौम्या स्वामिनाथन जी,नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद जी,स्वामिनाथन जी यांच्या कुटुंबातले सर्व जण इथे उपस्थित असलेले मी पाहत आहे, त्यांनाही माझा नमस्कार.सर्व वैज्ञानिक, इतर मान्यवर  आणि महिला आणि पुरुषहो !

काही व्यक्तिमत्वे अशी असतात ज्यांचे योगदान एखाद्याच कालखंडापुरते मर्यादित नसते, एखाद्या भागापुरते सीमित नसते. प्राध्यापक एम एस स्वामीनाथनही  असेच व्यक्तिमत्व असलेले महान वैज्ञानिक होते, भारत मातेचे सुपुत्र होते. विज्ञान हे त्यांनी जनसेवेचे माध्यम केले.देशाची अन्न सुरक्षा हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले.त्यांनी जागृत केलेली चेतना येत्या अनेक शतकांपर्यंत भारताची धोरणे आणि प्राधान्यक्रम यांना दिशा देत राहील.स्वामीनाथन जन्मशताब्दी समारंभाच्या आपणा सर्वाना मी शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आज 7 ऑगस्ट,राष्ट्रीय हातमाग दिनही आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये हातमाग क्षेत्राला देशभरात नवी ओळख आणि ताकद मिळाली आहे. आपणा सर्वाना,हातमाग क्षेत्राशी संबंधित सर्वाना, मी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या शुभेच्छा देतो.

मित्रहो,

डॉ. स्वामीनाथन यांच्याशी अनेक वर्षांपासून माझा स्नेह होता. गुजरातची पूर्वीची परिस्थिती अनेक लोकांना माहीतच आहे.दुष्काळ आणि चक्रीवादळे यामुळे शेतीवर मोठे संकट असेकच्छचे वाळवंट वाढत चालले होते.मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्या काळात आम्ही मृदा आरोग्य कार्ड योजनेवर काम सुरु केले होते. मला आठवत आहे की प्रा.स्वामीनाथन यांनी त्यामध्ये मोठी रुची दर्शवली होती.त्यांनी अगदी मोकळेपणाने आम्हाला सूचना केल्या,आम्हाला मार्गदर्शन केले.त्यांच्या योगदानामुळे या उपक्रमाला मोठे यश प्राप्त झाले. तामिळनाडूमध्ये त्यांच्या संशोधन केंद्रात मी गेलो होतो त्याला  सुमारे 20 वर्षे झाली. त्यांनी लिहिलेल्या ‘द क्वेस्ट फॉर अ वर्ल्ड विदाउट हंगर’ या पुस्तकाचे 2017 मध्ये प्रकाशन करण्याची संधी मला मिळाली. 2018 मध्ये वाराणसीमध्ये  आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन झाले तेव्हाही आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या समवेत झालेली प्रत्येक भेट म्हणजे माझ्यासाठी ज्ञानाचा एक अनुभव असे.एकदा त्यांनी म्हटले होते, विज्ञान म्हणजे केवळ शोध नव्हे तर ते संबंधितापर्यंत पोहोचविणे होय आणि त्यांनी आपल्या कृतीतून ते सिद्धही केले. संशोधनाबरोबरच शेतीच्या पद्धतीत बदल घडविण्यासाठी ते शेतकऱ्यांना प्रेरीतही करत असत. आजही भारताच्या कृषी क्षेत्रात त्यांचा दृष्टीकोन, त्यांचे विचार आपल्याला सर्वत्र आढळतात. ते सर्वार्थाने भारतमातेचे रत्न होते. डॉ.स्वामीनाथन यांना  भारतरत्न  या सन्मानाने  गौरविण्याचे भाग्य आमच्या सरकारला लाभले हे माझे भाग्य  असल्याचे मी मानतो.

