पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूतील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात आदि तिरुवथिराई महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
27 JUL 2025 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2025
वणक्कम चोळा मंडलम!
परम आदरणीय अधिनस्थ मठाधीशगण, चिन्मया मिशनचे स्वामीगण, तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवि जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. एल मुरुगन जी, स्थानिक खासदार थिरुमा-वलवन जी, मंचावर उपस्थित तामिळनाडूचे मंत्री, संसदेतील माझे सहकारी आदरणीय इलैयाराजा जी, सर्व ओदुवार, भक्त, विद्यार्थी, सांस्कृतिक इतिहासकार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ! नमः शिवाय
नम: शिवाय वाळघा, नादन ताळ वाळघा, इमैइ पोळुदुम्, येन नेन्जिल् नींगादान ताळ वाळघा!!
मी पाहत होतो जेव्हा जेव्हा नयनार नागेंद्रन यांचे नाव घेतले जायचे तेव्हा चोहोबाजूनी उत्साहामुळे वातावरण अचानक बदलून जात होते.
मित्रहो,
एक प्रकारे राज राजांची ही श्रद्धा भूमी आहे आणि या श्रद्धा भूमीत इलैयाराजा यांनी आज ज्याप्रकारे आपल्या सर्वांना शिवभक्तीने भारून टाकले , श्रावण महिना सुरु आहे, राज राजांची श्रद्धा भूमी आहे आणि इलैयाराजा यांची तपस्या , किती अद्भुत वातावरण आणि मी तर काशीचा खासदार आहे आणि जेव्हा ओम नमः शिवाय ऐकतो तेव्हा अंगावर शहारे येतात.
मित्रहो,
शिवदर्शनाची अद्भुत ऊर्जा, इलैयाराजा यांचे संगीत, ओदुवार यांचे मंत्रोच्चार, खरंच हा आध्यात्मिक अनुभव मन भारून टाकणारा आहे.
मित्रहो,
श्रावणाचा पवित्र महिना आणि बृहदेश्वर शिव मंदिराच्या बांधकामाला 1,000 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी, मला भगवान बृहदेश्वर शिव यांच्या चरणी उपस्थित राहून पूजा करण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी या ऐतिहासिक मंदिरात 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या निरंतर प्रगतीसाठी प्रार्थना केली . भगवान शिव यांचा आशीर्वाद सर्वांना मिळावा अशी इच्छा व्यक्त केली, नम: पार्वती पतये हर हर महादेव!
मित्रहो,
मला इथे यायला विलंब झाला, या ठिकाणी मी लवकर पोहचलो होतो , मात्र भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जे अद्भुत प्रदर्शन आयोजित केले आहे ते ज्ञानवर्धक आहे, प्रेरणादायी आहे आणि आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे मानवी कल्याणाला दिशा दिली हे पाहून आपल्या सर्वांचा ऊर अभिमानाने भरून येतो . किती विशाल , व्यापक आणि भव्य होते, आणि मला सांगण्यात आले की मागील एका आठवड्यापासून हजारो लोक हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत. हे दर्शनीय आहे आणि सर्वांनी आवर्जून पाहावे असे मी आवाहन करतो.
मित्रहो,
आज मला इथे चिन्मय मिशनच्या प्रयत्नांतून तमीळ गीता अल्बमच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्याची संधी देखील मिळाली आहे. मी या प्रयत्नात सहभागी असलेल्या सर्वांचे देखील खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रहो,
चोल शासकांनी आपल्या राजनैतिक आणि व्यापारी संबंधांचा विस्तार श्रीलंका, मालदीव आणि दक्षिण -पूर्व आशिया पर्यंत केला होता. आणि हा देखील एक योगायोग आहे की कालच मी मालदीवहून परतलो आणि आज तामिळनाडूमध्ये या कार्यक्रमात सहभागी झालो.
