रेल्वे मंत्रालय
‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेअंतर्गत भारतीय रेल्वे, डबे, इंजिन आणि संचालन प्रणालीचा जागतिक निर्यातदार म्हणून वेगाने उदयास येत आहे: अश्विनी वैष्णव
Posted On:
27 JUL 2025 7:30PM by PIB Mumbai
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुजरात मधील वडोदरा येथील अल्स्टॉम कंपनीच्या सावली येथील उत्पादन केंद्राला भेट दिली. हे केंद्र भारतातील रेल्वे रोलिंग स्टॉकसाठी एक महत्त्वपूर्ण उत्पादन केंद्र आहे. त्यांनी सावलीतील अल्स्टॉमच्या कार्यपद्धतींचे परीक्षण केले आणि देखभाल प्रक्रियेच्या दृष्टीने त्याची सखोल पाहणी केली. त्यांनी प्रत्येक ऑर्डरसाठी सानुकूल उपाययोजना आरेखन करण्याच्या अल्स्टॉमच्या उपक्रमाचे कौतुक केले, ज्याचे अनुकरण भारतीय रेल्वेने करावे अशी शिफारस देखिल त्यांनीं केली तसेच ‘गती शक्ती विद्यापीठा’बरोबर एक संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याचा प्रस्तावही मांडला.

सावली केंद्र ही अत्याधुनिक प्रवासी आणि ट्रांझिट ट्रेन कोचेस तयार करत आहे, आणि ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या भारत सरकारच्या उपक्रमांशी कटिबद्ध आहे. नाविन्यपूर्णता आणि उत्कृष्ट उत्पादन यावर भर देत, भारतातील 3,400 पेक्षा अधिक अभियंते अल्स्टॉमच्या जगभरातील 21 केंद्रांसोबत सहकार्य करत आहेत. 2016 पासून भारताने 1,002 रेल्वे डबे विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी यशस्वीपणे निर्यात केले असून, भारत आधुनिक रेल्वे प्रणालींसाठी एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून उदयास येत आहे. यापैकी 450 डबे सावली येथे तयार होऊन ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड मेट्रो प्रकल्पासाठी निर्यात करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या रेल्वे घटकांची निर्यात
सावली केंद्राने आतापर्यंत जर्मनी, इजिप्त, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील यासारख्या देशांमध्ये 3,800 पेक्षा अधिक बोगी यशस्वीपणे निर्यात केल्या आहेत. तसेच व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे 4,000 पेक्षा अधिक फ्लॅटपॅक्स (मॉड्युल्स) पुरवले आहेत.जे भारतामध्ये डिझाइन केलेले आणि अनेक देशांमध्ये यशस्वीपणे बसवले गेले आहेत.
सध्या भारत 27 आंतरराष्ट्रीय सिग्नलिंग प्रकल्पांचे नेतृत्व करत आहे आणि जगभरातील आणखी 40 प्रकल्पांना तांत्रिक पाठबळ पुरवित आहे. बेंगळुरूतील डिजिटल एक्सपीरियन्स सेंटर नवकल्पनांचा केंद्रबिंदू असून, 120 हून अधिक प्रकल्पांना डिजिटल सिग्नलिंग, आयओटी, एआय, ब्लॉकचेन आणि सायबरसुरक्षा यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित समर्थन देत आहे.
“डिझाईन, डेव्हलप आणि डिलिव्हर फ्रॉम इंडिया टू द वर्ल्ड” या दृष्टीकोनांतर्गत भारताच्या रेल्वे उत्पादनांची निर्यात वाढत आहे.
मेट्रो कोचेस: ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथे निर्यात केले गेले.
बोगी: ग्रेट ब्रिटन, सौदी अरेबिया, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्यात आले
संचालन प्रणाली व्यवस्था: फ्रान्स, मेक्सिको, रोमानिया, स्पेन, जर्मनी आणि इटली यांना पुरवले गेले.
प्रवासी डबे: मोझांबिक, बांगलादेश व श्रीलंका यांना वितरित केले गेले.
इंजिन्स: मोझांबिक, सेनेगल, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश आणि गिनी प्रजासत्ताक येथे निर्यात केले गेले.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
सावली परिसरात एक सक्षम पुरवठादारांचे जाळे उभे राहिले असून हे उत्पादन परिसंस्थेला पाठबळ पुरवत आहे.
माध्यमांशी बोलताना, केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी सांगितले की, “मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड” या उपक्रमांचा प्रभाव रेल्वे उत्पादन क्षेत्रात स्पष्टपणे दिसून येत आहे. विविध देशांमध्ये रेल्वे भागांची निर्यात होत असून भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होत आहेत. तसेच, भारतीय अभियंते आणि कामगार आता आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम करण्याचा अनुभव मिळवत आहेत, ही बाब ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या यशाचे ठोस उदाहरण आहे.
***
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2149150)