मित्रहो,

डॉ.स्वामीनाथन यांनी भारताला अन्नधान्यात समृद्ध बनविण्याचे अभियान घेतले होते.मात्र हरित क्रांतीच्या पलीकडेही त्यांची ओळख होती. शेतीमध्ये रसायनांचा वाढता वापर आणि एकच पिक सातत्याने घेण्याच्या धोक्याविषयी त्यांनी शेतकऱ्यांना सातत्याने सावध केले.म्हणजेच एकीकडे ते अन्नधान्य उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करत होते आणि त्याच बरोबर त्यांना पर्यावरणाची धरणीमातेचीही काळजी होती.दोन्हींमध्ये संतुलन साधण्यासाठी  आणि आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी सदाहरित क्रांतीची संकल्पना दिली.त्यांनी जैव खेडी ही संकल्पना मांडली ज्यायोगे गावांमधले लोक आणि शेतकऱ्यांचे सशक्तीकारण होऊ शकते. त्यांनी सामुदायिक बीज बँक आणि अन्नधान्य सुरक्षा आणि पोषणमुल्ये  वाढविणारी  पिके यासारख्या कल्पनांना प्रोत्साहन दिले.

मित्रहो,

हवामान बदल आणि पोषण विषयक आव्हानांवरचा तोडगा हा अशा पिकांमध्ये सामावलेला आहे ज्यांचा आपल्याला विसर पडला आहे. दुष्काळ विषयक आणि क्षार विषयक लवचिकता यावर त्यांचा भर होता. भरड धान्यांकडे ज्यावेळी कोणी फारसे लक्षही देत नव्हते अशा काळात त्यांनी भरड धान्य- श्री अन्न यावर काम केले. खारफुटीचे जनुकीय वैशिष्ट्य धानामध्ये रूजवले पाहिजे असे त्यांनी  अनेक वर्षांपूर्वी सुचवले होते.यामुळे पिके हवामान बदलाला तोंड देऊ शकतील.आज आपण जेव्हा हवामान बदलाविषयी बोलतो तेव्हा जाणीव होते की त्यांचा विचार किती भविष्यवेधी होता.

मित्रहो,

आज जगभरात जैव विविधतेची चर्चा होते, याची जपणूक करण्यासाठी  सर्व सरकारे अनेक पाऊले उचलतात. मात्र या सर्वांच्या पुढे एक पाउल जात डॉ. स्वामीनाथन  यांनी जैवआनंद  ही संकल्पना दिली. आज आपण हीच संकल्पना साजरी करत आहोत.  जैवविविधतेच्या सामर्थ्याने आपण स्थानिक लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतो,स्थानिक संसाधनांच्या उपयोगाने लोकांसाठी उपजीविकेची नवी साधने निर्माण करू शकतो असे डॉ. स्वामीनाथन  म्हणत असत.आपल्या कल्पना वास्तवात साकारणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते.आपल्या संशोधन प्रतिष्ठान द्वारे  नवनवीन शोधांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी अखंड प्रयत्न केला. छोटे शेतकरी,मच्छिमार बंधू-भगिनी,आदिवासी समुदाय या आपल्या सर्व वर्गाना त्यांच्या प्रयोगांचा लाभ झाला आहे.

मित्रहो,

प्राध्यापक स्वामीनाथन यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी एम एस स्वामीनाथन अन्नधान्य आणि शांतता पुरस्कार सुरु झाला आहे याचा मला आनंद आहे.अन्न सुरक्षेसंदर्भात मोठे कार्य करणाऱ्या, विकसनशील देशांमधल्या व्यक्तींना या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.अन्न आणि शांतता, भोजन आणि शांतता याचे नाते जितके तात्विक आहे तितकेच व्यावहारिकही आहे. आपल्याकडे उपनिषदांमध्ये म्हटले आहे  

- अन्नम् न निन्द्यात्, तद् व्रतम्। प्राणो वा अन्नम्। शरीरम् अन्नादम्। प्राणे शरीरम् प्रतिष्ठितम्। म्हणजेच आपण अन्नाचा, धान्याचा अनादर किंवा अवहेलना करता कामा नये. अन्न हे प्राण म्हणजेच जीवन आहे.

म्हणूनच मित्रहो,

जर अन्नधान्याचे संकट उभे ठाकले तर जीवनावर संकट  निर्माण होते आणि जेव्हा हजारो लाखो लोकांच्या जीवनावर संकट  येते तेव्हा जागतिक अशांतता निर्माण होणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच एम एस स्वामीनाथन अन्नधान्य आणि शांतता पुरस्कार अतिशय महत्वाचा आहे.हा पहिला पुरस्कार प्राप्त करणारे नायजेरीयाचे प्रतिभावंत वैज्ञानिक आडेनले यांचे मी खूप-खूप आभिनंदन करतो.

मित्रांनो,

भारतीय कृषी क्षेत्र आज ज्या उंचीवर आहे, ते पाहून डॉ. स्वामीनाथन जिथे कुठे असतील, तिथे त्यांना नक्कीच अभिमान वाटत असेल. आज भारत दूध, डाळी आणि ताग यांच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. आज भारत तांदूळ, गहू, कापूस, फळे आणि भाज्या यांच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश देखील आहे. गेल्या वर्षी भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक अन्नधान्य उत्पादन केले आहे. तेलबियांच्या उत्पादनातही आपण विक्रम करत आहोत. सोयाबीन, मोहरी, भुईमूग या सर्वांचे उत्पादन विक्रमी पातळीवर वाढले आहे.

मित्रांनो,

आमच्यासाठी आपल्या शेतकर्‍यांचे हित ही सर्वोच्च प्राधान्यक्रमाची बाब आहे. भारत आपल्या शेतकरी बांधवांच्या, पशुपालकांच्या आणि मच्छीमार बांधवांच्या हितासोबत कधीही तडजोड करणार नाही आणि मला माहीत आहे की यासाठी मला वैयक्तिकरित्या खूप मोठी किंमत मोजावी लागेल, पण मी त्यासाठी तयार आहे. माझ्या देशातील शेतकर्‍यांसाठी, माझ्या देशातील मच्छिमारांसाठी, माझ्या देशातील पशुपालकांसाठी आज भारत सज्ज आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीसाठी येणाऱ्या खर्चात कपात करणे, उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करणे, या उद्दिष्टांवर आम्ही सतत काम करत आहोत.

मित्रांनो,

आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या सामर्थ्याला देशाच्या प्रगतीचा पाया मानले आहे. त्यामुळे, गेल्या काही वर्षांमध्ये जी धोरणे तयार केली, त्यामध्ये केवळ मदतच नव्हती, तर शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचाही प्रयत्न होता. पीएम किसान सन्मान निधीतून मिळणाऱ्या थेट मदतीने लहान शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना धोक्यांपासून संरक्षण दिले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे सिंचनाशी संबंधित समस्या दूर करण्यात आल्या आहेत. 10,000 एफपीओ (FPOs) च्या निर्मितीमुळे लहान शेतकऱ्यांची संघटित शक्ती वाढली आहे, तर सहकारी संस्था आणि बचत गटांना  आर्थिक मदतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली आहे. **ई-नाम (e-NAM)**मुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकणे सोपे झाले आहे. पीएम किसान संपदा योजनेमुळे नवीन अन्न प्रक्रिया युनिट्स आणि साठवणुकीच्या अभियानालाही वेग मिळाला आहे. अलीकडेच पंतप्रधान धन धान्य योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अशा 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे, जिथे शेती अजूनही मागासलेली आहे. येथे सुविधा पुरवून आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतीविषयी नवा विश्वास निर्माण केला जात आहे.

मित्रांनो,

विकसित देश बनण्यासाठी 21 व्या शतकातील भारत पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. आणि हे उद्दिष्ट प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक व्यवसायाच्या योगदानातूनच साध्य होईल. डॉ. स्वामीनाथन यांच्यापासून प्रेरणा घेऊन, आता देशातील शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे. मागील पिढीतील शास्त्रज्ञांनी अन्नसुरक्षा सुनिश्चित केली. आता पोषणविषयक सुरक्षेवर (nutritional security) लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. लोकांचे आरोग्य अधिक चांगले होण्यासाठी आपल्याला बायो-फोर्टिफाइड आणि पोषणयुक्त पिकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावे लागेल. रसायनांचा वापर कमी व्हावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, यासाठी आपण अधिक तत्परता दाखवली पाहिजे.

साथियों,

क्लाइमेट चेंज से जुड़ी चुनौतियों से आप भली-भांति परिचित हैं। हमें climate-resilient crops की ज्यादा से ज्यादा वैरायटीज को विकसित करना होगा। ड्राउट-tolerant, heat-resistant और flood-adaptive फसलों पर फोकस करना होगा। फसल चक्र कैसे बदला जाए, किस मिट्टी के लिए क्या उपयुक्त है, उस पर अधिक रिसर्च होनी चाहिए। इसके साथ ही, हमें सस्ते सॉइल टेस्टिंग टूल्स और nutrient management के तरीके, उसको भी विकसित करने की आवश्यकता है।

मित्रांनो,

हवामान बदलाशी संबंधित आव्हानांशी तुम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे परिचित आहात. आपल्याला हवामान-अनुकूल पिकांची (climate-resilient crops) जास्तीत जास्त वाणे विकसित करावी लागतील. दुष्काळ सहन करणारी, उष्णतेचा प्रतिकार करणारी आणि पुराला तोंड देणारी पिके (draught-tolerant, heat-resistant and flood-adaptive crops) यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पीक चक्र कसे बदलावे, कोणत्या मातीसाठी काय योग्य आहे, यावर अधिक संशोधन झाले पाहिजे. यासोबतच, आपल्याला स्वस्त मृदा परीक्षण साधने (soil testing tools) आणि पोषणमूल्य व्यवस्थापनाच्या पद्धती विकसित करण्याचीही गरज आहे.

मित्रांनो,

आपल्याला सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सूक्ष्म-सिंचनाच्या  दिशेने आणखी काम करण्याची गरज आहे. ठिबक सिंचन आणि प्रिसिजन इरिगेशन  अधिक व्यापक आणि प्रभावी करावे लागेल. आपण उपग्रह डेटा, AI आणि मशीन लर्निंग यांना एकत्र जोडू शकतो का? असे तंत्रज्ञान विकसित करू शकतो का, जे पिकांच्या उत्पादनाचा अंदाज देऊ शकेल, किटकांवर लक्ष ठेवू शकेल आणि पेरणीसाठी मार्गदर्शन करू शकेल? प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी रिअल-टाइम निर्णय समर्थन प्रणाली  पोहोचवता येईल का? तुम्ही सर्व अनुभवी लोकांनी कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप्सना  सतत मार्गदर्शन करत राहा. आज अनेक नवीन युवा शेतीतल्या समस्यांवर उपाय शोधण्यात गुंतले आहेत. जर अनुभवी लोकांनी त्यांना मार्गदर्शन केले, तर त्यांची उत्पादने अधिक प्रभावी आणि वापरण्यास सोपी होतील.

मित्रांनो,

आपले शेतकरी आणि आपल्या शेतकरी समुदायांकडे पारंपरिक ज्ञानाचा खजिना आहे. पारंपरिक भारतीय कृषी पद्धती आणि आधुनिक विज्ञानाला जोडून एक सर्वांगीण ज्ञानाचा पाया  तयार करता येऊ शकतो. पीक विविधता निर्माण करणे ही आज एक राष्ट्रीय प्राधान्यक्रमाची बाब आहे. आपल्या शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगायला हवे. त्याचे फायदे काय आहेत, तसेच ते न केल्यास काय तोटे होऊ शकतात, हे देखील त्यांना पटवून द्यावे लागेल. आणि यासाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता.

मित्रांनो,

गेल्या वर्षी जेव्हा मी 11 ऑगस्ट रोजी पूसा कॅम्पसमध्ये आलो होतो, तेव्हा मी सांगितले होते की, कृषी तंत्रज्ञानाला प्रयोगशाळेतून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न वाढवा. मला आनंद आहे की, मे-जून महिन्यात “विकसित कृषी संकल्प अभियान” राबवण्यात आले. पहिल्यांदाच देशातील 700 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये शास्त्रज्ञांच्या सुमारे 2200 टीम्सनी भाग घेतला. 60 हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले. इतकेच नाही, तर सुमारे सव्वा कोटी जागरुक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आपल्या शास्त्रज्ञांनी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला हा प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे.

मित्रांनो,

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी आपल्याला शिकवले होते की, शेती फक्त पिकांची नसते, ती लोकांचे जीवन असते. शेतीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, प्रत्येक समाजाची समृद्धी आणि निसर्गाचे संरक्षण, हीच आपल्या सरकारच्या कृषी धोरणाची ताकद आहे. आपल्याला विज्ञान आणि समाजाला एका धाग्यात गुंफायचे आहे, लहान शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे आहे आणि शेतात काम करणाऱ्या महिलांना सक्षम करायचे आहे. आपण याच उद्दिष्टासह पुढे जाऊया, डॉ. स्वामीनाथन यांची प्रेरणा आपल्या सर्वांसोबत आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या समारंभासाठी खूप खूप अभिनंदन करतो.

खूप खूप धन्यवाद.

***

जयदेवी पुजारी स्वामी/सोनल तुपे/निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2154498)