आपले शास्त्र सांगते, भगवान शिव यांचे साधक देखील त्यांच्यात समाहित होत त्यांच्याप्रमाणेच अविनाशी होतात. म्हणूनच , भगवान शिव यांच्यावरील अढळ भक्तीमध्ये रुजलेल्या भारतातील चोल वंशाच्या वारश्याला अमरत्व प्राप्त झाले आहे . राजराजा चोल , राजेन्द्र चोल ही नावे भारताच्या अस्मिता आणि अभिमानाचे प्रतीक आहे. चोल साम्राज्याचा इतिहास आणि वारसा भारताची खरी क्षमता दर्शवितो . ही भारताच्या त्या स्वप्नांची प्रेरणा आहे जी घेऊन आज आपण विकसित भारताच्या लक्ष्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. याच प्रेरणेसह मी महान राजे राजेंद्र चोल यांना वंदन करतो. काही दिवसांपूर्वीच तुम्ही सर्वांनी आदि तिरुवादिरइ उत्सव साजरा केला. आज त्याची सांगता या भव्य कार्यक्रमाच्या रूपाने होत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात योगदान देणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.
मित्रहो,
इतिहासकारांच्या मते चोल साम्राज्याचा कालखंड हा भारताच्या सुवर्णयुगांपैकी एक होता. त्या काळाची ओळख त्याच्या लष्करी सामर्थ्याने होते.
लोकशाहीची जननी म्हणून भारताची परंपरा चोल साम्राज्याने पुढे नेली होती. इतिहासकार लोकशाहीच्या संदर्भात ब्रिटनच्या मॅग्नाकार्टा यांचा उल्लेख करतात मात्र अनेक शतकांपूर्वी चोल साम्राज्यात कुडावोलई अमैप्पू द्वारे लोकशाही पद्धतीने निवडणुका होत होत्या. आज जगभरात जल व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत एवढी चर्चा होते. आपल्या पूर्वजांनी खूप आधी हे महत्व जाणले होते.आपण अशा अनेक राजांबद्दल ऐकतो जे अन्य प्रांतावर विजय मिळवल्यानंतर सोने, चांदी किंवा पशुधन घेऊन यायचे. मात्र राजेंद्र चोल हे गंगाजल आणल्याबद्दल ओळखले जातात. त्यांनी गंगाजल आणले होते. राजेंद्र चोल यांनी उत्तर भारतातून गंगाजल आणून दक्षिणेत ते स्थापित केले. "गंगा जलमयं जयस्तंभम्" ते पाणी इथे चोल गंगा सरोवरात प्रवाहित करण्यात आले जे आता पोन्नेरी सरोवर म्हणून ओळखले जाते.
मित्रहो,
राजेंद्र चोल यांनी गंगैकोंडा चोलपुरम कोविलची स्थापना केली होती. हे मंदिर आजही जागतिक स्तरावर स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्य मानले जाते. माता कावेरीच्या या भूमीवर गंगा मातेचा उत्सव साजरा होत आहे ही देखील चोल साम्राज्याची परंपरा आहे. मला खूप आनंद होत आहे की त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मृतीप्रित्यर्थ काशीवरून गंगाजल पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये आणण्यात आले आहे. आत्ताच मी पूजा करण्यासाठी तिथे गेलो होतो तेव्हा विधिवत अनुष्ठान संपन्न झाले , गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला आणि मी तर काशीचा लोकप्रतिनिधी आहे आणि माझे गंगा मातेशी एक भावनिक नाते आहे.
चोल राजांचे हे कार्य , त्यांच्याशी संबंधित हे आयोजन “एक भारत, श्रेष्ठ भारत” च्या महायज्ञाला नवी ऊर्जा , नवी शक्ती आणि नवी गती देतात.
मित्रहो,
चोल राजांनी भारताला सांस्कृतिक ऐक्याच्या सूत्रात गुंफले होते. आज आमचे सरकार चोल युगाच्या त्याच विचारांना पुढे नेत आहे. आम्ही काशी-तामिळ संगमम् आणि सौराष्ट्र-तामिळ संगमम् सारख्या आयोजनांद्वारे शतकानुशतके टिकून असलेली एकात्मतेची नाती अधिक मजबूत करत आहेत.
