युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मेरा युवा भारत (MYBharat) मंचाद्वारे राष्ट्रीय ध्वज प्रश्नमंजुषेची घोषणा; देशभक्तीला प्रोत्साहन देणे आणि तिरंग्याबद्दल जागरूकता वाढवणे हे उद्दिष्ट

Posted On: 07 AUG 2025 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025

 

देशभक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत (MYBharat) मंचाने देशव्यापी प्रश्नमंजुषेची घोषणा केली आहे. MYBharat पोर्टलवर (mybharat.gov.in) आयोजित या ऑनलाइन प्रश्नमंजुषेमध्ये सर्व नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि तिरंग्याबद्दलचे त्यांचे ज्ञान पडताळून पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

ही प्रश्नमंजुषा म्हणजे सर्व सहभागींसाठी एक आकर्षक आणि शैक्षणिक अनुभव ठरेल  यादृष्टीने तयार केली  आहे. यात बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील, प्रत्येक प्रश्नात चार पर्याय असतील आणि  एकच उत्तर बरोबर असेल.  सहभागाची दखल घेऊन, सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल.

यामध्ये एक मोठे प्रोत्साहन म्हणून, सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पंचवीस सहभागींची निवड केली जाईल आणि त्यांना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यासोबत सियाचीनला भेट देण्याची एक अनोखी संधी मिळेल.

ही प्रश्नमंजुषा MYBharat प्लॅटफॉर्मवरील सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी खुली असली तरी, सियाचीन भेटीसाठी 21 ते 29 वयोगटातील विजेत्या तरुणांचीच  निवड केली जाईल. पंचवीस विजेत्यांची अंतिम निवड सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांच्या गटातून संगणक-आधारित लॉटरी प्रणालीद्वारे केली जाईल.

प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. बक्षिसांसाठी पात्र होण्यासाठी सहभागींनी MYBharat पोर्टलवरील त्यांचे प्रोफाइल अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करावी.

मेरा युवा भारत (https://mybharat.gov.in/) पोर्टलची रचना देशातील तरुणांसाठी एकाच ठिकाणी  सेवा देणारे व्यासपीठ म्हणून करण्यात आली आहे. 1.76 कोटींहून अधिक तरुणांनी या व्यासपीठावर नोंदणी केली आहे.

 

* * *

सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2153509)