तामिळनाडूच्या गंगै-कोंडचोळपुरमसारख्या प्राचीन मंदिरांचे एएसआयमार्फत संरक्षण केले जात आहे. देशाच्या नव्या संसदेचे लोकार्पण झाले तेव्हा आपल्या शिव आधीनम् च्या संतांनी त्या आयोजन समारंभाचे आध्यात्मिक नेतृत्व केले होते, ते सारे लोक इथे उपस्थित आहे. तामिळ संस्कृतीशी निगडीत पवित्र सेंगोलचे संसदेत स्थापना करण्यात आली आहे. आजही त्या क्षणाचे स्मरण करतो तेव्हा माझे उर अभिमानाने भरून जाते.
मित्रांनो,
आत्ता मी चिदंबरम् च्या नटराज मंदिरामधील काही दीक्षितरांना भेटलो. त्यांनी मला या दिव्य मंदिरात, जिथे भगवान शिवाची नटराज रुपात पूजा केली जाते तेथील पवित्र प्रसाद भेट दिला. नटराजाचे हे रूप आपल्या तत्वज्ञान आणि वैज्ञानिक मूळाचे प्रतीक आहे. भगवान नटराज यांची अशीच आनंद तांडव मूर्ती दिल्लीतल्या भारत मंडपम् ची शोभा वाढवते आहे. याच भारत मंडपम् मध्ये जी -20 परिषदेदरम्यान जगभरातले दिग्गज नेते एकत्रित आले होते.
मित्रांनो,
भारताच्या संस्कृती निर्मितीमध्ये आपल्या शैव परंपरेने मोठी भूमिका निभावली आहे. आजही शैव परंपरेचे जीवित केंद्र असलेल्या या निर्मितीचे चोल सम्राट मुख्य वास्तुनिर्मितीकार होते, त्यामध्ये तामिळनाडू महत्त्वाचे आहे. महान नयनमार संतांची परंपरा, त्यांचे अध्यात्मिक साहित्य, तामिळ साहित्य, आपल्या पूजनीय आधीनम् यांची भूमिका, त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एका नव्या युगाला जन्म दिला आहे.
मित्रांनो,
आज जग जेव्हा अस्थिरता, हिंसा आणि पर्यावरण सारख्या समस्यांना तोंड देत आहे, तेव्हा शैव सिद्धांत आपल्याला त्याच्यावरील उपायांचा मार्ग दाखवते. तिरुमूलरने लिहून ठेवलेले होते - "अन्बे शिवम्", म्हणजेच प्रेम म्हणजेच शिव. प्रेम म्हणजे शिव! आज जर जगाने हा विचार स्वीकारला तर, बहुतांश पेचप्रसंग आपोआप सुटतील. याच विचाराला भारत, एक जग, एक कुटुंब, एक भविष्य या रूपात पुढे आणतो आहे.
मित्रांनो,
आज भारताची वाटचाल विकासही आणि परंपरादेखील या मंत्रावर आधारित सुरू आहे. भारताला आज आपल्या इतिहासाविषयी अभिमान वाटतो. गेल्या एका दशकामध्ये आपण देशाच्या परंपरांच्या संरक्षणासाठी प्रामुख्याने काम केले आहे. देशातील प्राचीन पुतळे आणि शिल्प, ज्यांची चोरी करून परदेशात विकण्यात आले होते, ते परत आणले आहेत. 2014 नंतर जगभरातल्या विविध देशांतून 600 हून अधिक प्राचीन कलाकृती, मूर्ती भारतात परत आणल्या आहेत. त्यापैकी 36 वस्तू आपल्या तामिळनाडूतल्या आहेत. आज नटराज, लिंगोद्भव, दक्षिणमूर्ती, अर्धनारीश्वर, नंदीकेश्वर, उमा परमेश्वरी, पार्वती, सम्बन्दर अशा अनेक महत्त्वाच्या वारसा मूर्ती आपल्या भूमीची शोभा वाढवत आहेत.
मित्रांनो,
आपला वारसा आणि शैव तत्वज्ञानाचा प्रभाव आता केवळ भारत किंवा याच पृथ्वीपुरता मर्यादित राहिलेला नाही. जेव्हा भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश झाला, तेव्हा चंद्रावरील त्या बिंदूलाही शिवशक्तीचे नाव दिले. चंद्राच्या त्या प्रमुख भागाची ओळख आणि शिव-शक्ती नावाने होते.
मित्रांनो,
चोल काळात भारताने ज्या आर्थिक आणि सामरीक प्रगतीचे शिखल गाठले होते, ते आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. राजराजा चोल याने शक्तिशाली नौदल स्थापन केले. राजेंद्र चोल ने त्याला आणखी भक्कम केले. त्याच्या कारकीर्दीत अनेक प्रशासकीय सुधारणा करण्यात आल्या. त्यांनी स्थानिक प्रशासकीय संस्थेलाही भक्कम केले. एक भक्कम महसूल व्यवस्था लागू केली. व्यापारी प्रगती, समुद्री मार्गांचा वापर, कला आणि संस्कृतीचा प्रचार, प्रसार यामुळे भारताची प्रत्येक दिशेने वेगाने प्रगती होत होती.
मित्रांनो,
चोल साम्राज्य, नव्या भारताच्या उभारणीत एक प्राचीन आराखड्याप्रमाणे आहे. आपल्याला विकसित राष्ट्र निर्माण करायचे असेल तर एकतेवर भर द्यावा लागेल, असे तो सांगतो. आपल्या देशाच्या नौदलाला, संरक्षण दलाला भक्कम करावे लागेल. नव्या संधीही आपल्याला शोधाव्या लागतील. या सर्वांबरोबरच, आपल्याला मूल्यदेखील जपावी लागणार आहेत. आणि देश आज याच प्रेरणेसह प्रगती करत आहे, याचे मला समाधान आहे.
आज भारत,स्वतःच्या सुरक्षेला अत्यंत महत्त्व देतो. आताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वावर जर कोणी हल्ला करत असेल तर भारत त्याला कसे उत्तर देतो हे जगाने पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूरने हे दाखवून दिले की भारताच्या शत्रूंसाठी, दहशतवाद्यांसाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही. आणि आज जेव्हा मी विमानतळावरून इथे येत होतो तेव्हा 3-4 किलोमीटर अंतर कापून येत होते, आणि अचानक एक मोठी पथफेरी दिसली आणि ते सर्वजण ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करत होता. ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण देशभरात एक नवी चेतना जागृत केली आणि एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे आणि जगालाही भारताची ताकद स्वीकारावी लागली आहे.
मित्रांनो,
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, राजेंद्र चोल ने गंगै-कोंडचोळपुरमची निर्मिती केली, तेव्हा त्याचा कळस तंजावूरच्या बृहदेश्वर मंदिरापेक्षा लहान ठेवला. त्यांना आपल्या वडिलांनी बांधलेले मंदिर सर्वांत उंच ठेवायचे होते. राजेंद्र चोल यांनी कीर्तीवान असून विनम्रता दर्शवली. आजचा नवा भारतही याच भावनेतून पुढे जात आहे. आपण सतत बलवान होत आहोत, परंतु आपली भावना ही विश्वबंधुत्वाची आहे, विश्व कल्याणाची आहे.
मित्रांनो,
आपल्या वारशाच्या अभिमानाची भावना पुढे नेत, मी आज इथे आणखी एक संकल्प सोडतो. येत्या काळात, आम्ही तामिळनाडूमध्ये राजराजा चोल आणि त्यांचे सुपुत्र आणि महान शासक राजेंद्र चोल पहिले, यांच्या भव्य पुतळ्यांची स्थापना करू. आपल्या ऐतिहासिक जाणीवेचे ते आधुनिक आधारस्तंभ होतील.
मित्रांनो,
आज डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. विकसित भारताचे नेतृत्व करण्यासाठी आपल्याला डॉक्टर कलाम, चोल राजांसारख्या लाखो तरूणांची गरज आहे. शक्ती आणि भक्ती ने भारलेले असे तरूण 140 कोटी देशवासियांची स्वप्नपूर्ती करतील. आपण सर्वजण एकत्रितपणे एक भारत श्रेष्ठ भारत हा संकल्प पुढे नेऊ या. याच भावनेतून, मी पुन्हा एकदा या प्रसंगी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद.
माझ्यासमवेत म्हणा,
भारत माता की - जय
भारत माता की - जय
भारत माता की- जय
वणक्कम!
* * *
सोनल तुपे/सुषमा काणे/ विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2150289)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam